वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

बालपणाच्या पूर्वार्धातील काळजी आणि शिक्षण – भाग २

२ प्रतिक्रिया

नर्सरीज किंवा बालवाड्यांमध्ये राबवले जाणारे उपक्रम हे मुलांच्या भावी आयुष्याचा पाया रचतात. चित्रकलेच्या माध्यमातून मुले स्वत:चे विचार तर व्यक्त करतातच पण खडू बोटांच्या पकडीत धरण्याचा सराव लहान वयातच झाल्याने त्यांना पुढे मोठ्या शाळेत पेन्सील किंवा पेन धरताना अडचण येत नाही. तसेच, कागदाचे बोळे बनवून किंवा पट्ट्या कापून ते निरनिराळ्या आकारांत चिकटवणे यांसारख्या गोष्टी लहान मुलांचे तळ्व्याचे व बोटांचे स्नायू विकसित करतात. हम्प्टी डम्प्टी किंवा बाबा ब्लॅक शिप सारख्या छोट्या बडबडगीतांमधून मुलांचे भाषाज्ञान वाढीस लागते. ऐकलेली गोष्ट पुन्हा सांगणे किंवा त्या गोष्टीवर आधारित नाटक सादर करणे यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीला चालना मिळते.

सर्वसाधारणपणे १-२ महीन्यानंतर मुलांना शाळेतील दिनक्रम माहीत होतो व मग त्यांना दैनंदिन गोष्टी, जसे आपले दप्तर व चपला रांगेत लावून ठेवणे, प्रार्थना म्हणणे, गाणी म्हणताना करावयाचे हावभाव याबद्दल पुन्हा पुन्हा सांगावे लागत नाही. काही मुले शाळेत येताना सुरुवातीचे २-३ दिवस रडतात पण एकदा का, त्यांच्या मनात शाळेबद्दल सुरक्षिततेची भावना निर्माण झाली की मग त्यांना शाळेची ओढ वाटू लागते. तेथे असलेली थोडी वेगळी आणि आकर्षक अशी खेळणी व चित्र त्यांना हवीहवीशी वाटू लागतात. मुलांमध्ये ही सुरक्षिततेची भावना निर्माण करणं फार गरजेचं असतं आणि ECCE प्रशिक्षित शिक्षिका किंवा शिक्षक ते चोखपणे करतात.

नर्सरीजमध्ये काम करणारा शिक्षकवर्ग

सुमारे दोन ते तीन तासांचा एक वर्ग, सकाळी व दुपारी अशा दोन वेळांत भरतो. नर्सरीजमध्ये काम करणारा शिक्षकवर्ग, सुमारे सहा तास अखंड काम करत असतो. लहान मुलांकडून निरनिराळ्या अक्टिव्हिटीज करून घेताना, गाणी म्हणताना, या शिक्षकांची इतकी शारीरिक व मानसिक शक्ति खर्च झालेली असते की त्यांना खर.तर स्वत:साठी वेगळा असा व्यायाम करण्याची काहीच गरज नाही. यातला विनोदाचा भाग आपण सोडून देऊ पण दिसायला हे काम खूप सोपं असंलं तरी ते आहे मात्र खूप मेहनतीचं. त्यामानाने, ह्या शिक्षकांना वेतन मात्र तसं कमीच मिळतं. कदाचित काही शिक्षिका ह्या सुखवस्तू घरातून आलेल्या असतात व केवळ आवड म्हणून त्यांनी ह्या क्षेत्राकडे पाहील्यामुळे असेल पण बर्‍याचशा स्त्रिया हे क्षेत्र सुरक्षित आर्थिक क्षेत्र म्हणूनही निवडतात. मर्यादित वेतन ह्या कारणामुळेच बहुधा पुरुषवर्ग या क्षेत्राकडे वळलेला दिसत नाही.

नर्सरी टीचर म्हणजे चार तासाचं काम आणि भरपुर सुट्ट्या , असा एक सर्वसाधारण समज आहे पण जर ह्या नर्सरीजमधील मुले निघून गेल्यानंतर आपण तिथे एक चक्कर टाकलीत, तर ह्या शिक्षिका तिथेच थांबून दुसर्‍या दिवशीची पूर्वतयारी करताना तुम्हाला दिसतील. केवळ आवड असून चालत नाही तर काम करण्याची इछाशक्ती असलेल्या व्यक्तीचाच ह्या क्षेत्रात निभाव लागू शकतो.

संबंधित लेखन

PG

कांचन कराई

मी कांचन कराई. आरशासारखी स्वच्छ आणि पारदर्शक. मनुष्यस्वभावाचा अभ्यास करणे हा छंद आहे माझा. मराठीच्या प्रसारासाठी निरनिराळ्या माध्यमांतून स्वत:च्या ब्लॉगवर प्रयोग करत असते. स्वत:च्या आवाजात कथा ध्वनिमुद्रित करण्याचे प्रयोग सध्या सुरू आहेत.
मोगरा फुलला

  1. लहान मुल म्हन्जे मातिचा गोला हवा तसा आकार द्दा

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME