वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

मराठी रंगभूमीवरचा राजहंस हरपला

१ प्रतिक्रिया

मराठी रंगभूमीवर स्वतःचे युग निर्माण करणारे, एका नाट्यसंस्थेचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोरणारे, “कट्यार” सारख्या संगीत नाटकाने मानदंड निर्माण करणारे, आपल्या भूमिकेने राजहंसी रूप धारण करणारे, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर ऊर्फ पंत यांचे निधन झाले…

आणि रंगभूमीवरचा राजहंसच हरपल्याची जाणीव झाली.

प्रभाकर_पणशीकर_तो_मी_नव्हेच“तो मी नव्हेच” मधल्या पंचरंगी, बहुढंगी भूमिकांतून स्वतःचे नट म्हणून असलेले अस्तित्व हे तर पणशीकरांच्या अभिनयातला मोरपंखी तुराच जणू…

अभिनय करताना ते भूमिका जगले. व्यक्तिरेखेतल्या बारकाव्यांनी नाटकाला अजरामर केले. काळ बदलला, नटांमध्ये बदल झाले, तरीही पंतांचा तो लखोबा लोखंडेची किमयाच वेगळी! खरेच ती सर कुणालाच आली नाही.

नाट्यसंपदेचे संस्थापक म्हणून पंतांची कामगिरी अजोड, तथापि त्यांचे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदले जाईल. त्यांनी निर्मिती केलेल्या नाटकांची यादी देण्यापेक्षा जी आज माझ्या स्मृतीत साठवली गेली आहेत, त्यांचा उल्लेख करतो:

वसंत कानेटकरांचे अश्रुंची झाली फुले मधला प्रिन्सीपॉल विद्यानंद, इथे ओशाळला मृत्यू मधला औरंगजेब, तो मी नव्हेच तर आहेच, थॅंक यू मि. ग्लॉड मधला इन्स्पेक्टर, बेईमान मधली सतीश दुभाषींबरोबरची गिरणी मालकाची भूमिका, मला काही सांगायचं आणि जिथे गवकाला भाले फुटतात मधील अभिनयाचे टोक—पंतांच्या अभिनयातून साकारलेल्या या व अशा कित्येक भूमिकांनी मराठी रंगभूमीवर रसिकांना राजहंसी रुपाचे दर्शन घडले. सामाजिक आशय, त्यातून समाजातली दरी, शिवाय इतिहासात डोकावताना औरंगजेबालाही त्यांनी जिवंत केले. प्रिन्सिपॉल विद्यानंदाच्या रूपाने शैक्षणिक क्षेत्रातल्या प्रवृत्तींवर केलेली टीका, इत्यादी. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लखोबा लोखंडेच्या रूपांतून लग्नासाठी उतावीळ झालेल्या तरुणींची कथा सांगणारे आचार्य अत्रे यांचे “तो मी नव्हेच” ला दिलेले योगदान. सारेच पंतांच्या कर्तृत्वाची त्यांच्या अभिनय कलेची उत्तुंग उंची घडवितात. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. वसंतरांव देशपांडे, पं.जितेंद्र अभिषेकी या त्रयींच्या रूपाने साकारलेले “कट्यार काळजात घुसली” हे तथाकथित संगीत नाटकांचा चेहराच बदलून टाकणारे नाटक देऊन संगीत रसिकांना वेगळ्या विश्वात घेउन गेले, याची निर्मितीही पंतांच्या शिरपेचातला मानाचा तुराच!

असा कलावंत, असा निर्माता… फिरता रंगमंच प्रथम रंगमंचावर आणणारे, नाट्य परिषदेला स्वतःचे बळ देणारे आणि मराठी संस्कृतीवर प्रेम करणारे कलावंत म्हणून त्यांचे कितीही गोडवे गायले तरी शब्द अपुरे पडतात.

आणि अवघ्या काही प्रयोगांतून “तो एक राजहंस” हे कर्णाच्या जीवनावरील नाटक धाडसाने निर्माण करणारे—ज्यात कर्णाच्या भूमिकेत शोभणारे रविंद्र महाजनी; सारेच घडविले ते प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेने!

आज नाट्यसंपदा “अवघा रंग एकची झाला” ने कार्यरत आहेच पण पंतांची मौलिक दृष्टी आता रहाणार नाही.  मराठी रंगभूमीवर राजहंसी रूपाने वावरणारा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेलाय. केवळ त्यांच्या आठवणीतून तो दिसणार. त्यांच्या “तो मीच…” या आत्मचरित्रातून ते आता वाचता येतील. त्यांच्या भूमिकांची आठवण मनात साठवून निर्माता, कलावंत असलेल्या आणि नाटकासाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या या महान साधकाला श्रद्धांजली.

अधिक वाचन: मराठी विकिपीडिया

चित्र-सौजन्य: [en.academic.ru] येथून साभार—गूगलच्या मदतीने शोध.

[टीप: प्रस्तुत लेखात व्यक्त केलेली मते व तत्सम् माहिती ही लेख-प्रस्तावकाची स्वतःची आहे. – संपादक ]

संबंधित लेखन

 • जोगवा – एक वास्तव दर्शन
  शहरीकरणाच्या थोड्याच दूर असणार्या वास्तवासाठी पहा, त्याला चव्हाट्यावर आणणाऱ्या धाडसी निर्मात्यांस…
 • आघात – एक उल्लेखनीय प्रयत्न
  विशेषतः डॉक्टर रुग्णांची करत असलेली भलावण, रुग्ण्यांच्या मनातली शस्त्रक्रियेबद्दलची भीती. ऐकलेल्य…
 • देऊळ चित्रपटाची घोषणा झाली झोकात
  वेगळ्या धाटणीचा आणि आपल्या मनातला चित्रपट करण्याची ही संधी मिळाल्याचे कबूल करून देऊळच्या निमित्ता…
 • गोंधळ
  विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा …
 • जागे व्हा…..!!
  माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, जो दिवस-रात्र उन्हा-तान्हात काबाडकष्ट करून पिकवतो त्याच्या …
PG

सुभाष इनामदार

Pioner of E-sakal, and Now Media Consultant
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
http://www.culturalpune.blogspot.com/

 1. थोडक्यात आणि महत्वाचे अश्या पद्धतीने आपण घेतलेला त्यांच्या लोकोत्तर कार्याचा आढावा आवडला. मी स्वतः ‘तो मी नव्हेच’ एवढेच पहिले जरी असले, तरी त्यातूनही पंतांची जी छाप माझ्यावर पडली, ती विसरणे शक्य नाही.

  लखोबा लोखंडे, या आणि अश्या अनेक व्यक्तींना त्यांनी आणि फक्त त्यांनीच उभे केले, जी आठवण कधीही पुसली जाणे शक्य नाही.

  जरी आपणास ते अशांत करून गेले असले तरी, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ हीच प्रार्थना !

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME