वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

“ओपन सोअर्स” काय भानगड आहे?

२ प्रतिक्रिया

ओपन सोअर्स म्हणजे “मुक्त स्त्रोत”!

ओपन सोअर्स

संगणकावर चालणारी (एक्जिक्युटेबल) आज्ञावली लिहितांना संगणकतज्ञाला त्यासाठी आवश्यक असणार्‍या विविध आज्ञावली लेखन भाषांचा (उदा. सी, सी++, जावा इत्यादी.) व्यवस्थित अभ्यासपूर्ण विचार करावा लागतो.. या आज्ञावल्या सामान्य मणुष्याला व्यवस्थित समजू शकतील अशा सोप्या भाषेत लिहिलेल्या असतात. आज्ञावल्या लिहिण्यासाठी वापरल्या जाणार्‍या आज्ञावली लेखन भाषांमध्ये वापरल्या जाणार्‍या पूर्वव्याख्यित संज्ञा व शब्द हे मुळ इंग्रजीतील शब्दांच्या अर्थांशी सांधर्म्य असणारे असतात (उदा. सी भाषेत आउटपुटमध्ये (उत्पादित भाग?) काही उमटवायचे असेल तर इंग्रजी भाषेतील print या शब्दाशी मिळताजुळता असणारा शब्द printf असा वापरला जातो.). या आज्ञावल्या मणुष्याला जर तत्सम भाषांचे ज्ञान असेल तर व्यवस्थित समजतात. पण संगणकाला तर फक्त डिजीटल (द्विमान, ऑक्टेल, हेक्जा-डेसिमल किंवा इतर एक्जिक्युटेबल क्रम(?) प्रणाल्या.) भाषाच समजतात. त्यासाठी त्या आज्ञावल्या विशिष्ट विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या कंपाईलिंग प्रणालीने कंपाईल कराव्या लागतात. (कंपायलर ही प्रणाली उच्चक्रम भाषेत, उदा. सी, लिहिलेली माहिती संगणकाला समजणार्‍या असेम्ब्ली भाषेत परिवर्तित (डिकोडींग?) करण्यासाठी वापरतात.) कंपाईल केल्यानंतर ती आज्ञावली मणुष्याला समजण्याच्या पलिकडची असते. (कारण ती कोडेड स्वरूपात असते, तिथे चित्र-विचित्र चिन्हे, शुन्य आणि एक यांशिवाय काहीही नसते!). अशा प्रकारची आज्ञावली नंतर एक स्वतंत्र प्रणाली म्हणून रूप घेते, जी विशिष्ट संगणकावर विशिष्ट स्वरूपाचे काम करण्यासाठी बनवलेली असते.

यामध्ये तुम्हाला ज्ञात असलेल्या काही प्रणाल्या आहेत, उदा. मायक्रोसॉफ्ट विन्डोज एक्सपी/विस्टा, इंटरनेट एक्स्प्लोरर, मायक्रोसॉफ्ट विन्डोज ऑफिस २००७, ओपेरा मिनी, आई-ट्यून्स इत्यादी. या सर्व प्रणाल्या तुम्हाला द्विमान (बायनरी) किंवा एक्जिक्युटेबल स्वरूपात मिळतात, त्यांची आज्ञावली (कोड?) आपल्याला समजणार्‍या भाषेत उपलब्ध नसतो. कारण या सर्व प्रणाल्या प्रोप्रायटरी (खाजगी मालकीच्या?) असतात, त्याबद्दलचे सर्व  हक्क कंपनीने स्वतःकडे राखून ठेवलेले असतात.

याउलट, मुक्त स्त्रोत (ओपन सोअर्स) प्रणाल्यांच्या आज्ञावल्या (कोड?) माणसांना (ज्यांना त्याबद्दलचे ज्ञान आहे, असे संगणकतज्ञ!) व्यवस्थित समजतील, अशा भाषेत उपलब्ध असतात. उदा. लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम (कार्यान्वन प्रणाली?), याच प्रणालीची आवृत्ती असलेल्या उबुन्टू, फेडोरा, रेड हॅट इत्यादी प्रणाल्या, मोझिला फायरफॉक्स(?), पिडजिन मल्टिपल आयएम प्रणाली, व्हीएलसी मिडीया प्लेअर, ओपन ऑफिस.ओआरजी इत्यादी. या सर्व मुक्त स्त्रोत संगणक प्रणाल्या आहेत, यांचा पुर्ण कोड (आज्ञावली) त्यांच्या-त्यांच्या संकेतस्थळांवर सर्वांसाठी उपलब्ध आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा मुक्त स्त्रोत प्रणाल्या का वापराव्यात आणि त्यांच्या वापरण्याचा नेमका फायदा काय? याबद्दल मी तुम्हाला अगदी मोजक्या शब्दांत सांगू इच्छितो की, या प्रणाल्या मुक्त स्त्रोत असल्याने किंबहुना निःशुल्क (मोफत!) असतात (निःशुल्क असतातच, असेही नाही, काही वेळा एखादे नविन वैशिष्ट्य मिळविण्यासाठी पैसेही मोजावे लागतात!). दुसरी गोष्ट म्हणजे, यामध्ये कोणतीह्या खाजगी कंपनीचा सहभाग नसतो, असला तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही, म्हणजेच घोटाळे, दिवाळे, नफाखोरी इत्यादी प्रकरणे! त्यामुळे एन्ड युजरला (म्हणजेच आपण लोक) कसलिही आर्थिक आणि मानसिक हानी पोहोचण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय, या प्रणाल्या जगभरातील अनेक नामवंत संगणक तज्ञांच्या योगदानातून (सहभागातून) तयार केल्या जातात. कोड (स्त्रोत) सर्वांना उघडपणे उपलब्ध असल्याने त्याचे इतर काही संगणक तज्ञांकडून अभ्यासपूर्ण परिक्षण होते, यावेळी प्रणालीमध्ये त्यांच्या नजरेस कोणतीही त्रुटी वा चुक आली तर ते लगेच आवश्यक त्या दुरूस्त्या तिथल्या तिथल्या तिथे करतात, त्यामुळे प्रणालीचा कोड सर्वत्र ऑनलाईन असल्याने जगभरातील कुठल्याही वापरकर्त्याने ती प्रणाली अपडेट केल्यानंतर त्या त्रुटी/चुका दूर होतात. आणि आज्ञावली स्त्रोत (कोड) मुक्त उपलब्ध असल्याने जर प्रणालीमध्ये कसलिही त्रुटी आढळली तर वापरकर्त्याला जर त्याबद्दल आवश्यक ज्ञान अवगत असेल तर तो स्वतः त्या त्रुट्या शोधून फिक्स (दुरूस्त?) करू शकतो. याउलट खाजगी मालकी (कॉपीराईट्स?) असलेल्या प्रणाल्यांमध्ये जर काही त्रुटी/अडचणी वापरकर्त्यास आढळून आल्या तर त्या प्रणालीच्या सर्वच वापरकर्त्यांना सर्वस्वी ती प्रणाली देऊ करणार्‍या (विकणार्‍या!) कंपनीवर अवलंबून राहावे लागते.

हे “मुक्त स्त्रोत” वापरण्याचे काही मोजके फायदे मी इथे सांगितले आहेत, याशिवायही अनेक आहेत, जे मी नंतर मला पुरेसा वेळ मिळाल्यानंतर सांगण्याचा प्रयत्न करीन.

धन्यवाद!

यासंबंधी अजुनही काही प्रश्न आहेत, नक्की विचारा, आम्ही त्यांवर उपाय शोधण्यास मदत करू…

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

  1. thank you Vishal , It’s you who gave me proper marathi words for our day to day english words(like program,Operating system . . .), I am also a student from computer engineering . . .

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME