वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे १०१ मार्ग: भाग – १

१३ प्रतिक्रिया

“काय रे, बरेच दिवस झाले.. काही लिहिलं नाही, ब्लॉगवर? विषय संपले का नव्याचे नऊ दिवस संपले? – एक मित्र.

ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे १०१ मार्ग

ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे १०१ मार्ग

“नाही रे.. जरा बीझी आहे आज – काल.. ऑफिसमध्येच बराच वेळ जातो.. लिहायला सवडच मिळत नाही!” – मी.

” मी बीझी आहे! ” – ब्लॉग न लिहिण्याचं एक कारण.. अशी अनेक कारणं महेंद्रजींनी त्यांच्या ब्लॉगवर सांगितली आहेत.

ब्लॉग सुरु करतेवेळी प्रत्येकजण फार उत्साही असतो.. मीही होतो/ आहे. मात्र काही दिवसांतच सर्वांत मोठा प्रश्न भेडसावु लागतो – दरवेळी कोणत्या विषयांवर लिहायचे? ब्लॉगिंग सुरु केल्यानंतर काही मंडळीकडचा ब्लॉगच्या आयडिया – किवा विषय म्हणा – संपल्यासारखे वाटु लागतात. मग लिहण्यासाठी टाळाटाळ साहजिकच आहे! असो. तर मलाही असं होतंच..म्हणुन एकदा महाजालावर थोडी शोधा-शोध करुन पाहिलं आणि ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे चक्क शंभरपेक्षा अधिक मार्ग सापडले!

चला त्यावर सविस्तरच बोलुया…!

१. आवडीचे कोनाडे शोधा:
बर्‍याच ब्लॉग/ वेबसाईट्सवर आपल्या आवडीचे लेख/ विषय असतात. गुगल-रीडर मध्ये अशा वेबसाईट्स/ ब्लॉग यांची ई-मेल वर्गणी [सबस्क्रिप्शन] घेऊन ठेवा आणि दररोज – वेळ मिळेल तेंव्हा किमान त्याच्या मथळयावर नजर फिरवा. तुम्हाला तुमचा विषय मिळेल. अशाच काही मथळ्याचसाठी “डंप लिटल मॅन” किंवा “लाईफहॅक” या संकेतस्थळांना भेट द्या – त्यांचे सबस्क्रिप्शन घ्या.

२. लोकल – स्थानिक वर्तमान पत्रे वाचा:
तुमच्याच शहराचे – विभागाचे किंवा गावचे स्थानिक वर्तमान पत्रही तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयावर एखादी बातमी – आयडिया देऊ शकतं. बर्‍याचदा, आपल्या आवडीबाहेचं वाचनही आपल्याला एखादी भन्नाट कल्पना/ विषय देतं.

३. वाचकांना विचारा
तुमचा ब्लॉग वाचणार्‍यांना विचारुन पहा – त्यांना कोणत्या विषयांवर वाचायला आवडेल? काही जण, अगदी प्रोफेशनल ब्लॉगर्सही, त्यांच्या वाचकांकडुन अशी माहिती विचारतात आणि त्यावर येणर्‍या मतांमधुन/ प्रतिसादातुन तुम्हाला तुमचा विषय निवडता येतो. उदा. प्रोब्लॉगरचा डॅरन रोज.

४. तुमचे प्रश्न – उत्तरे शोधा:
चांगल्या पोस्ट/ लिखाण हे तुम्हाला पडलेल्या लाख मोलाच्या प्रश्नावर अवलंबुन असतं. तुमच्या विषयाला अनुसरुन विचारलेले प्रश्न, त्याची उत्तरे यातुनच तुम्हाला लिहायला एक चांगला विषय मिळु शकतो. किमान तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर हेच एखादी पोस्ट होऊ शकतं! याहु आणि विकि वर तुम्हाला अशी बरेच प्रश्नोत्तरे सापडतील.

५. कल्पना करा – तुम्ही एक सॉलिड लेख लिहिलाय!
जरासं वेगळं वाटलं ना? अहो कल्पना करा की तुमची एक भन्नाट पोस्ट झालीय.. लोक त्या लेखांबद्दल चर्चा करताहेत… प्रतिक्रिया लिहिताहेत आणि त्यातुनच तुम्हाला नविन विषय सुचतोय – नवी पोस्ट लिहायला!

६. फ़ोरम – चर्चासत्रांना भेट द्या
इंटरनेटवरील फोरम – चर्चा सदरांनी भेट द्या.. बघा लोक कशाबद्दल आणि काय बोलताहेत. त्यांना काय हवंय, कशाबद्दल माहिती हवीय? जर तुम्हाला हे कळालं तर तुमची पुढची पोस्ट बनलीच ना! इंग्रजीच नाही तर तुम्हाला “मिसळपाव”, “मनोगत”, “मायबोली” यांवरही रोज नविन विषय वाचायल मिळतील हो!

७. आर्टीकल डिरेक्टरीजना भेट द्या
विषयवार माहिती देणार्‍या “मार्गदर्शिकांना” – डिरेक्टरींना भेट देऊन तुम्हाला तुमच्या आवडत्या किंवा न आवडत्या विषयांवरही अधिक माहिती मिळवता येईल. काही वेळा लिहु घातलेल्या किंवा पुर्ण होत आलेल्या पोस्टलाही संपुर्ण करण्यासाठी अशा मार्गदर्शिका फार उपयोगी पडतात. उदा. इझाईन मार्गदर्शिका

८. इंटरनेट वरील शोधाचा उपयोग करा.
गुगल वर काही शोधताना तुमच्या शोध शब्दासारखेच – साधर्म्य असणारे शोध तुमच्याआधी घेतल्या गेल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. ते शोध शब्द काय होते.. लोक त्यातुन काय शोधत होते हे त्या शोधा वर – पोस्टवर जाऊन पहा, तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळतेय का? म्हणजे काही शोधताना सापडलेल्या माहितीचाही – पुढची पोस्ट लिहिताना उपयोग होईल, नाही का?

९. काही ठराविक शब्द शोधा
हा अजुन एक सोपा मार्ग. एखादा शब्द घ्या आणि त्यावर शोधा. बघा काय – काय हाती लागतंय. उदा. देतो. समजा मी “पुणे” असा शब्द “वर्डट्रॅकर” या साधनाच्या सहाय्याने शोधला तर मला चिक्कार शब्द सापडले. तुम्हीही तुमचा एखादा शब्द शोधुन पहा!

१०. ऑनलाईन वाचा
स्थानिक बातम्या प्रमाणेच ऑनलाईन न्युज ही नविन लिहायला विषय मिळवुन देतात. ऑनलाईन बातम्या वाचण्याचा मोठा फायदा म्हणजे – ताबडतोब बातमी वाचायला मिळते. शिवाय, गुगल वापरुन देशात चाललेल्या “हॉट ट्रेन्ड्स” बद्दल ही माहिती घ्या. यातुनच तुम्हाला तुमच विषय मिळेल ना! उदा. आजचे “हॉट ट्रेन्ड्स” पहा.

११. ऍनालीटीक्सचे आकडे पहा
पाठीमागच्य एका पोस्टमध्ये मी गुगल ऍनालीटीक्स बद्दल लिहलं होतं. त्याच्या रिपोर्ट मध्ये पाहताना तुम्हाला कळेल की लोक कोणत्या विषयावर जास्त वाचताहेत, कोण काय शोधुन तुमच्या ब्लॉग/ साईटवर आलं. ही माहिती वापरुन किंवा त्यावरच तुम्हाला नविन पोस्ट लिहिता येईल.

१२. जुन्या पोस्ट धुंडाळा
तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीला लिहिलेल्या विषयाबद्दल आठवतंय? जरा स्वत:च्याच जुन्या पोस्ट धुंङाळुन पहा. त्यातले विषय, वाचकांच्या प्रतिक्रिया यावरुन तुम्हाला नविन पोस्टसाठी काही सुचेलच ना!

१३. दुसऱ्यांच्या ब्लॉगच्या जुन्या पोस्ट धुंडाळा
काही जाणकार आणि प्रसिध्द ब्लॉगर्सच्या जुन्या पोस्ट धुंडाळा. काही नविन आयडिया मिळतील…. हां, मात्र तीच पोस्ट कॉपी – पेस्ट मारु नका म्हणजे झालं!

१४. कुणाची तरी मुलाखत घ्या!
कुणाची तरी म्हणजे एखाद्या विचारवंताची, गावच्या सरपंचांची, शेतकर्‍याचीही! पत्रकार म्हणुन नव्हे.. त्यांचे विषय … अडचणी/ मत समाजाला अवगत करुन देता आलं तर एक समाजसेवाच होईल नाही का?

१५. अमेझॉन वर शोधा
अमेझॉन वर तुम्हाला सध्याच्या प्रसिध्द पुस्तकं – विषय या बद्दल माहिती मिळेल. ती वापरुन एखादी ब्लॉगपोस्ट नक्कीच लिहिता येईल.

१६. टेड.कॉम वर पहा – नविन काय आहे?

टेड.कॉम या साईटवरुन तुम्हाला समजेल की सध्या तांत्रिक – करमणुक किंवा इतर बाजारात काय चालु आहे. या नविन घडामोडीबद्दल तुम्हालाही माहिती मिळेल.

१७. रिकाम्या वेळात – विचार करा!
रिकामं मन – शैतानाचा कारखाना असतो असं म्हणतात… हाच कारखाना आपण आपल्या ब्लॉगसाठी नविन पोस्ट छापायला वापरायचा! मनात आलेला विषय लागलीच कागदावर – समोर असणार्‍या वहीत, हवं तर मोबाईलमध्ये ड्राफ्ट करुन ठेवा आणि त्यावर लिहा.

१८. पी.एल.आर. आर्टिकल्स शोधा
अगदीच विषय संपले असं वाटत असेल तर हा पर्याय. पी.एल्.आर. म्हणजे “प्रायवेट लेबल राईट्स”. यानुसार तुम्ही एखादं पुस्तक, लेख खरेदी करुन नंतर तुमच्या सोयी/ आवडीनुसार त्यात बदल करु शकता. उदा. पी.एल.आर. स्टोर

१९. संगित ऐका.
गाणी ऐकणं – सर्वांनाच आवडतं.. नाही का? गाणी ऐकताना एखादा शब्द/ कडवं किंवा त्यातला एखादा ठेकाही तुम्हाला नविन पोस्ट लिहायला विषय मिळवुन देईल. शिवाय – आवडती गाणी/ गायक/ संगीत अशा अनेक विषयांवर लिहिता येईल ते सांगायची गरज नाही, हो ना 🙂

२०. मुक्त विचार
कोणताही विषय पुर्वनियोजित न ठेवता नविन विषयांच्या विचारात मनाला अगदी मोकाट सोडा.. बघा काय विचार मनात येताहेत.. ते विचार लागलीच नोंद करुन ठेवा.

२१. कोट्ससाईला भेट द्या
थींक-एक्जिस्ट किंवा ब्रेनीकोट्स यांसारख्या संकेतस्थळांना भेट देऊन पहा. अनेक वेगगेळया विषयांवर तुम्हाला चांगले कोट्स – विचार वाचायला मिळतील. त्यातलेच काही विचार तुम्हाला एखादी चांगली पोस्ट लिहायला मदत करतील.

२२. मित्र आणि नातेवाईकांना विचारा
मित्र आणि नातेवाईकांकडे “मी नविन पोस्ट लिहितोय, तुम्हाला काही प्रश्न किंवा माहिती हवी आहे का?” असं विचारुन पहा. एका पेक्षा एक आयडिया मिळतील. कदाचित तुम्ही विचार न केलेला किंवा मनात नसलेला सुद्धा एखादा विषय लिहायला मिळेल.

२३. माईन्ड ब्लॉकेज!
अगदी तडकाफडकी विषय – म्हणजे, बरेच आठवुनही जर तुम्हाला एखादा विषय/ नाव किंवा सिनेमाच आठवत नसेल तर तो विषय मना आल्या-आल्या तुम्हाला सुचलेला विषय किंवा कल्पनाही नविन पोस्ट लिहिण्यास पुरेशी असते. अगदी मुळात न घुसता लागलीच मिळालेल्या – सुचलेल्या विषयावरच लिहायला घ्या!

२४. ध्यान – मेडिटेशन करा
मेडिटेशन – मी काही अगदीच ध्यानमग्न व्हायला सांगत नाही, पण बर्‍याचदा अगदी डोळे मिटुन शांत – निर्विकार बसुनही मनातले अनेक विचार साफ होतात. मनात शांत रस निर्माण होऊन तुम्हाला एखादा विषय नक्कीच सुचतो!

२५. गुगल-वंडर-व्हील
गुगल वंडर व्हील ही सुविधा वापरुन आपल्याला आपण शोधत असलेल्या फ्रेज बद्दल जरा अधिक माहिती मिळते. आता हे चक्र कसे वापराल?
१. गुगल.कॉम वर जा – शक्यतो गुगल त्या त्या देशाचे सर्च इंजिन वापरते त्यामुळे गुगच्या होमपेजवर जाऊन गुगल.कॉम वर क्लिक करा.
२. एखादा शब्द किंवा फ्रेज शोधा.
३. सर्च रिजल्ट पानावर, गुगलच्या लोगो खाली “show options” दिसेल. त्यावर क्लिक करा.
४. जरा खाली स्क्रोल करुन “standard view.” पहा आणि त्यामध्ये “wonder wheel.” वर क्लिक करा आणि पहा, तुम्हाला अनेक पर्याय दिसतात!

उदा. गुगल वंडरवर “ब्लॉगिंग” शोधा… आणि हे घ्या निकाल.
आता तुम्हाला तुमच्या शोधाबद्दल अधिक माहिती घेणे सोपं जाईल!

२६. ट्विटरवर टॅग्स व टॉपिक्स शोधा
ट्विटरबद्दल आपणांस माहितचा आहे. १४० अक्षरांत आपल्या सद्य – परिस्थिती – कार्य इ. बद्दल आपण इतरांना माहिती देवु शकतो. ट्विटरवर “हॅश टॅग” या सदरात आपण आपला निरोप जोडुन त्या विषयांवर अधिक ट्विट्स पाहु शकता. असे “हॅश टॅग” आपणांस नविन लेखन करण्यासाठीही वापरता येतील. सध्याचे हॅश टॅग पाहण्यासाठी आपण हॅशटॅग या संकेतस्थळालाही भेट देवु शकता.

२७. काहीतरी वेगळं करा – लिहा!
वेगळं म्हणजे, जे करायचं राहुन गेलं.. जसं एखादा गड किल्ला – ट्रेक – सामाजिक कार्य वगैरे. असं काही हातुन घडलं तर त्यात जो आनंद आहे तो अवर्णनियच! आणि तो आनंद – अनुभव इतरांशी वाटण्यातही वेगळाच आनंद आहे. त्यावर एखादी पोस्ट नक्कीच होईल, नाही का?

२८. पुस्तक वाचा!
आता हे काही सांगावं लागत नाही! मात्र बर्‍याचदा कामाच्या गडबडीत अगदी प्रसिध्द आणि आपली आवडती – आवडत्या लेखकाची पुस्तकं वाचणेही राहुन जाते. थोडा वेळ काढुन ती वाचुन काढा. मग त्यातील आवडलेल्या लेख/ मुद्दा/ लेखक यांवर आपणांस नक्कीच लिहता येईल.

२९. खेळ खेळा
सध्याच्या धावपळीच्या जगात मैदानी खेळ खेळायला वेळ मिळणं जरा कठीणच, नाही का? असो. आपण काही संगणकावर असणारे खेळ – ज्याला व्ही.डी.ओ. गेम्स म्हणतात ते तर खेळुच शकतो. अशाच आपल्या आवडत्या खेळाबद्दल, तो कुठे – कसा खेळता येईल/ त्यातील टिप्स – ट्रिक्स यावर लिहा.

३०. लहान मुलांशी बोला
“मुलं म्हणजे देवाघरची फुलं” असं म्हणतात. अगदी निरागस आणि बिंधास्त विषयही त्यांच्याकडुनच तुम्हा – आम्हाला ऐकायला मिळतील. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारा. बघा तुम्हाला तुमचा नविन लेखनाचा विषय कसा पटकन मिळतो ते!

३१. चालायला किंवा व्यायामाला जा!
माझ्यासाठी तरी व्यायाम करणे ही गोष्ट “धर – सोड” या प्रकारात मोडते. म्हणजे अनेकदा सुरुवात करुनही त्यात आजही नियमितता नाही. मात्र तुम्ही जर नियमित व्यायाम करायला अथवा चालायला जात असाल तर तुमचे शरीर नक्कीच निरोगी राहिल. आता व्यायामशाळेतील अनुभव – किस्से किंवा सकाळी – सायंकाळी चालायला गेल्यानंतर इतरांशी होणारे संभाषण यातुन तुमच्या ब्लॉगसाठी चांगलाच खुराक मिळेल!

३२. काहीतरी बनवा!
काहीतरी बनवा म्हणतोय – कुणालातरी बनवा, असं नाही. शाळा – कॉलेज पर्यत असताना क्राप्टचा विषय असायचा. त्यातील काही कलाकुसरीवर नविन एखादा प्रयत्न करुन पहा. शिवाय “मी हे सुरु करतोय” असं सदर सुरु करुन त्यावर चालु घडामोडींबद्दल लिहित रहा. यामध्ये स्वत:च्या घराचे काम – ते तंत्रज्ञान या पर्यत अनेक विषय तुम्हाला निवडता येतील.

३३. शाळेला एकदा भेट देऊन या!
तुम्हाला तुमची शाळा – कॉलेज आठवतंय.. काहीतरीच काय? आठवतच असेल! तुमची शाळा किंवा दुसरी एखादी शाळा जवळ – शहरात असेल तर एक फेरफटका नक्की मारा. विद्यार्थी/ शिक्षक यांच्याशी गप्पा मारा.. अहो चिक्कार विषय मिळतील तुम्हाला लिहायला!

३४. एखादा ग्रुप जॉईन करा
आता ऑनलाईन ग्रुपचा तर ढीग पडलाय.. तरीही एखादा क्रियाशील असा ग्रुप निवडुन त्यात सहभागी व्हा. शिवाय आसपास असणारे – भाषिक, सामाजसेवा करणारी मंडळे यांनाही सहभागी होऊन तुम्हाला काहीतरी मदत करता येईल. त्यांच्या अडी – अडचणी. कार्यशिलता याबाबत त्यांना मदत करता करता तुम्हाला तुमच्या पोस्टसाठी कित्येक विषय मिळतील.

३५. शैक्षणिक संकेतस्थळांना भेट द्या
महाजालावरती अशी अनेक संकेतस्थळे मिळतील की जिथे तुम्हाला शिक्षण – पध्दती – नविन पदवी वगैरे असं बरंच काही शिकता येईल. टोटल ट्रेनिंग ही त्यापैकीच एक. तेथे सापडणार्‍या विषयांवर तुमची नविन पोस्ट लागलीच लिहिता येईल.

३६. स्वतःच्या जीवनातील गोष्टी पहा.
कालच मी माझ्या मुलीकडुन नविन कविता शिकलो. हो, लहानपणीच्या आपल्या बालकविता आणि आत्ताच्या कविता यांत फार फरक आहे. अगदी छोट्या गोष्टीही आपणांस बरंच शिकवुन जातात. शिवाय नोकरी करताना – लग्नानंतर – एखादा मित्र मिळाल्यानंतर तुमच्यांत झालेले बदल .. शिकलेल्या गोष्टी अशा अनेक विषयांवर तुम्ही लिहु शकाल.

३७. माईंड मॅपिंग
“माईंड मॅप” अर्थात तुमच्या कल्पनेला आकृतीच्या रुपात सादर करणे. यात तुमच्या मुख्य कल्पना केंद्रस्थळी ठेवुन त्याभोवती संबंधित विचार/ कल्पना/ विषय यांचा मांडणी करतात. अशा प्रकारे तुमच्या मध्यवर्ती कल्पनेबरोबरच तुम्हाला लिहायला अनेक उपविषयही मिळतील. माझ्या वाचनातील “माईंड मॅप” चा सर्वोत्तम वापर मी सोमेशच्या ब्लॉगवर पाहिला. तुम्हीही पहा.. कसे विषयाला – विषय मिळत गेलेत!

३८. नेहमी छोटी डायरी आणि पेन बाळगा.
तुम्हाला कोणता विचार विषय कोठेही सुचु शकतो. अगदी रस्ते – बस – बस स्टॉप वगैरे वगैरे. त्यासाठी एखादी छोटीशी डायरी आणि पेन सोबत ठेवा. विषय सुचल्यावर लागलीच तो विषय आणि त्यातील मुख्य मुद्दे यांचे नोंद करा. हे आपणांस आपल्या मोबाईलवरही करता येईल. वेळ मिळताच त्यावर सुंदर पोस्ट लिहा.

३९. सेमिनार – व्याखानाला हजर रहा.
शहरामध्ये – कंपनीमध्ये असणार्‍या व्याख्यानमाला वगैरेना हजर रहा. त्यातुन तुम्हाला त्या विषयांवरच्या चालु घडामोडी कळतील. शिवाय अशा व्याख्यानमाला – सेमिनार्स यावर तुम्हांला तुमचं मतही लिहिता येईल.

४०. आसपासच्या परीसराबद्दल बोला.
आसपास चालणार्‍या घडामोडी – हालचालींवर तर नक्कीच तुम्हाला लिहता येईल. अगदी घराच्या पाठीमागे चालु असलेल्या ईमारतीच्या बांधकामापासुन, त्यावर काम करणार्‍या रोजगार्‍यांपर्यत ते तुमच्या परीसरातील नविन बागेपर्यंत!

४१. स्वतःचे अनुभव लिहा.
स्वानुभव हा अगदी नविन ब्लॉग सुरु करण्यासारखा विषय आहे. गेल्या वर्षीच्या “स्टार माझा – ब्लॉग माझा” च्या विजेत्यापैकी श्री. देव हे आपल्या अनुभवावरतीच लिहितात. आता तुम्ही तुमच्या ब्लॉगवरही अशा काही पोस्टस् नक्कीच लिहु शकाल, नाही का?

४२. सिझनल लिखान – सण – वार
हा एक प्रमुख विषय होईल. म्हणजे, नविन वर्षापासुन नाताळापर्यंतच्या सर्व सण- सणावळीवर तुम्हाला एक-दोन पोस्टस् आरामात लिहिता येतील.

४३. केस स्टडी – मोस्ट कमेंटेड – विचारलेले प्रश्न!
तुमच्या ब्लॉगवरील आलेल्या प्रतिक्रिया – विषय – वाद विवाद यावरही चांगले लेखन होईल. श्री. महेंद्र कुलकर्णींच्या ब्लॉगवर याची उदाहरणे पाहता येतील.

४४. नियमित लिखानाचा रकाना – दैनंदिनी!
रोजच्या आढाव्यावर तुम्हाला ब्लॉगवर एक “दैनंदिनी” असा रकाना बनवता येईल व त्यामध्ये तुमचे रोजचे लेखन करता येईल.. कसं?

४५. तुमचे आवडते ब्लॉगर्स!
आवडते कवी – लेखक – अभिनेता… अगदी तसंच आवडते ब्लॉगर्सही असतातच ना! अशाच तुमच्या आवडत्या ब्लॉग आणि ब्लॉगर्स विषयी लिहा. कदाचित आठवड्यातुन एकदा तुम्ही “या आठवड्याचा ब्लॉगर मित्र” यांवर नक्कीच लिहु शकता. हो, अधिक माहितीसाठी तुम्ही आधी त्या आवडत्या ब्लॉगशी संपर्क साधा.. त्याला/ तिला एखादी प्रश्नावली पाठवुन अधिक माहिती घ्या.. अगदी मुलाखत घेतली तरी वावगे ठरु नये!

४६. फ़ोटो गॅलरी!
छायाचित्र – फोटो काढणे आणि काढुन घेणे हा माझ्या आवडत्या छंदापैकी एक. आता हा छंद काही माझा एकट्याचाच नाही. मला वाटतं प्रत्येका – दिसणारी सुंदर – चांगली गोष्ट टिपुन घेणे – ठेवणे आवडतेच. मग अशा ठेवणीतल्या आठवणींसाठी एखादा रकाना – पोस्ट लिहा. त्यात त्या फोटोबद्दलही माहिती लिहा.

४७. डिग्.कॉम
डिग्.कॉम वर तुम्हाला प्रशिध्द आणि वाचकांना आवडणार्‍या विषयांबद्दल माहिती मिळेल. त्यातुनच तुम्हाला तुमच्या तुमचा नविन “पॉप्युलर” विषयही मिळेल.

४८. आठवड्यातुन एकदा – गुगल ऱीडर्सचे टॉप पोस्ट पहा
गुगल रीडर्स मध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या व्लॉगचे वर्गणीदार व्हा. किमान आठवड्यातुन एकदा तुम्ही तुमच्या गुगल रीडरला भेट द्या आणि पहा की तुमचे आवडते ब्लॉगर्स काय लिहिताहेत.. कशावर बोलताहेत. यातुनच तुम्हाला तुमची “आठवड्याची पोस्ट” लिहायची प्रेरणा मिळेल.

४९. वादविवाद – वादंग करणारी पोस्ट!
आता आपल्याकडे अशा विषयाला काय कमी? असे विषय तुमच्या ब्लॉगला चांगलीच प्रसिध्दी देवु शकतात. मात्र अशा विषयावर लिहण्याआधी त्या विषयाचा पुर्ण विचार – अभ्यास करा. मन आणि डोकं शांत ठेवुन विचारपुर्वक लिहा. कुणाच्या भावना दुखावतील असं लिहु नका. येणार्‍या प्रतिक्रियांनाही शांतपणेच उत्तरे द्या!

५०. सुधार – सुधारणा यांवर लिहा.
सुधारणा आणि बदल काही एका दिवसांत होत नाहीत. तुमच्यातील काही बदल कसे झाले किंवा काही सामाजिक बदलांसाठी काय करता येईल.. किंवा समोरचा रस्ता / उड्डाणपुल कसा ‘अर्थ’पुर्ण / निरर्थक ठरला इ. विषयांवर तुम्ही तुमचे प्रामाणिक मत मांडु शकता ना?

मला माहित आहे.. ही पुर्ण पोस्ट वाचणे जरा वेळ खर्ची करण्यासारखं आहे. म्हणुनच क्रमशः देतोय. म्हणजे पहिले पन्नास मार्ग या लेखामध्ये व राहिलेले ५१ पुढच्या भागात. शिवाय पुढच्या भागात त्याची साधी पी.डी.एफ. बनवली आहे. तीही देतो… डाऊनलोड करा आणि आरामात वाचा.

क्रमशः

संबंधित लेखन

PG

दिपक शिंदे

नमस्कार! आजपर्यंत “भुंगा – द सोशल इन्सेक्ट” या नावाने लिखान करत आलो. मराठी मंडळीवरही तंत्रज्ञानविषयी लिहीत राहीन. आपण मला ट्विटर वरही भेटु शकता.

 1. आणखी एक विषय सुचला : ब्लॉग न लिहिण्याची सराईत कारणं !

 2. अहो ! दिपक महोदय, मला रोज असे अनेक विषय मिळतात, पण त्यावर लिहायला वेळच मिळत नाही.माझ्याच दिनिकेवर ( ब्लॉग=दिनिका-हा माझा शब्द बरंका?) पहाना ? तुम्हाला विविध विषयावर मी लिहितोय हे दिसून येईल.पण तुमचा हा लेख छान झालाय बरंका?

 3. सलाम आहे भाऊ तुला!!! मस्त लेख! भाग २ पण लवकर द्या.

 4. राजेंद्र सरंबळकर म्हणतात:

  जबरदस्त…….
  दरवेळी कोणत्या विषयांवर लिहायचे? ब्लॉगिंग सुरु केल्यानंतर ब्लॉगच्या आयडिया किंवा विषय संपल्यासारखे वाटु लागतात आणि याच कारणामुळे लिहण्यासाठी टाळाटाळ होते हे आपल्या ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे १०१ मार्गा इतकच १०१ ट्क्के खरे आहे. असो. माझही असंच होतंय परंतु आपल्या या लेखाने मला मार्ग नक्कीच मिळाला. धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद!

 5. मस्त आहे लेख! त्यावरच्या कोपरखळ्याही आवडल्या. सोपे, सहज उपाय! 🙂

 6. मस्त माहिती दिली आहेस रे
  हे वाचल्यानंतर एक पोस्ट तरी नक्कीच येऊ शकते ब्लॉगवर 😉

 7. राजेंद्र सरंबळकर म्हणतात:

  दिपक शिंदे स.न.वि.वि.
  ब्लॉगपोस्ट लिहिण्याचे १०१ मार्ग: भाग १ या लेखाचा भाग २ लवकरच लिहिताय असे १२ मार्च २०१० रोजी कळविलेत पण अध्याप पर्यंत लेख आलेला नाही लवकर पाठवा वाट पाहातोय.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME