वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

अजंठा लेणी

२ प्रतिक्रिया

सह्याद्री पर्वताच्या सातमाळा डोंगर रांगेतील नालेचा आकार असलेल्या एका डोंगर उतारावर या गुंफा खोदण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एकूण ३० लेणी असून ती इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून इ. स. नंतरचे पाचवे शतक अशा सुमारे ८०० वर्षांच्या काळात खोदण्यात आली आहेत. या लेण्यांमध्ये मुख्यत: चैत्य, प्रार्थना मंदिरं, सभागार, विहार आणि मठांची व्यवस्था आहे.

इ. स. १८१९ मध्ये एक ब्रिटीश क्रॅप्टन जॉन स्मिथ या परिसरातील गर्द जंगलात शिकारीसाठी आला असताना जंगलाने व्यापलेल्या या गुंफा अचानक त्याच्या नजरेस आल्या.

अजंठ्याच्या निर्मितीस सुमारे 700 वर्षे लागली आणि ती ख्रिस्तानंतर सुमारे पाच शतके सुरू होती. ह्या गुफा प्रसिध्द आहे त्या त्यात असलेल्या सौंदर्यपूर्ण मूर्तींमुळे, स्तूपांमुळे, कलाकृतिपूर्ण चित्रांमुळे, त्यांच्या भव्यतेमुळे आणि प्राचीनतेमुळे. “युनेस्को’ने त्यांचे माहात्म्य ओळखून 1983 मध्ये त्यांना जगातील “अमूल्य वास्तूं’च्या यादीत समाविष्ट केले. या गुहांवर आणि त्यांत आढळणाऱ्या विविध कलांवर अनेक पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी कित्येक दशके संशोधन केले. केवळ भारतातीलच नव्हे; तर युरोप आणि अमेरिकेतून अत्यंत नामांकित तज्ज्ञांनी येथे येऊन आपल्या या ऐतिहासिक आणि एकमेवाद्वितीय अशा ठेव्याबद्दलचे आपले ज्ञान वृद्धिंगत केले. वॉल्टर स्पिंक हे मिशिगन विद्यापीठाचे इतिहास संशोधक गेली सुमारे पन्नास वर्षे अजंठामधील चित्रे आणि मूर्तींवर संशोधन करीत आहेत. दर वर्षी जूनच्या दरम्यान ते विद्यार्थ्यांसाठी या गुंफांमध्ये चर्चासत्र आयोजित करतात. आज वयाची ऐंशी वर्षे ओलांडलेल्या या वृद्ध तपस्व्याला पाहून मन आदराने भरून येते. आजही त्याच्या अजंठा”वाऱ्या’ सुरू आहेत आणि अनेक नशीबवान परदेशी; तसेच भारतीय विद्यार्थी त्यांच्या सखोल ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ घेत आहेत.

अजंठा – खगोलीय दृष्टिकोनातून निरीक्षणे

अजंठा हा एकूण 30 बौद्ध गुंफांचा समुदाय आहे. या सर्व गुंफा दगडातून वरून खाली कोरून काढल्या आहेत. वरून पाहता हा सर्व समुदाय एखाद्या प्रचंड घोड्याच्या नालाप्रमाणे दिसतो. यापैकी पहिल्या दोन गुंफांमध्ये मुख्य मूर्तीशिवाय अनेक भित्तिचित्रे आहेत. पद्मपाणी आणि वज्रपाणी ही केवळ अप्रतिम समजली जाणारी रंगीत चित्रे येथे आजही पाहता येतात. अजंठामधील हे प्रसिद्ध विहार आहेत. याउलट 26 क्रमांकाची गुंफा प्रसिद्ध चैत्य आहे. या दोन गुंफा समोरासमोर आहेत. आमचे निरीक्षण येथून सुरू झाले. “गंमत म्हणजे पहिली गुंफा 21 जूनच्या सूर्योदय रेषेशी जवळजवळ समांतर आहे, हे आमच्या ताबडतोब लक्षात आले. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी जेव्हा ती कोरली गेली तेव्हा असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राशी ती शून्य अंशाचा कोन करीत असावी. याउलट तिच्या विरुद्ध दिशेत असलेले चैत्य 22 डिसेंबरच्या सूर्योदयरेषेशी खूपच समांतर आहे. हे चैत्य त्या सुमारास असलेल्या पौर्णिमेच्या चंद्राशी शून्य अंशात असावे, असे नवीन निरीक्षण पुढे आले. त्यामुळे मग पौर्णिमेला उगवत्या चंद्राचा प्रकाश बुद्धप्रतिमेवर पडत असावा. बौद्ध धर्मात चंद्राच्या पौर्णिमांना खूपच महत्त्व असल्यामुळे कदाचित प्राचीन भिख्खूंनी गुहांची रचना अशा प्रकारे केली असेल काय?

ज्या डोंगरात ही लेणी खोदण्यात आली आहेत. त्यांच्या माथ्यावर एक जलौघ असून त्याचे पाणी एका नैसर्गिक कुंडात साठवले जाते. या कुंडास सप्तकुंड असे म्हणतात. क्र. ९ व १० च्या लेण्यात चैत्यगृहे आहेत. ८, १२, १३ व १५ क्रमाकांच्या लेण्यांचाही मठ किंवा प्रवचने यासारख्या धार्मिक कर्मासाठी उपयोग होत असावा. लेणी क्र. १, २, १६, १७, १९ व २६ या सुद्धा अशाच कार्यासाठी तयार करण्यात आली असावीत. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध आणि बुद्ध जीवन शिल्प व चित्रकलेद्वारे चितारण्यात आले आहे. लेण्यांमध्ये चितारण्यात आलेली रंगीत चित्रे तर अतिशय अप्रतिम आहेत. शेकडो वर्षे उलटूनही त्यातील रंग मात्र अजूनही उबदार आहेत. बुद्धावतार, जातककथा असे बुद्धजीवनाशी निगडित प्रसंग येथे कलात्मकतेने चित्रित केलेले आहेत. बोधीसत्व पद्मपाणी, आकाशगामी अप्सरा, बुद्धाचे सहस्त्रावतार, नृत्यगायन करणाऱ्या अप्सरा, पत्नीकडे भिक्षेची याचना करणारा बुद्ध, राजसभा आदि चित्रे खरोखरीज अद्वितीय आहेत. गुंफांमध्ये चितारलेली रंगीत चित्रे आणि शिल्पचित्रे भव्य तर आहेतच पण त्यातील भाव, नाट्य, बांधेसूदपणा, लय आणि गति यामुळे सर्व कलाकृतींना कमालीचा जिवंतपणा आलेला आहे.

अजंठा गुफांच्या देखभालीची जबाबदारी जपानच्या गव्हर्नमेंटने उचलली आहे आणि तेंव्हापासुन ह्या जागेचा कायापालटच झाला. सर्व ठिकाणी स्वच्छ स्वच्छतागृह आहेत. पर्यटकांच्या वाहनांपासुन प्रदुषणाचा धोका असल्याने डोंगराच्या पायथ्याशीच वाहनं लावावी लागतात. तेथुन लेण्यांपर्यंत महाराष्ट्र पर्यटनाच्या बसेस आहेत. बहुतांश जागा ह्या स्वच्छ आहेत. लेण्या चालायला आणि चढ-उताराच्या पायऱ्यांच्या असल्याने जागोजागी कुलरच्या थंडगार पाण्याची व्यवस्थाही आहे.

अजंठा गुफांचे काही फोटो –

माहीतीचा स्त्रोत – सकाळ आणि मायमराठी.कॉम

संबंधित लेखन

PG

अनिकेत

संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो.

मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा ह्या नावाने ब्लॉग चालवतो.

  1. अनिकेत, फोटोज व माहिती दोन्ही उत्तम! अजून असेच छान विषयांवर लिहिण्यासाठी शुभेच्छा! 🙂

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME