वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

गीतेमधील मैत्रभाव: एक चिंतन

५ प्रतिक्रिया

ॐ श्री सदगुरू स्वामी माधवनाथाय नमः | ॐ श्री सदगुरू स्वामी मकरंदनाथाय नमः

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च |
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ||

श्रीभगवदगीतेच्या बाराव्या अध्यायातील तेरा क्रमांकाच्या या श्लोकावर आपण चिंतन करीत आहोत. पहिलं भक्तलक्षण आहे ’अद्वेष्टा’. जो कुणाचाही कधीच द्वेष करत नाही, ज्याच्या मनातून द्वेषभाव पुर्णपणे निघून गेला आहे हे सांगत असताना भगवंतानी काय गोष्टी आपल्यात नकोत किंवा कश्याचा आपण त्याग करावयाचा हे सूचित केलं. आणि पुढच्याच चरणात त्यांनी याची पॉझिटीव बाजू म्हणून एक विधायक खुण सांगितली ती म्हणजे ’मैत्र’.

…………………………………………………………………………………………………………..

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च | निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ||

आपल्याला मैत्री माहिती आहे. एक नातं, जिव्हाळ्याचे संबंध, सख्य, भावनिक गुंतवणुक तर क्वचित कधीतरी फक्त एक बाह्य उपचार अश्या अनेक स्वरूपात कधी ना कधी आपण या मैत्रीचा अनुभव घेतला असेल. भगवंत मात्र इथे मैत्र एक आंतरीक गुण म्हणून सांगत आहेत.
• खरं सांगायचं तर मैत्री हा जसा एक अभ्यास आहे तसाच तो बाकीच्या दैवी गुणांचा एक दृश्य परीणाम आहे. द्वेषरहीतता, करूणा, निर्मम होणं, निरहंकारी होणं असे अनेकानेक गुणं साधायला लागले, ही लक्षणे अंगात बाणू लागली की त्याची स्वाभाविक परिणीती ही मैत्रभावाचा विकास होण्यामध्ये होते. असा साधक अथवा भक्त अगदी सहज नम्र होतो आणि जनसामान्यांशी निष्काम मैत्रीपुर्ण व्यवहार करू लागतो.
• विनोबांनी तर एकेठिकाणी म्हटलंय ’निर्वैर होणं ही जणू सगळ्या गुणांची सुरूवात आहे.’
• प्रचलित मैत्रीमधल्या ज्या अगदी बेसिक प्राथमिक गोष्टी आहेत – म्हणजे आधार देणे अथवा दुसर्‍याला आधार वाटेल असे वर्तन, कधीही सोडून न जाणे, अंतःकरणात आस्था, प्रेम बाळगणं ह्यांचा समावेश तर मैत्रभावात असतोच पण त्याच्या पुढे जाऊन दुसर्‍याच्या कल्याणाची तळमळ, अत्यंत निरपेक्षता, अमानित्व वगैरे कितीतरी गुण भगवंतांना यामध्ये अपेक्षित आहेत.
• आपली मैत्री ही खुपच सापेक्ष असते. व्यक्तीसापेक्ष, गुणसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष वगैरे. पण भक्ताची मैत्री ही यापैकी कश्यावरच अवलंबून नसते. तो जे सर्वांशी सलोख्याचे, सामोपचाराचे संबंध निर्माण करतो आणि टिकवतो त्यामागे काय असतं बरं?
सर्वसामान्य असा अनुभव आहे की जेंव्हा दोन प्रकृती एकत्र येतात तेंव्हा संघर्ष हा अटळ असतो. जे कृष्णमुर्तींच एक खुप प्रसिद्ध वचन आहे To Be is To Be related and to be related is to be in conflict. समोरची व्यक्ती जर भिन्न विचारांची, भिन्न संस्कारांची असेल तर आपलं त्याच्याशी जमू शकत नाही. संत मात्र याकडे थोड्याश्या वेगळ्या दृष्टीने पाहतात. ’जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’ असा पक्का भाव अंतरात स्थिर असल्याने संपर्कात येणार्यात व्यक्तीचे प्रकृतीगत दोष बाजूला सारून त्याच्याशी हार्दिकतेचे संबंध राखणं त्यांना जमतं.
•  स्वामीजी म्हणाले “बोधात असलेली व्यक्ती अभेदाने वर्तन करते. आतमध्ये अद्वैत ज्ञान आणि बाहेर ’अणुमाजि राम, रेणुमाजि राम’ किंवा ’तुका म्हणे एका देहाचे अवयव’”.
• आपण दुसर्‍याचा स्वभाव आणि वैगुण्यांनी विचलीत होतो तर संत किंवा भक्त हे इतरांमधील भगवत स्वरूपाचं जमेल तसं दर्शन घेत असतात. त्यामुळे लोकांशी मित्रत्व सांभाळणं त्यांना सहज शक्य होतं.
…………………………………………………………………………………………………………..

महात्मांच्या मैत्रीचे अजून एक अंग म्हणजे दुसर्‍याच्या सुखदुःखात समरस होण्याची त्यांची कला. स्वामी माधवनाथ म्हणायचे, दुसर्‍याच्या दुःखाने दुःखी होणं एकवेळ सोपं आहे पण दुसर्‍याच्या आनंदात सहभागी होऊन आनंदी होणं हे महाकठीण. अश्याप्रकारे लोकांच्या भावविश्वाशी एकरूप होणं ज्याला साधतं त्याच्याठायी हे मैत्र खुप लवकर स्थिरावेल.

…………………………………………………………………………………………………………..

मैत्रत्वाचं आपल्याला परिचीत आणि किंबहुना इतिहासातील सर्वात मोठं उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. लहानपणी गोकुळातील साध्याभोळ्या गोपगोपींबरोबरचं त्यांच सख्य असो की सुदाम्यासारख्या बालमित्रावरचं त्यांच अलोट प्रेम. किंवा अर्जुन. आपल्या सख्यासाठी रथ हाकण्यापासून ते घोड्याला खरारा करण्यापर्यंत सर्व कामे मोठ्या प्रेमाने करणारे भगवंत. अर्जुन म्हणाला देखील, “एथ परब्रह्म तूं उघडें| सारथी केलासी ||”
अकराव्या अध्यायात अर्जुनाच्या क्षमापनस्तोत्राच्या अनुषंगाने त्या दोघांच्या सख्ख्याची अनेक उदाहरणं माऊलींनी मांडली आहोत.
• अर्जुनाला भगवंत सखा वाटले यात नवल नाही पण दुर्योधनालादेखील ते आपले मित्र वाटले यात सर्व काही आलं.
महापुरुषांचा मैत्रभाव हा बाहेरून असा विस्मय वाटावा इतका रूजू आणि सहज असतो.
ते लहानांशी लहान, थोरांशी थोर असे प्रत्येकाच्या पातळीवर येऊन संवाद साधतात. त्यांच्या या साधेपणामुळे आपली एखाद्या वेळी फसगत होण्याची शक्यता असते. आणि त्यांच्या बाजूने पाहिले तर? “ते माझे सखे सोयरे सांगाती, आठविती पाय विठोबाचे”

…………………………………………………………………………………………………………..
मैत्रभाव आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो निरपेक्ष, निष्कपट प्रेमाचा अभ्यास करतो, भूतदया अंगी बाळगतो तोच ’जगाशी जुनाट सोयरीक’ किंवा ’हे विश्वचि माझे घर’ असं म्हणू शकतो.

…………………………………………………………………………………………………………..
ज्ञानेश्वर महाराजांनी यावर निरूपण करताना म्हटलंय,
कां रायाचें देह चाळूं| रंकातें परौतें गाळूं| हें न म्हणेचि कृपाळू| प्राणु पैं गा||
श्रीमंताच्या देहात सुखेनैव वास्तव्य करावं आणि गरीबांच्या शरीरात अजिबात टिकू नये असं आपले प्राण ज्याप्रमाणे कधीच करत नाहीत..

गाईची तृषा हरूं| कां व्याघ्रा विष होऊनि मारूं| ऐसें नेणेंचि गा करूं| तोय जैसें ||
गाईसारख्या परोपकारी, प्रेमळ प्राण्यांची तहान आपल्यायोगे भागवावी पण वाघ-सिंहासारख्या हिंस्त्र श्वापदांना विष होऊन मारावे असे ज्याप्रमाणे पाणी करत नाही, ते एकाच साम्यभावाने सर्वांना तृप्ती देते
ज्ञानोबा म्हणतात की समस्त भूतमात्रांशी एकत्वाने ज्याने मैत्री केलेली आहे तो खरा भक्त.
या सर्वच उदाहरणात आपल्याला दिसून येतो तो प्रकृती निरपेक्ष व्यवहार.

…………………………………………………………………………………………………………..
मैत्रभावाचं तत्वज्ञानाच्या अंगानी असं खुप विवेचन करता येईल. प्रश्न उरतो तो म्हणजे साधकाने याचा अभ्यास कसा करावा? आपण हे लक्षण कश्या पद्धतीने आपल्या जीवनात उतरवू शकतो?
सर्वप्रथम वर म्हटल्याप्रमाणे सर्वांशी मैत्रीचा भाव प्रस्थापित होणं हा एक अंतिम परीणाम आहे. जेंव्हा आपण भगवंतांनी सांगितलेली विवीध लक्षणे उदा. भक्ताची लक्षणे वा ज्ञानी महापुरुषांची लक्षणे अथवा स्थितप्रज्ञाची लक्षणे अभ्यासायला लागू आणि त्यातली काहीबाही आपल्या आयुष्यात मुरू लागतील, त्याचा डायरेक्ट इफेक्ट म्हणून भगवंतांना अभिप्रेत असलेला मैत्रभाव आपल्या व्यवहारात आपोआप प्रकट होईल.

…………………………………………………………………………………………………………..
दुसरे म्हणजे ’जगामध्ये जगन्मित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र’ अशी समर्थांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आपले बोलणे हे अत्यंत मधूर, सरळ, हितकारी असे करायचा अभ्यास आपण करूयात.

…………………………………………………………………………………………………………..

सहनशीलता आणि व्यवहारामध्ये अहंभाव शक्य तितका कमीकमी करत जाणे यासाठी आवश्यक आहे.

…………………………………………………………………………………………………………..
आपली जी मध्यवर्ती कल्पना आहे या महिन्याची, ’प्रेमभाव’. त्याचा अभ्यास हा देखील मैत्रभावासाठी खुप पुरक आहे हे एव्हाना आपल्या लक्षात आलंच असेल.
मागे काही वर्षांपुर्वी स्वामीजींनी एक युक्ती शिकवली होती. Shooting of Prayer. प्रेम आणि कल्याणाच्या भावनेचे प्रक्षेपण. अधूनमधून समोरच्या व्यक्तीवर – मग त्याची बॅकग्राऊंड, पुर्वेतिहास, त्याचा स्वभाव वगैरे कसाही असो – आपण प्रेम आणि कल्याणाच्या भावनेचे प्रक्षेपण करायचे. ’ह्या व्यक्तीचे कल्याण होवो’ ’तिच्यावर परमात्म्याची कृपा होवो’ अश्या स्वरूपाची तीव्र भावना मनोमन करणे यामुळे आपल्या लोक आणि लोकव्यवहाराविषयी असलेल्या भावामध्ये हळूहळू बदल घडायला लागतो. हा बदल आपल्यामध्ये भगवंतांना अपेक्षित मैत्र आणतो.

…………………………………………………………………………………………………………..

अश्या अनेक छोट्या मोठ्या युक्त्या आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात. भगवंतांनी आदर्श म्हणून जे काही गुण किंवा लक्षणे सांगितली आहेत ती केवळ पुस्तकात अथवा ग्रंथात न राहता तुमच्या आमच्या रोजच्या जीवनात आली तरंच आपले जीवन समृद्ध होते. आता आपल्याकडून या अभ्यासात काहीही कसर न रहावी आणि स्वामीजींना, भगवंतांना अभिप्रेत अश्या सर्व पारमार्थिक गुणांचा परिपोष आपल्यात व्हावा ही त्यांच्याच चरणी प्रार्थना करून आपण इथे थांबूयात.

हरी ॐ तत् सत्.

संबंधित लेखन

 • अश्वत्थ!
   
  एखाद्या अंधार्‍या खोलीत एका कोनड्यात कुणीतरी समईची मंद वात लावावी आणि तिच्या शांत तेवण्याने अव…
 • अध्यात्मिक आनंद आणि सात्विक सुख
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

  पुणे,

  दिनांक —

  चि. श्रीधर यास अनेक आशिर्…

 • वर्गवारी करण्याची सवय
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
  खिशात हात घालून त्या निर्मनुष्य रस्त्यावर स्वतःच्या…
 • श्रीमद्भगवद्गीता व आहार
  आजच्या काळात आपल्याला खाण्यासाठी कुठे काय मिळते,कुठले ठिकाण चांगले आहे त्याची इत्यंभूत माहिती असत…
 • नात्यांतील अस्थिरता
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  त्याची गाडी जुनी होती पण अतिशय सुंदररीत्या काळजी घे…
PG

विक्रांत देशमुख

मी एक चिमुकलं रानफुल…रंग,रूप,गंध नसलेलं… दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं… त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला… रुतुराज आज वनी आला’.

 1. विक्रांत महोदय, फारच छान ! जे जे भेटे भूत तेते मानिजे भगवंत ! अगदी सत्य !पण अंगी बाणवायला अत्यंत कठीण सत्य.कसाबला भगवंत मानता येईल का?
  आपण कृपया माझा हा लेख पण वाचावा ही विनंती. शून्यवाद आणि संत ज्ञानेश्वरांचा चैतन्यवाद ! विज्ञान
  http://Savadhan'sblog

 2. Very Nice! Rakshas tar purvi hi hote aani aaj hi aahet, bass! Tyakade satat laksha devun aapli mansthithy dhalu naye. Kasabla tyachya krutichi saja tar milelach. Pan जे जे भेटे भूत तेते मानिजे भगवंत! he mansik aani samajik swasthya sathi awshyak aahe.

 3. विक्रांत, निरूपण अतिशय भावले. गीतेमधले मैत्रभाव सहज, सुंदर मांडले आहेस.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME