वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

यथा राजा तथा अधिकारी….

१२ प्रतिक्रिया

यथा राजा तथा अधिकारी….

आयएस अधिकारी टी चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असताना त्यांची कारकीर्द बरीच गाजली. काहींच्या मते त्यांनी ठाणे शहराचा संपूर्ण कायापालट केला. अत्यंत कार्यक्षम व सचोटीचा अधिकारी अशी प्रतिमा जनमानसात होती. तर काहींच्या मते शहराचे नागरीकरण/आधुनिकीकरण ह्या नावाखाली मनमानी केली. जेव्हां एखादा अधिकारी बेधडक कृती करतो तेव्हा दोन्ही बाजूने मतप्रवाह वाहणारच. कोणाच्याही दबावाला बळी न पडणारे लोक फारच दुर्मिळ आहेत.

चंद्रशेखर यांचे काम चांगले का वाईट- हे पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. ज्यांची दुकाने, घरापुढचे अंगण रस्ता रंदीत गेले आहे ते नक्कीच बोटे मोडणार. परंतु मुळात वरिष्ठ अधिकारी कुठल्याही प्रकारची मनमानी मग ती स्वत:च्या स्टाफची असली तरीही खपवून घेणारा नसेल तर जनसामान्यांना आवडतो. चंद्रशेखर यांच्या हाताखालील लोकांना हे चांगलेच माहीत होते. जर राजा कार्यक्षम असेल तर जनतेला किती उपयोग होतो ह्याचे हे एक छोटेसे उदाहरण.

ठाण्याच्या नीतिन कंपनी जवळच्या उड्डणपुलाचे काम सुरू होते. आमचे घर हायवेच्या अलीकडे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने व मध्यभागी नेहमीच क्रेन्स, ट्रक्स, पुल बांधण्यासाठी लागणारी अनेक मशीन्स उभी असत. ह्या कामामुळे नागरिकांच्या दररोजच्या कामात फार अडथळे येत होते, तरीही पूल पूर्णं झाल्या नंतरच्या फायद्याकडे डोळे ठेवून लोक सहन करीत होते. रविवारी काम बंद असे. ही सगळी वाहने जिथे असतील तिथे सोडून देऊन कर्मचारी निघून जात. मग ट्रॅफिक चा गोंधळ ठरलेला. लोक तेवढ्यापुरते बोंबाबोंब करीत अन दमले की चालू पडत. ह्या कामामुळे आवाजाचे प्रदूषण व धूळ हे सगळ्यांचा अंत पाहत होते. तशातच…….

एका रविवारी सकाळी नऊच्या आसपास एकाएकी हॉर्न चा कर्कश आवाज आला, येतच राहीला. आत्ता थांबेल मग थांबेल, पण दोन मिनिटे होऊन गेली तरी चालूच. बरेच लोक गॅलरीमध्ये येऊन शोध घेऊ लागले की हा मूर्खपणा कोण करते आहे. आम्हीही पाहत होतो. पण पत्ता लागेना. पंधरा मिनिटे झाली हॉर्न चालूच. डोके दुखायला लागले. तोवर एवढे लक्षात आले होते की हॉर्न चिकटला आहे. काही पोरे पार्क केलेल्या प्रत्येक गाडीजवळ जाऊन पाहू लागली. करता करता शोध लागला एकदाचा. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या क्रेनचा हॉर्न टाहो फोडून आक्रंदत होता. झाले, आज रविवार असल्याने सुटी म्हणजे पूर्ण चोवीस तास हा आवाज आजूबाजूच्या समस्त जनतेला बहिरे करणार होता.

आता बरेच लोक क्रेन भोवती गोळा होऊन चर्चा करत होते. काही पोरे वर चढून खिडकी उघडी आहे का ते पाहत होती. तासापेक्षा जास्त वेळ गेला पण उपाय सापडत नव्हता. डोके अगदी पिकले. तिरिमिरीतच मी उठले अन ठाणा टेलिफोन एक्सचेंजला फोन करून चंद्रशेखरांचा नंबर मागितला. नेहमीप्रमाणे मला ऑपरेटरने उडवलेच. पुन्हा नंबर फिरवला अन प्रथमच सांगितले की मला नंबर हवा आहे आणि तुम्ही तो न देता जर फोन ठेवून दिला तरी मी तो मिळवेनच आणि मग त्यावेळी तुमचीही तक्रार करेन. खरे तर ह्या धमकीत काहीच तथ्य नव्हते पण कदाचित माझ्या आवाजातला संताप किंवा ऑपरेटरलाच वाटले असेल देऊन टाकावा. मला तिने चंद्रशेखर यांच्या सेक्रेटरीचा नंबर दिला.

सेक्रेटरींना फोन लावला तर आधी दुसऱ्याच कोणीतरी उडवाउडवी करू लागले. त्या दिवशी माझ्या अंगात कसला संचार झाला होता कोण जाणे मी त्या माणसाला सेक्रेटरीला फोन देण्यास भाग पाडले. त्यांना काय झाले आहे ह्याची कल्पना दिली. त्यांनी काय करता येईल ते पाहतो असे आश्वासन दिले. परंतु तेवढ्याने काही होणार नव्हते म्हणून मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे मला आयुक्तांशीच बोलायचे आहे असा धोषा लावला. तसे त्यांनी मला पालिकेच्या एका इंजिनियरचा नंबर दिला, म्हणाले मी प्रयत्न करतोच पण तुम्हीही इथे फोन करा.

इकडे रस्यावर प्रचंड गर्दी जमलेली. अर्धे लोक कानात बोटे खुपसून तर काही क्रेनची काच तोडण्याच्या विचारात. मी त्या इंजिनियरचा नंबर फिरवला. पलीकडून एक बाई बोलत होती, ती म्हणे ते फोन घेऊ शकत नाहीत. सत्यनारायणाची पूजा सुरू आहे. मी तिला सांगितले की तितके महत्त्वाचे काम आहे म्हणूनच त्यांच्याशी बोलायचे आहे. दोन मिनिटांनी ते आले फोनवर. मी थोडक्यात काय घडते आहे ते सांगितले आणि चंद्रशेखर यांच्या सेक्रेटरीने तुमचा नंबर दिला असून तुम्हीच ह्या कामाचे इनचार्ज असल्याने हे काम तुम्हीच करू शकता असेही सांगितले. इंजिनियरने घरात किती गडबड आहे, त्यात रविवार असल्याने पाहतो असे गुळमुळीत उत्तर देऊन मला वाटेला लावले.

आता पुढे काय करावे? आवाज बंद होईल अशी चिन्हे दिसत नव्हती. मनात एकच आशा होती की चंद्रशेखर यांच्या दराऱ्यामुळे कदाचित हे काम होईल. आणि काय आश्चर्य खरोखरच पंचवीस मिनिटांत पालिकेचे दोन कर्मचारी कुठुनसे उगवले आणि एकदाचे त्या चिकटलेल्या हॉर्नचे मुस्कट दाबले. हूश्श्श… झाला बंद. दोनसव्वादोन तास चाललेला गोंधळ शांत झाला. पाच मिनिटात फोनची बेल वाजली, फोनवर चंद्रशेखरांचे सेक्रेटरी होते. आवाज थांबला का? तुमचे काम झाले ना? असे विचारीत होते. ह्यापुढेही कधीही काहीही अडचण आल्यास फोन करावा हेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांचे आभार मानून फोन ठेवला तर इंजिनियरचा फोन आला, त्यानेही हेच विचारले. तुमच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या गडबडीतही तुम्ही काम केलेत ह्याचे मनापासून आभार असे म्हणून फोन ठेवला.

ह्या सगळ्यातून पुन्हा एकदा सिध्द झाले, जर मुख्य अधिकारी चांगला असेल तर हाताखालच्यांनाही प्रेरणा मिळते. किमान धाक तरी नक्कीच असतो. सामान्य माणसाचीही दखल घेतली जाते.

[फोटो – साभार – फ्लिकर]

संबंधित लेखन

 • तेज:रक्षक की भक्षक?
  मिल जळून भस्मसात या घटनेची भीषणता व आलेली विषण्णता अजूनही मनातून जात नाही. तसे पाहिले तर आजकाल ही…
 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • नात्यांतील अस्थिरता
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  त्याची गाडी जुनी होती पण अतिशय सुंदररीत्या काळजी घे…
 • फरक कुठे पडला आहे
  लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
  त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
  आताही मी …
 • स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
  सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर क…
PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

 1. यथा वरिष्ठाधिकारी तथा अधिकारी-कर्मचारी असं म्हणणं जास्त योग्य.किंबहुना प्रामाणिकपणे काम करू इच्छिणार्‍या कर्मचार्‍यास अधिकार्‍याचे पाठबळ असेल तर सगळी कामे विनाविलंब नि बिनबोभाट पार पडतात.पण त्यासाठी अधिकारीसुद्धा निरलसपणे काम करणारा असावा लगतो.

 2. भाग्यश्री, I just love your writing style. I have read most of the articles from your blog. It’s a treat for Marathi people like me who live in North America or anywhere outside India and are still able to read such a great material. Of course, thanks to “Marathi Mandali” for making this happen!

  By the way, a great inspiring story above.

  Thanks, Neha

  P.S. Sorry could not use the Marathi font properly hence writing in English!

 3. Bhagyashree,

  Mast ahe. Mukhya adhikari karyaksham asel tar kay hote he baghitale. Nehemi pramane tumache likhan mastach zhale ahe. Tumhi evadhe kahi karun likhanasathi vel kadhu shakata he mahatvache.

  Vivek Nerlekar

 4. kharech thane khoop badlat ahe..uncha buldings/malls/bridges…pan marathi sanskuti thanyachi harwayla nako..bhagyashree blogs lihun tu kharech lokana tyanchya astitvachi visar padu det nahis…keep writing..ammhi wahcat arhu ani pratisad det rahu..
  mi pan thanekar…mamledar chi misal…wa zakas…

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME