वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

मराठी भाषा व्यवहारात ब्लॉगचे महत्व…साहित्याचे नवे माध्यम

३ प्रतिक्रिया

ब्लॉग म्हणजे काय?– ब्लॉग म्हणजे काहीतरी फॅशन, मिरवायची गोष्ट नाही. ज्याप्रमाणे कधीकाळी उगाचच उघडलं जाणारं ई-मेल अकाऊंट आज गरज बनलंय, तसंच ब्लॉगचंही आहे. संपर्कासाठी ई-मेल आणि अभिव्यक्तीसाठी ब्लॉग किंवा वेबसाईट हे भविष्य आहे. हे ब्लॉग माध्यम सध्या आपला दहावा वाढदिवस जगभर साजरा करतंय. ब्लॉग म्हणजे वेबसाईटच. ज्याप्रमाणे www.google.com, www.sadhanatrust.com ही वेबसाईटची लिंक आहे, त्याचप्रमाणे www.marathimati.blogspot.com अशी ब्लॉगची लिंक असते. पण, ब्लॉग जरी वेबसाईट स्वरूपाचा असला, तरी वेबसाईट ही ब्लॉग असतेच असे नाही. उलट, ब्लॉग हा वेबसाईटमधला एक घटक असू शकतो. तुम्ही तुमचा ब्लॉग विनामूल्य तयार करू शकता. Blogger, WordPress, Typepad, Tripad आणि Squarespace अशा अनेक वेबसाईट तुम्हाला ब्लॉग देऊ करतात. पैकी Blogger आणि WordPress या दोन सईट्स विनामोबदला तुम्हाला आपला ब्लॉग बनवण्याची सुविधा देतात.

ब्लॉगचे महत्व– आज जगभरात जी बहुमाध्यमं आहेत (Mass Media) ती जरी लोकांसाठी असली आणि लोकांबाबत असली तरी त्यात लोकांना थेट सहभाग कमी प्रमाणात मिळतो. अगदी तुम्ही पुस्तक लिहिलं, जाहिरात दिली, भाषण केलं तरी तुम्ही काही वेळेपुरता, काही लोकांपर्यंतच पोहोचू शकता. पण ब्लॉगचं तसं नाहीए. ब्लॉग कुणीही, कुठेही, कधीही प्रसिद्ध करू शकतो आणि तो कुणीही, कधीही, कुठेही वाचू शकतो. तुम्ही जर ब्लॉगवर व्हिडिओ, ऑडिओ क्लिप, फोटो टाकले तर या वाक्यात पाहू आणि ऐकू हे शब्द सुद्धा समाविष्ट होतील. सध्या जगभरात १.३ कोटी ब्लॉग्ज असल्याचा अंदाज आहे (संदर्भ: technorati.com). भारतात सुमारे दहा लाखांपेक्षा अधित ब्लॉगर्स असून, यात तरूणांची संख्या (१५ ते ४५ वर्ष) ६० टक्क्यांहून अधिक आहे. (संदर्भ: MSN LIVE सर्व्हे).

मराठी आणि ब्लॉग– मराठीची गळचेपी, मराठी भाषेची दुरवस्था हा महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून चर्चेत असणारा विषय आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, साहित्य निर्मिती आणि प्रसारासाठी भाषा संवर्धन महामंडळ, साहित्य परिषद, विश्वकोष मंडळ असे अनेक उपक्रम सुरू आहेत. आज अर्धा डझन मनोरंजन आणि तितक्याच वृत्तवाहिन्याही मराठीत आहेत. अनेक साप्ताहिकं, मासिकं, दैनिकं, दिवाळी वार्षिकं यांची रेलचेल आहे. पण त्यांच्या वाढीला, आवाक्याला मर्यादा आहेत. कुठल्याही भाषेचे संवर्धन हे त्या भाषेचा लिहिण्यात, बोलण्यात, वाचण्यात, ऐकण्यात अशा सर्व बाजूंनी, सर्व विषयात आणि महत्वाचे म्हणजे सर्वांकडून वापर होण्यावर अवलंबून असते. आणि हेच काम ब्लॉग करू शकतो. एखादा मराठी ब्लॉग ज्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील कुणी तयार करू शकतो, तसाच तो वॉशिंग्टनमध्येही एखादा मराठमोळा, महाराष्ट्रावर प्रेम करणारा करू शकतो. जरा विचार करा…धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी नागपूरमधल्या दीक्षा भूमीवरचा अनुभव ते अगदी कोपनहेगनमधल्या वातावरणविषयक परिषदेचा वृत्तान्त, शेअरबाजाराची मराठीत माहिती, औरंगाबाद जवळच्या अजिंठा लेण्यांविषयी सचित्र लेखन, खवैय्येगिरीची ठिकाणं, विविध भाषांमधील लेखांचा अनुवाद, आपलेच स्वैर अनुभव, फोटो, कार्यक्रमाचं शूटींग असं सगळं तुम्हाला लिहिता-अनुभवता येतं. आपल्याच भाषेत! कुठेही आणि कधीही!

मराठी ब्लॉगोस्फिअरची स्थिती– जसं Atmosphere तसंच Blogosphere! चांगली गोष्ट ही आहे, की मराठी ब्लॉगर्समध्ये तरूणांची संख्या मोठी आहे. पण, प्रॉब्लेम आहे तो सकस विषयांवरच्या लेखनाचा (लेखन, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ) दुष्काळ, ब्लॉग लिहिण्यातली अनियमितता. या शिवाय मराठीत लिहण्याच्या अडचणी, इंटरनेटची सुविधा दर्जेदार नसणं (विशेषत: ग्रामीण भागात) या काही अस्सल अडचणीही आहेतच. चालू घडामोडी, पर्यटन, ज्योतिष, शास्त्र, संगीत, कला, तंत्रज्ञान यांना वाहिलेले उत्तम ब्लॉगही खूप आहेत. एक जाणवलं. ग्रामीण असो की शहरी लेखनाची शैली, त्यातली ओढ उत्तम आणि अस्सल आहे. गरज आहे ती या मराठी ब्लॉग विश्वाची दखल घेण्याची.

ब्लॉगिंगचे फायदे– तुम्ही ब्लॉगिंग मराठीत करा किंवा अन्य कुठल्याही भाषेत, तुम्हाला स्वत:ला ओळख मिळाल्याचा आनंद गवसेल. तुमच्या लेखनाला जेंव्हा कुणी दाद देतं तो आनंदच न्यारा. ज्या विषयावर तुम्ही लिहित जाता, तस तसा तुमचा फोकस स्पष्ट होत जातो. तुमचे भाषेवरील प्रभुत्व वाढते. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी ब्लॉगवर लेखन केल्यास, ते ज्ञान सर्वांना उपलब्ध होऊ शकते. विशिष्ट विषयावरील ब्लॉगर्स एकत्र येऊन चळवळ उभारू शकतात. आज ब्लॉगच्या माध्यमातून दर्जेदार ई-नियतकालिकं विनाखर्च तयार होऊ शकतील. लोकचळवळींनाही ब्लॉग हे सशक्त माध्यम म्हणून उपलब्ध आहे. हे सर्व मराठीत झाल्यास आपली मराठी भाषा समृद्ध होईल हे नक्की.

यासाठीच ‘मराठी मंडळी’….बृहन्मराठी ब्लॉगर्सचे व्यासपीठ-
आज घडीला महाराष्ट्रासह जगात 20 हजार मराठी ब्लॉग्ज आहेत. यातील सुमारे 10 हजार कार्यरत ब्लॉग्ज आहेत. www.marathiblogs.net या वेबसाईटवर सुमारे 1200 मराठी ब्लॉग्ज आपल्याला पाहायला मिळू शकतात. आतापर्यंत मराठी ब्लॉगर्स अपवादात्मक गट वगळता आपापलं ब्लॉगिंग करत होते. पण, मराठी टायपिंगविषयक समस्या, मराठी ब्लॉगिंग वाढावं ही तळमळ, विचारांच्या आदान-प्रदानासाठी एकत्र येण्याची गरज यातून आम्ही काही ब्लॉगर्सनी पुढाकार घेऊन ‘मराठी मंडळी’ हे मराठी ब्लॉगर्सचे व्यासपीठ निर्माण केलंय.

आमचे भविष्यातील उपक्रम-

 • मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणणे, संवाद साधणे
 • मराठीतून ब्लॉगिंगविषयक असणा-या समस्यांचे निराकरण
 • नव्या ब्लॉगर्ससाठी प्रशिक्षण, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजिणे.
 • मराठी ब्लॉगिंग प्रतिभेला दाद देणारे उपक्रम राबवणे
 • मराठी भाषा, साहित्य, माध्यम व्यवहारातील संस्था, व्यक्ती यांना जोडणे

– प्रसन्न जोशी

संबंधित लेखन

 • काही लिनक्स कमांड्स – भाग २
  मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामु…
 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • टेक मराठी सभा -२
  टेक मराठीच्या पहिल्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! या महिन्यात दुसरी सभा आयोजीत करण्…
 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
PG

अनिकेत

संगणक अभियंता, सॉफ्टवेएर मधील किडे (Bugs) पकडण्याचे काम (Testing) करतो.

मनमिळावु, Happy-Go-Lucky, थोडास्सा उर्मट/आगाऊ, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पठडीत मोडणारा. छोट्या छोट्या गोष्टींनी मन खट्टु करुन घेणारा आणी तितक्याच छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा मी डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा ह्या नावाने ब्लॉग चालवतो.

 1. सुभाष गोरे म्हणतात:

  ब्लोग व्यवथित किबोर्द वर कसा ताइप करायअचा मला कोनि सान्गेल का?

 2. प्रसन्न जोशी

  नव्या ब्लॉगर्ससाठी प्रशिक्षण, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजिणे. या उपक्रमाची अनेकांना
  गरज आहे.
  * मराठी ब्लॉगर्सना एकत्र आणणे, संवाद साधणे
  * मराठीतून ब्लॉगिंगविषयक असणा-या समस्यांचे निराकरण
  * नव्या ब्लॉगर्ससाठी प्रशिक्षण, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजिणे.
  * मराठी ब्लॉगिंग प्रतिभेला दाद देणारे उपक्रम राबवणे
  * मराठी भाषा, साहित्य, माध्यम व्यवहारातील संस्था, व्यक्ती यांना जोडणे
  आपल्या या उपक्रमांस लाख लाख शुभेच्छा !

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME