वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

प्रेममयी

१ प्रतिक्रिया
मैत्रीण आलेली. गेल्या वेळच्या मुक्कामात ही पठ्ठी स्वत:च भटकंती ला गेल्याने गाठभेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे आम्ही दोघींनी दंगा मांडलेला. तोच, एकेकाळी रोज गाठभेट होणार्‍या एका ओळखीच्यांचा फोन आला. ” कधी आलीस? कशी आहेस? मुक्काम किती? यावेळी जमलं तर भेटूयात आपण. पुढच्या वेळी येशील तेव्हां न जाने हम अल्ला को प्यारे… ” असे म्हणत नेहमीचे त्यांचे गडगडाटी हसणे. भरभर प्रश्न विचारणे आणि स्वत:च त्यांची स्वत:ला हवी असलेली उत्तरे देत ते निकालातही काढणे. माझ्या शहाळी प्रेमाची उजळणी झाली. ” अगं, परवाच गेलो होतो शहाळे आणायला. चक्क तो नारीयलपानीवाला तुला विचारत होता. वो हमारी छोकरी किधर हैं? दिखतीच नही बिलकुल. मी त्याला सांगितले, अरे वो तो उडनछू हो गयी. भूल जाव उसको और हमको देखो. ” पाठोपाठ हसण्याचा गडगडाट.

जसा अचानक फोन आला तसाच अचानक तो बंदही झाला. नेहमीसारखाच. पंधरा मिनिटे हा कोसळता धबधबा अखंड झेलून मी थोडीशी भिरभिरलेच होते. बोलत होते ते पण धाप मला लागली होती. क्षणात कित्येक वर्षे डोळ्यासमोर तरळून गेली. तसे ते माझे साहेब कधीच नव्हते. मात्र शेजारी होते. आईच्या घरापासून पाच मिनिटांवरच राहत असल्याने आम्ही एकाच कॉन्ट्रॅक्ट बसने रोज जा ये करत असू. मी नुकतीच लागलेली, अजून रुळत होते. तेव्हांपासून यांनी जी साथ केली ती आजही तितकीच टिकून आहे. गेल्या अकरा-बारा वर्षात प्रत्यक्ष भेटी तश्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच घडल्या. त्यांचे वयही तसे बरेच झालेय. वयानुसार येणारी दुखणीही आहेतच. घरातही फार काही सुसंवाद आधीही नव्हता आणि आजही नाहीये. ” जीवनाचे सगळेच चॅप्टर आपल्याला हवे तसे कसे लिहिता येतील? काहीतरी डावेउजवे असणारच. असे मी कधीतरी म्हणून गेलेली. ” ते वाक्य ‘ घर ‘ हा शब्द निघाला की लगेच ते मला परत करतात आणि पुन्हा नेहमीचे गडगडाटी हसतात. पंचवीस वर्षांच्या सहवासाने त्यातला उपहास, कारुण्य ठसठशीत समोर येते. जसे ते दाखवत नाहीत तसे मीही न दाखवता मंद हसते. तो मंदपणा त्यांच्यापर्यंत अचूक पोहोचतो. की लगेच आमच्यात ‘ तेंडल्या ‘ येतो. पुन्हा एक अखंड उत्साहाचा धबधबा उसळायला लागतो. क्रिकेट त्यांच्या नसानसातून वाहत असते.

मी नकळत या सार्‍यात गुंतत गेलेली. तोच समोरून प्रश्न आला, ” अजूनही तुमचे संबंध आहेत? कमालच आहे? आता कशाला ही झेंगट सांभाळते आहेस? काम ना धाम, उगाच नको ते ताप नुसते. “

” अगं, असं काय म्हणतेस? अशी तोडून का टाकता येतात माणसे? “

” हो येतात. काम संपले की तुम तुम्हारे रास्ते हम हमारे रास्ते. अशी खरकटी उगाच डोईजड होऊन बसतात. तुला इतकेही समजत नाही म्हणजे… “

” काय समजत नाहीये गं? थोडक्यात स्वार्थ पुरा होईतो ओळख, संबंध, मैत्री ठेवायची आणि मग झटकून टाकायचे, असेच म्हणते आहेस ना? आणि जी ओळख स्वार्थाविनाच होते तिचे काय करायचे? का अशी ओळख होतच नसते? “

” अगदी बरोब्बर नेमक्या शब्दात बोललीस. हेच मला म्हणायचे आहे. अशी ओळख झाली तरी मैत्री स्वार्थाशिवाय होत नसते. तुझा स्वभाव आता तरी बदल जरा. किती तरी लोकांनी गैरफायदा घेतलाय तुझा हे विसरून कशी जातेस तू. जसे लोकं आपल्याशी वागतील तसेच आपण त्यांच्याशी वागायला हवे हे शीक जरा. “

पुढे बराच वेळ ती मला काय काय ऐकवत होती. त्या शब्दांच्या वावटळीतून अनेक भिंती माझ्याभोवती उभ्या राहत गेल्या. ही माझी खूप जुनी मैत्रीण. जवळची. मी आजही तिला तितकीच जवळची मानतेय, पण ही तर शेकडो कोस दुरावलीये. या इतक्या अदृश्य भिंती कधी उभ्या केल्या तिने ? का?

तिचे शब्द अजूनही ऐकू येतच होते. ” अगं, इतकी ढील कशाला द्यायची मी म्हणते? हाय आणि बाय करावं मोकळं व्हावं. तू पण ना…. अशीच बावळट राहशील कायम. बरं चल मी पळते आता. फोन करतेच तुला मग भेटू पुन्हा सवडीने. ” मी नुसतीच मान डोलवली.

ती गेल्यावर मी आरशासमोर जाऊन उभी राहिले. ” काय? सारे आलबेल आहे ना? “

प्रतिबिंब गालातल्या गालात हसून म्हणाले, ” तूच सांग.. “

” मी हादरलेय. आज एक विकेट पडली. कदाचित कधीचीच पडली असावी फक्त मला आज कळली आहे. “

” मग त्यात नवीन ते काय? आयुष्याचे पीच पावलोपावली बदलतेय ना? असे व्हायचेच. “

” अगं, मैत्री ही काय वरवरची असते का? त्यात्या वेळेपुरती, कारणीक, गरजेची, तकलादू? “

” हे असे बावळट प्रश्न विचारण्याची सवय तुझी कधी सुटणार गं बाई? आता इतके रामायण ऐकूनही तू हा प्रश्न विचारतेस? “

” तू मला तिच्यासारखेच भिरभिरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी बावळट असेनही पण स्वार्थी नाहीये. एक तर, मैत्री असते किंवा नसते. उगाच संभ्रम नकोत. बांडगुळासारखी लटकणारी मैत्री ही अशी गळून पडतेच. पण म्हणून मी काही सगळ्यांना एकाच तागडीत तोलायची नाही. भेटीगाठी, स्वार्थ, तात्पुरती, साखरपेरणी शब्दांची, मौताज नसते मैत्री. माझा विश्वास आहे या नात्यावर आणि कायम राहील. नात्यात गुंता असायचाच. त्याला गृहीत धरून त्याची संगती लावत ते नाते पुढे नेण्यात तर, ‘ खरा कस ‘ लागतो. अलिप्तता, पलायनवाद हे उत्तर असूच शकत नाही. मैत्री ही आपल्याला हवी तशी आणि हवी तितकीच होऊ शकत नाही. या कुंपणांची मौताज मने फक्त सौदाच करतात. सगळ्याच गोष्टी समीकरणात मांडता येत नसतात. एक अधिक एक इतके सोपे भावनांचे गणित नसते. “

प्रतिबिंब पुन्हा गालातल्या गालात हसले. मला का कोण जाणे पण त्यात कुत्सित भाव दिसले. चिडून काहीतरी बोलायला जाणार होते पण ते पठ्ठे पळून गेले. मग मी त्याचा नाद सोडला आणि पुन्हा मैत्रीला शोधायला सुरवात केली.

खरेच का केवळ स्वार्थापोटी संबंध असावेत? मग माझा स्वार्थ असताना त्या समोरच्याने पाठ फिरवली तर तो दोष कोणाचा? माझा? का तोही त्याचाच? प्रत्येक ओळखीचे रुपांतर स्नेहात होऊ शकत नाही, मान्य. पण म्हणून स्नेह वाढवायचाच नाही हे समीकरण कसं योग्य? मैत्रीतही एक ठरावीक स्पेस – अंतर राखलेले असतेच की. सौजन्य व सामंजस्याने प्रेरित होऊन आखलेली अतिशय पुसटशी लक्षुमण रेषा. तुला हवे तेव्हां मी आहेच गं, हे आश्वासन देणारी. अनावश्यक हक्क टाळणारी. दुसर्‍यावर स्वत:ला लादून त्याच्या भावनांची नासधूस न करता हळुवार फुंकर मारत गोंजारणारी. व्यवहाराच्या, स्वार्थाच्या अभेद्य भिंती उभ्या होण्याआधीच रोखण्याची ताकद असलेली समर्थ मैत्री निर्माण करण्याची आंतरिक ऊर्मी आपल्यात असायला हवी. केवळ, ” काय म्हणतेस? कशी आहेस? ” इथेच खुंटणारी, काठाकाठाने सामाजिक नियमात पोहणारी मैत्री निव्वळ कुचकामीच. जवळीक भासवून पोटात शिरून, दुसर्‍याच्या दुखर्‍या जागा नेमक्या हेरत काढून घेतलेल्या गुपितांची चारचौघात वाटणी करत कुचाळक्या करणारी मैत्री आणि खरा स्नेह यातला फरक ओळखता यायला हवाच. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावता नये या नियमाला अनुसरून कोणालाही आपल्यावर आक्रमण करू देऊ नयेच, बांडगुळे नसावीतच हे जितके खरे तितकाच मैत्रीतला सच्चेपणाही जपता आला की मनामनातल्या दरीची निर्मितीच थांबेल. असेल ती फक्त एक निखळ स्वच्छ पायवाट. मुळात आयुष्यात इतर अनेक कठीण झगडे आहेतच निदान ही वाट सहज, प्रेममयी करणं तरी आपल्याला नक्कीच जमेल, जमायला हवच… काय?

संबंधित लेखन

 • रिसीवींग एंड ला मीच आहे रे

  तुमच्या आमच्या सारख्या बऱ्याच घरात हे असे प्रत्यक्ष व देहबोलीतून ठसक्यात व्यक्त होणारे संवाद …

 • सई…………
  सर्वत्र हिरवळ पसरलेली……..हिरवळ……………… ओली …………
  मन तृप्त करणारी ………….
 • पाऊस मनातला !
  आज रविवार ऑफिस ला  मस्त सुट्टी. सुट्टीची संध्याकाळ आभाळ भरून आलेल विजेच्या कडकडाटा सह पावसाल सुरु…
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • नगण्यतेत समावलेले जीवन….

  मानवी मनाची सगळ्यात आवश्यक गरज म्हणा, इच्छा म्हणा…..” कोणीतरी माझी विचारपूस करेल, आठवण…

PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME