वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

आघात – एक उल्लेखनीय प्रयत्न

० प्रतिक्रिया

aaghaat_poster.jpgअलीकडेच प्रदर्शित झालेला विक्रम जोशी दिग्दर्शित ‘आघात’ हा चित्रपट पाहण्याचा योग आला. ज्यांना तो पाहायचा होता त्यांनी आत्ता पर्यंत तो पहिला असेलच असे गृहीत धरून मी विषयाला हात घालणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या इस्पितळाच्या तोडफोडीच्या अनेक घटना आपण ऐकतो. त्यावर त्यांच्या असंस्कृतपणाबद्दल त्यांना बोलही लावतो. मात्र त्यातील रुग्णांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे वर्तन जरी बरोबर नसेल तरी ह्या नाण्याची जी दुसरी बाजू आहे, त्यावर प्रकाश टाकण्याचा ह्या चित्रपटाद्वारे प्रयत्न केलेला दिसतो. डॉक्टरी पेशा हा नेहमीच एक आदराने पाहिला जाणारा पेशा आहे. या व्यवसायातील लोक, त्याकडे निव्वळ उपजीविकेचं साधन म्हणून पाहत नाहीत तर एक समाजकार्य म्हणून ह्याचा उल्लेख होतो. पण सगळेच काही फक्त ह्या उत्तुंग प्रतिमेसाठी ह्या व्यवसायात येत नाहीत हेच दुर्दैव हा चित्रपट अधोरेखित करतो.

विक्रम गोखले आणि मुक्ता बर्वे ह्या दोघांची ह्यात प्रमुख भूमिका आहे पण त्याच बरोबर जिच्यावर अन्याय झाला त्या मुलीनेही उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखवलेलं आहे. रुग्णांबद्दल आणि त्यांच्या नातेवाईकांबद्दल एक सहानुभूती निर्माण करायचा ह्याचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नात तो अजिबात तोकडा पडत नाही. विशेषतः डॉक्टर रुग्णांची करत असलेली भलावण, रुग्णांच्या मनातली शस्त्रक्रियेबद्दलची भीती, कानावर पडलेल्या अनेक चांगल्या-वाईट गोष्टी, बातम्यांमुळे डॉक्टारांवरचा अविश्वास ह्याचा परामर्श ही वास्तववादी कलाकृती घेतेच पण त्याच बरोबर, अनेक शस्त्रक्रिया बिनचूक करूनही एका चुकीमुळे मग ती मुद्दाम असो किंवा अनवधानाने, डॉक्टरांना मिळणाऱ्या अगदी तिरस्कारपूर्ण आणि संतापजनक वागणुकीकडेही हा चित्रपट डोळेझाक करत नाही.

अश्या ह्या जमेच्या बाजूंचा विचार करताना, हळूहळू हा चित्रपट व्यक्तिसापेक्ष बनत जातो. एका मोठ्या विषयाला हात घालूनही मग मध्यंतरानंतर हा दोन व्यक्तींच्या संघर्षावर येऊन ठेपतो. जरी हे टाळण्याजोगं नसलं तरीही मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले हळूहळू त्यांच्या भूमिकेच्या बाहेर येतात. आणि उरतो तो एकाने दुसऱ्याला नेस्तनाबूद करण्यासाठी चालवलेला संघर्ष; कदाचित अगदीच तसं नसेलही पण मला तर हे नक्कीच जाणवून गेलं. चित्रपटाच्या अखेरीस एका साक्षीदाराचा अनपेक्षित आगमन (ह्याला इंग्रजी मध्ये dues-ex-machina असं म्हणतात). डॉक्टर आणि त्यांच्या चुकीवर सुरू होऊन कथानक हळू हळू विक्रम गोखले ह्यांना दुराभिमानी, दुष्ट, खलनायक बनवत जाते. आणि सगळ्याच वाईट गोष्टीसाठी त्यांना जबाबदार ठरवत जाते. इथे चित्रपट तसा थोडा भरकटला असे मानता येईल.

चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः विक्रम गोखले ह्यांनी केले आहे. स्वतः अभिनयाच्या क्षेत्रात जरी ते एक मोठी असामी असले तरी त्यांचे दिग्दर्शन विशेष प्रभाव पाडू शकलेले नाही. थोड्याश्या कमकुवत दिग्दर्शनाने कलाकारांच्या अभिनयाला पण म्हणावी तितकी धार येत नाही. असे जरी असले, तरी चित्रपट मुळीच टाकाऊ नाही. तसे पाहता त्यात उद्धृत केलेल्या सर्व बाबींसाठी एकदा तर तो जरूर पाहण्याजोगा आहे हे नक्कीच.

चित्र सौजन्य: http://www.maanbindu.com/

संबंधित लेखन

PG

छिद्रान्वेषी

आयुष्याच्या सागरातील एक खलाशी, असं मी स्वतःचं वर्णन करेन. वारा येतो माझं शिडाच गलबत अजून तरी तरंगतय, लाटा येतात, जातात. समुद्र खवळतो, शांत होतो. क्षितिजाची ओढ, आणि मोटरबोटीची अपेक्षा मला कायमच आहे…

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME