वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

आपणचं होऊया आपल्या खारुताईंचे डेव्ह…

३ प्रतिक्रिया

२००७ च्या शेवटी कधीतरी alvin and the chipmunks चित्रपट पाहिला. ऍनिमेटेड चित्रपट पाहायला वयाचं बंधन नाही हे पाहताना जाणवतं पण हे चित्रपट आपल्याला एक छान संदेश देऊन जातात हे पुन्हा एकदा पटलं…त्यानंतर भोवताली घडणार्‍या बर्‍याच घडामोडींच्या निमित्ताने हा चित्रपट सारखाच आठवतो. कितीतरी ठिकाणी मी या चित्रपटातल्या खारुताई भेटतात असं मनाशीच म्हणते त्याची आठवण म्हणून ही पोस्ट.
ही गोष्ट आहे तीन चिपमक्सची. आपल्या सोयीसाठी त्यांना खारुताई म्हणूया हवंतर. तर तीन गाणार्‍या खारुताई, त्यांचं गाण्याचं कौशल्य ओळखणारा एक धडपड्या गीत/संगीतकार डेव्ह सेव्हिल आणि त्यांच्या या कौशल्याचं मोठ्या चतुरपणे मार्केटिंग करणारा इयान. बाकीचे नेहमीचे लोकं आहेतच म्हणजे हिरो डेव्हची एक गर्लफ़्रेंड वगैरे पण ही गोष्ट मुख्यपणे घडते ती या पाच जणांच्या आयुष्यात. योगायोगाने डेव्हच्या घरी आलेल्या या तीन गाणार्‍या खारुताईंचं कौशल्य ओळखून डेव्ह त्यांच्या बरोबर एक आल्बम काढतो, त्याच्या धडपडीला यश येतं आणि तरी ते यश तो खारुताईंच्या डोक्यात जाऊ देत नाही.. पण एका मोठ्या संगीत कंपनीचा मालक इयान, खोटं खोटं अंकल इयान बनुन यांच्यात फ़ुट पाडून या तिघांना डेव्हपासुन वेगळं करुन आपल्या घरी आणतो.
यांचं गाणं जगावेगळं आहे हे ओळखून या तिघांच्या कॉन्सर्ट्सचे एकापाठी एक शो लावतो. परिणाम तिघांच्या स्वरयंत्रावर अधिक ताण आणि एकंदरित तब्येत बिघडण्यावर होते. मग त्यांची डॉक्टर त्यांना विश्रांतीचा सल्ला देते. पण धंद्याचं होणारं नुकसान आणि भावी फ़ायदा लक्षात घेऊन इयान त्यांना लिपसिंगिग करायला लावतो. दरम्यान डेव्हला आपल्या आयुष्यात मुलांसारखी झालेली या तीन खारुताईंची सवय लक्षात येते आणि यांना परत आणण्यासाठी तो एका शोमध्ये जाऊन त्यांना शोधायचा प्रयत्न करतो. खारुताईंनाही तोपर्यंत डेव्ह आणी इयान मधला फ़रक कळला असतो..इयानने केलेलं लिपसिंगिगचं गुपीत लोकांना कळतं…एकंदरित बरंच काही फ़िल्मी चक्कर घडून शेवटी ही मुलं आपल्या मानलेल्या बाबाकडे येतात. आणि मग त्यांनाही बाबाचं आपल्या भविष्यासाठी काळजी, पैशाची बचत करणं हे सगळं कळतं. ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड…
ही कथा म्हटलं तर लहान मुलांसाठी आहे पण नीट लक्ष देऊन पाहिलंत तर कळतं असे कितीतरी जगावेगळी कौशल्य असणार्‍या खारुताई आपल्यात आहेत आणि आपल्यासारख्या सर्वच पालकरूपी डेव्हनी आता जागं व्हायला हवंय. मला हे जाणवलं जेव्हा हिंदीतल्या एका गाण्याच्या रिऍलिटी शोमध्ये छोट्या छोट्या मुलांना गाताना. शेवटपर्यंत टिकणार्‍या मुलांना फ़क्त कार्यक्रमासाठीच नाही तर इतर ठिकाणीही गायला लावुन काय होत असेल त्यांच्या छोट्याशा स्वरयंत्राचं हे मनात आल्याशिवाय राहावलं नाही. नंतर पाहिलं ते हिंदीमधलाच एक नाचाचा कार्यक्रम यातही मोठ्यांनाही न कळणार्‍या भावना चेहर्‍यावर आणून, सगळं अंग लचकवुन ही मुलं नाचत होती. म्हणायचं तर कदाचित मोठीही इतकी छान अदाकारी करु शकणार नाहीत पण म्हणून आतापासुनंच हे? असंही मनात आल्याशिवाय राहावलं नाही. आणि मग नेहमीप्रमाणे याच स्पर्धा मराठीतही पाहिल्या गेल्या. मुलं कार्यक्रमाबाहेर गेली की हताश, रडवेल्या चेहर्‍याचे पालक आणि कार्यक्रम संपला की मग इतर ठिकाणी या मुलांचे गुणदर्शन सुरू…
या सगळ्यांनीच हा चित्रपट एकदा मन लावुन पाहावा असं मला वाटतं…युग स्पर्धेचं असलं तरी ’लहानपण देगा देवा’ असं नंतर ही मुलं म्हणू शकणार नाहीत इतकंही त्यांना राबवावं का? एक दोनदा ठीक आहे पण हिंदीत हरलं की मराठीत..तिथुन बाहेर पडलं की एखाद्या कार्यक्रमात असं सगळीचकडे आपल्या मुलांना पुढे पुढे करायचं याला काय अर्थ आहे? आणि मग सारखं सारखं टिव्हीवर झळकायचं व्यसन मुलाला लागलं तर दोष कुणाचा?

आता वेळ आहे आपल्या लहानग्याचा कल पाहुन ती कला डेव्हलप करायची, त्यातलं पुढंचं शिक्षण देऊन मोठेपणी या स्पर्धेत आपले गुण तो योग्य प्रकारे दाखवु शकेल याची तयारी करायची. वाहिन्या, माध्यमं त्यांच इयान अंकल व्हायचं काम नेटाने करताहेत. वेगवेगळे रिऍलिटी शोज आणि स्पर्धा आयोजित केल्या जातील. कदाचित तुमच्या खास कलाकारी अवगत असणार्‍या मुलासाठी एखादा वेगळा कार्यक्रम, स्टेज शो याचंही आमंत्रण पुढ्यात येईल पण आत्ता त्या लहानग्याच्या आयुष्यात एका काळजीवाहु डेव्हची गरज आहे आणि आपल्या मुलांसाठी ती भूमिका आपण स्वतःच करायला हवी नाही का?

संबंधित लेखन

PG

अपर्णा संखे-पालवे

मी अपर्णा संखे-पालवे, शिक्षणाने इंजिनियर, आय.टी. व्यवसायात गेले काही वर्ष अमेरिकेत मुक्काम, त्यामुळे कमी होत चालेला मराठीशी संपर्क..अशा पार्श्वभुमीवर ब्लॉगिंग करायला घेतलं आणि लक्षात आलं की मराठीत विचार मांडता आल्यामुळे होणारा आनंद काही औरच आहे. जे काही थोडे फ़ार कडू-गोड अनुभव येतात त्या क्षणांच्या आठवणी होण्याआधीच आजकाल त्या माझिया मना ब्लॉगवर मांडल्या जातात. मराठीमधले अनेक सुंदर सुंदर ब्लॉग्ज वाचणं आणि जमेल तिथे प्रतिक्रिया देणं हेही सध्या आवडीने करते.

 1. स्पर्धांशिवाय गुणवत्ता दिसत नाही किंवा अंगी असलेले सुप्तगुण जागृत होत नाहीत अशी समाजाची आज समजूत झालेली आहे. आपल्या मुलानेच अमुक-अमुक क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करावं, आपला नावलौकिक करावा इत्यादी गोष्टींचा आज प्रत्येक घरात पूर आलेला दिसतो. एवढ्याश्या जीवाकडून हे सगळं कसं होऊ शकेल? स्पर्धेत बाजी फक्त एकच जण जिंकत असतो, पण त्यामुळे इतरांवर त्या गोष्टीचा किती मानसिक दुष्परिणाम होत असेल, याची जाणीव आजच्या २१ व्या शतकातील सुशिक्षित आणि सुजान पालकांना जर नसेल, तर त्यांच्यावर काही बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत… माझ्या मते तरी आपण लोकांनी एकत्र येऊन टीव्हींवर चालणारे हे असले जीव-घेणे व चिमुकल्या जीवांच्या सहनशक्तीशी अमानुषपणे खेळणारे हे रीऍलिटी कार्यक्रम बंद करण्याची गरज आहे, स्पर्धा असावी पण “अति झाले की माती होते” याचीही जाणीव आपण सुज्ञ लोकांनी ठेवावी..
  ताई, नेहमीप्रमाणे हा लेखही अतिशय छान सुटसुटीत आहे, तू बघितलेल्या त्या चित्रपटातील कथानकाची तू अगदी अभ्यासपूर्ण अशी सुटसुटीत मांडणी या लेखात केलीय.
  या लेखाबद्दल खुप खुप आभार.

 2. धन्यवाद विशाल…तुझी प्रतिक्रिया सर्वांचीच ठरो आणि त्या बालकांची या जीवघेण्या स्पर्धेमधून तात्पुरती सुटका होवो इतकंच म्हणू शकते…

 3. Namaskar,Marathimandali.com ha blog Kharachh Aawashak Aahe.Me ek marathi Masikacha sampadak aasun shivamarg masikat nav-nave lekhan sahitya prashidha karnyachi Mazi manokamana aahe.Desh-videshat rahat aaslelya marathi Mansani ya masikat satatyane lihawe yakarita he patra mee lihit aahe.Aapan sare Marathimandali aaple blog waril sahitya shivamarga masikamadhye prashidha karnyachi sandhi aamhala dyal ka? Aamhi aplya sarwaprakarchhya lekhanachhi wat pahat aahot.
  story,lekh,Coverstory,prawas Varnan,Kadambari,Arogya,Chitrapat,Vinod,
  Mahila,Bal Aani eaterprakarche lekhan prashidha kroo.

  Aamchhi hee ichhya purna kral hichh apeksha.Dhanyawad.
  Aapla
  Mr.Dattatrya Surve
  Editor-shivamarg

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME