वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

उडत्या तबकड्या (U.F.O.)

७ प्रतिक्रिया

निश्चित अंदाज व्यक्त होऊ न शकलेल्या अनेक अवकाशिय वस्तूंच्या घटनांबद्दल जगातील अनेक ठिकाणच्या पुरातन इतिहासामध्ये अनेक घटना नमूद केलेल्या आढळतात. उघड्या डोळ्यांनी स्पष्ट किंवा अंधुक दिसणार्‍या काही अंतराळातील वस्तू, उदा. तेजस्वी उल्का, अशनी, आपल्या सुर्यमालेतील मोठाल्या पाच ग्रहांपैकी काही ग्रह, वातावरणातील बदललेल्या हवामानामुळे होणारे दृश्यभास, विचित्र आकार-रंगरूप असलेले काहीवेळा दिसणारे ढग इत्यादी गोष्टींबद्दल व अवकाश तसेच भौतिक विज्ञातील अपुर्‍या ज्ञानामुळे त्या गोष्टींबद्दल नमूद करणारे त्या गोष्टींबद्दल निश्चित अंदाज किंवा कल्पना बांधू शकले नाहीत. ख्रिस्तपूर्व इ.स. २४० मध्ये एका चिनी अवकाश निरीक्षकाने हॅलेच्या धुमकेतूला असेच गणले होते (नोंदवून ठेवले होते), हे यासंबंधी एक उदाहरण होऊ शकते.

आत्ताच्या इतिहासकाळातील यासंबंधीच्या काही घटना उल्लेखनिय आहेत. “डेनिसन” या एका दैनिक वृत्तपत्राने २५ जानेवारी, १८७८ च्या अंकात एका स्थानिक शेतकर्‍याने अनुभवलेल्या एका घटनेची बातमी छापली होती. जॉन मार्टिन नावाच्या त्या शेतकर्‍याने त्याच्याशी घेतलेल्या मुलाखतीत “अतिशय भव्य, गडद, गोलाकार उडणार्‍या वस्तू ज्या की एखाद्या भल्या-मोठ्या उडणार्‍या फुग्यासारख्या दिसत होत्या आणि त्या अतिशय सुसाट वेगाने उडत होत्या, त्यांचा आकार बशीच्या (सॉसर) आकाराशी मिळता-जुळता होता.” अशा शब्दांत त्याने पाहिलेल्या प्रसंगांची माहिती दिली होती. ज्ञात इतिहासात जॉनने पहिल्याच वेळी “सॉसर” या शब्दाचा “U.F.O.” ना प्रकट(?) करण्यासाठी वापर केला.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात प्रचलित वाक्प्रचार “घोस्ट रॉकेट्स” हाही यासंबंधितच आहेत. नंतर झालेल्या संशोधनांत हे सिद्ध झाले की, जर्मन सेनेने तयार केलेल्या काही अफलातून विमानांना मित्र राष्ट्रांतील लोक “घोस्ट रॉकेट्स” समजत होते म्हणून…! 😛

दिनांक २४ जुन, १९४७ रोजी अमेरिकेच्या माउंट रेनिअर, वॉशिंग्टन डी.सी. च्या सीमेवर केनिथ आर्नोल्ड या विमान चालकाला स्वतःचे खाजगी विमान चालवित असतांना अतिशय वेगवान गतीने काही तेजस्वी वस्तू आकाशातून आपल्या मागून येऊन पुढे जातांना दिसल्या (त्याच्या विमानातील रडारच्या मदतीने त्याने त्या वस्तूंची पुष्टी केली होती.). केनिथने लगेच त्या भरधाव वेगाने जात असलेल्या अनोळख्या वस्तूंचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्याच्या विमानात असलेल्या काही यंत्रांच्या आधारे तो त्या वस्तूंची गती आणि त्यांची एकूण संख्या मोजण्यात यशस्वी झाला, पण त्याच्या विमानाची गती त्या वस्तूंपेक्षा खूपच कमी असल्याने त्याला जास्त वेळ त्यांचा पाठलाग करता आला नाही. स्वतःभोवती गोलाकार कक्षेत भ्रमण करणार्‍या त्या एकूण नऊ वस्तू होत्या आणि त्यांची गती किमान ताशी २७०० किमी एवढी होती. त्याने त्या घटनेच्या वर्णनांत त्या वस्तूंबद्दल “दोन बश्या एकमेकांवर पालथ्या ठेवल्या की बनणारी प्रतिकृती किंवा तबकडीच्या आकृतीसारखी प्रतिकृती.., अर्धचंद्राकार, फुगीर.. इत्यादी” गोष्टी सांगितल्या आहेत. जंगलात लागलेल्या आगीसारखी ही बातमी लगेच पुर्ण जगात पसरली. आर्नोल्डने पाहिलेल्या त्या अनोळख्या प्रतिकृतींची जगभरातील वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिद्धी केली. १९४७ च्या काळात एवढी गतिमान वस्तू अजुनही बनवली गेली नव्हती, त्यामुळे या घटनेचा सर्वच स्तरांतून खुप उहा-पोह केला गेला. काही दिवसांतच एका बिल बिक्वेटन नावाच्या पत्रकाराने त्या अनोळख्या व अज्ञात वस्तूंना “फ्लाईंग सॉसर्स” (मराठीत “उडत्या बश्या” किंवा “उडत्या तबकड्या”?) असे नाव दिले. लगेचच काही दिवसांत ४ जुलै, १९४७ रोजी (संध्याकाळी) इडाहो वरून उडणार्‍या युनायटेड एअरलाईन्सच्या विमानाच्या प्रवाशांनी अशाच प्रकारच्या नऊ तेजस्वी वस्तू आकाशात पाहिल्याचा दावा केला. या घटनानंतर अमेरिकेपाठोपाठ युरोपिय राष्ट्रांतूनसुद्धा साम्य असलेल्या प्रसंगांचा एकच महापूर आला. यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांचा तर्क-वितर्क लावून (शुद्ध भाषेत तिखट,तेल, मीठ लावून! ;P ) बातम्या प्रसारित केल्या जाऊ लागल्या. या घटनेबद्दल आणि इतर राष्ट्रांअमध्ये घडलेल्या नंतरच्या काही घटना विकिपेडियावर देण्यात आलेल्या आहेत, त्या आपण येथे वाचू शकता. ह्या उडत्या तबकड्या म्हणजे नेमका काय प्रकार आहे, याबद्दल सर्वत्र साशंकतेचे वातावरण निर्माण झाले. जो-तो नागरिक इतका घाबरला की या उडत्या अज्ञात वस्तूंचा योग्यप्रकारे तपास करण्यासाठी अमेरिकेच्या वायू दलाला १९४७ मध्ये “प्रोजेक्ट ब्लू बुक” (पूर्वी “प्रोजेक्ट साईन” आणि “प्रोजेक्त ग्रज” म्हणून प्रचलित.) सारखी समिती नेमावी लागली. १९४७ ते १९६९ पर्यंत उडत्या तबकड्या पाहणार्‍यांच्या व त्यांच्या अस्तित्वाबद्दलचे ठोस पुरावे देणार्‍यांच्या मुलाखती या समितीने घेतल्या, पण एवढं सगळं करूनही उडत्या तबकड्यांच्या अस्तित्वाचा निश्चित पुरावा समितीला मिळाला नाही. शेवटी अमेरिकेच्या वायूदलाला ही समिती बर्खास्त करावी लागली. इतर राष्ट्रांमध्येही अशाच समित्या नेमल्या गेल्या. पण त्यांच्याही हाती विशेष असे काहीच लागले नाही.

“फ्लाईंग सॉसर्स” असे नाव काही काळ रूढ होते. पुढे ह्या वस्तूंना “अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट्स (U.F.O.)” असे नाव मिळाले. मराठीत आपण त्यांना “अज्ञात उडत्या वस्तू (?)” म्हणून संबोधू शकतो.

या घटनांबद्दल प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी आपापले मतप्रदर्शन केले. आपल्याकडील दुरदर्शनवरील “शक्तीमान”प्रमाणे १९६०-८० च्या दशकांत अमेरिकेच्या प्रत्येक घरात लोकप्रिय झालेल्या “स्टार ट्रेक“ने या संकल्पनेत नवी क्रांती आणली. विचित्र व भयंकर दिसणारे हिरवट रंगाचे परग्रहवासी (एलियन्स), त्यांची शक्तीशाली भव्य अशी विमाने, माणसे आणि एलियन्समधील अवकाश-युद्धे, एलियन्संनी पृथ्वी बळकावणे, इत्यादी वातावरण तयार करून टीव्हीवर चालणारी सायन्स-फिक्शन (साय-फाय) मालिका पाहून अनेक अवकाशवेडे लोक, शास्त्रज्ञ, लेखक इत्यादींनी यासंबंधी त्या काळात अनेक नव्या संकल्पनांना जन्म दिला. याच काळात अमेरिका, रशिया, जापान या राष्ट्रांमधील शित-युद्धे आणि अवकाशात जाण्यासाठी एकच चढा-ओढ सुरू झाली. याच काळात अनेक प्रचलित कथा तयार झाल्या. चंद्रावर सर्वात पहिले पाऊल ठेवणार्‍या नील आर्मस्ट्राँग आणि त्याच्या सहकार्‍यांना चंद्रावरील एलियन्सनी बंदी बनवून त्यांच्यासह शारिरीक संबंध बनवून माणूस व एलियन्स मिळून एक नविन जात निर्माण केली, नील व त्याचे सहकारी यांनी त्या जमातीला पृथ्वीवर आणून त्यांच्या फैलावास मदत केली, आज त्याच जातीची माणसे पृथ्वीवर वावरत आहेत, अशा अनेक कथा या काळात रंगवल्या गेल्या.

काळ गेला, पण २१व्या शतकातही उडत्या तबकड्यांबद्दलच्या बातम्यांचा ओघ तीळमात्रही कमी झाला नाही. उलट काही दिवसांपूर्वी नॅशनल जिओग्राफिक चॅनेल या वाहिनेने एक नविन मालिका सुरू केली होती. “क्लोज एनकाउन्टर ऑफ थर्ड काईंड” अश्या एका नविन संकल्पनेवर आधारित ही मालिका होती. परग्रहावरील उडत्या तबकड्यांवरून आलेल्या एलियन्संनी आपले अपहरण केले, आपली वैद्यकिय तपासणी केली, त्या एलियन्सकडून आपल्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले गेले, हे सर्व होत असतांना आपण एकदम शुद्धीत होतो इत्यादी प्रकारच्या गोष्टी छातीठोकपणे सांगणारे अनेकजण (महिला-पुरूष) या माध्यमातून पुढे आले. अजुनही असे विविध लोक प्रसिद्धी मिळविण्यासाठी या प्रकारच्या कथा रंगवताना अधून-मधून आपल्या बातम्यांमधून दिसत असतात.

*********************************************************************************

ही तर झाली ऐतिहासिक पार्श्वभूमी… पण जर विज्ञानाच्या सर्व शाखांच्या पुरेपूर मदतीने आजच्या घडीला या “युएफओं”बद्दल खूप गोष्टी उजेडात आणल्या आहेत. उडत्या तबकड्यांच्या ह्या सर्व घटनांकडे दोन दृष्टिकोनांतून पाहिले पाहिजे. शुद्ध वैज्ञानिक (शास्त्रिय) दृष्टिकोन आणि दुसरा मानसिक (सायकॉलॉजिकल?) दृष्टिकोन… पहिल्या दृष्टिकोनानुसार जर व्यवस्थित अभ्यासपूर्वक विचार केला तर उडत्या तबकड्या म्हणजे माणसाच्या डोळ्यांचा निव्वळ आभास (दृष्टिभ्रम?) आहे. टपोरा शुक्र, ढगांकडून परावर्तित झालेला प्रकाश, वातावरणाच्या पाहणीसाठी सोडलेले फुगे, काही कृत्रिम उपग्रहे, अवकाशयाने, अमेरिकेच्या सारख्या प्रगत लष्करी विमानांच्या गुप्तपणे चालू असणार्‍या चाचण्या वगैरे गोष्टी उडत्या तबकड्यांसम आभास तयार करू शकतात. आता जर दुसर्‍या दृष्टिकोनाचा आधार घेऊन विचार केला तर वेगळ्या गोष्टी पहायला मिळतील. अलिकडच्या काळातील बेमाप(?) वाढलेल्या वैज्ञानिक कादंबर्‍या (साहित्य), साय-फाय चित्रपट इत्यादींना भलताच जोर चढलेला आहे. सगळे प्रसंग (कथानक) अगदी तेल-तिखट-मीठ लावून रंगवले जातात. मग त्यांचा माणसाच्या मेंदूवर परिणाम झाल्याशिवाय कसा राहणार? 😉 झोपेमध्ये अशा प्रसंगामुळे चमत्कारिक स्वप्ने पडतात, मेंदूमधील काही पेशी अचानक जागृत झाल्याने किंवा अकार्यशील झाल्याने आपल्यासमोर आपण अनुभवलेल्या काही घटना वेग-वेगळ्या प्रकारे आभास मिर्माण करतात. मानसिक विश्लेषणातून उडत्या तबकड्यांमागचे रहस्य अश्या प्रकारे पाहण्यात येते.

जर आताच्या आपल्या पृथ्वीतलावर उपलब्ध असलेल्या विज्ञानाच्या साह्याने जर कसून अभ्यास केला, तर उडत्या तबकड्या हा निव्वळ भासाचाच एक प्रकार आहे. कारण परग्रहावरील जीवसृष्टी कितीही प्रगत असली तरी ती निसर्गाचे नियम मोडू शकणार नाही आणि हे नियम सर्वत्र सारखेच असले पाहिजेत. अर्थात पृथ्वीला सहजपणे भेट देऊन पुन्हा आपल्या ग्रहांवर अल्पकाळात (लाखो प्रकाश वर्षांचा कालावधी तरी लागेल हे करण्यासाठी!) परत फिरण्याइतकी गती (प्रकाशाची गती सुद्धा कमी पडेल मग!) परग्रहावरील प्रगत संस्कृतीलाही साध्य होणारी गोष्ट नाही. त्यांनाही पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी सहस्त्रावधी वर्षांचा काळ लागेल. अर्थातच उडत्या तबकड्या म्हणजे माणसाच्या मनामधील अद्‍भुत कल्पनाच असाव्यात.

माझ्यावर शेरलॉक होल्म्सच्या अद्‍भूत साहस व रहस्यकथांचा खुप मोठा प्रभाव आहे. वर चर्चिलेल्या दोन्ही दृष्टिकोनांव्यतिरिक्त शेरलॉक होल्म्सच्या सिद्धातांप्रमाणे तिथे अजुन एक सत्य असू शकेल, जे की हे सर्व प्रसंग (उडत्या तबकड्या असण्याचे) खरेसुद्धा असू शकतात. डॉ. जयंत नारळीकरांनी एक मुद्दा मांडलेला मला कायमचा स्मरणात आहे, तो म्हणजे हे परग्रहवासी एलियन्स अवकाशातील शॉर्टकट्स वापरत असतील, उदा. जर एखादा कापड/कागदा दुमडत दुमडत बारीक केला आणि त्यातून सुई घातली तर अत्यंत कमी अंतर व वेळ घेऊन ती त्या कापड/कागदाच्या एका टोकापासून (बाजूपासून) दुसर्‍यापर्यंत जाऊ शकते. अगदी हीच कल्पना वापरून ते परग्रहवासी अत्यंत कमी काळात अवकाशातील निर्वात पोकळीमध्ये अशाच मार्गांनी भ्रमण करीत असले पाहिजेत (जर ते परग्रहवासी खरेच अस्तित्वात असतील तर!).

काही शंका, प्रश्न किंवा शिल्लकची माहिती, अनुभव आहेत?

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. जालन्दर बनकर म्हणतात:

  विशाल,तुमचा लेख वाचुन एका पुस्तकाची आटवन झाली.”देव – परग्रहावरील प्राणी” किवा असेच काहीतरी नाव आहे.त्यात प्रत्येक धर्मग्रन्थातले देव आकाशातुन जमिनीवर कसे आले,त्याबद्दल लिहीले आहे.देवाना परग्रहावरिल रहिवासी म्हटले आहे.निरनिराळ्या सन्स्क्रुतिमध्ये व निरनिराळ्या काळामध्ये ते जमिनीवर आले.विशालकाय बान्धकामे केली व जाताना “आम्ही परत येवु” असे सान्गितले.काहि ईतिहासकाळातिल बान्धकामान्चा उल्लेख लिहिला आहे.जुन्या काळी अशी अजस्र बान्धकामे मानवानेच केली आहेत का? असा सवाल केला आहे.त्यात मेक्सिको, दक्षिन अमेरिका इत्यादी देशातील बान्धकामाचा उल्लेख आहे.

  • जालंदर जी,
   हो, माझ्याही वाचनात अशी पुस्तके आली आहेत. जर त्या दृष्टीने विचार केला, तर प्राचिन मिस्त्र (इजिप्शियन) संस्कृतीच्या पुरातन कालखंडात बांधल्या गेलेल्या भव्य वास्तू (पिरॅमिड्स इत्यादी) या त्याकाळी तरी मानवाला अशक्य होत्या, असे सबळ पुरावेही आहेत. काही पिरॅमिड्समध्ये प्राचिन wall paintings (भित्तीचित्रे ?) काढलेली आहेत आणि आजही तेथील भागांमध्ये काही प्रचलित दंतकथा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये (ज्याआधारे) असे दिसते (किंवा निष्कर्ष निघू शकतो) की, त्यावेळी (म्हणजे ही पिरॅमिड्स बांधण्याच्या काळात) कोणीतरी परग्रहवासी (किंवा अवकाशातून आलेले तेजस्वी वर्णिय लोक) भव्य विमानांतून (उडणारी याने) आले, त्यांनी अनेक दिवस पृथ्वीतलावर वास्तव्य केले, सामान्य लोकांप्रमाणे सर्वसामान्य कामे केली, शेवटी जातेवेळी, “आम्ही परत येऊ” असे त्याकाळच्या लोकांना सांगितले, अवकाशातून त्या ठिकाणी काहीतरी खुण दिसावी त्यासाठी त्यांनी त्याकाळच्या सम्राटाला (शासनकर्त्याला) पिरॅमिडसारख्या भव्य वास्तू बनवण्यासाठी मदत देऊ केली, त्याकाळी सामान्य मणुष्य एवढे भव्य आर्किटेक्चर डिजाईन करण्यास असमर्थ होता, त्यामुळे त्यांनी (त्या तेजस्वी परग्रहवासियांनी) पिरॅमिड्सचे डिजाईन्स बनवून दिले व ते सर्व बांधकाम पुर्ण होईपर्यंत ते लोक पृथ्वीवर वास्तव्य करून होते. त्यानंतर ते पृथ्वीवरून परत गेले. त्यांचा एकूणच स्वभाव अत्यंत दयाळू व भावनिक असल्या कारणाने त्या काळचे लोक त्यांना परग्रहांवर राहणारे “देव” असे संबोधू लागले.

   शिवाय, मेक्सिको, संयुक्त अमेरिकेच्या काही संस्थानांमध्ये मोठाल्या पडीक (ओसाड) पडलेल्या भुखंडांमध्ये अतिशय सरळ (उंचावरून पाहिल्यावर) अशा अखंड, लांबच लांब रेषा (रस्ते), ज्या की सुमारे १० ते १५ किलोमिटर्स पर्यंत अखंड एकरेषिय आहेत, मध्ये कुठेही वक्र नाहीत, बन(व)ले गेलेले आहेत. हे मिस्त्र संस्कृती उदयास येण्याच्याही आधीच्या काळातील आहेत. त्यावेळीही मानवाचा एवढा बौद्धिक विकास झालेला नसेल की तो अशा भूमितिय कलाकृती तयार करू शकेल म्हणून… त्या ठिकाणच्या दंतकथांमध्येही काही भव्य याने असलेले परग्रहवासी आले, त्यांना काही खुणा (चिन्हे) अवकाशातून दिसावीत म्हणून त्यांनी त्या ठिकाणच्या सामान्य पृथ्वीवासीयांना आकाशातून लक्ष ठेऊन अशा सरळ रेषा तयार कराव्या लावल्यात, असे प्रकार (अनुभव) आढळतात.

   काही ठिकाणी रात्रभरात आपल्या पीक असलेल्या शेतामध्ये भव्य कलाकृती (कॉम्प्लेक्स डिजाईन्स), जी की एका रात्रीतून मानवास करणे अजुनही शक्य नाहीत, अशी डीजाईन्स तयार झाली, असे काही प्रकार काही दिवसांपासून उघडकिस येत आहेत. त्या शेतांचे फोटोज आणि साक्षिदारांची मते माहितीजालवर उपलब्ध आहेत, मला सवड मिळाली तर मी येथे त्यातील काही टाकण्याचा प्रयत्न करेन.

   पण आजपर्यंत जे काही संशोधन झाले, त्याआधारे तरी हे सर्व घडलेलेच नाही, किंवा दंतकथा, भाकडकथा, मनावर झालेल्या परिणामामुळे जगभर पसरलेल्या अशा काही गोष्टी, खोटे पुरावे किंवा काही समाजकंटकांनी असे वातावरण निर्मिती करून केलेले प्रकार असतात, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

   आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!

 2. प्रिय विशाल तेलंग्रेजी,
  आपला लेख वाचला. आवडला.
  मला प्राचार्य गळतगे यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ पुस्तकातील याबाबतच्या लिखाणाची आठवण झाली. कदाचित आपणांस त्यांच्या लेखनाची कल्पना असेल. मी त्यांच्या पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख टाकलाय. कृपया पहावा व प्रतिक्रिया कळवावी.

 3. फार छान!बम्युडा ट्रन्गल बद्द्ल असेच म्हणता येइल!

 4. Dear Vishal
  jase tu mhanala ki U.F.O. he ek kalpanik ase shakte kiva manache bhram …its OK i agree with u ..pan SHODH ya lekhat mhatlyapramane dusari Pruthavi hi asu sahkte karan aaplyasarkhya hajaro aakashganga ,hajoro surya ahet ….then i think it should be possible..

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME