वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

प्रेमाची व्याख्या नसते – ३

० प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

दुसऱ्याचे विचित्र वागणे आपण सहन का करावे हा प्रश्न तुझ्या मूळ प्रश्नापासून किती दूर आहे हे लक्षात आले का? सुरुवातीला आपण सासुबाई त्यांच्या मनातील गोष्टी आपणास सांगत नाहीत या वस्तुस्थितीने अस्वस्थ होतो. त्यातून त्यांच्या मनातील आपल्यावरील प्रेमाबद्दल शंका निर्माण झाली आणि हे लक्षात आले की कुणाच्या वागण्यावरुन त्याच्या मनात काय चालले आहे याचे ज्ञान होणे अशक्य आहे. फारतर आपण आडाखा बांधू शकतो पण अशा अंदाजाने वागल्यास कधीनाकधी मनाला धक्का बसणारच आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट तुझ्या लक्षात आलेली नाही. ती म्हणजे, जेव्हा आपण दुसऱ्यांच्या वर्तनावरुन प्रेम ओळखू शकत नाही हे जाणतो त्याचवेळी स्वतःची प्रेम दाखविण्याची धडपडही व्यर्थ आहे हे कळले पाहीजे. कारण प्रेमाचे नाते दोन्ही बाजूने सारखे असल्याने आपल्या वागण्यावरुन आपल्या मनातील प्रेमाची जाणीव त्यांनासुध्दा होणार नाही! मग ‘सहन करण्याच्या’ वर्तनाचा आग्रह कशाला?!

‘सहन करण्याचा आटापिटा नको म्हणजे मी त्यांच्याशी कसेही वागावे काय?’

समाजात कसे वागावे याचे जे नियम आहेत त्यांचे तू पालन केले नाहीस तर तुला निश्चितच परीणाम भोगावे लागतील. तू आपल्या मनातील प्रेमाची जाणीव दुसऱ्यांना व्हावी म्हणून ठराविक वर्तन करत असशील तर ते चुकीचे आहे असे इथे म्हणणे आहे. प्रेम आहे पण तरीसुध्दा दुसऱ्याच्या प्रत्येक चुकीची जाणीव त्यांना देत बसशील तर त्या वर्तनाने तुझ्यामधील प्रेमाला धक्का लागणार नाही पण दुसऱ्याचे तुझ्याबरोबरचे वर्तन हट्‍टी होईल! आणि मनात प्रेम नसताना सतत गोड बोलशील तर त्याने प्रेम उत्पन्न होणार नाही पण दुसऱ्यांचे सहकार्य जरुर मिळेल. तू बघत नाहीस का की विमानातील कर्मचारीका प्रत्येकाचे गोड आवाजात स्वागत करतात आणि त्यावेळी कुणाची कशीही मनःस्थिती असली तरी तो त्या अभिवादनाला तसेच प्रत्युत्तर देतो!!

‘पण मग ‘प्रेम’ हा प्रकार आहे तरी काय?’

प्रेम ही आपली सहज स्थिती आहे. प्रेम आपल्यामध्ये उपजतच आहे, खरे म्हणजे ती एकच गोष्ट आपण बरोबर घेऊन जन्माला आलो आहोत. व्यवहारात आपण ‘एखाद्याबद्दल प्रेम वाटते’ असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्या व्यक्‍तीच्या माध्यमाद्वारे आपल्यातच कायम असलेले प्रेम आपणास दिसते. ज्याप्रमाणे सलूनमध्ये केस कापायला गेल्यावर तेथील समोरासमोर असलेल्या आरशांद्वारे आपल्या डोक्याची मागची बाजूसुध्दा आपणास स्पष्टपणे दिसते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्‍तीच्या वा तत्वाच्या वा वस्तूच्या सान्निध्यात आल्याने जेव्हा आपल्या व्यक्‍तिमत्वाचा लोप होतो तेव्हा प्रेम दिसू लागते. ‘कष्ट न करणे’ हाच आपल्या व्यक्‍तिमत्वाला जपण्याचा खटाटोप असल्याने (कष्ट म्हणजे काय याची व्याख्याच आपल्या व्यक्‍तिमत्वावर आधारीत आहे) सर्वसाधारणपणे प्रेमाची व्याख्या ‘स्वतःची कुठलेही कष्ट सहन करायची तयारी’ अशी असते. परंतु आपल्या डोक्याचा मागला भाग आरशात नसून आपल्याजवळच आहे तसेच आपली ‘स्वतःचे व्यक्‍तिमत्व सोडायची तयारी’ आपल्यातच आहे!!! संतांनी आपल्या संकुचित व्यक्‍तिमत्वाचा पूर्ण त्याग केलेला असल्याने सर्वांनाच असे वाटते की त्यांचे आपल्यावर प्रेम आहे!!

तेव्हा सांगायची गोष्ट अशी की मनात प्रेम आहे म्हणून एका ठराविक साच्यात वागायला हवे ही कल्पनाच चुकीची आहे. प्रेम या तत्वाचा जीवनात काहीतरी उपयोग करु ही आपली भावनाच आपणास प्रेमापासून वंचित करते. ज्याप्रमाणे आपण सतत पृथ्वीवर उभे आहोत त्याचप्रमाणे आपल्या अस्तित्वाचा पाया प्रेम आहे. सासूबाईंशी तू कसे वागावे हे तुझ्या आणि त्यांच्या सामाजिक बंधनांवर आणि स्वभावांवर अवलंबून आहे. त्यातून तुमच्या मनातील प्रेम ना कमी होणार आहे ना वाढणार आहे. ‘प्रेम’ या शब्दाचा आधार घेऊन तू ना आपल्या वागण्याचे समर्थन करु शकशील ना त्यांच्या वागण्यातील विचित्रपणा सिध्द करु शकशील! (समाप्त)

संबंधित लेखन

PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME