वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

प्रतिमा करण्याचा छंद

३ प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

अत्यंत उच्चभ्रू लोकांच्या निवासस्थानांभोवताली एक वेगळीच शांतता असते. रस्त्यावर चालणारी माणसेही त्या भागात फिरताना मनमोकळ्या मनाने जोरजोरात गप्पा मारताना दिसत नाहीत. त्या आलिशान बंगल्यांचे आणि त्यांच्याभोवतालच्या एक भला मोठा परदेशी कुत्रा असलेल्या आवाराला सुरक्षित ठेवणाऱ्या उंच कुंपणांचे दडपण फिरायला निघालेल्या त्रयस्थांच्या मनावरही येते. त्यांच्या अस्तित्वाने स्वतःच्या अपूर्णतेची जाणीवच लोकांना प्रकर्षाने होते. स्वतःच्या तोऱ्यात असलेल्या त्या बंगल्यांनी फूटपाथवर अतिक्रमण करायला नाही म्हटलेले नसते. कुणी आपली गाडी लावली आहे, तर कुणी चार कुंड्यात निवडुंगाची झाडे लावून स्वतःला अजून सुरक्षित केले आहे. जागोजागी असे अडथळे आल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरुन कडेने चालत जाण्याखेरीज पर्याय नव्हता. त्यामुळे फार माणसे नसतानाही त्या छोट्याशा रस्त्यावर गर्दी असल्याचा भास होत होता. त्या गर्दीमध्येच अचानक एक सरकारी लाल दिव्याची गाडी मोठा हॉर्न वाजवित घुसली आणि दिसेनाशी होईपर्यंत लोकांना स्वतःच्या महत्वाची जाणीव करीत भरधाव गेली. एखाद्या डबक्यात दगड टाकल्यावर पाणी ढवळून निघते त्याचप्रमाणे रस्त्यावरील नैसर्गिक घडी त्या घटनेने मोडून गेली.

‘तू इतकी मोठी आहेस आणि तरी तुला अशा किरकोळ गोष्टींमध्ये रस वाटतो असे कसे?’ अत्यंत प्रामाणिकपणे विचारलेल्या त्या प्रश्नामागील आश्चर्य स्पष्ट होते. आपण नेहमी लोकांना एका साच्यात बसविण्याचा प्रयत्‍न करीत असतो. एकदा एखाद्या व्यक्‍तीची प्रतिमा आपल्या मनात पक्की झाली की तीच्या सर्व वर्तनाचे मूल्यमापन आपण स्वतःच्या डोळ्यावर चढविलेल्या या चश्म्यातूनच करतो. मग आपणास एखादी आश्चर्यजनक वर्तणुक दिसली तर आपला गोंधळ उडतो. जी गोष्ट आपण दुसऱ्यांच्या बाबतीत करतो तीच स्वतःलाही लागू करुन आपल्या वागण्याचे विश्लेषण करीत बसण्याची सवय आपल्या रक्‍तातच जणू भिनलेली असते. सगळ्यांच्या वागण्याकडे विश्लेषणात्मक नजरेने बघण्याने आपल्यावर एक प्रचंड ताण आलेला असतो. पूर्वीच्या काळी जसा ‘भरभऱ्या स्टोव्ह’चा आवाज तो बंद झाल्यावरच त्याच्या अनुपस्थितीने जाणवायचा तसा आपल्यावरचा हा सततचा ताण तो नसल्यावरच्या मोकळ्या वाटण्याने कळतो. नवीन ठीकाणी गेल्यावर स्वतःची कुठलीही प्रतिमा नसल्याने आणि तेथील कुणाही माणसाची ओळख ठेवण्याचे बंधन नसल्याने आपल्यावर ताण नसतो. भरभऱ्या स्टोव्ह बंद असतो! म्हणूनच काही दिवस रजा काढून सहलील्या गेल्यावर आपणास आनंद होतो. पुढच्यावेळी त्याच ठिकाणी रजा काढून गेलो तर पहिल्या सारखा आनंद मिळत नाही कारण मनात त्या जागेबद्दल प्रतिमा झालेली असते आणि तीला जपायचे बंधन आपल्यावर असतेच. म्हणून आपण दरवेळी नव्या ठिकाणी रजा काढून जातो. लोकांना साच्यात घालायची आपली सवय एकदा तुटली तर नेहमीचीच माणसे नवी दिसू लागतील आणि कचेरीतून संध्याकाळी घरी जाताना बंधनात अडकल्याची जाणीव न होता ‘आज काय बघायला मिळेल’ याची उत्सुकता निर्माण होईल. घर न सोडता आपले रुपांतर मनमानी फिरण्याऱ्या संन्याशात होईल आणि खरा परमार्थ सुरु होईल.

संबंधित लेखन

PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

  1. अतिशय मौलिक विचार. सदगुरूकृपेने प्रत्येकाच्या अंतरात अशी प्रेरणा निर्माण होवो !!

  2. sathya dai-nandin jivnathi athyatmik jivan apan kase jagu shaku yacha apan srv ata nakkich vichar karu

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME