वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

अध्यात्मिक आनंद आणि सात्विक सुख

४ प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

पुणे,

दिनांक —

चि. श्रीधर यास अनेक आशिर्वाद,

— माझी तब्येत अतिशय तंदुरुस्त आहे. अजिबात काळजी करु नये. मी इथे आल्यापासून चि. – आणि चि.सौ. – या दोघांना आपल्या कामावर जोरात लक्ष देता येत असल्याने ती दोघे आनंदी आहेत. घरातील दोन लहान मुलेही आजी घरात आल्यापासून दररोज शाळेतून आल्यावर मनपसंद गरमागरम खाणे मिळत असल्याने लाडावलेली आहेत. त्यांचा निरागस आनंद बघून मलाही खूप आनंद होतो. लहान मुलांना वाढताना बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आपल्या डोळ्यासमोर जणू त्यांच्या जीवनाच्या घड्याला आकार येत आहे असे वाटते! कामे आवरल्यावर वेळ मिळत असल्याने माझी साधनाही उत्तम चालू आहे. भगवंताच्या कृपेची क्षणोक्षणी जाणीव होत असल्याने मनात भक्‍ती उदयास यायला लागली आहे असे वाटते. माझ्यासारख्या शंकेखोर बाईच्या जीवनात आयुष्याच्या संध्याकाळी अशी अवस्था येईल असे कधी वाटले नव्हते. भक्‍तीशिवाय आनंद मिळत नाही ही संतांची उक्‍ती मनाला पटायला लागली आहे. ही सर्व सद्‌गुरुकृपाच म्हटली आहे. माझी सध्याची ही आनंदी अवस्था खास सांगावी असे वाटले म्हणून हा पत्र लिहीण्याचा खटाटोप! असो.

घरातील सर्वांना शुभाशिर्वाद,

तुझी

आई


बंगलोर,

दिनांक —

ती. आईंस, सा.न.,

आपले पत्र मिळाले. तुमची तब्येत आता बरी असल्याचे वाचून खूप आनंद झाला. आपल्या माणसांच्या प्रेमळ सहवासाने सगळ्या व्याधी नष्ट होतात! आपल्या मनात उद्भवलेल्या भगवंतभक्‍तीबद्दल हार्दीक अभिनंदन. आपली श्रध्दा उत्तरोत्तर गाढ होत जावो अशीच सद्‌गुरुचरणी प्रार्थना. आपणास जाणविणाऱ्या आनंदाबद्दल दोन शब्द लिहावेसे वाटतात. आपली ‘शंकेखोर वृत्ती’ पणाला लावून या शब्दांवर आपण विचार करावा अशी माझी विनंती आहे.

असे बघा: स्वतःची तब्येत, मुलांचे सुख, नातवंडांचा आनंद इत्यादी निकषांवर (म्हणजेच भूतकाळात ठाम केलेल्या परीमाणांवर) आधारीत असलेले आपले सुख आणि संतांच्या उक्‍तीमधील अभिप्रेत असलेला ‘आनंद’ फार वेगळे आहेत. जरा विचार करा की समजा तुम्ही घरी एकट्याच असताना चि. – ने उपद्व्यापीपणा करुन सायकलच्या फिरत्या चाकात बोट घालून स्वतःला इजा करुन घेतली तर त्याला रुग्णालयात नेताना तुमच्या मनात आनंद असेल का सगळे व्यवस्थित चालू असताना या कारट्याने का असे केले हा उद्वेग मनात असेल? किंवा तुमच्या मुलाच्या मनात भरपूर काम करुनही कामात बढती मिळाली नाही याचे दुःख आहे याची जाणीव तुम्हाला झाली तर तुमच्या मनातील आनंद तसाच राहील का? स्वतःच्या जीवनात दुसऱ्याला मदत करीत असताना सर्व व्यवस्थित चाललेले आहे याची जाणीव होऊन जो आनंद उत्पन्न होतो त्याला सात्विक सुख म्हणतात. ‘भक्‍तीतून आनंद प्राप्त होतो’ या संतांच्या उक्‍तीतील आनंद सर्व गुणांच्या पलिकडील आहे म्हणून या दोघांची तुलनादेखील होऊ शकत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे श्रीसंत गोरा कुंभारांना भगवंताच्या प्रेमाच्या नादात नाचताना झालेला आनंद स्वतःच्या पायदळी आपले रांगते मूल चिरडले गेले आहे याची जाणीव झाल्यावर देखील नष्ट झाला नाही हे आहे. मनासारखे घडल्याने उत्पन्न झालेली भगवंताबद्दलची ‘कृतज्ञता’ आणि या जगात जे काही चाललेले आहे ते सर्व (आणि सर्व म्हणजे खरोखर सर्व!!) किती सुंदर आहे याची जाणीव झाल्याने उत्पन्न झालेला निर्हेतुक ‘आनंद’ यातील फरक स्वानुभवाने जाणणे ही खरी सद्‌गुरुकृपा आहे. आपणास ती प्राप्त होवो ही सदीच्छा!!

येथील बाकी सर्व ठीक. आपला कृपाशिर्वाद असाच असू द्यावा. कळावे.

आपला

श्रीधर

संबंधित लेखन

 • वर्गवारी करण्याची सवय
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
  खिशात हात घालून त्या निर्मनुष्य रस्त्यावर स्वतःच्या…
 • गीतेमधील मैत्रभाव: एक चिंतन
  ॐ श्री सदगुरू स्वामी माधवनाथाय नमः | ॐ श्री सदगुरू स्वामी मकरंदनाथाय नमः
  अद्वेष्टा सर्वभूतानां म…
 • प्रतिमा करण्याचा छंद
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

  अत्यंत उच्चभ्रू लोकांच्या निवासस्थानांभोवताली एक …

 • आयुष्याला आकार देण्याची धडपड
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  दिवस कलंडायला लागल्याने सूर्याचा ताप कमी व्हायला सु…
 • नात्यांतील अस्थिरता
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  त्याची गाडी जुनी होती पण अतिशय सुंदररीत्या काळजी घे…
PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

 1. मान्यवर,
  खुप प्रासादीक आणि उद्‍बोधनपर लिहीलं आहे आपण.. भक्तीतला आनंद हा काही औरच असतो. स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग आहे. त्यात ते म्हणतात “सोडवेना मज नित्य नवी गोडी” किंवा जसं तुकोबांनी म्हटलंय “गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ”…
  हा अनुभवाचा विषय.

 2. shashank purandare म्हणतात:

  श्रीधर् जी,
  सन्ताना अभिप्रेत असलेला “निर्विशय आनन्द ” आपण अगदी योग्य शब्दात सान्गितलात त्याबद्द्ल आपले आभार मानावे तेवढे थोडेच. खूपच सुन्दर.
  shashank

 3. स्वतःच्या जीवनात दुसऱ्याला मदत करीत असताना सर्व व्यवस्थित चाललेले आहे याची जाणीव होऊन जो आनंद उत्पन्न होतो त्याला सात्विक सुख म्हणतात.
  swatha dukhi asatana hi dusaryachya sukhasaathi dhadapane,tyana madat karane he hi satwik sukhatacha modat naahi kaa?
  chhan !
  NY-USA

 4. श्रीराम…
  श्री. श्रीधरजी नमस्ते ……
  खूप सुंदर लिहिले आहे ,भक्ती चा हा अनुभव खूप सुंदर आहे .
  जेथे जातो तेथे तू माझा संगती चालविशी हाती धरो-निया …
  या आनंदात श्री सद -गुरु ठेवतात या भाग्यवंताला अजून काय हवे ….
  मुकुंद =जो आनंदाचा कंद -कुलकर्णी ,धुळे

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME