वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

प्रेमाची व्याख्या नसते

२ प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

सकाळच्या ताज्या सूर्यकिरणांनी सर्व जग स्वच्छ होत होते. घराच्या उघड्या दारातून दिसणाऱ्या बागेतील कोवळे नीम वृक्षाचे रोपटे नुकत्याच फुटलेल्या पालवीसकट वाऱ्याच्या झुळूकीवर नाचत होते. एक अंगठ्याएव्हढा पक्षी रात्री उमलेल्या फुलाशी आपुलकीने गप्पा मारत त्यातील रसाने आपली भूक शमवीत होता. इतक्यात त्याला कुणाची चाहूल लागल्याचा भास होऊन तो भुर्रकन उडून गेला. त्याच्या अचानक निघून जाण्याने दचकलेली फुलाची फांदी काहीकाळ स्वतःशीच थरथरुन परत जीवनाला सामोरे जाण्याला स्तब्ध झाली. काही मिनिटातच तेव्हढ्याच अचानकपणे तो पक्षी परत आला आणि त्याने आपले झाडाबरोबरचे संभाषण काही झालेच नाही अशा भावनेने परत सुरु केले. त्या प्रसन्न वातावरणात मुलाची बरेच दिवस न वापरलेली सायकलसुध्दा स्वतःच्या हवा गेलेल्या चाकांसकट स्वतःवरील धुळीच्या थराखाली तृप्त दिसत होती. स्वतःच्या सवंगड्यांना शोधण्याच्या प्रयत्‍न करणाऱ्या कोकीळांच्या कर्कश आवाजाने अचानक वातावरणातील स्तब्धतेला वाचा फुटली आणि ती सुखद सकाळ स्वतःशीच गुणगुणू लागली. त्या मंगल समयी निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याच अस्तित्वात मग्न असण्यामध्येच आनंदित होता.

‘माझी सासू खूपच चांगली आहे आणि आमच्या संसारात मदत करण्यामध्ये त्यांना अतिशय आनंद होतो. अर्थात न आवडणाऱ्या गोष्टी घरात झाल्या की त्यांना संताप येतो आणि त्यात काहीच वावगे नाही. परंतु त्यांची राग दाखविण्याची पध्दत घरात सर्वांशी संभाषण बंद करुन गॅलरीमध्ये उभे राहण्याची आहे. आम्हाला त्या आपले म्हणतात पण स्वतःच्या मनातील गोष्टी आम्हाला सांगत नाहीत आणि याने सबंध घरात अस्वस्थपणा भरुन राहतो. त्यापेक्षा मोठ्या आवाजात कडाक्याचे भांडण केलेले बरे.’

आपल्या जीवनात स्वतःच्या भावनांना आपलेपणाने समजून घेणारी व्यक्‍ती अशी प्रेमाची व्याख्या आपण करतो आणि त्यामध्येच ‘आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्‍तींनी त्यांच्या मनातील भावना आपल्याला सांगाव्यात’ या अपेक्षेचे मूळ असते.

‘परंतु या व्याख्येमध्ये आणि अपेक्षेमध्ये काय चुकीचे आहे? आपल्या माणसांना मनातील भावना सांगायच्या नाहीत तर कुणाला सांगायच्या?’

आपले खासगी विचार दुसऱ्यांना सांगण्याने काय मिळते?

‘काय मिळते हे माहिती नाही, पण खूप बरे वाटते हे नक्की.’

म्हणजे स्वतःला बरे वाटण्याची भावना जागृत होण्याकरीता आपण दुसऱ्यांना आपल्या जीवनात सहभागी करुन घेतो! असे असेल तर यातून दुसऱ्यांबद्दलचे प्रेम कुठे दिसून येते?

‘तुम्ही असे शब्द वापरल्यावर आमच्या प्रेमातील स्वार्थ स्पष्ट होतो. परंतु हा स्वार्थ आमच्या नकळत घडलेला आहे. आम्ही जाणूनबुजून असे वागत नव्हतो आणि त्यातून कृपा करुन आमच्या मनातील प्रेमाबद्दल शंका घेऊ नका.’

बरोबर आहे. स्वतःच्या नकळत आपण मनातील प्रेमाला व्यावहारिक पातळीवर आणत असतो. याचे कारण म्हणजे आपण निव्वळ प्रेमात पडण्यामध्ये सुखी रहात नाही तर त्या अमूर्त प्रेमाला दृश्य रुप देण्याच्या मागे लागतो. स्वतःच्या कृतीमध्ये ते प्रेम आलेच पाहिजे या अट्‍टाहासात आपण दुसऱ्यांच्या कृतींमार्फतच त्यांच्या प्रेमाच्या पातळीला ठरवितो. एकदा तुला जाणीव झाली की सासूचे तुझ्यावर प्रेम आहे की मग त्यांना तुझ्याशी प्रेमाने वागण्याशिवाय गत्यंतरच नाही हे लक्षात घे. त्यांचे न बोलता दिवसेंदिवस एकटे राहणेसुध्दा ‘उगाच बोलून तुला त्रास का द्यावा’ या भावनेमुळे असण्याच्या शक्यतेला तू का नाकारतेस. तुझी प्रेमाची व्याख्या संकुचित आहे, त्यांच्या प्रेमात खोट नाही.

संबंधित लेखन

PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

 1. wow he looking so handsome of this letter is very beutiful, i love this letter

  you will be try it about any letter ,

  i wiil meat for you or call in my mobile no 9029004905

  really love this letter

 2. khup aawdle.
  aapli mayboli tumhi aani aamhi japtay yacha mala abhiman aahe.
  aapla khup khup aabhari aahe.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME