वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

कृष्णं वंदे जगद्‍गुरूम आणि मुग्धगीते

२ प्रतिक्रिया

मुग्धा आणि तिची गायनी कृष्णभक्ती हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय आहे.

भागवतातील भगवंतांच्या लीलाचरीत्रातले प्रसंग असोत की संतांनी त्यांच्या रुपाचे, गुणाचे, अलौकिक जीवनाचे केलेले वर्णन असो, मुग्धाने ते ऐकवून आपल्याला नखशिखांत हरपून टाकलं होतं. किती लिहावं यावर आणि किती नको?

कृष्णं वंदे जगद्‍गुरूम

कृष्णं वंदे जगद्‍गुरूम

बड़ा नटखट है ये कृष्णकन्हैया, का करे यशोदामैया असे आपले चिमुकले हात पुढे करून विचारणारी मुग्धा आपल्याला थेट त्या रांगणार्‍या बाळकृष्णाच्या आजूबाजूला घेउन गेली.

राधा क्यों गोरी, मैं क्यूं काला असे निरागसपणे विचारणारी मुग्धा काय किंवा चल उठ रे मुकुंदा अशी हळूवार भूपाळी गाणारी मुग्धा काय… अत्यंत नितळपणे ऐकणार्‍याला भगवद्‍चरीत्रातल्या एकेक ओळखीच्या जागा दाखवण्याचं तिचं काम तिच्याही नकळत चालू असे.

जळी वाकून मी घट भरताना, कुठून अचानक आला कान्हा यात खट्याळपणा, नाचत होते हरिमंदिरी मध्ये समरसतेतली बेधुंद धांदल, वृंदावनी वेणू वाजे मध्ये मुरलीची जादू, श्रीरंगा कमलाकांता असे अत्यंत उल्हासित करणारे आळवणे, ’तुझ्या मुरलीने तहानभूक हरली रे मधली एकरूपतेची सायुज्यभक्ती असे कितीतरी आविष्कार दाखवत मुग्धाने आपल्या सर्वांना अक्षरशः कृष्णमय करून टाकलं होतं.

बद्धाला ईश्वरीय दास्यत्वाच्या राजमार्गाकडे घेऊन जाणारी सूरांची ताकद ही मुग्धाची आपल्या सर्वांसाठीची सगळ्यात मोठी उपलब्धी होती.

कंठातचं रूतल्या ताना’…….. मुग्धाची कमालीच्या ताकदीची ओपनिंग लाईन ऐकली आणि क्षणार्धात मी गोकुळात गेलो.

माझ्या मनःचक्षुंसमोर श्रीकृष्णप्रीतीने वेड्या झालेल्या गौळणी अन् त्यांचा भगवंताप्रती असलेला पराकोटीचा भाव उभा राहिला.

ही नादाला कंठातचं अडकवून टाकणारी, देह,मन अवरूद्ध करणारी अवस्था त्या गोपगोपींना कश्यामुळे बरं प्राप्त झाली असेल?

एवढे उत्कट वेध त्या श्रीरंगांचे कसे लागत असतील?

मुग्धा रंगून गेली होती. आपण थक्क झालो होतो…..

कुठे गं बाई कान्हा या ओळीतून तर तिने आख्ख्या गोकुळाचे विरही मनोभाव अगदी आत भिडणार्‍या कंपनीयतेने प्रकट केले.

एक अनोखी कालवाकालव होवून गेली. मीही नकळत स्वतःला विचारू लागलो ’कुठे आहे तो परमात्मा? कुठे आहे ते सावळे परब्रम्ह?’.

अंर्तशोधनाचा एक रस्ता लख्ख उजळून समोर आला होता.

कुणी तरी जा जा जा, घेउनी या मोहना’. मुग्धाने या हलवून टाकणार्‍या स्वरात भक्ताचं आर्जवी प्रेमळ मागणं आमच्या ओठापर्यंत आणून ठेवलं.

तिच्या या गीताने माझ्यासारख्या अनेक सामान्य साधकांना त्या मुरलीमनोहराच्या प्रीतीकंदात न्हाउ घातलं.

संबंधित लेखन

PG

विक्रांत देशमुख

मी एक चिमुकलं रानफुल…रंग,रूप,गंध नसलेलं… दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं… त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला… रुतुराज आज वनी आला’.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME