वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

प्रेमाची व्याख्या नसते – २

३ प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळी दहा वाजताच उन्हाचा दाह जाणवित होता. शाळेला नुकतीच सुट्‍टी लागलेल्या आनंदी मुलांखेरीज दुसरे कुणी आपणहून घराबाहेर पडण्यास उत्सुक नव्हते. छोटे पक्षीसुध्दा नुकत्याच पालवी फुटलेल्या झाडांच्या फांदीवर बसून स्वतःची जागा न सोडता मित्रांना आपल्याकडे बोलावित होते. दिवसभरच्या तापाची ही फक्‍त सुरुवात असल्याने सर्वजण आपली शक्‍ती वाचविण्याचा प्रयत्‍न करीत होते. अचानक दोन पक्षी एकमेकांशी सुसाटपणे स्पर्धा करीत जमिनीला समांतर उडत मैदान ओलांडून पलिकडच्या झाडावर जाऊन बसले. अशावेळी खोलीत मंदपणे फिरणाऱ्या पंख्याखाली बसलेलो असताना सर्व वातावरणाची स्वतःबरोबर असलेली एकरुपता अनुभवता येत होती. मनामध्ये अचानक उद्भवलेल्या त्या स्तब्धतेतील सुंदरतेचा भंग करण्यास जवळच्या घरातील गाडीचा कर्कश लोकप्रिय गाण्यावरील आधारित असलेला रिव्हर्स हॉर्नदेखील असमर्थ होता. नवशिक्या चालकाने बराचवेळ त्याला वाजवून अखेरीस जेव्हा वाहनाला पुढे नेण्यास सुरुवात केली तेव्हासुध्दा मनातील स्तब्धता तशीच परिपूर्ण होती. समोर आलेल्या कुठल्याही घटनेला सामोरे जाण्याची ताकद त्या स्वयंभू शांततेत ठासून भरलेली होती.

‘एखाद्या व्यक्‍तीचे आपल्यावर प्रेम असेल तर तीने स्वतःच्या मनातील गोष्ट आपणास सांगावी ही आपली अपेक्षा स्वार्थी आहे हे कळले, पण मग त्या व्यक्‍तीकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नये काय? आणि असे जगणे मला शक्य आहे असे वाटत नाही.’

तू जरा शांत हो. आपण प्रेम म्हणजे काय याचा विचार करीत आहोत. प्रेमाचा खरा अर्थ समजल्यावर स्वतःच्या जगण्याला एक साचा मिळेल ही अपेक्षा मनात ठेवून अर्थ शोधणे संकुचित वृत्ती दर्शविते. एखाद्या व्यक्‍तीने मनाला खुपणारी गोष्ट आपणास सांगावी या अपेक्षेत चुकी आहे का नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. सध्या एव्हढेच लक्षात घे की एखाद्या अटीच्या पूर्तीतून दुसऱ्याच्या मनातील प्रेमाबद्दल निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. तुझे स्वतःच्या मुलावर जीवापाड प्रेम आहे पण म्हणून तुला बोचणारी प्रत्येक गोष्ट तू त्याला सांगतेस का? खऱ्या प्रेमाला कुठलाही साचा नसल्याने दुसऱ्याचे आपल्यावर किती प्रेम आहे हे बघणे असंभव आहे हे एकदा पूर्णपणे जाणून घे. निव्वळ शाब्दीक ज्ञान नव्हे तर असे ज्ञान की जे तुझ्या हाडामासांत भिनलेले आहे. त्याकरीता तुला स्वतःच्या वर्तनाकडे डोळे उघडून बघायला हवे. ज्या माणसांबद्दल तुझ्या मनात प्रेम आहे अशा व्यक्‍तींच्याबद्दल तुझ्या मनात कुठकुठल्या भावना उद्भवतात हे तू पहायला शिकले पाहिजे. तुझ्या लक्षात येईल की त्यांच्याबद्दल निव्वळ सात्विक भावनाच येतात असे तू प्रामाणिकपणे म्हणू शकत नाहीस. उदाहरणार्थ, कधीकधी मुलाला शाळेत डबा द्यायचा कंटाळा येतो, नवऱ्याच्या नोकरीतील अतिरेकी कष्टांची असूया वाटते आणि सासूबाईंच्या शांत बसण्याचा कंटाळा येतो. आपल्या मनातील त्यांच्यावरील प्रेमाला याने बाधा येत नाही असे तू मानतेस (या मानण्यात अजिबात चुकी नाही) पण मग दुसऱ्याच्या वागण्याने का अस्वस्थ होतेस? मी कधीकधीच अशी वागते आणि ते कायमच असे विचित्र वागतात या म्हणण्याला शास्त्रीय आधार नाही. कारण काही काळाने ते कायम ‘चांगले’ वागतील आणि तू बहुतांशी विचित्र वागशील! शेवटी त्यांच्या वागण्याची गोळाबेरीज तुझ्यासारखीच होईल यात शंका नाही. कारण कर्माचा नियमच असा आहे की सर्वांच्या वर्तनाची शेवटची गोळाबेरीज शून्य होते.

‘अंतिम स्थितीमध्ये सर्व एकसारखे होणार आहेत या माहितीने सध्याच्या जीवनातील दुःख कमी होत नाही! सध्या मी कुठलेही दुर्वतन केलेले नसताना का म्हणून दुसऱ्यांचे विचित्र वागणे मी सहन करावे?’

(क्रमशः)

संबंधित लेखन

 • वर्गवारी करण्याची सवय
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥
  खिशात हात घालून त्या निर्मनुष्य रस्त्यावर स्वतःच्या…
 • अध्यात्मिक आनंद आणि सात्विक सुख
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

  पुणे,

  दिनांक —

  चि. श्रीधर यास अनेक आशिर्…

 • नात्यांतील अस्थिरता
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  त्याची गाडी जुनी होती पण अतिशय सुंदररीत्या काळजी घे…
 • प्रेमाची व्याख्या नसते
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  सकाळच्या ताज्या सूर्यकिरणांनी सर्व जग स्वच्छ होत हो…
 • काम करण्यातील आनंद
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  आज मुलाला शाळेतील सहलीला जायचे होते. सकाळी ५ वाजता …
PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

 1. ज्ञानेश्वर महाराजांनी म्ह्टलयं ना – “तेथ प्रियाची परिसीमा । तो भेटे माऊली आत्मा । तया खेवी आटे डिंडीमा । मग सांसारीक हे ॥”

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME