वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

आयुष्याला आकार देण्याची धडपड

० प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

दिवस कलंडायला लागल्याने सूर्याचा ताप कमी व्हायला सुरुवात झालेली होती आणि तलावाकाठी असलेल्या त्या सुंदर बागेत आता गर्दी जमायला लागली होती. कचेरीतील काम संपल्याने आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात करण्यास अजून वेळ असल्याने त्या छोट्या कुटुंबातील सर्वांना अचानक मोकळा वेळ मिळाला होता आणि ते सर्व बागेत स्वच्छ हवेचा आनंद चाखायला उत्साहाने आले होते. काही काळ बागेत फिरल्यावर हिरवळीवर एका ठिकाणी रुमाल पसरुन ते भेळ खात गप्पा मारीत बसले. लहान मुलातील नैसर्गिक कुतुहलामुळे तो सतत आई-वडिलांपासून दूर जाऊन बागेतील गोष्टींची दखल घेत होता. एखाद्या झाडाखालील लागलेली मुंग्यांची रांग, लोकांनी अर्धवट खाऊन फेकलेल्या पुड्यांमागे असलेल्या कावळ्यांची दंगल आणि त्याच्या वयाच्या बाकी मुलांनी ‘त्याच्या’ भागात येऊ नये अशी धडपड करण्यात तो इतका दंग होता की आपल्या आई-वडिलांना विसरल्यासारखे त्याचे वर्तन होत होते. अशावेळी वडिलांचा मोबाइल वाजला आणि ते त्यावर बोलण्यात दंग झाले. आई मग ‘हे करु नकोस, ते करु नकोस’ असे म्हणत आपल्या मुलामागे लागली. अचानक डोक्यावरील ढगांनी मावळत्या सूर्याची किरणे पकडली आणि ते चमकदार रंगांनी उजळून निघाले. आकाशातील ढग स्वतःशीच हसत काही क्षण चमकून मग परत आपल्या बेढब रुपात विलीन झाले. जमिनीवरच ज्यांची नजर स्थिर आहे अशांपैकी कुणीच त्या कल्पनेबाहेरील, स्वयंभू सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकले नाहीत. खरे म्हणजे स्वतःचे घर सोडून बागेत आलेल्या सर्वांना त्या देखाव्याचा आनंद घेणे शक्य होते. पण प्रत्येकाने बागेत जाऊन काय करायचे याचा आधीच आडाखा बांधलेल्या असल्याने काही न करीता आकाशाकडे बघण्याचे भान कुणालाच नव्हते. बाकावर बसलेल्या त्रयस्थाला अचानक सूर्यास्ताचे सौंदर्य, तलावाची गूढता आणि लोकांची आपल्याच जीवनातील तल्लीनता यांची एकाचवेळी जाणीव झाली आणि सर्व परिस्थितीचे त्याला एकसंध सामुदायिक आकलन झाले. परिस्थितीतील गुंतागुंतीमुळे त्याच्या मनात भगवंताच्या लीलेबद्दल अतीव आदरयुक्‍त प्रेम उत्पन्न झाले आणि त्याचा अनिर्वाच्य आनंद ह्रुदय फोडून बाहेर येऊ लागला.

‘भगवंत जर सर्वांशी एकसारखेच वागतात तर त्यांनी फक्‍त अर्जुनालाच का गीता सांगितली? दुर्योधनाला का नाही? यातून त्यांचा पक्षपातीपणा सिध्द होत नाही का?’

तू दुर्योधनाचेच नाव का घेतलेस? भगवंतांनी युधिष्ठीराला वा भीमाला सुध्दा गीता सांगितलेली नाही! खरे म्हणजे युध्दामध्ये प्रत्यक्ष भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करणे रुपकात्मक आहे. दैनंदिन जीवनातील रोजच्या उलाढालीमध्येसुध्दा आपणास परमतत्व मिळू शकते ही गोष्ट आपण त्यातून शिकली पाहिजे. आपण आपल्या दुनियेतच इतके मग्न असतो की भगवंताचे अस्तित्व आपणास जाणवित नाही, आकाशातील ढगांचे सौंदर्य दिसत नाही. श्रीकृष्णांनी दुर्योधनाला वा भीष्मांना वा युधिष्ठिराला गीता सांगितली नाही कारण त्यांची गीता ऐकायची मानसिक तयारी नव्हती. आपण स्वतःला विचारायला हवे की आपली किती तयारी आहे? काहीही न करता आहे त्या आयुष्यातील सौंदर्य बघण्यास आपण उत्सुक असायला हवे. आयुष्याला एक वेगळे वळण लावून त्याला साचेबध्द करण्याची आपली सवय सोडण्यास जो तयार असतो त्यालाच परमार्थाच्या बागेत येण्याचे खरे फळ मिळेल. स्वतःला काय मिळवायचे आहे याची ज्याला जाणीव आहे त्याला भगवंताचे शब्द ऐकू येणे अशक्य आहे.

संबंधित लेखन

 • वर्गवारी करण्याची सवय
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
  खिशात हात घालून त्या निर्मनुष्य रस्त्यावर स्वतःच्या…
 • अध्यात्मिक आनंद आणि सात्विक सुख
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

  पुणे,

  दिनांक —

  चि. श्रीधर यास अनेक आशिर्…

 • प्रेमाची व्याख्या नसते
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  सकाळच्या ताज्या सूर्यकिरणांनी सर्व जग स्वच्छ होत हो…
 • नात्यांतील अस्थिरता
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  त्याची गाडी जुनी होती पण अतिशय सुंदररीत्या काळजी घे…
 • काम करण्यातील आनंद
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  आज मुलाला शाळेतील सहलीला जायचे होते. सकाळी ५ वाजता …
PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME