वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

खारे व मसाला शेंगदाणे

२ प्रतिक्रिया

समुद्रकिनारी गेल्यावर ती चिरपरिचित सेंगचना ची हाक आली नाही असे कधी तरी होईल का? आमच्या चाळीत तर शेंगदाणे-चणे, शेव, कुरमुरे, चिंचोके, डाळं, काबुली चणे, कधीकधी हिरवे उकडलेले चणे, कैरी-कांदा व बरेच काही घेऊन भैय्या येत असे. असेही आपल्याकडे नाक्यानाक्यावर हा सारा माल मसाला शिगोशीग भरलेला असतो. येताजाता पावले थबकतातच. मग कधी गरमागरम खारे शेंगदाणे घे तर कधी सर्दी झालेली असली की चणे. चटणी-चिवड्यासाठी डाळ्या, कुरमुरे, भेळीचा तर साराच सरंजाम असतोच पण घरी करायचा कंटाळा आल्यास ओली व सुकी भेळही चटदिशी हाजिर होते. पापडीचा चमचा करून मस्त हासहुस करत ही आयती भेळ चापण्यातली लज्जत काही औरच. 🙂  ही अशी दिवास्वप्ने मला भारीच त्रास देतात. इथे तशी पाकिटातली भेळ मिळते पण त्यातल्या चटण्या( दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी मस्तच असल्या तरी ) मला खास आवडत नाहीत. बरे एकवेळ तेही चालवून घेऊ… मात्र खारे शेंगदाणे व मसाला शेंगदाणे अगदीच बेकार मिळतात. बरेचदा ते खूप जुनाट व सादळलेले असतात. मसाला शेंगदाण्याला तर एक चमत्कारिक-तेलकट वास ही येत असतो. सुरवातीला चार-पाच वेळा निरनिराळ्या दुकानांमधून आणून पाहिले पण सगळीकडे तिच रडकथा. खाऱ्या शेंगदाण्याची तल्लफ काही चैन पडू देईना तसे एक दिवस घरीच प्रयत्न केला. जमले. आता तर चुटकीसरशी खारे शेंगदाणे – मसाला शेंगदाणे ( हिरवा मसाला, लाल मसाला, किंचितश्या डाळीच्या पिठाचा हात लावलेले- कोटेड, वगैरे प्रकार ) तयार…. 🙂

खारे व मसाला शेंगदाणे

वाढणी : निदान दोन माणसांना तरी एकावेळी पुरावी.

साहित्य:

दोन वाट्या कच्चे शेंगदाणे
तीन चमचे मीठ
तीन वाट्या पाणी

कृती :

शेंगदाणे, मीठ व पाणी एका काचेच्या भांड्यात एकत्र करून तीन मिनिटे मायक्रोव्हेव मध्ये वॉर्मरवर ठेवा. एकदा हालवून पुन्हा मिनिटभर ठेवा. नंतर भांडे बाहेर काढून पाच-सात मिनिटे शेंगदाणे खाऱ्या पाण्यातच ठेवून चाळणीवर टाकून सगळे पाणी काढून टाका. आता शेंगदाणे काचेच्या भांड्यात घाला व भांडे पुन्हा मायक्रोव्हेव मध्ये ठेवा. सुरवातीला तीन वेळा ४५ सेकंद ठेवायचे व प्रत्येक वेळी शेंगदाणे हालवायचे. त्यानंतर प्रत्येकवेळी ३० सेकंद असे चार वेळा व २० सेकंद ३ वेळा. जरा दमट आहेत असे वाटल्यास अजून दोन-तीन वेळा २० सेकंद ठेवावे. हा अंदाज दोनतीनदा केले की बरोबर येतो. मायक्रोव्हेव मधून काढून कोमट होईतो दम धरा. गरम खाल्ले तरी लागतील मस्तच पण थोडेसे ओलसर वाटतील. जसे जसे थंड होत जातील तसतसे अगदी टिपीकल खारे शेंगदाणे लागतील.

टीपा :

मायक्रोव्हेवची वेळ अजिबात वाढवायची नाही. एकावेळी जास्ती ठेवू म्हणजे पटकन तयार होतील असा मोह झाला तरी तो अमलांत आणायचा नाही. जळून जातात. अगदी थोडा थोडा वेळ ठेवून प्रत्येक वेळी हालवावे. उद्याला हवे असतील तर शक्यतो आजच करावे. चुकून मीठ जास्त झालेय असे वाटल्यास तीन-चारवेळा ठेवून झाले की हातावर चोळावे म्हणजे जादा झालेले मीठ पडून जाईल. मायक्रोव्हेव मध्ये करायचे नसल्यास पातेल्यात जिन्नस घेऊन खळखळवून उकळून घ्यावे. पाणी काढून टाकले की पसरट पॅनमध्ये किंवा तव्यावर टाकून मध्यम मंद आचेवर परतत राहावे. आच अजिबात वाढवू नये. किमान दहा ते बारा मिनिटे लागतील सगळे पाणी आटून कोरडे होण्यासाठी. पंधरा दिवस मस्त राहतात. अजिबात सादळत नाहीत.

मसाला शेंगदाणे करताना……

साहित्य :

दोन वाट्या कचे शेंगदाणे
दीड वाटी पाणी
तीन चमचे मीठ
तीन चमचे तिखट ( आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावे )
चिमूटभर गरम मसाला
एक मोठा चमचा बटर किंवा तूप
दोन चमचे लिंबाचा रस ( ऐच्छिक )

कृती :

शेंगदाणे, पाणी, मीठ व तिखट एकत्र करून वरीलप्रमाणेच उकडून घ्यावे. मुळात आपण पाणी कमीच ठेवले असल्याने जे उरले असेल ते काढून टाकायचे नाही. एका पसरट पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा बटर घालावे. ते वितळले की हे उकडलेले शेंगदाणे शिल्लक असलेल्या पाण्यासकट त्यावर घालावेत. आच मध्यम ठेवावी व परतत राहावे. पाणी थोडेसे कमी झाले की गरम मसाला भुरभुरून लिंबाचा रस घालावा. शेंगदाणे जोवर कोरडे होत नाहीत तोवर परतत राहावे. तूप-तिखट-मसाला व लिंबाच्या एकत्रीकरणाने मस्त खमंग वास सुटतो व शेंगदाणे तुकतुकीत दिसू लागतात. साधारण दहा ते बारा मिनिटाने आच बंद करावी. गरम गार कसेही छानच लागतात.

टीपा :

मसाला शेंगदाणे शक्यतो पॅनमध्ये किंवा तव्यावरच कोरडे करावेत. तव्यावरच लिंबाचा रस टाकल्यामुळे आंबटपणा तर उतरतो मात्र शेंगदाणे ओले होत नाहीत. आठदहा दिवस अगदी मस्त टिकतात. ( केल्याकेल्या फन्ना न झाल्यास…. पण अशी वेळ येतच नाही. घरात कोणीही नसताना करून ठेवले तरच….. ) मसाला शेंगदाण्यात बरीच विविधता आणता येते. कधी लसूण घालून तर कधी जिरे-मिरीचे, किंचित डाळीच्या पिठाचे कोटींग चढेल असे. 🙂


संबंधित लेखन

PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

 1. vaa vaa Desai madam ! Pharacha chhan ! Mi sadya Ny-USA madhye aahe Aani mala khare shengadane khup Aavadatat.yethe Aapalayakadae jase milatat tase khare shengadane milat naahit. Mi lagech maajhya patnila he vachun dhakhavle aani Moven madhye kele suddha.
  Vaa pharacha chhan !
  Dhanyawad !
  Ny-USA
  30-7-10

 2. धन्यवाद पुरुषोत्तमजी. 🙂

  आपल्याला पाकृचा उपयोग झाल्याचे ऐकून आनंद झाला.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME