वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

चविने खाणार गोव्याला…

७ प्रतिक्रिया

सगळ्या मस्त्याहारी लोकांना गोवा म्हणजे जीव की प्राण असतं   कदाचित म्हणुनच माझं पण  फेवरेट शहर आहे गोवा. गेल्या कित्येक वर्षात दर महिन्याला कामानिमित्य एक तरी व्हिजीट असतेच गोव्याला. अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे २०-२५ वर्षापुर्वी मी वास्कोला महाराजा हॉटेल मधे किंवा अन्नपुर्णा मधे उतरायचो. अन्नपुर्णा मधे रुम फक्त ४० रुपयांना मिळायची. तेंव्हा दररोजचा डीए पण फक्त १२५ रुपये होता. वास्को मधे उतरण्याचे मुख्य कारण म्हणजे एमपीटी ( मार्गोवा पोर्ट ट्रस्ट ) मधे काम असायचं, जास्त प्रवास करावा लागु नये म्हणुन ज्या भागात काम असायचं तिथेच रहाणं व्हायचं..

नंतर एक कर्मा म्हणुन हॉटेल निघालं, तिथे पण बरेचदा उतरलो आहे. काही जवळचे मित्र पण वास्को, बागोमोलो ला रहातात – हे पण एक कारण असेल.

नंतर मात्र काही मडगांवच्या वुडलॅंड्स मधे रहाणं सुरु केलं. वुडलॅंड्स हॉटेल जरी बरं असलं, तरी रुम सर्व्हिस च्या नावाने अगदी बोंब असायची, तरी पण काही दिवस इथेच उतरायचो. माझा एक फारच जवळचा मित्र, त्याने घर बांधलं चिनचिनिम ला, आणि मडगांव तिथुन जवळ, म्हणुन इथे मुक्काम सुरु केला. मडगांवला एक नानुटेल म्हणुन हॉटेल आहे. अतिशय सुंदर आणि निटनेटकं हॉटेल. स्विमिंग पुल वगैरे असल्याने , गोवा टुर म्हंटलं की स्विमिंग ट्रंक सुटकेस मधे टाकायची हे नक्कीच..

स्विमिंग ट्रंक वरुन आठवलं, एकदा बागोमोलो बिच वरच्या पार्क प्लाझा मधे उतरलो होतो. नाही- गैरसमज नको, फाइव्ह स्टार मधे मी कधीच उतरत नाही, कारण डिए तितका नसतो आमचा, तेंव्हा फक्त एक कॉन्फरन्स ऑर्गनाइझ केलेली होती म्हणुन तिथे उतरलो होतो. हॉटेलचा प्रायव्हेट म्हणता येइल असा बिच आहे. बिच वर समुद्रात पोहायला गेलो. समुद्र अतिशय रफ आहे इथला . तसेच इथली रेती पण खुपच रफ आहे. समुद्रातुन डुंबुन बाहेर आलो  आणि काठावर बसलो थोडावेळ. तर ही रेती स्विमिंग ट्रंक मधे दोन मांड्य़ांच्या मधे जाउन बसली. तेंव्हा लक्षात आलं नाही, पण जेंव्हा उठुन चालणं सुरु केलं तेंव्हा मात्र घर्षणाने मांड्यांची वाट लागली. कधी एकदा रुमवर जाउन शॉवर घेतो असं झालं होतं. असो.. नंतरचे दोन दिवस कॅंडीड क्रिम लाउन जखमा कुरवाळण्यातच गेले.

जेंव्हा गोव्याच्या हॉटेल्स बद्दल बोलतो आहोच, तर गोवा टुरिझमच्या चिप रेट हॉटेल्स चा उल्लेख करायलाच हवा. अगदी मोक्याच्या जागेवर आणि सुंदर प्रॉपर्टी म्हणजे गोवा टुरिझम ची हॉटेल्स, सुरुवातीच्या काळात टुरिझम ला बढावा देण्यासाठी ही हॉटेल्स इथे सुरु करण्यात आली होती. मी स्वतः इथे थांबणं कधीच प्रिफर करत नाही- पण जर कोणी इथे येणार असेल तर मी ही हॉटेल्सच नेहेमी रेकमंड करतो. समुद्र किनाऱ्यावरची यांची प्रॉपरटी व्हॅल्यु फॉर मनी चा अनुभव देते. सगळ्यात शेवटी आपलं नेहेमीच कोलवा बिचवरचं हॉटेल माझं फेवरेट झालंय.

चविने खाणार गोव्याला हे हेडींग देउन हॉटेलची माहिती काय लिहित बसलोय मी?? गोव्याला आल्यावर रुम टेरिफ मधे ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतो. तोच नेहेमीचा कट फ्रुट्स, कॉर्न फ्लेक्स, टोस्ट, ऑम्लेट, साउथ इंडीयन डिश एखादी, पोहे उपमा वगैरे काही तरी असा बफे नेहेमीच असतो. ह्याची कॉस्ट जरी रुम मधे इन्क्लुडेड असली तरी मी मात्र नेहेमी ऑथेंटीक गोव्याचा ब्रेक फास्ट घेण्यासाठी नेहेमी बाहेर एखाद्या लहानशा टपरी मधे जातो.

गोव्याचा ब्रेकफास्ट म्हणजे भाजी पाव किंवा भाजी पुरी.. इथे हा शब्द याच क्रमाने म्हणजे भाजी आधी, आणि नंतर पुरी किंवा पाव असे म्हंटले जाते. एखादी उसळ, त्यात बटाट्याची सुकी भाजी चिरलेला बारिक कांदा आणि पाव किंवा पुरी असा हा नाश्ता असतो. या नाश्त्या सोबत जर इच्छा असेल तर एखादी मिर्ची  ( म्हणजे बेसन लाउन तळलेली मिरचीची भजी) पण घेउ शकता. या भाजीमधे गोव्याचे लोकल हर्बस घातल्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो.

साधारण मिरी असतात ना त्याच्या आकाराची बारिक फळं असलेला मसाल्याचा पदार्थ आता नाव आठवत नाही त्याचं. अगदी मिऱ्याप्रमाणेच गुच्छा असतो त्यांचा पण. एकदा मी घरी आणला होता हा मसाल्याचा पदार्थ. ह्याचा उपयोग जेंव्हा एखादी थोडा जास्त वास असणारी फिश करी करायची असते तेंव्हा  केला जातो. आता नांव आठवत नाही त्या पदार्थाचं, पण त्याचा फ्लेवर अप्रतिम असतो. याच्या वापरामुळे भाजी पावाची चव एकदम वेगळीच होऊन जाते.

गोव्याला असलो की एखाद्या शॅक मधे जाउन असा नाश्ता करुन दिवसाची सुरुवात करणे मला जास्त आवडते. भाजी पाव खाउन झाल्यावर   होम मेड बन नावाचा एक अतिशय टेस्टी प्रकार इथे मिळतो. (पण त्यासाठी शुध्द गोवनिज हॉटेलमधेच जावं लागेल तुम्हाला) या बन च्या सेंटर मधे कधी तरी थोडं जाम वगैरे पण असु शकतं भरलेलं . हा होम मेड गोवनिज बन आणि चहा घेउन ब्रेकफास्ट संपवायचा. दुपारी एक वाजेपर्यंत भुक म्हणजे काय याची जाणीव पण होणार नाही.

सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर वाटेल की खुप झालं ,आज जेवण टाळू, पण दुपारी एक दिड वाजला की पोटात उंदीर कबड्डी खेळणं सुरु करतात – आणि आपोआपच पाय एखाद्या हॉटेल कडे वळतात.. गोव्याची हवाच तशी आहे !! दुपारच्या वेळेस जेवणासाठी एखाद्या एसी हॉटेलात जायचं म्हणताय?? छे छे.. नाही. गोव्याला गेल्यावर गोव्याचं ऑथेंटीक जेवण घेण्यातच मजा आहे – मग ते एसी असो वा नसो. बरेचसे लहान लहान रेस्टॉरंट्स आहेत गोव्यात .पण नेहेमी जाउन काही जागा आता पक्क्या झालेल्या आहेत.  पणजी जवळचं नदिकिनारच्या स्टार मधे गेलात तर शेल फिश क्रिस्पी फ्राय मस्त असतो. कोलोस्ट्रॉल ची काळजी कींवा ऍलर्जीची काळजी न करता खायचा पदार्थ आहे हा.

एअरपोर्टवरुन मडगांवकडे निघाले असाल तर हॉटेल मार्डोल नावाचं एक चांगलं हॉटेल आहे – याच हॉटेल मधे अभिषेक बच्चनचा फोटो पण लावलाय – तो जेंव्हा इथे आला होता तेंव्हाचा. या ठिकाणी स्पेशल फिश थाली मागवली की त्यामधे – शार्कचं  मटण, फिश फ्राय – या मधे चणक असेल तर तोच घ्या. नाहीतर नॉर्मल किंग फिशचा पिस मिळतो, सोबतच चिंबोऱ्या, क्रॅब्स्चा एक तुकडा -टांग, आणि  करी असते. करी मधे प्रॉन्सचे पिसेस अगदी मुबलक प्रमाणात असतात. जर इतकं नको असेल तर नुसती साधी फिश थाली पण मागवता येते. त्यामधे फिश चा पिस, करी आणि राइस असत. सोबत सोलकढी हवी असेल तर एक्स्ट्रॉ मिळते.

पण माझी स्वतःची फेवरेट ठिकाणं म्हणाल, तर वास्कोचं अनंताश्रम  . या ठिकाणी जाउन फक्त फिश करी राइस ऑर्डर करायची.   अनंताश्रमचं ऍम्न्बिअन्स मला आवडतो.  टिपिकल फिशफ्रायचा वास नाकात शिरतो , हॉटेल मधे पोह्चल्या बरोबर  आणि पोटातले उंदीर पुन्हा कबड्डी खेळु लागतात. भिंतीवर मारिओ मिरांडाच्या शैली मधे काढलेली पेंटींग आहेत. त्यातलं फिशर वुमन चं पेंटींग मला खुप आवडतं. अनंताश्रम मधे जेवणाची ऑर्डर द्या आणि येइ पर्यंत थंड बिअरचा आस्वाद घेत बसा. गोव्याला जाउन बिअर न पिणॆ म्हणजे सिध्दिविनायकाच्या मंदिरात जाउन गणपतीचे दर्शन न घेणे होय.इथली फिश करी पण मला आवडते. लंच टाइम मधे म्हणजे एक ते दोन या वेळात ह्या हॉटेलमधे जाणं टाळा,. ्खुप गर्दी असते.

इथे   फिश चा पीस गोवनीज स्टाइलने फ्राय केलेला असतो, करी मधे दुसरे लहान फिश आणि प्रॉन्स वापरतात.   भाताचा डोंगर बघितला की आधी तर भिती वाटते की हा संपेल तरी कसा?? पण एकदा संपुन पुन्हा एकदा एक हेल्पिंग ऑर्डर करायची वेळ यावी इतकी सुंदर टेस्ट असते इथल्या जेवणाची. एक्स्ट्रॉ राइस मागवला तर पुन्हा राइस+ फिश फ्रायचा पिस असतो , सोबत वाटी मधे करी, एका भागात चिंबोरी, आणि थोडी कसली तरी भाजी. आणि खोटी कढी ( गोवनिज मित्रांना समजेल हा काय प्रकार आहे तो. सोलकढी मधे नारळाचं दुध घातलेलं असतं, नुसत्या आमसुलाची सोलकढी म्हणजे खोटी  सोलकढी) फिशचा एक पिस आपल्यासारख्यांना कमी पडतो म्हणुन ऑर्डर करतानाच एक्स्ट्रॉ फिश फ्राय मागवावा. शक्यतो चणक मिळेत तर जास्त उत्तम नाहीतर बांगडा वगैरे पण चांगला असतो. माझ्या बरोबर असलेला मित्र किंग फिश चा शौकीन म्हणुन मी तरी पुन्हा किंग फिशच मागवला. गोव्याला आल्यावर पाम्प्लेट वगैरे टाळणे उत्तम. तो ब्राह्मणी मासा मला तरी फारसा आवडत नाही. 🙂

मडगांवचं अशोका हॉटेल पण खुप मस्त आहे . पहिल्या मजल्यावर चढलॊ की सरळ एसी रुम मधे जाउन बसा. टिपिकल खानावळ सदृष्य़ हॉटेल आहे हे . इथलं पण जेवण अतिशय सुंदर असतं. गोव्याला गेलात तर इथे नक्की या एकदा. गोवनिज फिश फ्राय आणि करी ऑर्डर करा इथे. इथली सोलकढी पण खुपच छान असते.

गोव्याला असतांना मोठ्या हॉटेल मधे जेवायला गेलात तर  फिशचा पिस करी मधेच शिजवलेली फिश करी मिळते  पण त्या पेक्षा फिशचा पीस वेगळा रवा फ्राय ( मसाला फाय टाळा गोव्याला आल्यावर) आणि सोडे, प्रॉन्स, लहान फिशचे पिसेस घालुन केलेली वेगळी करी  लहान हॉटेल्स मधे मिळते ती मला जास्त आवडते. म्हणुनच मी शक्यतो लहान शॅक्स मधे जेवायला जातो गोव्याला असलो की.

खुप वर्षापुर्वी गोव्याला बिचोलिम जवळच्या सेसा गोवा माइन्स आणि डेम्पो माइन्सला जावं लागायचं. जेवणं त्यांच्या कॅंटीन मधेच व्हायचं . मोठा डॊंगर भाताचा.. तिखट जाळ करी आणि पाव असा मेनू असायचा. इथेच एकदा चुकुन बिफ खाण्यात आलं होतं.  🙁
असो.

गोव्याला बरेच नॉर्थ इंडीयन्स/ आणि इतर टूरिस्ट  येतात. हॉटेल मधे बघावं तर इथे येउन पण तंदुरी रोटी ऑर्डर करतात- आणि नंतर मग हमारे यहां तो ऐसा नही होता बहुत अच्छा खाना होता है असे म्हणतांना नेहेमी ऐकतो. त्या जागेची जी स्पेशॅलिटी आहे ती ऑर्डर न करता इतर काहीतरी ऑर्डर करुन मग अशा कॉमेंट्स करणे मुर्खपणाचे वाटते मला तरी. ज्या भागात जावे, तिथलाच लोकल पदार्थ ट्राय करावा, असे माझे स्वतःचे मत आहे.

गोव्याला बागोमोलो बिच वर जायला पण मला आवडतं. पार्क प्लाझाचा कॅसिनो नेहेमी खुणावत असतो . तिथे जाउन एक दोन हजार रुपये घालवल्या शिवाय काही चैन पडत नाही मला तरी. अर्थात नेहेमीच घालवतो असेही नाही. पण पोकर खेळायची एक चांगली जागा आहे ती. तर त्या बिचवरच  एक जॉन ची शॅक आहे. तिथे जाउन प्रॉन्स फ्लेवर्ड पापड ( याला ते लोकं वेफर्स म्हणतात ) आणि बिअर अप्रतिम कॉम्बो असतं. सोबतचं एखादी फडफडीत मासळी तळुन मागवा .. बस्स.. खल्ल्लास!!! मेंदु एकदम तृप्त होऊन जाइल.

खादाडी साठी तर गोवा हे माझं फेवरेट ठिकाण आहे. फक्त ख्रिश्चन हॉटेल्स मधे ते जे व्हिनेगर वापरतात, त्याचा वास मला आवडत नाही म्हणुन शक्यतो हिंदु हॉटेल्सच मी प्रिफर करतो. तुम्ही दोन्ही ट्राय करु शकता..

संबंधित लेखन

 • व्हेज मान्चुरिअन
  चायनीज फूडला आपण व ते आपल्याकडे आता चांगलेच रूळलेत. गाडीवरचे असो किंवा चांगल्या हॉटेल मधले असो, प…
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • तो सुप्रसिद्ध केक…
  गाजराचा केक..साधं जेवणही बनवताना चाचपडणार्‍या माझ्यासारख्या व्यक्तीला बेकिंग जमावं म्हणजे ही पाकक…
 • दृष्टिकोन २०१०

  अज्ञातच पायवाट
  कुणी चेहरा निनावी
  उडी उंच किटकाची
  कैसी कुणी पहावी ?

  चिमुकले असे हे विश्व

 • नीळकंठेश्वर – नव वर्ष, नवी जागा
  बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करा…
PG

महेंद्र कुलकर्णी

मी महेंद्र कुलकर्णी. एक वर्ष होऊन गेलं ब्लॉगिंग सुरु करुन . ‘काय वाटेल ते’ ब्लॉग वर लिहितो. मनाविरुध्द काही झालं की चिडणारा, मनासारखं झालं की आनंदाने सगळ्या जगाला सांगत सुटणारा, कोणी थोडं प्रेमाने बोललं की त्याच्या साठी जीव टाकणारा, कोणी थोडा वाकडेपणा दाखवला तर तेवढ्याच आवेशाने भांडणारा- तुमच्या सारखाच मी एक !

 1. भाजी पाव आणि तो स्थानिक पद्धतीने बनवलेला गोडसर पाव (इथले गोवन नाव- उंडो)
  फिशमध्ये किंगफिश, कालामारी आणि तॉम्सो (रेड स्नॅपर) म्हणजेच अस्सल गोवा.
  पण तुम्ही ते आंबटतिख आणि रेषाद मसालामधले फिश ट्राय केलेले दिसत नाही अजून. काय हे…!!! किती दिवस सांगतोय मी… (प्रेमळ तक्रारीच्या सुरात वाचा).
  मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय.

 2. तो मसाल्याचा पदार्थ बहूदा तिरफळ असावा.

  जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME