वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

जोगवा – एक वास्तव दर्शन

१ प्रतिक्रिया

jogwa_poster.jpgकाही चित्रपट आनंदासाठी, विरंगुळ्यासाठी नसतातच. तुम्हाला ज्ञात-अज्ञात वास्तवाचा प्रत्यय आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांनी, अस्वस्थ करणाऱ्या वास्तव प्रसंगांनी मनात जे प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं शोधणं जरी एका व्यक्तीला शक्य नसलं तरी अशी व्यक्ती मग चार चौघांत आपलं मत मांडते, शक्य असेल तर मग जोगवा सारखी एखादी कलाकृती निर्माण होते. ह्यात काम करणारे अभिनेते, त्यातून मिळणाऱ्या बिदागीच्या आशेने तर येत नाहीतच मात्र, आपली ह्या लोकोपयोगी कार्याला काही मदत होईल का ह्या विचाराने पुढे सरसावतात.

देवाला वाहून घेतलेल्या, थोडक्यात देवासाठी सोडून दिलेल्या जोगीणींची आणि जोगत्यांची ही कथा. नाही म्हणजे विषय तसा साधा सरळ आहे. त्यातील बऱ्याच सत्यतेचा अंदाजही आपल्याला असतोच. पण ह्या गोष्टी अश्या होणारच असे मानणारे आपण आणि त्यात काही खटकण्याजोगं आहे हे समजणारे ते श्रीपाल मोरखिया नाहीतर राजीव पाटील ह्या सारखे लोक. कर्नाटकामधलं एक साधं सरळ गाव, नाव काय माहित नाही. किंवा तितकंसं लक्षात राहत नाही. एकूण काय एकंदर सर्वच गावांची ही तऱ्हा. इकडून तिकडून सारखीच. न- कळत्या वयात केसांमध्ये जट निघाली म्हणून देवीला वाहिलेली सुली, आणि तय्याप्पाची ही कहाणी. दोघांची मनःस्थिती निराळी, दोघांवर समाजाचे आघात निराळे. एकंदर पंथाचा दृष्टीकोनही हताश आणि निराशावादी. तरीही हा चित्रपट कंटाळवाणा आणि अगदीच नकारात्मक होत नाही. संपूर्ण समाजाचा दृष्टीकोन दाखवताना, त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावनांचा पण तितकाच व्यापक विचार लेखक आणि दिग्दर्शकाने केलेला आहे.

मी तसं पाहता विषयासाठी चित्रपट पहिला असा म्हणणं तसं चूक ठरेल. मी पाहिला उपेंद्र लिमये साठी. मला तर त्याचा अभिनय नेहमीच आवडलेला आहे. त्याला तर ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसंच मुक्ता बर्वेही अभिनयाला कुठेही उणी पडली नाही. दोघांच्या संवेदनशील आणि जिवंत अभिनयामुळे कलाकृती आणि निर्मात्यांचा आशय सरळ मनाचा ठाव घेतो. विनय आपटे, किशोर कदम अश्या सहकलाकारांनी पण ह्या जोडीला चपखल साथ दिलेली आहे.

श्रद्धा—सर्व धर्मांचं मूळ. ह्या धर्मांचं मग कर्मकांडात कधी रुपांतरण होतं हे कळतही नाही. आणि सवयीने मग ते खटकतही नाही. श्रद्धेच्या गरजेतून मग अश्या काही निष्पापांचा बळी दिला जातो आणि समाजाचा गाडा अविरत चालू राहतो. आपल्या सारख्या शहरी संस्कृतीत वाढलेल्या मनांना जेंव्हा ह्या वास्तवाची जाणीव होते तेंव्हा ते आपल्याला जरूर अस्वस्थ करून जातं, आणि वर्षानुवर्षे ह्या चालीरीतींना मानत आलेल्या सश्रद्ध समाजाच्या मनाच्या कोडगेपणाचं आश्चर्य वाटत रहातं. असं जरी असलं तरी तेथील सामान्य माणसासाठी ही गोष्ट नेहमीचीच असते, आणि ह्या वस्तुस्थितीची जाणीव चित्रपट आपल्याला हळूवारपणे करून देतो.

आत्तापर्यंत मी हा चित्रपट पाहिला नव्हता ही माझी चूकच. पण तशी आपण करू नये ही विनंती. अनेकांनी आत्तापर्यंत हा पाहिला असेलच. नसल्यास जरूर पहा, शहरीकरणाच्या थोड्याच दूर असणाऱ्या वास्तवासाठी पहा, त्याला चव्हाट्यावर आणणाऱ्या धाडसी निर्मात्यांसाठी पहा. आपल्या अभिनयाने त्यात प्राण ओतणाऱ्या कलाकारांसाठी पहा. समाजाच्या जाणिवेचे पदर अनुभवण्यासाठी पहा, निष्कारण वाया गेलेल्या आयुष्यांसाठी पहा. आईचा हा मेळा जरूर पहा.

चित्र संदर्भ: http://www.bbc.co.uk/

संबंधित लेखन

 • आघात – एक उल्लेखनीय प्रयत्न
  विशेषतः डॉक्टर रुग्णांची करत असलेली भलावण, रुग्ण्यांच्या मनातली शस्त्रक्रियेबद्दलची भीती. ऐकलेल्य…
 • मराठी रंगभूमीवरचा राजहंस हरपला
  मराठी रंगभूमीवर स्वतःचे युग निर्माण करणारे. एका नाट्यसंस्थेचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरण…
 • गोंधळ
  विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा …
 • देवा तुझी सोन्याची जेजुरी
  शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे…
 • देऊळ चित्रपटाची घोषणा झाली झोकात
  वेगळ्या धाटणीचा आणि आपल्या मनातला चित्रपट करण्याची ही संधी मिळाल्याचे कबूल करून देऊळच्या निमित्ता…
PG

छिद्रान्वेषी

आयुष्याच्या सागरातील एक खलाशी, असं मी स्वतःचं वर्णन करेन. वारा येतो माझं शिडाच गलबत अजून तरी तरंगतय, लाटा येतात, जातात. समुद्र खवळतो, शांत होतो. क्षितिजाची ओढ, आणि मोटरबोटीची अपेक्षा मला कायमच आहे…

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME