वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

तो सुप्रसिद्ध केक…

७ प्रतिक्रिया

लहान मुलांपासुन मोठ्यांपर्यंत एकमुखाने आवडणारं डेझर्ट म्हणजे केक आणि त्याचेही किती प्रकार आपल्याकडे मॉंजिनीझमध्ये गेलं किंवा इथे अमेरिकेत कुठल्याही सुपरमार्केटच्या बेकरी सेक्शनमध्ये गेलं की केक आणि त्याचं आइसिंग अक्षरशः भुरळ घालतात.

अमेरिकेत आल्यावर अगदी सुरूवातीला माझ्या नवर्‍याच्या एका मित्राची बायको अगदी जात्याच सुगरण कॅटेगरीतली होती. ती प्रत्येक गोष्ट घरी करायची आणि मुख्य म्हणजे तिची सर्व खाणी अगदी चविष्ट व्हायची. आल्याच्या पहिल्या महिन्यात तिच्या ओव्हनमधला गरम गरम केक पाहुन केक घरी पण होतो असं नव्यानेच कळल्यासारखं झालं होतं. हा हा 🙂 माझी आई खरंतर घरी जमेल तेव्हा रेतीचं भांडं ठेऊन करायच्या पद्धतीने केक करायची पण म्हणतात ना पिकतं तिथं विकत नाही. त्यानुसार आता आयतं करुन देणारं किंवा सरळ विकत मिळणारे पर्याय बंद झाले आणि माझी पावलं स्वयंपाकघराकडे वळली. वाचुन, विचारून कधी पदरचं काही वेगळं घालुन काही काही प्रयोग करत राहिले पण कधीच बेकिंग केलं नव्हतं. अगदी तो पहिला वर उल्लेखलेला गरम केक पाहिला तेव्हाही रेडिमेड केक मिक्स च्या पुढे आपलं घोडं कधी पुढं दामटलं नाही.

पण ओरेगावात बेकिंग गुरु भेटल्यामुळे बेकिंगचंही तंत्रशुद्ध शिक्षण उपलब्ध झालंय. ते मेंदुच्या बाहेर जायच्या आत हा कॅरेट केक गुरूची मदत न घेता केला आणि पहिल्या फ़टक्यात तिचा झाला होता तसाच झालाय त्यामुळे त्याची सोप्पी पाककृती खाली देतेय.

कोरडे साहित्य: १ कप मैदा , ३/४ कप साखर, १ टे.स्पुन बेकिंग पावडर, चिमुटभर बेकिंग सोडा, १ चमचा दालचिनी पूड , १ चिमुट कोशर (किंवा साधं) मीठ

ओले साहित्य : २ अंडी (मी एकच पिवळा बलक घेतला त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी हवं तर फ़क्त पांढरा भाग घेतला तरी चालेल), १ टी.स्पुन व्हॅनिला इसेन्स (असल्यास), १ कप कनोला (किंवा कुठल इतर) तेल, हलक्या हाताने किसलेले गाजर २ कप, थोडेसे आवडतील ते नट्स (अक्रोड, पेकन्स यातील)

कृती: १. एका मोठ्या भांड्यात कोरडे साहित्य एकत्र करुन घ्या.


२. दुसर्‍या भांड्यात प्रथम अंडी चांगला फ़ेस येईपर्यंत फ़ेसुन घ्या. आणि त्यात तेल, इसेन्स, गाजर आणि नट्स घालुन एकजीव करुन घ्या.

३. आता मोठ्या भांड्यातल्या कोरड्या साहित्यात हे ओले मिश्रण घालुन कट ऍन्ड फ़ोल्ड पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करा.

४. एका बेकिंग ट्रेला तेलाचा (अथवा ऑइल स्प्रेचा) लेप देऊन अगदी थोडा मैदा टाकुन तो सर्व ठिकाणी लागेल अशा पद्धतीने भांडं तयार करा.


५. क्रमांक ३ मधील मिश्रण वर तयार केलेल्या ट्रेमध्ये घालुन ३५० F तापमानाला गरम केलेल्या ओव्हनमध्ये साधारण २५-३० मिनिटं भाजुन घेणे.वरील मिश्रणाचे चित्रात दाखवलेल्या ट्रेसारखा गोल ट्रे तयार होईल.

अगदी साशाने सांगितल्याप्रमाणे सोपा आहे की नाही हा केक?? आमच्याकडे तरी आता मी तयार केक मिक्स आणायचं रद्द केलंय..शिवाय हाच केक मैद्याऐवजी थोड्या हेल्दी प्रकारे करता येईल का यावरही विचार सुरू आहे. फ़क्त तुर्तास साखर मूळ कृतीप्रमाणे न घेता अर्धी घेतली तरी चालेल. नाहीतरी गाजराचा गोडवा असतोच. हवं असल्यास आइसिंग करता येईल. थोडी साखर कमी खावी आणि एवढं सगळं केल्यावर कंटाळा या कारणास्तव मी तरी आइसिंगच्या वाटेला गेले नाही आहे. पण सध्या गुरुने शिकवलेला केक स्वहस्ते करून पाहिला हेच मोठं समाधान आहे. आइसिंग ऐवजी आम्ही आमचा केक आइस्क्रिमबरोबर खाल्ला..कसा वाटतोय?? नक्की कळवा आणि करुनही पाहा.

संबंधित लेखन

PG

अपर्णा संखे-पालवे

मी अपर्णा संखे-पालवे, शिक्षणाने इंजिनियर, आय.टी. व्यवसायात गेले काही वर्ष अमेरिकेत मुक्काम, त्यामुळे कमी होत चालेला मराठीशी संपर्क..अशा पार्श्वभुमीवर ब्लॉगिंग करायला घेतलं आणि लक्षात आलं की मराठीत विचार मांडता आल्यामुळे होणारा आनंद काही औरच आहे. जे काही थोडे फ़ार कडू-गोड अनुभव येतात त्या क्षणांच्या आठवणी होण्याआधीच आजकाल त्या माझिया मना ब्लॉगवर मांडल्या जातात. मराठीमधले अनेक सुंदर सुंदर ब्लॉग्ज वाचणं आणि जमेल तिथे प्रतिक्रिया देणं हेही सध्या आवडीने करते.

 1. मस्त खमंग असा केक तयार होतांना दिसतोय फोटोंमध्ये.. पण ते “…..१ टी.स्पुन व्हॅनिला इसेन्स (असल्यास), १ कप कनोला (किंवा कुठल इतर) तेल……” हे काय असतं, ते कळालं नाही… या वस्तू मिळतील का आमच्याकडे, की नुसतं आम्हा भारतात राहणार्‍यांच्या तोंडाला पाणी सोडण्याचा विचार करतीहेस तू..!! 😉

  असो.

  पण असल्या पाककृती दिसल्या की मला कसं-कसं होतं..! 😛

 2. अरे वा!मस्तच दिसतोय गं केक… आणि सोपाही आहे. चला आता करून पाहायला हवा. 🙂

 3. हा हा विशाल….तू पण ना???
  अरे व्हॅनिला इसेंस मिळतं आणि कनोला ऑइल मिळतं का हे नक्की माहित नव्हतं पण कुठलंही तेल अजुनतरी भारतात मिळतं की??? आणि तेलामुळे थोडं बटरचं फ़ॅट कमी झालंय इतकंच….
  तुला सांगते जर मी काही पाककृती करु शकले तर ती इतर कुणीही आणि कुठेही करू शकेल इसकी गॅरेंटी…नाहीतर तू इथेच ये खायला…:)

 4. नमस्कार,
  हा तुमचा लेख आजच वाचनात आला आणि बायकोच्या वाढदिवसाचे निमित्त साधून लगेच तुमच्या पद्धतीनुसार तंतोतंत बनवला. फारच सुरेख जमला.
  बायको जाम खुश !!!

  धन्यवाद !

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME