वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

कुंभारकला : काल व आज

२३ प्रतिक्रिया

तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ ….. विठ्ठला तू वेडा कुंभार ||

“कुंभारासारखा गुरु नाही रे जगात। वरि घालितो धपाटा, आत आधाराला हात॥”

कविवर्य गदिमांच्या या अजरामर ओळींमध्ये कुंभाराचे रूपक वापरून गुरु- शिष्याचे नाते कसे असते ते सांगितले आहे. वर्षानुवर्षे सिद्धहस्त कवी, साहित्यकार मंडळींना आपल्या भारतीय संस्कृतीचा प्राचीन हिस्सा असलेल्या कुंभाराच्या कलेने व जीवनशैलीने प्रेरित केल्याचे दिसून येते.

भारताच्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात हमखास आढळणारा व्यवसाय म्हणजे कुंभारकाम. पार सिंधू संस्कृतीपासूनचा इतिहास असलेला हा व्यवसाय आजही प्रतिकूल परिस्थितीत गावांगावांतून प्लॅस्टिक, अ‍ॅल्युमिनियम, स्टील व्यवसायांनी निर्माण केलेल्या आव्हानाला तोंड देत टिकून आहे. आणि त्याचे मुख्य कारण आपल्या संस्कृतीत असून मातीकामाला पुन्हा एकदा मिळालेल्या प्रतिष्ठित, आधुनिक अवतारात आहे.

“आधी तुडवी मग हाते कुरवाळी.. ओल्या मातीच्या गोळ्याला मग येई आकृती वेगळी.. घट जाती थोराघरी, घट जाती राऊळात.. वरि घालितो धपाटा, आत आधाराला हात॥”

माणूस बदलला, अत्याधुनिक झाला. पण संस्कृतीची पाळेमुळे खोल रुजलेल्या भारतासारख्या देशात कुंभाराला व कुंभारकामाला समाजात आजही तितकेच अनन्यसाधारण महत्त्व आहे. काय करतो तरी काय हा कुंभार? बारा बलुतेदारांच्या यादीत मानाचे स्थान मिळवणारा हा मातीकाम करणारा कुंभार प्रत्येक समाजाचे अविभाज्य अंग आहे. कुंभ म्हणजे मातीचा घडा. अशा घड्याला जो बनवतो, आकार देतो, तो कुंभार. आपल्या संस्कृतीत कुंभाला जीवाचे प्रतीक मानले आहे. पंचमहाभूतांनी बनलेल्या मातीच्या घड्याला पंचमहाभूतसंपन्न देहाचे प्रतीक मानले आहे. आणि ह्या जीवाला आकार देणारा तो ब्रह्मा, प्रजापती. म्हणूनच कुंभाराला प्रजापती ह्या नावाने संबोधिल्याचे उल्लेखही आढळतात. त्याच्या चाकाला ऋतुचक्राचे, कालचक्राचे प्रतीक मानले गेले आहे. जसा कुंभार आपल्या चाकावर घड्याला आकार देतो त्याचप्रमाणे विधाता मनुष्याला घडवितो. गदिमांच्याच एका प्रसिद्ध काव्यात ते म्हणतात,

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार | विठ्ठला तू वेडा कुंभार ||
माती पाणी, उजेड वारा | तूच मिसळसी सर्व पसारा |
आभाळच मग ये आकारा | तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥
….. विठ्ठला तू वेडा कुंभार ||

जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व टप्प्यांमध्ये ज्या कुंभाला आपल्या भारतीय संस्कृतीत एवढे महत्त्व आहे त्या कुंभ निर्माण करणाऱ्या कुंभाराचे उल्लेख प्राचीन साहित्य, पुराणांमध्येही आढळतात. कुटुंबातील, समाजातील आनंदाच्या व दुःखाच्या प्रसंगीही त्याच्या कसबी हातांतून बनलेल्या मृत्तिकापात्रांचे एक विशेष महत्त्व आहे. आजही दिवाळी, नवरात्र, गणेशोत्सव, करवाँ चाँद, संक्रांत ह्यासारख्या सणांना वापरण्यात येणाऱ्या मातीच्या भांड्यांनी त्या त्या उत्सवाची शोभा अजूनच वाढते. कधी पणती, कधी करा, कधी सुगड, कधी जाळीदार नक्षीचे दिवे, लहानांसाठी टुमदार खेळणी, बाहुल्या, तर कधी घड्याच्या रूपात ही मातीची भांडी आकर्षक रीतीने आपल्याला भेटायला येतात. त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये, आकारांमध्ये, बनविण्याच्या पद्धतीत व कलाकुसरीमध्ये प्रत्येक प्रांतानुसार व कलाकारानुसार वैविध्य आढळून येते. मनाला मोहविणारे हे मातीकाम पारंपारिक ज्ञान, अनुभव, कसब व आधुनिक तंत्रज्ञानामुळे अजूनच खुलताना दिसून येते. आज बाजारात सिरॅमिकच्या भांड्यांची, कलावस्तूंची, फिटिंग्जची असलेली क्रेझ हे त्याचेच प्रतीक आहे.

आपला देश शेतीप्रधान. त्यामुळे शेतकामाशी संबंधित मातीची भांडी कुंभाराकडे न आढळली तरच नवल! कित्येक शतके सर्वसामान्य जनता ह्याच मातीच्या गाडग्या-मडक्यांमध्ये अन्न रांधायची. घरातील साठवणीचे अन्नधान्य अशाच मातीच्या रांजणांमध्ये साठवले जायचे. दूध-दही-ताक-तूप-लोणी हे दुग्धजन्य पदार्थही अशा मातीच्या भांड्यांतूनच ठेवले जायचे. आजही उत्तर भारतात अनेक ठिकाणी मातीच्या कुल्हडमधूनच दूध, चहा वगैरे पेये दिली जातात. मटक्यातील दही, शिजवलेले अन्न आजही तितकेच लोकप्रिय आहे.

अन्नसेवनासाठी पूर्वीही सामान्य माणसाच्या घरी मातीच्या, खापराच्या भांड्यांचाच उपयोग होत असे. बलुतेदारीची पद्धत असल्यामुळे कुंभाराने बनवलेल्या भांड्यांच्या बदल्यात त्याला धान्य वगैरे पुरविले जाई. लग्नाचे वेळी काही प्रांतांमध्ये नववधूला वराकडचे लोक सौभाग्यविधींचा एक भाग म्हणून कुंभाराकडे घेऊन जात. कुंभार नववधूला त्याच्या मातीकाम करायच्या चाकावर बसवून ते चाक सात वेळा गोल गोल फिरवत असे. कुंभारीण नववधूला पाण्याने भरलेले सात घडे भेटीदाखल देत असे. पाणी भरलेले ते सात घडे म्हणजे सात समुद्रांचे प्रतीक. ही भांडी नंतर नववधू तिच्या नव्या संसारात वापरत असे. त्यातही पुन्हा मजेमजेशीर समजुती आढळून येतात. जर ह्या भांड्यांमधली कोणतीही दोन भांडी आपापसांत टक्करली तर त्याचा अर्थ पुढे वधू-वरांच्या संसारात भांडणे होतील! ह्या सर्व भांड्यांच्या व सहभागाच्या बदल्यात कुंभाराला कपडेलक्ते दिले जात असत. घरात कोणाची मयत झाली तर तेव्हाही कुंभार तेरा घट त्या घरी पोहोचवत असे. मयताच्या घरातील सर्व खापराची भांडी फोडून नष्ट करण्यात येत व त्याजागी नवी भांडी घेतली जात. होळी – शिमगा व ग्रहणाच्या वेळीही अशाच प्रकारे घरातील जुनी भांडी नष्ट करून त्यांची जागा नवी भांडी घेत. पाणी भरण्यासाठी व साठवणीसाठी मातीचे घडे, धान्य – भाज्या – पिठे इत्यादी साठविण्यासाठी मातीचे रांजण, पाणी पिण्यासाठी सुरया, मातीचे दिवे, चिलीम – हुक्का… दैनंदिन आयुष्यात कुंभाराशिवाय पानही हालत नसे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. एवढेच नव्हे तर प्राचीन संस्कृतींमध्ये शिक्के-मुद्रा बनविण्यासाठीही ह्या कलेचा वापर झालेला दिसून येतो. मातीच्या वस्तू भाजण्यासाठी पारंपारिक भट्टीचा वापर करण्यात येत असे. उत्खननांमध्ये सापडलेल्या खापराच्या तुकड्यांवरून, त्यांची बनावट – त्यावरील नक्षीकाम, खुणा, वापरलेली माती, मूळ भांड्याचा आकार इत्यादींवरून त्या त्या काळचा इतिहास समजण्यास मदत होते.

भारतात आढळणाऱ्या कुंभारकामाच्या प्रांतवार वैशिष्ट्यांमध्ये भांडे बनवण्याची – भाजण्याची पद्धत, वापरली जाणारी माती, भांड्याची जाडी, आकार, रंगकाम, नक्षी, कलाकुसर यांच्यात बरीच विविधता पाहावयास मिळते. ग्लेझ दिलेली व ग्लेझ न दिलेली पॉटरी असे त्यांचे प्रमुख वर्गीकरण करता येईल. ग्लेझ न दिलेल्या पॉटरीतही अनेक प्रकार आढळून येतात. तसेच लाल व काळ्या रंगाची मातीची भांडी पूर्वापार लोकप्रिय असलेली दिसून येतात. त्या त्या भागातील शैली, प्रथा – परंपरा, समजुती, राजवटी व वातावरणाचाही खास प्रभाव या भांड्यांवर दिसून येतो. उदाहरणार्थ : राजस्थानात बनवल्या जाणाऱ्या पाणी साठवायच्या भांड्यांचे मुख लहान व निमुळते असते. त्यामुळे राजस्थानात अतिशय मौल्यवान असणारे पाणी सांड-लवंड होण्यापासून, उष्णतेने बाष्पीभवन होण्यापासून वाचते. मीरत, झज्जर ह्या उत्तरप्रदेशातील प्रांतांत उत्तम कलाकुसरीच्या सुरया पाहावयास मिळतात. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर हे धान्य साठवणीसाठी मोठ्या आकाराचे रांजण बनविण्यात प्रसिद्ध आहे. दिल्ली, जयपूर प्रांतांतील खेड्यांमध्ये निळ्या रंगाचा वापर करून अतिशय सुंदर, देखणी भांडी बनवली जातात. अनेक ठिकाणी कुंभार विविध देवीदेवतांच्या मूर्ती, खेळणी, फुलदाण्या, बागकामाच्या कुंड्या, कौले, स्वयंपाकाची व जेवणाची भांडी बनवताना दिसून येतात. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू इत्यादी राज्यांतील कुंभारकाम विशेष प्रसिद्ध आहे.

तसे कुंभारकाम जरा मुश्कीलच! चाकावर गरगरा फिरणाऱ्या मातीच्या गोळ्याला एका हाताने केंद्रापाशी नियंत्रित करायचे, दुसऱ्या हाताने त्याचा आकार नियंत्रणात ठेवायचा म्हणजे हस्तकौशल्याबरोबरच ताकदीचे काम. पारंपारिक पद्धतीच्या मोठ्या व्यासाच्या चाकांवर काम करताना पूर्वी कुंभारांचे हात, पाठ, मान धरायचे. ह्या व्यवसायात खांदेदुखी – पाठदुखी ही ठरलेलीच! परंतु विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे सध्या कमी आकाराची व विजेवर चालणारी स्वयंचलित चाके बाजारात मिळत असल्यामुळे पूर्वीचे हे महाकष्टाचे काम आता जरा सुकर झाले आहे.

आज भारतीय मातीकलेने साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय बनावटीच्या, कलाकुसरीच्या मातीकामाला चांगली मागणी आहे. तसेच अनेक प्रशिक्षित कलावंत, शिल्पकार मातीकामाकडे वळल्यामुळे पारंपारिकतेला नव्या कलामूल्यांची व कौशल्याची जोड मिळाली आहे. भारत सरकारतर्फेही ह्या कलाकारांना व त्यांच्या कलावस्तूंना पाठिंबा देण्यासाठी विविध मेळे, प्रदर्शने आयोजित केले जातात. पारंपारिक मातीकामाबरोबरच आज स्टुडिओ पॉटरीला बाजारपेठेत विलक्षण मागणी आहे. गृहसजावटीसाठी, तसेच उद्याने, ऑफिसेस, मॉल्स इत्यादी ठिकाणीही मातीच्या कलात्मक वस्तू वापरण्याकडे विशेष कल आहे. त्यासाठी जास्त किंमत मोजायची तयारीही सध्याच्या ग्राहकांमध्ये आढळून येते.

कुंभारकलेच्या दृष्टीने हे अतिशय आशादायी चित्र असले तरीही आजचा पारंपारिक व्यवस्थेतील कुंभार उदरनिर्वाहासाठी झगडत असल्याचे विदारक वास्तवच समोर येते. शिक्षण व आर्थिक पाठबळाचा, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव हे त्यामागचे मूळ कारण म्हणता येईल. अपुऱ्या सोयीसुविधांमध्ये, असंघटित व अनिश्चित स्वरूपाच्या व्यवसायामध्ये रस्त्याच्या कडेलाच पाले ठोकून अनेक कुंभार आपला चरितार्थ चालवताना दिसतात. एका गणनेनुसार भारतात काही काळापूर्वी कुंभारांची अशी बारा लाख कुटुंबे होती. हीच संख्या १९५० साली चौपन्न लाख असल्याचे सांगितले जाते. परंतु औद्योगीकरणामुळे त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट दिसून आली. बाजारपेठा प्लॅस्टिक, स्टील, अ‍ॅल्युमिनियमच्या, विदेशी बनावटीच्या वस्तूंनी पादाक्रांत केल्या व पारंपारिक, नाजूक व फुटणाऱ्या ह्या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली.

परंतु आता चित्र पालटत आहे. मातीच्या ह्या भांड्यांचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व नव्याने ज्ञात झाल्याने स्वयंपाकासाठीही ही भांडी वापरण्यास अधिकाधिक कुटुंबे पसंती देत आहेत. आता गरज आहे ती पारंपारिक कुंभाराला आवश्यक आधार देऊन त्याला तांत्रिक दृष्ट्या अधिक सक्षम करण्याची! त्याला त्याच्या कसबाचे, कामाचे योग्य मूल्य देण्याची. आणि समाजाचा डोलारा, व्यवस्था शतकानुशतके सांभाळण्यात सिंहाचा वाटा असलेल्या या मातीच्या शिल्पकारास जगण्याची नवी उमेद देण्याची!

– अरुंधती
[ माहिती संकलनः आंतरजाल व अन्य स्रोत ]

संबंधित लेखन

 • देवा तुझी सोन्याची जेजुरी
  शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे…
 • ११८ वर्षांची गणेशोत्सव परंपरा………….
  दगडूशेठ च्या शतकातील तीनही मूर्तींचे आजही विधिवत पूजन
   
  श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केले…
 • गोंधळ
  विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा …
 • जोगवा – एक वास्तव दर्शन
  शहरीकरणाच्या थोड्याच दूर असणार्या वास्तवासाठी पहा, त्याला चव्हाट्यावर आणणाऱ्या धाडसी निर्मात्यांस…
 • मराठी भाषा – ओळख आणि इतिहास

  इतिहास:
  “महाराष्ट्री प्राकृत” या “संस्कृत” पासून उगम पावलेल्या भाषेचा कालांतराने इतर भाषांसो…

PG

अरुंधती कुलकर्णी

सहज सुंदर आयुष्याचा घेते चांदणझोका |
या रसिकांनो रंजक वेधक गोष्टी माझ्या ऐका ||

नमस्कार, मी अरुंधती कुलकर्णी. आपण मला माझ्या इरावती या ब्लॉगवरही भेटु शकता.

 1. JGD,

  ths a very good article. It seems you studied the subject a lot. You hve a gr8 knowledge about writting I guess.. simply gr8 | Tussi Gr8 ho…..
  Love
  Anup Deshpande

 2. Chi. Irtulas,
  Sundar lekh! Agadi abhyaas purn sudhdha ho!
  ( “Ichalkaranji Sahity Sammelana” sarkha nahi! )
  Kabira cha hi kumbharavar cha ek doha ahe – to Nandan Mahajan la vicharun kalavto. Tyala tuza lekh frwrd hi karto.
  -Baba.

 3. Ram ram Arundhati,
  Pharach chan ahe lekh, Pan tula evadhi mahiti kashi kay???

 4. Priy Irutaais,
  Tuza lekh atishay sahaj sundar ani sampoorna ahe. Tuze lekhan vachun pot bharte, changle kasdaar vachan kelyacha anand milto ani mahitimadhye navi bhar padte te veglech. Ek vegla drushtikon lakshat yeto.
  Asech amchya vachanvishwala samruddha karit raha. Tula ajun adhikadhik lekhan karnyachi prerana milo.

  Tuzi
  Priyamvada

 5. Iravati,
  khoopch chhan lekh aahe. kharach kiti hi mahiti milavavi lagali asel na tula?
  aani tuze abhinandan.
  asech chhan chhan interesting lekh lihoon aamhala pathavat ja.

 6. अरुंधती, खुपच छान आणि माहीतीने परीपुर्ण असा लेख. मज्जा आली वाचायला.
  पुढील लेखनास शुभेच्छा

  अनिकेत

 7. जालन्दर बनकर म्हणतात:

  अरुंधती,कुंभारकलेबद्दल खुप चांगली माहिती लिहिली आहे.लहान असताना मी,कुंभारवाड्यात फ़िरत्या चाकावर बनणारे घट,घागरी,मडकी,बुळकुली इ.वस्तू तासनतास पाहायचा.कच्ची मडकी भाजायची भट्टी हे सारे जवळून पाहायचा.घोड्यावर ८-१० मडकी घेऊन कुंभार फिरायचे निरनिराळ्या गावी जाउन विकायचे.सारे चित्र डोळ्यासमोर आले.ह्या साध्या कलाकारावर तुम्ही सुंदर लेख लिहिला.आता बहुतेक कुंभार मंडळी विट भट्ट्या चालवतात.काही कुंभारबाया स्वताः मडकी बनवायच्या.

 8. मित्रवर्य,कुम्भार्कला हा लेख फरच छान झाला आहे.लेखन फारच चागले आहे.ही कला जपण्यासाठि हे गरजेचे आहे.धन्यवाद….
  आपला हा लेख आम्ही आमच्या मासिकात प्रसिध्द करु का? आपन तशी परवानगी द्यावी ही विननती.
  कळावे,
  आपला
  द्त्तात्रय सुर्वे
  सम्पदाक-शिवमार्ग मासिक,पुणे

 9. thats like a good collection on the kumbhar kalla
  i thanks to arundhati, it’s very nice, keep going on different subject.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME