वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

लिनक्सवर कॉम्प्रेस्ड आर्काइव्ह्ज मधून सॉफ्टवेअर कसे स्थापित करावे?

४ प्रतिक्रिया

बर्‍याच वेळा (नविन असतांना) लिनक्स संगणक-प्रणालीवर सॉफ्टवेअर्स स्थापित करणे खुपच किचकट आणि अवघड काम आहे, असे वाटते. Apt, RPM, Yum, Portage यांसारख्या काही पॅकेज मॅनेजमेण्ट युटिलिटिज द्वारे विन्डोज मध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यापेक्षा लिनक्समध्ये अतिशय सोपे असते. तुम्हाला नेमके काय हवे आहे, हे जर तुम्हाला माहित असेल तर तुमच्या पॅकेज मॅनेजरला तुमची गरज सांगितल्याबरोबर ते तुम्हाला हवे असलेले पॅकेज (सॉफ्टवेअर) शोधते, त्याला डाऊनलोड करते, जर परवानगी दिलेली असेल तर त्या डाऊनलोड केलेल्या पॅकेजला तुमच्या संगणकात इन्स्टॉलही करते आणि तुमच्या संगणक-प्रणालीशी (लिनक्सच्या फ्लेवरशी) योग्यपणे जुळवून घेण्यासाठी ते इन्स्टॉल केलेले पॅकेज कन्फिगरही करून देते.

पण काहीवेळा, तुमच्या लिनक्स फ्लेवरच्या डीस्ट्रिब्युशन रीपॉजिटरी मध्ये तुम्हाला हवे असलेले पॅकेज नसते. अशावेळी तुम्ही फक्त टारबॉल्स फाईल्स (सामान्यतः .tar.gz, tar.bz किंवा .tgz) डाऊनलोड करू शकता, ज्यामध्ये प्रोग्रॅमसाठीचा सोर्स कोड असतो, आणि तो तुम्हाला कम्पाईलही करावा लागू शकतो (ह्म्म, तुमच्याच हाताने!). प्रथमतः तुम्हाला ही प्रोसेस जराशी अवघड जाईल, पण हळूहळू सवय झाली की नंतर ती पटकन व अतिशय सोपी वाटू लागेल. असे सॉफ्टवेअर्स कसे इन्स्टॉल करावेत, यासाठी हा लेख मी लिहित आहे.

सर्वात पहिले मी सांगू इच्छितो की, सर्वच टारबॉल्स हे एकसारखेच नसतात. मी बहुतेक टारबॉल्स पॅकेजेस कसे इन्स्टॉल करावेत, याबद्दल एकत्रितपणे या लेखात सांगणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे असलेले एखादे टारबॉल पॅकेज या लेखातील प्रक्रियेद्वारे इन्स्टॉल होईलच असे नाही. पण शंका आल्यास मात्र आपण निसंकोचपणे विचारु शकता. मी ही प्रक्रिया दोन दिवसांपूर्वीच शिकलोय, त्यामुळे मलाही याबद्दल खोलवर माहिती नाहिये, पण मी माझ्या संगणकावर असलेल्या उबुन्टू ९.०४ या प्रणालीमध्ये बरेचसे टारबॉल पॅकेजेस खालील कृतीप्रमाणे इन्स्टॉल केले आहेत, त्यामुळेच मी हा लेख लिहित आहे. या क्षेत्रातील अनुभवी जाणकारांनी मी या लेखात दिलेल्या माहितीची सत्यता तपासावी व त्याला पर्यायी काही प्रक्रिया आहेत का ते सांगावे.

पायरी १: टारबॉल एक्स्ट्रॅक्ट करणे

जे लोक लिनक्स वर नविन असतील, त्यांना टारबॉल काय भानगड आहे, ते कदाचित कळाले नसावे. एका फाईल मध्ये इतर संबंधित फाईल्स ठवेलेल्या असतात, त्या फाईलला टारबॉल हा शब्दप्रयोग वापरून संबोधले जाते. हे विन्डोज मधल्या .zip किंवा .rar फाईल्ससारखे आहे; फरक एवढाच, टार प्रोग्रॅम, तो स्वतः फाईल्सना कॉम्प्रेस करण्याचे काम करीत नाही. तर त्यासाठी तो अन्य प्रोग्रॅम्सचा वापर करतो, उदा. gzip (गनझिप) किंवा bzip (बनझिप) हे प्रोग्रॅम्स फाईल्स कॉम्प्रेस करतात. बहुतेक त्यामुळेच तुम्हाला एखादी टारबॉल फाईल .tar आणि .gz किंवा संक्षिप्तपणे .tgz अशा दोन एक्स्टेन्शनची दिसली असेल.

आजच्या घडीला तरी आपल्याला फाईल्स एक्ट्रॅक्ट करण्यासाठी दोन वेगवेगळे प्रोग्रॅम्स रन करण्याची गरज नाही. आपल्याला टार ला फक्त एवढेच सांगावे लागते की फाईल्स gzip द्वारे डीकॉम्प्रेस (एक्स्ट्रॅक्ट) करण्यासाठी रन कर म्हणून…! तुम्ही ग्राफिकल युजर इंटरफेस वापरून (GUI) वापरून त्या टारबॉल फाईलवर डबल क्लिक करून तीला एक्स्ट्रॅक्ट करू शकता किंवा कमांड लाईन इंटरफेस वापरूनही ती फाईल एक्स्ट्रॅक्ट केली जाऊ शकते. सर्वप्रथम तुमचे टर्मिनल किंवा शेल/कमांड प्रॉम्प्ट उघडा. आता त्यात खालीलप्रमाणे प्रक्रिया कराः

सर्वप्रथम तुम्ही डाऊनलोड केलेली टारबॉल फाईल ही कोठे एक्स्ट्रॅक्ट करून पॅकेज इन्स्टॉल करणार आहात, याबद्दल ठरवा. मी आणि शक्यतो बरेचसे लोक /usr/local/src ही डिरेक्टरी वापरतात.

त्यासाठी प्रथम तुम्ही ती टारबॉल फाईल कोठे साठवली आहे, ते शोधा. त्यानंतर ती फाईल /usr/local/src या डिरेक्टरी मध्ये आपण हलवू शकाल. तुमच्या कमांड टर्मिनल मध्ये पुढील प्रमाणे कृती कराः

१) तुम्ही टारबॉल फाईल असलेल्या डिरेक्टरी मध्ये आहात का याची खात्री करा. नसाल तर पुढील कमांडद्वारे त्या डिरेक्टरी मध्ये जा.

cd येथे फाईलची सध्याची डिरेक्टरी
उदा. cd /home/vishaltelangre/Desktop

२) वरील कमांडने तुम्ही तुमची टारबॉल असलेल्या डिरेक्टरी मध्ये जाल. आता ती फाईल /usr/local/src या डिरेक्टरी मध्ये हलवा.

mv mytarball.tar.gz /usr/local/src

३) आता तुमची टारबॉल (मी उदाहरणादाखल mytarball.tar.gz ही फाईल दिली आहे.) फाईल /usr/local/src या डिरेक्टरी मध्ये हलवली गेलेली आहे. आता त्या तुम्हीही त्या डिरेक्टरी मध्ये दाखल व्हा.

cd /usr/local/src

४) आता ती फाईल तुम्ही या डिरेक्टरी मध्ये एक्स्ट्रॅक्ट करू शकता. त्यासाठी खालील कमांडचा वापर करा.

tar xvzf mytarball.tar.gz

वरील कमांड मध्येः
* -z हे टार ला gzip (गनझिप) द्वारे एक्स्ट्रॅक्ट करून रन करण्यासाठी सांगण्यासाठी. (.bz किंवा .bz2 टारबॉल्स साठी -z च्या ऐवजी -j वापरावे.)
* -x हे फाईल्स एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी

* -v हे एक्स्ट्रॅक्ट होत असलेल्या फाईल्सची यादी दिसण्यासाठी
* -f हे आपण फाईलवर काम करीत आहोत हे सांगण्यासाठी

५) आता तुमची टारबॉल फाईल ही /usr/local/src ह्या डिरेक्टरीमध्ये mytarball ह्या नविन फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे. आता तुम्ही त्या डिरेक्टरी मध्ये (/usr/local/src/mytarball) दाखल व्हा.

cd mytarball

पायरी २: कन्फिगर

मागील पायरी १ मध्ये आपण फाईल्स एक्स्ट्रॅक्ट केल्या आहेत व त्या जेथे एक्स्ट्रॅक्ट झाल्या त्या डिरेक्टरी मध्ये आपण सध्या आहोत (/usr/local/src/mytarball)

आता पॅकेज कम्पाईल करण्याअगोदर आपल्याला त्यातील स्क्रिप्ट कन्फिगर करावी लागेल. कन्फिगर करण्यामागचा उद्देश्य एवढाच तपासणे की, तुमच्या संगणकावर ते पॅकेज (त्याचा सोअर्स कोड) कम्पाईल करून वापरण्यासारखा एक बायनरी (द्विमान) प्रोग्रॅम तयार करण्यासाठी सर्व आवश्यक सॉफ्टवेअर्स/पॅकेजेस किंवा इतर प्रणाल्या (डिपेन्डन्सीज) उपलब्ध आहेत की नाही! (उदा. जीसीसी कम्पायलर आणि इतर सॉफ्टवेअर बिल्डिंग साधने)... जर काही महत्वपूर्ण डिपेन्डन्सीज तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर तुम्हाला त्या डाऊनलोड करून इन्स्टॉल करण्यासाठी सुचविले जाते.

सध्या तुम्ही /usr/local/src/mytarball या डिरेक्टरीमध्ये आहात.

आता वरील डिरेक्टरीमधील सोअर्स कोड कन्फिगर करण्यासाठी तुमच्या टर्मिनलमध्ये खालील कमांड वापरा. (कन्फिगर कृती बर्‍याच वेळ चालू शकते!)

./configure

जर सर्वकाही व्यवस्थित असले तर तुम्ही /usr/local/src/mytarball या डिरेक्टरी मध्ये आपोआप येता.

(सुचनाः जर या कृतीमध्ये तुम्हाला त्यांनी काही त्रुटी किंवा मिसिंग डिपेण्डन्सीज सांगितल्या तर त्या तुम्ही तुमच्या लिनक्स फ्लेवर साठी असलेल्या Apt, RPM, Yum, Portage यांपैकी एका पॅकेज मॅनेजमेण्ट युटिलिटीद्वारे ती मिसिंग डिपेण्डन्सी डाऊनलोड व इन्स्टॉल करू शकता.)

पायरी ३: मेक

जर वरील कन्फिगर पायरीमध्ये कसल्याही एरर्स आल्या नसतील तर तुम्ही यापुढील कृती करण्यास समर्थ आहात. ही कृती - जेथे आपण सोअर्स कोड इक्जिक्युटेबल प्रोग्रॅम मध्ये कम्पाईल करतो.

यासाठी खालील कमांड टाकाः (make कृतीसुद्धा बराच वेळ चालू शकते, त्यामुळे मनावर जरासा संयम ठेवण्याचा प्रयत्न करावा!)

make

पायरी ४: मेक इन्स्टॉल

जर वरील मेक पायरी कसल्याही एरर्स आल्या नसतील तर तुम्ही ही कृती करण्यास समर्थ आहात. यासाठी शक्यतो तुम्ही रुट असणे गरजेचे असते.

खालील कमांड कॉपी पेस्ट करा.

sudo make install

या कृतीने तुम्ही तुमचे पॅकेज यशस्वीरीत्या तुमच्या लिनक्सवर स्थापित केले आहे.

************************************************************************************

सुचनाः काही KDE 4 आप्लिकेशन्स स्थापित करण्यासाठी काही वेळा वरील पायर्‍यांमधील कन्फिगर पायरीऐवजी cmake ही कमांड वापरावी लागते.

जसे की,

cmake .

make

make install

************************************************************************************

टीपः तुम्हाला वरीलप्रमाणे पॅकेजेस इन्स्टॉल करतांना कधीही कसलिही अडचण येऊ नये (उदा. मिसिंग डिपेन्डन्सीज इत्यादी) यासाठी तुम्ही खालील कमांड तुमच्या टर्मिनलमध्ये एक्जिक्युट करावी.

१)उबुन्टू आणि इतर डेबियन फ्लेवर्स वापरणार्‍यांनीः

sudo apt-get install build-essentials

२)फेडोरा व रेड हॅट एन्टरप्राईज(??) फ्लेवर्स वापरणार्‍यांनीः

sudo yum install build-essentials

************************************************************************************

अजुन काही शंका, अडचणी?

संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात..., ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. रेडहॅटमध्ये yum कमांड लिनक्सचा विकतचा सपोर्ट (RHN Registration) असल्याशिवाय चालत नाही. त्यासाठी दुसरा एक ऑप्शन आहे. /etc/yum.config फाईलमध्ये रिपोझिटरीचा पाथ (एफटीपी किंवा सीडी) द्यायचा असतो. पण RHN Registration नसल्याने तो पाथ कनेक्ट होत नाही. अशा वेळी CentOS च्या एफटीपीचा पाथ द्यायचा. CentOS ही पूर्णपणे मोफत (सपोर्टसहित) आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये विंडोजला कधीच बाय-बाय केलंय. आणि रेडहॅट (CentOS सपोर्टसहित) वापरतोय. CentOS एफटीपी पाथसाठी आयआयटी चेन्नईचा एफटीपी पत्ता वापरतो.

  • माहितीबद्दल धन्यवाद पंकज!

   रेड हॅट फ्लेवर्सच्या रिपॉझिटरी मध्ये बहुदा RPM (रेड हॅट पॅकेज मॅनेजर) ला सपोर्ट करणारे पॅकेजेस (.rpm) उपलब्ध असतात.
   rpm options rpm-package-name असा RPM चा सिन्टॅक्स आहे. (man rpm द्वारे अधिक माहिती मिळू शकेल.)
   आता RPM हा एक स्वतंत्र प्रकल्प म्हणून राबविला जात आहे. noarch असणारे RPM पॅकेजेस कुठल्याही लिनक्स सिस्टीमवर इन्स्टॉल होण्यासाठी डिझाईन केले जातात, तर noarch नसणारे मर्यादित फ्लेवर्ससाठीच (खासकरून रेडहॅट व त्याच्या सब-फ्लेवर्ससाठीच) उपलब्ध करून दिले जातात.

   रेड हॅट, फेडोरा आणि इतर लिनक्स डिस्ट्रोज, जे RPM पॅकेजेसचा वापर करतात, त्यामध्ये Yum (Yellowdog Updater Modified) चा सुद्धा ते ऑनलाईन RPM रिपॉझिटरीमधून, ऍटोमॅटिकली सॉफ्टवेअर इन्स्टॉल आणि अपडेट करण्यासाठी वापर करू शकतात. (http://linux.duke.edu/projects/yum)
   Yum द्वारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी yum install package-name अशी सोपी कमाण्ड आहे. (अधिक माहितीसाठी man yum ही कमाण्ड पाहा. )

   (पंकज, तू सांगितल्याप्रमाणे मला तरी फेडोरा ११ वर yum किंवा RPM द्वारे पॅकेज इन्स्टॉल करताना किंवा अपडेट करताना कसलीही अडचण आलेली नाही, तरीही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!)

   मी सध्या उबुन्टू ९.०४ हे फ्लेवर वापरून पाहतो आहे, यावर Debian पॅकेजेस (.deb) इन्स्टॉल करणेही yum आणि RPM सारखेच आहे. apt-get install package-name या aptitude कमाण्डद्वारे आपोआप सॉफ्टवेअर, डेबियन रिपॉझिटरी मधून इन्स्टॉल होते.

   जर yum, RPM, aptitude या रिपॉझिटरींमध्ये तुम्हाला हवे असलेले सॉफ्टवेअर पॅकेज मिळत नसेल, तेव्हा वरील लेखात सांगितल्याप्रमाणे त्या सॉफ्टवेअरच्या, विश्वासार्ह तृतिय-पक्ष संस्थेकडून टारबॉल बायनरी सोअर्स फाइल्स घेऊन त्या कम्पाइल करून इन्स्टॉल कराव्यात.

   काही FTP क्लाएन्ट्सद्वारे तुम्ही एखाद्या ftp साइटवरूनसुद्धा पॅकेजेस डाउनलोड करू शकता. उदा. http://ftp.redhat.com या साइटवर कोणीही लॉगिन न करता डिस्ट्रीब्युशन मध्ये असलेल्या सर्व फाइल्स अनामिकपणे पाहू शकते आणि डाउनलोड करू शकते.

   काही FTP क्लाएन्ट्स:
   Firefox हे मोझिला वेब आणि ftp न्याहाळक आहे.
   Konqueror हे K Desktop फाइल मॅनेजर आहे.
   Nautilus हे GNOME फाइल मॅनेजर आहे.
   gFTP हा GNOME फ्लेवर्सवरील FTP क्लाएन्ट आहे.
   ftp हा कमाण्ड लाइन ftp क्लाएन्ट आहे.
   lftp कमान्ड लाइन FTP क्लाएन्ट आहे आणि एकाच वेळी बरेचसे कनेक्शन्स मॅनेज करू शकतो.
   NcFTP – ग्राफिकल युजर इंटरफेस असणारा FTP क्लाएन्ट
   curl आणि wget – इंटरनेट ट्रान्सफर क्लाएन्ट (FTP आणि HTTP): यांचा सर्वाधिक वापर केला जातो.

 2. OpenSUSE 11 मध्ये कोणती प्रक्रीया वापरावी लागेल?
  त्यामध्ये वन क्लीक इंस्टॉल म्हणून एक फाईल येते, ते ymg आहे का?

  • नमस्कार विक्रम जी,

   आपल्याला .ymp एक्स्टेन्शन असलेली फाइल म्हणायचे आहे का? असो, कारण .ymg हे याहू मॅसेंजरच्या एका डेटा फाइलचे एक्स्टेन्शन आहे! असो.. मी .ymp बद्दल अधिक माहिती देतोः

   »» .ymp ही एक YaST मेटापॅकेज फाइल असते, जसे की तुम्ही सांगितले, ही फाइल ओपन-सुसे (स्युज?) वर असणारी वन-क्लिक इन्स्टॉलेशन करण्यासाठीची (इंटरनेटवरून ऑनलाईन) फाइल असते! या फाइलमध्ये सॉफ्टवेअर पॅकेजबद्दलची आवश्यक ती सर्व माहिती (मेटाडेटा?) असते, जसे की सॉफ्टवेअरची आवृत्तीबद्दलची माहिती, सिस्टीमच्या रीक्वायरमेण्ट्स आणि इन्स्टॉलेशनसंबंधित इतर माहिती, साठवलेली असते.
   ओपन सुसे (स्युस?) च्या १०.३ व्या आवृत्तीपासूनच्या नंतरच्या सर्व आवृत्त्यांमध्ये हे YaST मोड्युल टाकले जाते! सध्याच्या ११.२ आवृत्तीमध्ये काही शिल्लकचे फिचर्स जोडण्यात आलेले आहेत, ते आपण नक्की तपासून पाहा!


   »» ओपन सुसे (स्युस?) ११.२ वरील Zypper हे मला आवडलेले एकदम मस्त ऍप्लिकेशन आहे. चांगला GUI, इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर ऍटोमॅटिक अपडेट करते आणि ह्याद्वारे तुम्हाला एखादे सॉफ्टवेअर आधी डाऊनलोड करून नंतर केव्हाही गरज पडल्यास इन्स्टॉल करण्याची मुभा मिळते (जसे की आपण rpm, deb पॅकेजेस डाऊनलोड करून नंतर केव्हाही इन्स्टॉल करून शकतो, त्याप्रमाणे!) या गोष्टींमुळे हे ऍप तुम्ही नक्कीच वापरून बघा!
   खालील दुव्यावरून तुम्ही तुमच्या ओपनसुसे (स्युस?) साठी Zypper चे .rpm पॅकेज डाऊनलोड करू शकताः
   दुवाः http://en.opensuse.org/Zypper/Packages

   »» http://software.opensuse.org/search या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हवे असलेले पॅकेज (मग ते कोणत्याही फ्लेवर साठी चालेल) शोधू शकता. वन-क्लिक इन्स्टॉलची सुविधा येथे पुरविण्यात आलेली आहे!

   »» या शिवाय .rpm पॅकेजेस तर आहेतच, ते सुसे (स्युस?) वर इन्स्टॉल केले जातात!

   »» ह्म्म, पण जर इच्छित पॅकेज जर वर सांगितल्याप्रमाणे मिळत नसेल, आणि त्याची टारबॉल फाइल तुम्हाला सापडली असेल, तर या लेखात सांगितल्याप्रमाणेच ते इन्स्टॉल करावे!

   धन्यवाद!

   आणखी काही शंका असल्यास जरूर कळवा!

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME