वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

काम करण्यातील आनंद

० प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

आज मुलाला शाळेतील सहलीला जायचे होते. सकाळी ५ वाजता त्याला उठविणे ही नेहमीच्या जीवनातील अशक्य घटना त्याच्या सहलीत भाग घेण्याच्या उत्सुकतेने सहज पार पडली. दिवसभर मित्रांबरोबर एकटे रहाण्याचा त्याचा निरागस आनंद बघूनच मजा येत होती. सहलीच्या बसेस सुटल्यानंतर परत आल्यावर घर अचानक रिकामे वाटायला लागले. खरे म्हणजे मुलगा शाळेत गेला असताच. पण दुपारी परत यायच्या ऐवजी आता तो एकदम रात्री परत येणार या कल्पनेने एकदम ‘आता दिवसभर काय करावे’ असा विचार उद्भवला.

खरोखर, मनाची गंमत असते. नेहमीच्या गोष्टी करण्यात त्याला कंटाळा येत असतो असे वाटते पण जर एखादा दिवस अचानक नेहमीच्या गोष्टींपासून सुटका मिळाली तरी ते अस्वस्थ होते. अशा मनाला कशी शांतता मिळेल?

‘आता मला घरात कामच सांगत नाहीत!’ तक्रारीच्या सुरात ती आपली अडचण समोर आणत होती. एकत्र कुटुंबामधील घरामधील दोन बायकांमध्ये सामंजस्य आढळणे कठीणच. त्यातून घरात तीन एकाच वयाच्या बायका असल्या तर त्यांच्यामधील तणावांना अंतच नसतो. काम करायचे तर नीट करायचे अशी मनोवृत्ती असलेल्या बाईच्या गळ्यात हळूहळू जास्त कामे पडतात. सुरुवातीला उत्साहाच्या भरात अंगावर घेतलेल्या कामांचा बोजा कधी वाटला तर त्या दिवसापुरती ती कामे वाटून घेण्याचा समंजसपणा सगळ्यांत असतोच असे नाही. आणि मग तक्रार केली की ‘तू अजिबात काम करु नकोस, आम्ही सांभाळू.’ दुसर्‍या बायकांनी अशी पराकोटीची भूमिका घेतल्यामुळे तिची कुचंबणा होत होती. हाताला काम करण्याची सवय लागली असण्याने अचानक आता काहीच करायचे नाही हे कळल्यावर अस्वस्थता निर्माण झाली होती.

जेव्हा तू जास्त काम पडते अशी तक्रार केलीस तेव्हा काम पडू नये हीच इच्छा होती ना?

‘माझ्या वाटची जी कामे आहेत ती मी आनंदाने करीन. पण माझ्या कामसूपणाचा इतरांनी फायदा घ्यावा हे मला पटत नाही. त्यात माझे काय चुकते?’

पण मग कामच करायचे नाही ही अवस्था का आवडत नाही? खरी गोष्ट अशी आहे की काम करण्यामध्ये तुला आनंद मिळत होता. परंतु त्या आनंदाचा लाभ उठविल्यानंतर परत बाकीच्या लोकांकडून कौतुकाची अपेक्षा, वा तू काम केले असल्याच्या जाणीवेची अपेक्षा असल्याने तोंडातून तक्रार निघत होती. जी गोष्ट करीत असताना आनंद मिळतो त्या गोष्टीतून अधिक समाधान मिळविण्याची धडपड अयोग्य आहे. काम करण्याचा आनंद मिळतो हे कळल्यावर बाकी सर्व जगाच्या प्रतिक्रियांपासून आपण अलिप्‍त व्हायला हवे. एकच चेक दोन वेळा कॅश करता येत नाही त्याचप्रमाणे काम केले आहे या घटनेचा दोनवेळा फायदा उठविता येत नाही. लक्षात घे की तुझा आनंद काम करण्यामध्ये आहे, केल्या कामाची इतरांकडून पावती घेण्यात नाही.

‘पण मग मी एकटीनेच काम करायचे आणि बाकीच्यांनी बसून खायचे असे का?!’

बाकीच्यांनी काय करायचे हा त्यांचा व्यक्‍तिगत प्रश्न आहे. तू त्यात नाक खुपसशील तर अस्वस्थतेशिवाय काही मिळणार नाही!…….

संबंधित लेखन

PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME