वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

नगण्यतेत समावलेले जीवन….

४ प्रतिक्रिया

नगण्यतेत समावलेले जीवन….

मानवी मनाची सगळ्यात आवश्यक गरज म्हणा, इच्छा म्हणा…..” कोणीतरी माझी विचारपूस करेल, आठवण काढेल. आवर्जून तू कसा आहेस हे विचारेल. मनापासून मी जसा आहे तसा माझा स्वीकार करेल. ” जोवर ही चाहत-इच्छा पुरवली जात नाही तोवर तो सतत प्रयत्नशील असतो. जाणूनबुजून त्याकरिता झटतो. सामान्यपणे प्रत्येक माणूस जीवनात यासाठी झगडताना दिसतो. क्षेत्र कुठलेही असू देत, स्वीकाराच्या मागे माणूस हात धुऊन लागतो. तसे मागे लागणे आवश्यक आहेच. पण त्याचा अतिरेक झाला की लक्ष्य भरकटते.

शब्द हे जितके धारदार असतात तितकीच किंबहुना थोडी जास्तच ’उपेक्षा ’ खोलवर आघात करते. ’ अनुल्लेखाने मारणे ’ हा आजकाल सार्वत्रिक बोकाळलेला एक प्रवाह आहे. जाणीवपूर्वक व संगनमताने एखाद्याला वगळायचे, टाळायचे. काही वेळा व काही माणसांकरिता हा मार्ग स्वीकारावाच लागतो. नाहीतर त्या अतिरेकी प्रवृत्ती आपला ताबा घेऊन गुलाम बनवू पाहतात. परंतु बरेचदा हा मंत्र सरसकट वापरला जातो व याचे बळी वारंवार बदलत असतात. या प्रवृत्तीचा सर्रास आधार घेणारे स्वत: मात्र त्याचीच शिकार असतात. माणूस एकवेळ टोचरे बोल सहन करेल….कारण त्यांना प्रत्युत्तर करता येते. किमान संवाद होतो.

परंतु उपेक्षा मनाला ढासळवते. तुमचे अस्तित्वच जेव्हां नाकारले जाते तेव्हां मन कोसळते. कोणालाही माझी कदर नाही. मी येथे असूनही साधी माझी दखलही त्यांनी घेतली नाही. मला टाळले, का? पुन्हा या ’ का ’ चे नेमके उत्तर मिळत नसतेच. वारंवार असे झाले की असंतोष खदखदू लागतो. मग हे दुखावलेले मन स्वत:चे अस्तित्व दाखवण्याच्या मागे लागते. कधी कष्टाने-त्यागाने, कधी सामान्य मार्गाने तर कधी वाम मार्गाने. प्रत्येक माणूस समाजात राहू इच्छितो, केंद्रस्थानी राहू पाहतो. हे सगळ्यांना जमतेच असे नाही. मग असंतुष्ट मने उदास होतात, तक्रारखोर होतात, धुमसत राहतात. स्वतः सोबत जवळच्यांचाही छळ करतात.

याचे कारण शोधण्याचा आपल्याच मनात प्रयत्न केला तर जाणवते की ’ माझे जीवन ’ हे ’ लोकांधीन ’ आहे. दुसऱ्याने मला आपले म्हणावे असे जोवर मला सारखे वाटत राहते तोवर खरे तर मीच स्वतःला त्यांच्या स्वाधीन करून टाकलेय हे मला समजतच नाही. इतरांनी मला आपले म्हणावे किंवा नाकारावे हेच जर माझ्या जगण्याचे बळ-आधार असेल तर मग अश्या जगण्याने ‘ मला ‘ काय मिळेल? थोडी तारीफ, माफक प्रसिद्धी, कदाचित थोडे पैसे, त्याहून पुढे अगदी गेलोच तर सत्ता-बक्षिसे, पुरस्कार-मानचिन्हे….. बस. या सगळ्यांनी त्या त्या क्षणांपुरता आनंद मिळेलही परंतु यावर अवलंबून राहत जीवन जगण्याचे वरपांगी प्रयत्न म्हणजे केवळ दु:खाची सुरवात. या मानपत्रांनी मनातला असंतोष दूर होईल का? का आजच्या पूर्णतः व्यावहारिक बनलेल्या जगाची सौख्याची हीच मानदंडे आहेत व ती मिळवणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता.

रोजच पहाटे आभाळ सोन्याची उधळण करते. एक विलक्षण प्रसन्न अनुभूती चराचरांत भरून राहते. किरणांकिरणांतून जीवनरस सूर्य ओतत राहतो. पक्षी पंखात नवा दम घेऊन भरारी घेतात. प्राजक्त दवासारखां डवरून सुगंध पसरवत टपटपत राहतो. मुक्या कळ्या मनमोकळ्या उत्फुल्ल हसू लागतात. झाडे-वेली हिरव्या-पोपटी पानांमधून जीवनाचा रंग दाखवत राहतात. फुलाफुलावर गुंजारव करणारे भुंगे-मोहक फुलपाखरे नाचत-बागडत राहतात, परागकण पेरत राहतात. सगळ्यांमध्ये जीवन मनापासून जगण्याची असोशी दिसते. या सगळ्यांच्या केंद्रभागी निसर्ग आहे. उडणे हा पक्षांचा केंद्रबिंदू तर उमलणे हा फुलाचा. कोणी नोंद घेवो न घेवो फुले फुलतीलच, पक्षी उडतीलच. निसर्गाची ही मुक्त उधळण सतत आपल्या समोर असते. पण त्याची नोंद किती जण घेतात? यांतील कोणी कधी संपावर जाते का? पक्षांचे कूजन बेसूरा आलाप गाते का? खरे तर यांची हेळसांड/अहवेलनाच जास्त केली जाते तरीही हे आपला मूळ गुणधर्म सोडत-बदलत नाहीत. निसर्गाचा हा देखणा उत्सव रोजचाच म्हणत आपण त्याची उपेक्षाच करतो. त्याचा तोल ढासळवत राहतो अन मग जेव्हां तो आपली उपेक्षा करतो तेव्हां त्याच्या रौद्ररूपाने बोटे मोडत राहतो.

मग आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षांचा आपण इतका का बाऊ करत बसतो? आठवून् आठवून दु:ख ताजे करत राहतो….डोळ्यांवाटे सांडत खंतावत राहतो. ते सारे क्षण जीवन बरबाद…. पुन्हा पुन्हा बरबाद. इतके फुकट घालवण्याएवढे क्षण आपल्यापाशी आहेत का हा विचारही डोकावत नाही. दुःखाचा उत्सव एकदाच काय तो मनवून त्याला संपवून टाकणे म्हणजे स्वतःला लोकांकडून कुरवाळून घेण्याचे थांबवणे. इतका त्याग मग तो स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यक असला तरी तो सहजी/कळूनही नजरअंदाज केला जातो. असे कुरवाळून घेण्याचीच हाव वाढते. अरेरे! बिचारा! यासारखे शब्द सुखावू लागतात. हळहळण्याकरीता तरी लोक आपली आठवण काढतात म्हणून वारंवार दु:ख मांडले जाते. जळवेसारखे जीवनाला चिकटलेले स्वनिर्मित दु:ख.

जगातले सर्वश्रेष्ठ मानपत्र कुठल्याही पक्षाला द्या, दुसऱ्याच दिवशी तो आपले घरटे सोडून जाईल. त्या पुरस्काराने त्याचे उडणेच जखडले गेले तर राहिलेच काय त्याच्यापाशी? सागरात प्रत्येक क्षणी एक लाट जन्म घेते……पाहता पाहता उच्चतम बिंदूवर आरूढ होते….अन निमिषार्धात किनाऱ्याशी ती फुटलेली असते. अशा असंख्य नगण्य लाटा वर्षोंनवर्षे तितक्याच ओढीने उठत आहेत -विरत आहेत. ह्या लाटा किती तरल आहेत. आपण का इतके जडशीळ बनू पाहतो आहोत?

कोणी माझी आठवण ठेवली आहे…कोणी मला त्यांच्या वर्तुळात घेतले आहे याने नेमके ’ मला ’ काय सुख मिळते? का ह्यातच जगण्याचे सुख सामावलेले आहे ही आपल्या मनाची पक्की समजूतच आपण करून स्वत:ला जखडून ठेवले आहे. जीवनपथावर खरे तर आपण थोडेसे रांगतो…….थोडीशी धूळ उडते. त्यातच आपले मन रमून जाते. अजून चालायला सुरवातही केली नाही तोच ते खुंटते. कालांतराने धूळ बसते पण आपण तिथेच, रुतलेले. चालणेच संपले मग नवीन धूळ उडणारच कशी? तोवर अनेक अपराधही आपण करून चुकलेले असतोच. मग त्या अपराधांच्या सावलीत बसून आपल्यासारख्याच आत्ममग्न जीवांशी या थिजलेल्या धुळीची चर्चा करत बसतो-संपून जातो. हेच, जर मुळातच या धुळीने माखण्यास आतूर असलेली आपली नजर आपण वारंवार स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित जीवन जगण्याचा मार्ग सापडू शकेल. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व चाल लाभेल. किमान नको ते दु:ख ओढवून घेण्याची प्रक्रिया थांबेल.

संबंधित लेखन

 • प्रेममयी
  मैत्रीण आलेली. गेल्या वेळच्या मुक्कामात ही पठ्ठी स्वत:च भटकंती ला गेल्याने गाठभेट होऊ शकली नव्हती…
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • पाऊस मनातला !
  आज रविवार ऑफिस ला  मस्त सुट्टी. सुट्टीची संध्याकाळ आभाळ भरून आलेल विजेच्या कडकडाटा सह पावसाल सुरु…
 • सई…………
  सर्वत्र हिरवळ पसरलेली……..हिरवळ……………… ओली …………
  मन तृप्त करणारी ………….
 • रिसीवींग एंड ला मीच आहे रे

  तुमच्या आमच्या सारख्या बऱ्याच घरात हे असे प्रत्यक्ष व देहबोलीतून ठसक्यात व्यक्त होणारे संवाद …

PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

 1. माझ्या जवळ शब्द्च नाहीत इतका अप्रतिम लेख आहे.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME