वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

प्राचीन भारतीय संस्कृतीतील वृक्षगान

३ प्रतिक्रिया

भारतात वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्वच प्राचीन संस्कृतींमध्ये पोषण करणार्‍या, अन्न देणार्‍या, सावली देऊ करणार्‍या वृक्षांना देवतांसमान मानले गेले आहे. त्यांची पूजा-अर्चा करून, प्रार्थना करून किंवा त्यांना देवाचे स्वरूप मानून त्यांची आराधना केली गेलेली दिसते.

मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे |
अग्रतः शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः ||

अश्वत्थ ! यस्मिन् त्वयि वृक्षराज !नारायणे तिष्ठति सौरिवारे ।
अतः श्रुतस्वं सततं तरुणां धन्योsसि चानिष्टविनाशकोsसि ।।

य इदं शृणुते भक्त्या नरोsश्वत्थस्य सन्निधौ ।
तारकाग्रहदोषाणं शीघ्रमेव विनश्यति ।।

प्राचीन भारतीय संस्कृतीतील वृक्षगान

भारतातही वृक्षसंपदा ही व्यक्तिगत व सामाजिक जीवनाचा अंगभूत हिस्सा असल्याचे दिसून येते. ‘नक्षत्रवृक्ष’, ‘इष्टवृक्ष’ अशा रूपात प्रत्येक माणसाला आयुष्यात त्या एका वृक्षाला तरी पुजायला, त्याचे संगोपन करायला, त्याच्या सहवासात वेळ घालवायला सांगितले गेल्याचे दिसते. त्या प्रकारे असा वृक्ष खरोखरी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे|’ झालेला दिसून येतो. मनुष्याचा ‘लालसा’ हा अवगुण गृहित धरून वृक्षांना अशा प्रकारे महत्त्व दिल्याने त्यांचे संवर्धन व संगोपन होईल व वृक्षसंपत्ती अबाधित राहील अशा हेतूने, तसेच वृक्षांप्रती आपला आदर व्यक्त करण्याच्या हेतूने त्यांना देवतेचा दर्जा बहाल केल्याचे दिसते.

वैदिक परंपरेतही वृक्षारोपण व वृक्षपूजनाची विशेष परंपरा होती. प्रयागक्षेत्राचा अक्षयवट, नाशिकची पंचवटी, अवंतिकेचा सिध्दवट, गयेचा बोधि वृक्ष, वृंदावनचा वंशीवट हे ह्या वृक्षांसंबंधी असलेल्या श्रद्धेचेच मूर्तिमंत उदाहरण होत. वेद व आरण्यकांमध्ये वृक्षांच्या महतीचे गोडवे गायलेले आढळतात. मत्स्यपुराण, अग्नीपुराण, पद्मपुराण, नारदपुराण, रामायण, भगवद्गीता, शतपथब्राह्मण इत्यादी ग्रंथांमधून वृक्षांना देवता, लोकदेवता मानले गेल्याचे उल्लेख येतात. श्रीमदवल्लभाचार्यांचा जन्मही चंपकारण्यात झाला याविषयी उल्लेख येतात.
मराठी साहित्यात शिवलीलामृतात पुढील ओळी येतात :

साल तमाल देवदार ॥ आम्र कदंबादि तरुवर ॥ त्या वनी नेऊनि सत्वर ॥ म्हणे शंका सांडी सर्वही ॥३८॥

गोरक्षनाथ व कानिफनाथांमधील अनोख्या प्रसंगाचे वर्णन करताना पुढीलप्रमाणे पंक्ती दिसतात :

तों दृष्टीसमोर आम्रवन ॥ पक्क फळी देखिलें सघन ॥
तेंही पाडाचें पक्कपण ॥ शाखा व्यक्त ॥ झोंबल्या आहेत ह्या वृक्षीं ॥४९॥
परी ऐसी फळें सुगम दिसती ॥ तरी भक्षण करावें वाटे चित्तीं ॥
यावरी गोरक्ष बोले युक्तीं ॥ नको नको म्हणतसे ॥५०॥

तसे पाहावयास गेले तर सर्वच धर्मांमध्ये, संस्कृतींमध्ये – वेद, पुराण, सूफी साहित्य, कुराण, बायबल, जातककथा इत्यादींमधून वृक्षांच्या लोककल्याणकारक रूपाचे गुणगान केलेले आढळते. पंचतंत्रासारख्या रंजक, शैक्षणिक कथांमध्येही वृक्षमहती वर्णिली आहे. नदी, पर्वत, वृक्ष यांचा आदर सन्मान ही बहुधा सर्वच प्राचीन संस्कृतींची ओळख आहे असे म्हणता येईल. हडप्पा – मोहेंजोदाडो येथे झालेल्या उत्खननांतूनही लक्षात येते की तेव्हाच्या समाजात मूर्तिपूजेबरोबरच वृक्ष व प्राणिमात्रांची पूजाही करण्यात येत असे.

भारतीय साहित्यातही वृक्षपूजेचे अनेक उल्लेख पावलोपावली येत राहतात. तसेच शिल्पकला, वास्तुकला, चित्रकलेतही वृक्षपूजा पाहावयास मिळते. अजंठाच्या गुंफाचित्रांत, सांचीच्या तोरणस्तंभात वृक्षपूजा दृष्टोत्पत्तीस येते. बौद्ध व जैन साहित्यात तर वृक्षपूजेला विशेष स्थान आहे. बोधिसत्वाने वृक्ष देवता बनून जन्म घेतल्याचे उल्लेख आहेत. शिल्पांमध्ये वृक्षींच्या सौष्ठवपूर्ण मूर्ती व त्यांच्या आधारासाठी असलेले तरू यांचे नयनरम्य दर्शन घडते.

प्राचीन साहित्यात खालील वृक्षांना मानाचे स्थान दिले गेले आहे.

अश्‍वत्थमेकं पिचुमंदमेकं
न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम्‌।
कपित्थबिल्वामल मलकत्रयंच
पञ्चाम्रवापी नरकं न पश्‍यते ।।

वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, बेल, आंबा, कवठ व अशोक ह्या वृक्षांचे रोज दर्शन घेतल्याने, संगोपन केल्याने मनुष्यजन्म सार्थ होतो असे त्यात म्हटले आहे. बृहत्संहिता, चरकसंहिता, आयुर्वेदीय ग्रंथ, अथर्ववेदांत ठिकठिकाणी विविध वृक्ष व त्यांचे आरोग्य, परिसरावर होणारे कल्याणकारक परिणाम यांचे उल्लेख येत राहतात. स्कंदपुराणात ‘पंचवटी’ म्हणजेच पाच सावली देणार्‍या वृक्षांच्या वैशिष्ट्यपूर्ण लागवडीचा उल्लेख येतो. त्यानुसार वड, पिंपळ, आवळा, बेल व अशोक वृक्ष कसे, कोणत्या दिशेने, क्रमाने, अंतराने व कशा प्रकारे लावावेत यांचे विधिवत वर्णन आहे.

कल्पवृक्षाचा अनेक ठिकाणी मनोरम कल्पनाविलासही आढळतो. सर्व इच्छा पूर्ण करणारा हा वृक्ष प्रतिभेचा एक सुरम्य आविष्कारच म्हणतायेईल.
महाभारतातही अनेक वृक्षांचे महत्त्वपूर्ण उल्लेख येतात. शमी वृक्षाच्या ढोलीत लपवलेली अस्त्रे, इंद्रप्रस्थात असलेले वृक्ष, पांडवांचा वनवास तर रामायणात पंचवटी, दंडकारण्य, अशोकवाटिका असे कैक उल्लेख त्या काळच्या वृक्षराजीविषयी संकेत देऊन जातात.

भगवान बुद्धाच्या आयुष्यात तर वृक्षसंपदा विषयक उल्लेख ठायी ठायी येतात. एक तर त्यांचा जन्मच मुळात लुंबिनी वनात झाला. ज्या वृक्षाखाली त्यांचा जन्म झाला त्या वृक्षाचे नाव सालवन किंवा शाल्मली. त्याच्या शाखेला धरून त्याची माता माया उभी आहे व प्रसववेणा सहन करते आहे अशी अनेक चित्रे, शिल्पे पाहावयास मिळतात. त्यांच्या बालपणातही प्रासादाच्या सभोवताली उपवन, वाटिका असल्याचे उल्लेख येतात. त्यांची पहिली समाधी जांभुळ वृक्षाच्या छायेत, सम्यकज्ञान – बोधि प्राप्ती पिंपळ वृक्षाच्या तळाशी, महानिर्वाण हे साल वृक्षाच्या तळाशी झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या धर्मप्रसाराच्या काळात त्यांनी भरपूर भ्रमण केले. त्या प्रवासांमध्ये त्यांचा मुक्काम बर्‍याचदा गावाबाहेरच्या उपवनांमध्ये, वाटिकांमध्ये असे. वैशालीतील आम्रपालीचे आम्रवन, नालंदा – पुरवारीक/ पावरिक – पिपिला – अनुप्रिय आम्रवनांचे उल्लेख त्यांची प्रिय मुक्कामाची ठिकाणे म्हणून येतात. जीवकाचे, राजवैद्याचे चिकित्सालयही आम्रवाटिकेत असल्याचे उल्लेख येतात. तिथेच त्याने जखमी अवस्थेतील बुद्धाच्या जखमांवर मलमपट्टी केली. इथेच बुद्ध मुक्कामी असताना अजातशत्रू त्यांच्याकडे आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येत असे. जीवकाने हे आम्रवन नंतर बौद्ध धर्माला अर्पण केले. बुद्धांनी एका आम्रवनात हात धुतले तर त्यांनी जिथे जिथे ते पाणी शिंपिले तिथे तिथे आम्रतरू बहरून आले असे प्रासादिक वर्णनही आढळते.

तीर्थंकरांनाही जे कैवल्यज्ञान प्राप्त झाले ते कोणत्या ना कोणत्या वृक्षाच्या छायेत झाले. म्हणूनच त्या वृक्षांना कैवली वृक्ष संबोधिले गेले आहे.

कुराणातही खजूर, अंजीर, बेरी, अनार, मेंदी, द्राक्ष, तुळस आदी वनस्पती/ वृक्ष पूजनीय मानले आहेत. शीख धर्मातही वृक्षांना देवतांसमान मानून गुरुकार्यासाठी उपयोगी पडणार्‍या धर्मस्थळाजवळच्या बागेला ‘गुरु की बाग’ म्हणून संबोधिले आहे. त्यातील काही वृक्ष ह्यांप्रमाणे : रीठासाहेबांचा रीठा वृक्ष, नानकमतांचा पिंपळ वृक्ष, टाली साहेबांचा शिसवी (रोझवुड), बेर साहेब प्रमुख वृक्ष आहेत. त्याशिवाय दु:खभंजनी बेरी, बाबा की बेरी, मेहताबसिंगकी बेरी हे वृक्षही महत्त्वाच्या वृक्षांच्या यादीत सामील आहेत.

आज जेव्हा वने पृथ्वीतळावरून मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत व केली जात आहेत तेव्हा वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व संगोपनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. देवराया, गायराने, जंगले विकासाच्या नावाखाली भक्ष्यस्थानी पडत आहेत. अनेक दुर्मिळ वनस्पती, वृक्ष, प्राणीसंपत्ती नष्ट होत आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पैशाच्या मागे धावणार्‍या जगात पुन्हा एकदा वृक्षांच्या आदर-सन्मान-संगोपनाची संस्कृती निर्माण करून आपल्या पृथ्वीला हरितभरित ठेवणे हे केवळ आपल्याच हातात आहे!

अरुंधती कुलकर्णी
[ माहितीस्रोत : आंतरजाल व अन्यत्र]

संबंधित लेखन

PG

अरुंधती कुलकर्णी

सहज सुंदर आयुष्याचा घेते चांदणझोका |
या रसिकांनो रंजक वेधक गोष्टी माझ्या ऐका ||

नमस्कार, मी अरुंधती कुलकर्णी. आपण मला माझ्या इरावती या ब्लॉगवरही भेटु शकता.

  1. Very informative article indeed. Interesting insight about Panchavati. Wr should also know the detail ‘Vidhi’ for planting those 5 trees, their directions with respect to each other and overall, as well as significance behind doing so. Please throw some more light if you already know the Vidhi.
    Truly it is said “Vrukshavalli Amha Soyari” by our own Saint Tukaramji.

  2. छान ! मी निसर्गप्रेमी संत हा लेख याच अनुषंगाने लिहिलाय. वाचुन पहावा हि विनंती
    http://mr.wordpress.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME