वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

आंतरजाल (Internet) – भाग १

१० प्रतिक्रिया
Internet

आंतरजाल (माहितीजाल)

तंत्रज्ञान शाखेचा आवाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेतील व्यक्तीला तंत्रज्ञानाबद्दल थोडीशी का असेना, पण माहिती असायलाच हवी. मी स्वतः माहिती तंत्रज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्याने प्रत्येकाला समजतील अशा भाषेत मी काही महत्वपूर्ण गोष्टींबद्दल इथे थोडक्यात माहिती देत आहे. ही माहिती निश्चितच सर्वांना उपयोगी पडेल अशी मला आशा आहे.

१) ऍक्सेस पॉईण्ट: बिनतारी लॅन (Wireless LAN) किंवा मोबाईल इंटरनेट सुविधांमध्ये, ऍक्सेस पॉईण्ट ही एक प्रणाली असते ज्याद्वारेच एखाद्या संस्थेमधील संगणकीय जाळ्यामधील (नेटवर्क) वापरकर्ते, संबंधित माहितीची देवाण-घेवाण(transmit-receive) करण्यास सक्षम असतात. जर एकाच ऍक्सेस पॉईण्टद्वारे नेटवर्कमधील सर्व जोडलेली साधने व्यापली जात नसतील तर एकापेक्षा अधिक ऍक्सेस पॉईण्ट्स वापरले जातात. जर एखादा वापरकर्ता पहिल्या ऍक्सेस पॉईण्ट्च्या ठरवून दिलेल्या आवाक्याच्या (range) बाहेर गेला असेल तर पुढील अन्य ऍक्सेस पॉईण्ट प्रणाली त्या वापरकर्त्यास लागू पडते. शिवाय ऍक्सेस पॉईण्टचा उपयोग बिनतारी लॅनला अगोदरच प्रस्थापित असलेल्या तारीय (wired) लॅन नेटवर्कला जोडण्यासाठी सुद्धा केला जातो.

२) बँडविड्थ: माहिती वाहक माध्यमांद्वारे वापरला जाणारा फिक्वेन्सींचा  (वारंवारिता, पुनरावृत्ती?) एक निश्चित आकाराचा समुह किंवा फ्रिक्वेन्सी पट्टी (frequency band) म्हणजेच बँडविड्थ होय. फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रति सेकंदाला किती वेळा एक बिट (bit) माहिती वाहक माध्यमात पाठवली जाते, याची गणना होय. म्हणजेच जर बँडविड्थ वाढली तर माहिती वहनाचा वेग सुद्धा वाढेल. तारीय व बिनतारी अशा दोन्ही प्रकारच्या नेटवर्क (लॅन, मोबाईल जोडण्या इत्यादी) जोडण्यांसाठी, ज्या एका विशिष्ट मर्यादेतील फ्रिक्वेन्सी बँड वापरतात, त्यांना ही बाब लागू पडते. सामान्यतः बँडविड्थ दर्शवितांना त्याचे एकक म्हणून हर्ट्झ (Hz) वापरतात, पण काही अंकात्मक (digital) प्रणाल्यांमध्ये ते बिट्स प्रति सेकंद अशा प्रकारेही दर्शविले जाते, जे की माहिती वहनाचे मुळ प्रमाण आहे. बँडविड्थच्या आधारानेच एखादी नेटवर्क जोडणी ब्रॉडबँड (रुंद)आहे की नॅरोबँड (अरुंद) आहे हे ठरवले जाते. जास्त बँडविड्थ असणार्‍या जोडण्यांना ब्रॉडबँड असे म्हटले जाते, तर तुलनेने कमी बँडविड्थ असणार्‍या जोडण्या नॅरोबँड असतात. आंतरजालीय सुविधा पुरविणारे (ISPs) नेहमी त्यांच्या एखाद्या पॅकेजची जाहिरात करतांना त्या पॅकेजद्वारे उपलब्ध असणार्‍या बँडविड्थच्या मदतीने माहिती दर्शवितात, अर्थात तेवढ्या जास्तीत जास्त वेगाने एखादा वापरकर्ता त्यांची सुविधा वापरू शकतो.

BlueTooth

ब्ल्युटूथ

३) ब्ल्युटूथ: ब्ल्युटूथ हे एक औद्योगिक तपशीलवार दिशा-निर्देश (नियम किंवा प्रोटोकॉल) आहे जे विविध इलेक्ट्रॉनिक प्रणाल्या आणि यंत्रांना एकसंधपणे सोबत काम करण्याची परवानगी देते. उदाहरणार्थ. तुमचा मोबाईल फोन हा ब्ल्युटूथद्वारे तुमच्या टिव्ही, स्टिरीओचे रीमोट होऊ शकतो, किंवा तुमच्या घरच्या टेलिफोनसाठीचा वायर नसलेला फोन म्हणून काम करू शकतो. ब्ल्युटूथ प्रणाल्या या अतिशय स्वस्त असलेल्या देवाण-घेवाण चिपचा (transceiver chips) वापर करून २.४५ गिगाहर्ट्झ (GHz) इतक्या फ्रिक्वेन्सीवर संवाद साधू शकतात. प्रत्येक ब्ल्युटूथ प्रणालीला एक ४८ बिटचा पत्ता दिलेला असतो ज्याद्वारे त्या प्रणाल्या एकमेकांशी सामान्यतः १० ते २० वर्ग मीटर च्या क्षेत्रफळामध्ये संवाद शाधू शकतात. ब्ल्युटूथचा वापर करून माहितीची देवाण-घेवाण आणि बिनतारी संदेशवहन व बिनतारी इंटरनेट जोडण्या केल्या जातात. संरक्षणासाठी ब्ल्युटूथमध्ये अगोदरच माहिती विशिष्ट पद्धतीने कोड-डिकोड करण्यासाठी, तसेच संवाद करण्यासाठी असलेल्या दुसर्‍या प्रणालींना किंवा यंत्रांना (ब्ल्युटूथ असलेल्या) ओळखण्यासाठी संरचना तयार केलेली असते.

WAP

WAP

४) WAP (Wireless Application Protocol):

 • बिनतारी प्रणाल्या आणि मोबाईल वापरणार्‍यांना विविध सुविधा आणि इतर आंतरजालीय माहिती मिळवण्यासाठी वॅप (WAP) ही एक वैश्विक, मुक्त नियमावली आहे.
 • ही संकल्पना एरिक्सन, नोकिया, मोटोरोला आणि अनवायर्ड प्लॅनेट यांनी मांडली होती व आता याचा जगभरातील अब्जावधी लोक उपभोग घेत आहे.
 • सध्या WAP 2.0 ह्या नियमावलीचा वापर करून इंटरनेट सुविधा पुरविली जाते.
TCP/IP

TCP/IP

५) TCP/IP:

 • TCP/IP हे Transmission Control Protocol / Internet Protocol याचे संक्षिप्त रूप आहे. हा प्रोटोकॉल काही सामान्य व महत्वाच्या नियमांचा संच आहे, जो आजचे बहुतेक सर्वच नेटवर्क्स वापरतात. या नियमावलीमध्ये मुख्यतः दोन भाग आहेत, ज्यामध्ये TCP हा मोठा या नियमावलीचा वरिष्ठ भाग घडवतो तर IP हा कनिष्ठ भाग तयार करतो. TCP हा नेटवर्कवरील माहिती पॅकेट्सच्या वहनाचे काम पाहतो शिवाय मुळ पॅकेट हे इच्छित स्थळाशी संबंधित आहे की नाही, याबद्दल खात्रीशीरपणे लक्ष ठेवतो. या आज्ञावलीचा कनिष्ठ भाग, म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल (IP) हा प्रत्यक्ष नेटवर्कच्या नजीक असतो व पॅकेटच्या पत्त्यासंबंधित बाबींकडे लक्ष ठेवतो.
 • TCP/IP नेटवर्कवरील प्रत्येक स्थळाच्या जोडणी बिंदूला (node) एक विशिष्ट पत्ता दिलेला असतो, त्याला IP address असे म्हणतात. हा पत्ता हस्तलिखित सुद्धा असू शकतो, म्हणजे जर तो एखाद्या नेटवर्क किंवा सिस्टिम मशीनला दिला तर ती मशीन जेव्हा नेटवर्कवर चालू होईल तेव्हा तो पत्ता कार्यरत होतो. याशिवाय पत्ते देण्याची अजुन एक पद्धत आहे ती म्हणजे Dynamic IP allocation. यासाठी एक तंत्रज्ञान वापरले जाते, ज्याला Dynamic Host Configuration Protocol (DHCP) असे म्हणतात. जेव्हा तुम्ही डायल-अप मोडेम वापरून इंटरनेटशी जोडणी करता त्यावेळी ही पद्धत वापरली जाते. तुमच्या इंटरनेट सुविधा पुरविणार्‍या (ISP) चे DHCP सर्व्हर तुम्ही वापरत असलेल्या सिस्टिमला डायनामिकलि एक IP address लेबल करते, ज्याद्वारे तुमच्या सर्व घडामोडींवर नजर ठेवली जाते.
 • सध्या पत्ते देण्याची सामान्यतः वापरली जाणारी योजना म्हणजे IPv4. यामध्ये आंतरजालावरील, प्रत्येक नेटवर्कवरील, प्रत्येक सिस्टीमला (प्रणाली) एक युनिक (विश्वातील एकमेव असा) अंकिय पत्ता देण्यात येतो, जो चार टिंबांनी विलग केलेला असतो.  उदा. 162.122.111.67 – या उदाहरणात प्रत्येक क्रमांक हा एका टिंबाने वेगळा केलेला आहे आणि त्याची मर्यादा 0 ते 255 यामध्ये असते. या पत्त्यांमध्ये विशिष्ट नेटवर्कवरील नोडचा पत्ता, नेटवर्कचा पत्ता, IP वर्ग इत्यादी. माहिती साठवलेली असते.
 • काही दिवसांनी IPv4 मध्ये येणार्‍या काही मर्यादा व अडचणी सुधारण्यासाठी IPv4 च्या जागी IPv6 ही पत्ते देण्याची नविन पद्धत लागू होणार आहे.

LAN

Local Area Network (LAN)

६) Local Area Network (LAN): Local Area Network (LAN) – लॅन हा एक तारीय किंवा बिनतारी माध्यमाने जोडलेल्या संगणकांचा एकत्रितपणे समुह असतो. हा समुह एका इमारतीमध्ये मध्ये किंवा कॅम्पसमध्ये फैलावलेला असू शकतो. नेटवर्कवर २ वापरकर्त्यांपासून ते हजारो वापरकर्ते असू शकतात.एकाच इमारतीमध्ये असलेल्या लॅनवरील वैयक्तिक संगणकांना (PCs) जोडण्यासाठी इथरनेट (Ethernet) आणि मॅकिन्टोश प्रणाल्यांना जोडण्यासाठी Apple Talk ही तंत्रज्ञाने वापरली जातात.

लॅनची काही ठळक वैशिष्ट्ये:

 • Topology – नेटवर्कवरील साधने व प्रणाल्या एका विशिष्ट रचनेने मांडण्याच्या पद्धतीला टोपोलॉजी असे म्हणतात. Tree, Ring, Star, इत्यादी ही काही लॅन टोपोलॉजीची त्यांच्या आकाराआधारे व रचनेच्या आधारे असलेली उदाहरणे आहेत.
 • नियमावल्या (Protocols) – हे नेटवर्कवरील नोड्सद्वारे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी बनवलेले असंख्य नियमांचे संच असतात.
 • माध्यम (Media) – तारीय (wired) नेटवर्क्समध्ये नोड्सना भौतिकरित्या जोडण्यासाठी हे माध्यम वापरले जाते.

काही शंका, प्रश्न?

संबंधित लेखन

 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • काही लिनक्स कमांड्स – भाग २
  मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामु…
 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

 • आंतरजाल (Internet) – भाग २

  १) मोडेमः
  मोडेम (MODEM) हा शब्द MOdulator आणि DEModulator यांचे मिळून संक्षिप्त रुप आहे. साम…

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. मला जर काही नेट्चे आंतर्जालाबद्दल शंका आल्या तर आपणाशी मेलवर संपंक केला तर चालु शकेल का?

 2. तांत्रिक माहिती अतिशय सोप्या भाषेत मांडलीस, मला LAN करताना MAC साठी apple talk वापरतात हे माहित नव्हत. एकूणच लेख माहितीपूर्ण आहे.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME