वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

मराठी भाषा – ओळख आणि इतिहास

४ प्रतिक्रिया
मराठी भाषा

मराठी भाषा

इतिहास:
“महाराष्ट्री प्राकृत” या “संस्कृत” पासून उगम पावलेल्या भाषेचा कालांतराने इतर भाषांसोबत मिलाप होऊन “मराठी” या भाषेचा विकास झाला. इसवी सन ८७५ च्या आधी पर्यंत आताच्या भारतीय खंडानुसार संपूर्ण दाक्षिणात्य प्रदेशावर सतवहन या योध्याचे शासन होते. गोदावरी नदीजवळील त्यावेळच्या “कोटिलंगला” या करीमनगर जवळील ठिकाणी त्याची राजधानी होती. या राजाच्या शासनकाळात “महाराष्ट्री प्राकृत” हीच त्याच्या राज्याची अधिकृत बोली-भाषा होती. उत्तरेकडील माळवे आणि राजपूत ते दक्षिणेकडील कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्यांच्या खोर्‍यांमध्ये वास्तव्य करणार्‍या लोकांकडून त्यावेळी “महाराष्ट्री प्राकृत” या भाषेचा वापर केला जात असे. आजच्या मराठी आणि कानडी भाषा या कित्येक काळापर्यंत “महाराष्ट्री प्राकृत” भाषेचा भाग म्हणून ज्ञात होत्या. त्यानंतर जैन धर्मियांकडून बोलल्या जाणार्‍या “महाराष्ट्री अपभ्रंश” या भाषेचा काही शतके वापर होत राहिला. येथेच मराठीच्या व्युत्पत्तीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. बहुतेक ऐतिहासिक संशोधनांतून हे स्पष्ट झाले आहे की, मराठी ही ८व्या शतकापासून बहुतेक लोकांकडून बोलली जात असावी.

थोडक्यात:

 • उच्चार: मराठी [məˈɾaʈʰi]
 • मराठी ही संयुक्त महाराष्ट्र राज्याची अधिकृत राज्यभाषा आहे.
 • जगभरातील सुमारे ९०० कोटी लोक मराठी बोलतात.
 • मराठी भारतवर्षाच्या साता-समुद्रापार आजही एक महान भाषा म्हणून संबोधली जाते.
 • भारत देशातील सर्वात जास्त बोलल्या जाणार्‍या भाषांपैकी मराठी चौथ्या स्थानावर आहे, आणि जगात तीचे स्थान १५व्या क्रमांकावर आहे.
 • सुमारे १३०० वर्षांपूर्वी किंवा त्याआधी “संस्कृत” आणि “पाली” या आर्य आणि बौद्ध बोली भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला. त्यावेळी “मराठी” मधील बहुतेक शब्द हे संस्कृत आणि पाली या मुख्य भाषांमधून अपभ्रंश होऊन आले असावेत.
 • मराठी भाषा लिहिण्यासाठी मुख्यत्वे “देवनागरी” लिपी आणि “मोडी” लिपी वापरली जाते.

दक्षिण कर्नाटकमधील श्रवणबेलगोळा गोमटेश्वर (बांधणी: सन ९८३) येथील एका दगडाच्या पायथ्याशी “श्रीचावुण्डराजे करवियले, श्रीगंगराजे सुत्ताले करवियले” अशी वाक्यरचना आहे, ज्याचा मराठीत असा अर्थ होतो की, “गंगाराजे यांचे पुत्र चावुंडराजे यांनी बांधले.” यावरून असे सिद्ध होते की, मराठी ही ८ व्या शतकापासून प्रचलित होती. तसेच ८ व्या शतकातील प्रचलित जैन धर्मियांच्या “कुवालयमाला”मध्ये एका ठिकाणी बाजाराचे वर्णन करीत असतांना मराठ्यांमधील संभाषणांमध्ये “दिहले (दिले)”, “गहिले (घेतले)” हे शब्द आढळतात. पंचतंत्राचा मराठीमधील मुळ अनुवाद हा देखील याच काळातील असावा, असा कयास व्यक्त केला जातो.

१० व्या शतकाच्या नंतर देवगिरी राजधानी असलेल्या यादव शासकांनी मराठीचा उद्धार करण्यात खुप मोठे योगदान दिले. यादवांच्या शासनकालातील नलोपाख्यान, रूख्मिनी-स्वयंवर, श्रीपतीची “ज्योतिष रत्नमाला” यामध्ये मराठीचा मुख्यत्वे उपयोग केला गेला.

मराठी साहित्यातील सर्वांत जुने काव्य “विवेकसिंधू” हे नाथ पंथातील योगी असलेल्या मुकुंदराज यांनी लिहिले आहे.

यादवांच्या काळात तयार झालेल्या महानुभव आणि वारकरी या दोन्ही पंथांनी मराठीचा विस्तार करण्यास मोलाची कामगिरी पार पाडली, आजही त्यांचे ते कार्य अविरत चालू आहे.

महानुभव पंथातील चक्रधर स्वामींशी संबंधित “लीळाचरित्र (सन १२३८)” हे मराठीतील आद्य-साहित्याचे एक महत्वाचे उदाहरण आहे.

त्यानंतर संत ज्ञानेश्वर (सन १२७५ ते सन १२९६) यांनी सन १२९० मध्ये लिहिलेले भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) आणि अमृतानुभव ही काव्ये जगतविख्यात आहेत. यांद्वारे मराठीला सुगीचे दिवस प्राप्त झाले. संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळी फक्त संस्कृत मध्ये उपलब्ध असलेल्या “भगवत गीता” ला मराठीमध्ये अनुवादित केले, तसेच भावपूर्ण अभंग लिहिले.

महानुभव पंथाचा विस्तार करीत वारकरी पंथातील संतकवी एकनाथ (सन १५२८ ते सन १५९९) यांनी “भावार्थ रामायण” (मुख्यत्वे मराठीमधून) याद्वारे समाजपयोगी संदेश दिले. संत तुकाराम (सन १६०८ ते सन १६४९) यांनी वारकरी पंथाची धुरा सांभाळून मराठीमध्ये सुमारे ३००० अभंग लिहिले.

छत्रपती शिवाजी महाराज (सन १६२७ ते सन १६८०) यांनी मराठीला देशाच्या काना-कोपर्‍यात विस्तार करण्यास तसे़च मराठीमध्ये साहित्य-विकास होण्यास वाव दिला.

१८ व्या शतकातील वामन पंडित (यथार्थदीपिका), रघुनाथ पंडित (नल-दमयंति स्वयंवर), श्रीधर पंडित (पांडव प्रताप, हरीविजय, रामविजय) आणि मोरोपंत (महाभारत) या मंडळींनी मराठी साहित्यात अनमोल भर घातली. पेशव्यांनीही त्यांच्या शासनकाळात मराठीच्या विकासाकडे अधिक लक्ष पुरविले.

इंग्रज शासनकाळात मराठीच्या विकासाची घोड-दौड सुरूच राहिली. सन १ मे, १९६० या दिवशी विदर्भ आणि मराठवाडा हे प्रांत मिळून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, आणि त्यानंतर मराठीला संयुक्त महाराष्ट्राची अधिकृत मातृभाषा म्हणून दर्जा मिळाला. त्यानंतर, मराठी भाषेतील साहित्यावर चर्चा करण्यासाठी आणि विकास होण्यासाठी, दरवर्षी, नित्यनियमाने “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” भरवले जाऊ लागले. यासोबतच, “अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन”ही भरवले जाऊ लागले. दोन्ही संमेलने आजही अविरतपणे दरवर्षी भरवली जातात.

मराठीच्या प्रांतिय-बोली भाषा:
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, द्वारे वेळोवेळी मानक मराठी विकसित करण्यासाठी मदत केली जाते. महाराष्ट्रामध्ये शुद्ध मराठी बोलणारा प्रांत म्हणून “पुणे” प्रांताची ओळख आहे. याव्यतिरिक्त इतर प्रांतांमध्ये मराठीच पण काही ऐतिहासिक प्रसंगांमुळे जरा वेगळेपण निर्माण झालेल्या मराठीच्या बोली भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. त्यांपैकी अहिरानी (जळगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, परोळा, अमळनेर तालुके या भागांमध्ये मुख्यत्वे, मोडी लिपीचा लिहिण्यासाठी वापर केला जातो.) , खान्देशी (जळगाव जिल्हा, तसेच धुळे जिल्हा. अहिरानीशी साम्य.), वर्‍हाडी (विदर्भ), सामवेदी (मुंबईतील नाला सोपारा, विरार ते वसई तालुका, ठाणे. पोर्तुगिजी भाषेचा प्रभाव.), कोंकणी (कोकणातील काही भाग. हिच्याही काही बोली भाषा आहेत, त्यापैकी कोळी, कुणबी, आगरी, धनगरी, ठाकरी, संगमेश्वरी, माओली या मुख्य आहेत. गौण कोंकणी ही एक विशिष्ट भाषा आहे. ती मराठीची बोली भाषा नाही.), वडवाळी (नायगाव, वसई ते डहाणू पर्यंतच्या भागातील सोमवंशी क्षत्रियांची भाषा म्हणून ओळख.), अरे मराठी (आंध्रप्रदेशातील काही प्रदेश), ठाकरी (रायगड जिल्ह्यातील आदिवासी लोकांकडून बोलली जाणारी एक मुख्य बोली भाषा), डांगी (महाराष्ट्र-गुजराथ सीमेवरील लोकांची बोली भाषा), दख्खिनी (हैदराबादी उर्दूचा आणि तेलुगु भाषेचा प्रभाव असलेली भाषा) या काही मुख्य बोली भाषा आहेत.

काही मराठी संघटना:

 • राज्य मराठी विकास संस्था
 • अखिल भारतिय मराठी साहित्य महामंडळ
 • मुंबई मराठी साहित्य संघ
 • मराठी विश्वकोश (encyclopedia) उपक्रम
 • विदर्भ साहित्य संघ, नागपूर
 • मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
 • गोमंतक मराठी ऍकॅडमी
 • मध्यप्रदेश साहित्य परिषद, जबलपूर
 • आंध्रप्रदेश साहित्य परिषद, हैदराबाद
 • मराठी साहित्य परिषद, कर्नाटक

लिप्या (scripts):
मराठी देवनागरी (बाळबोध) लिपी:
१६ स्वर आणि ३६ व्यंजने असे एकूण ५२ अक्षरे असलेली ही लिपी आहे. डावीकडून उजवीकडे लिहीली जाते. इतर देवनागरी भाषांव्यतिरिक्त (उदा. हिंदी आणि इतर) मराठी लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा जरा वेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. आज बहुतांशी प्रत्येक ठिकाणी या लिपीचा वापर होतो. (देवनागरी लिपीसंदर्भात एक विशेष लेख “मराठी मंडळी” वर उपलब्ध आहे: देवनागरी लिपी – ओळख आणि इतिहास )

मोडी लिपी: घसरती लिपी म्हणून ओळख. मराठा शासकांच्या शासनकालातील बहुतेक दस्तऐवज हे मोडी लिपी मध्ये आढळले आहेत. लिहिण्यास अवघड असल्याने ही लिपी दुर्मिळ होत चालली आहे. (मोडी लिपीसंबंधित अतिशय महत्वपूर्ण माहिती भानस ताईंनी येथे लिहीली आहे, त्यावर एकवेळ अवश्य नजर फिरवावी.)

आढावा
मराठी ही स्वतंत्र भारत देशातील, संयुक्त महाराष्ट्रातील बहुतेक लोकांकडून बोलली जाणारी (प्रथम दर्जाची) भाषा आहे. महाराष्ट्राशिवाय, भारतातील अनेक राज्यांमध्ये मराठी बोलणार्‍यांची संख्या विस्तिर्ण आहे. मुख्यत्वे गुजराथ, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, कर्नाटक, दमण-दीव, दादरा नगर हवेली या राज्यांमध्ये मराठी भाषिक वास्तव्य करून आहेत. हैदराबाद, बेळगांव, बडोदा, सुरत, इंदूर, ग्वालियर (मध्यप्रदेश) या मुख्य शहरांमध्ये मराठी भाषिकांचा खुप मोठा आणि स्वतंत्र असा एक वेगळा समुदाय आहे, हे भाषिक तेथील अधिकृत भाषांसह मराठीचाही प्रसार करीत आहेत.

याशिवाय मराठी भाषिक संपूर्ण जगभरात आहेत. मुळचे मराठी, परंतु कित्येक कालांतरापासून परकिय देशांमध्ये वास्तव्य करून असणारे अनेक लोक आहेत. त्यांचे वास्तव्य अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये अधिक आहे. तसेच, युरोपिय राष्ट्रे (इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, ऑस्टिया, ग्रीस), अरब राष्ट्रे (सिंगापूर), मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलॅंड या राष्ट्रांमध्येही मराठी भाषिकांची व्याप्ती अधिक आहे.

भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक आहे. भारतीय संविधानात तशी तरतूद आहे. संयुक्त महाराष्ट्र राज्य, गोवा, आणि दमण व दीव तसेच दादरा नगर हवेली या संघ राज्यांनी मराठीचा सर्व शासकिय कामांसाठी तसेच सांस्कृतिक भाषा म्हणून स्विकार केला आहे. महाराष्ट्रातील अधिकृत विद्यापीठांव्यतिरिक्त गोवा विद्यापीठ (पणजी), उस्मानिया विद्यापीठ (आंध्रप्रदेश), महाराज सयाजीराव विद्यापीठ (बडोदा), गुलबर्गा विद्यापीठ (कर्नाटक), देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली) या महाराष्ट्राबाहेरील अधिकृत विद्यापीठांमध्ये मराठी भाषेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम आणि विभाग बनवले गेले आहेत.

संबंधित लेखन

 • देवनागरी लिपी – ओळख आणि इतिहास
  आपण आपल्या मातृभाषेतील व्यवहार, विचारांची देवाण-घेवाण इत्यादी कामे, ज्याप्रकारे बोलून करतो, तसाच …
 • देवा तुझी सोन्याची जेजुरी
  शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे…
 • प्रेममयी
  मैत्रीण आलेली. गेल्या वेळच्या मुक्कामात ही पठ्ठी स्वत:च भटकंती ला गेल्याने गाठभेट होऊ शकली नव्हती…
 • (नव)रस
  ‘रस’ याचा शब्दशः अर्थ ‘चव’ किंवा ‘रूची’ असा आहे. व्यावहारिक जीवनात एकूण ज्ञात सहा रस आहेत: गोड, क…
 • ११८ वर्षांची गणेशोत्सव परंपरा………….
  दगडूशेठ च्या शतकातील तीनही मूर्तींचे आजही विधिवत पूजन
   
  श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केले…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. …त्यांपैकी अहिरानी (जळगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, परोळा, अमळनेर तालुके या भागांमध्ये मुख्यत्वे, मोडी लिपीचा लिहिण्यासाठी वापर केला जातो.) …

  आजही येथे मोडी लिपीचा वापर केला जात आहे काय? कारण मला इ.७ वीपर्यंत मोडी होती.मोडी कित्ते वाचण्यासाठी आणि सरावासाठी असत.पण आता मला सराव राहिला नाही पण माझ्या हस्ताक्षरात काही अक्षरे मोडी वळणाची आहेत.
  माझी कविता आपल्याला आवडली हे वाचून बरे वाटले. आपण लिहिलेलं आपल्यासारख्या अभ्यासूना आवडते ह्याचा खुप आनंद होतो
  धन्यवाद!

 2. गेली काही महिने पुणे गाजते आहे ते ८३ व्या साहित्य संमेलनामुळे. दोनच दिवस झाले तो धुरळा खाली बसू लागला आहे. प्रत्यक्ष ते पार पडल्यानंतर आता वादावरचे पडदे दूर होत होऊन नेमके यातून काय साधले याची चर्चा होऊ लागली आहे. अजून खर्चाचा आकडा बाहेर यायचाय. पण दोन कोटींचा आकडा पार झाला असावा असा अंदाज आहे. साहित्यप्रेमी आले . वादात उभें राहिलेलें पुस्तकांचे दालनात लाखोंची उलाढाल झाली.
  डॉक्टर श्री .सतीश देसाईंचे नाव गाजले. अचानक विंदांचे निधनाने हळवा झालेला रसिक गर्दी करून गेला. त्यांच्या जागी ना धो महानोरांची नियुक्ती झाली.
  विंदांच्या एका हाताने त्यांनी या साहित्य सोहळ्याचे दीप प्रज्वलित झाले. अजित पवारांची हजेरी लागली. द भिंचे भाषण झाले. दरबारात उत्साह आला. त्याच त्या परिसंवादाने मंडप डोलू लागले .
  काव्य कट्टा ओसंडून वाहत काव्याची तिरंदाजी भिरभिरत होती.परदेशांत तयार होणाऱ्या साहित्यावरच्या चर्चेला रंग भरत गेला.
  समारोपाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे बरोबर अमिताभ बच्चन यांची हजेरी लागणार की नाही याचीही चर्चा प्रसारमाध्यमांनी रंगवत ठेवली .अभिव्यक्तीच्या मुद्यावर बोलायाला एक दिवस आधीच मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंडपात हजर झाले. कॉंग्रेसच्या दालनात गडबड पाहून मुख्यमंत्री वादात न अडकता विंदांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करून ते परत फिरले .
  समारोप समारंभाला पद्मभूषण डॉक्टर सत्यव्रत शास्त्री यांना हजर करून संस्कृत साहित्याचीही थोरवी गायली गेली . अमिताभ बच्चन यांच्या तोंडून हरीवंशराय बच्चन यांच्या हिंदी साहित्याची उदाहरणे ऐकता आली. महानायकाला पाहण्यासाठी आणि त्यांचा आवाज कानात साठवुन ठेवण्यासाठी साहित्यिक रसिक प्रचंड संख्येने जमला होता .
  द भि कुलकर्णी यांनी हा समारोप नसून ही तर सुरवात असल्याचे सुतोवाच करून या मराठीतल्या या महाकुंभात सामील झालेल्या सर्वांचे आभार मानले .
  झाले साहित्याचा महाकुंभ तर संपला . यातून मराठी भाषेला काय मिळाले ?
  यातुन कुणाचा फायदा झाला ? इंग्रजीचे वर्चस्व असलेल्या मराठी मनावर याचा किती असर झालाय ?
  यातून मराठी माणसे जोडली गेली . पण मराठी मन जागृत झाले का ?
  रोजचे जगणे जिथे कठीण होत आहे त्याला हा साहित्य सोहळा कसा रुचेल ?
  मराठी वाढली पाहिजे . तिचे संगोपन झाले पाहिजे . विविध भाषेतील चांगले साहित्य मराठीत आले पाहिजे. त्यासाठी मराठी विद्यापीठ होणे हाच उपाय आहे काय?
  सारेच प्रकरण गंभीर आहे. याची उपाययोजनाही तेवढ्या गांभीर्याने करण्यात येते काय ?
  खरेच सोहळा पार पडला मात्र यातून काय साधले गेले ?
  तुमचे मत मोकळेपणाने लिहाल काय …………

  सुभाष इनामदार , पुणे
  subhashinamdar@gmail.com

  • सुभाष जी,

   अतिशय उत्स्फुर्त असा भाव आपल्या प्रतिसादातून व्यक्त होतो.

   माझेही विचार आपल्याप्रमाणेच आहेत. साहित्य संमेलनाचा इतिहासच असा राहिलाय, त्यामुळे या वर्षी गेल्या वर्षांप्रमाणे वाद-गोंधळ होणार नाहीत, असा विचारही कोण्या मराठी साहित्य प्रेमीच्या मनात आला नसेल. मावळत्या संमेलन अध्यक्षांच्या हस्ते (यावेळी ते पुर्वाध्यक्ष श्रीयुत आनंद यादव होते) नविन अध्यक्ष होणार्‍या उमेदवाराला सर्व कारभाराची सुत्रे सुपूर्द करण्यात येतात, पण यावेळी हा इतिहास मोडीत काढून श्रीयुत द.भिंना सुत्रे देण्यात आली. विंदांच्या निधनाने तर मराठी साहित्याचे पितृछत्रच हरवल्यासारखी परिस्थिती ओढवली, तीसुद्धा ऐन साहित्य संमेलनाला काही दिवस शिल्लक असतांना… असो. यावेळचे साहित्य संमेलन गाजले ते चव्हाण-बच्चन यांच्यातील उडालेल्या गोंधळामुळे! या अगोदर मराठी साहित्य संमेलनाला काहीही भाव न देणार्‍या राष्ट्रीय वृत्तपत्रांचे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकार या कार्यक्रमावर टक लावून होते. तुमच्याच प्रतिक्रियेचा संदर्भ घेऊन या कार्यक्रमात सुमारे २ कोटींची उधळण झाली असेल, किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते! गरज नसतांनाही एवढा पैसा उडवणे हे खरेच लाजिरवाणे आहे. पुस्तकांचे अनावरण व मराठी साहित्याकडे लोकांचा प्रवाह कसा वाढावा या चर्चा ठिक आहे, पण “जागतिक मराठी विद्यापीठ असावे” ही बाब मला तरी आवडली! जर हा प्रयोग यशस्वीरित्या चालवला गेला तर नक्कीच बरेच होतकरू साहित्यिक मराठी भाषेला लाभतील व अनेक गुणांनी व संपन्न असे लेखन मराठीत भर पडण्यास मदत होईल. हम्म, हे तेव्हाच होईल, जेव्हा शासकीय अधिकारी (मंत्री, संत्री) यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून निःस्वार्थ कामे करतील. तसे हे अशक्यच आहे. असो.

   हा सोहळा पार पडला, अनेक वाद-विवाद रंगले, पण मराठी रसिक यामुळे फार काही सुखावले नाहीत! जे घडायला हवे होते (ज्यामुळे मराठीची पाळेमुळे मजबूत होण्यास मदत होईल) ते घडलेच नाही! असो.. आपण आपले निःस्वार्थ प्रयत्न चालू ठेवायचे, ज्यायोगे कधीतरी कोण्या गरजू व्यक्तीला मदत होऊ शकेल किंवा त्याला मराठीविषयी लळा निर्माण होण्यास तरी मदत होईल!

   आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!

   आपल्याला हा “मराठी मंडळी” उपक्रम कसा वाटला? यात काही बदल आपण सुचवू शकाल का? शिवाय तुम्हाला अजुन कोणत्या क्षेत्राशी किंवा विषयांशी संबंधित लिखान येथे वाचायला आवडेल, तेही कळवा!

   धन्यवाद!

दखल घेणारे बाह्यदुवे (ट्रॅकबॅक्स/पिंगबॅक्स)

 1. मराठी भाषा | Marathi Search Results - [...] [...]

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME