वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

फोटोग्राफी: लेन्सविषयी सर्वकाही

३ प्रतिक्रिया

मागील भागात आपण फोटोग्राफीचे विविध प्रकार पाहिले. आता त्यासाठी लागणार्‍या भिंगांची म्हणजेच लेन्सेसची माहिती करुन घेऊ.

छायाचित्र www.the-digital-picture.com वरुन साभार

कॅमेराच्या ज्या बाजूकडून प्रकाश शलाका प्रकाशसंवेदी पटलावर पडते त्या बाजूवर सामान्य प्रकाशशलाकेचे रुपांतर ज्या भागाकडून केले जाते तो भाग म्हणजेच कॅमेराचे भिंग किंवा लेन्स. या लेन्सची क्षमता नाभीय अंतराच्या एककात मध्ये मोजली जाते. हे नाभीय अंतर म्हणजे लेन्सची काही विशिष्ट अंतरावरील वस्तू फोकस करण्याची क्षमता म्हणता येईल. जेवढे जास्त नाभीय अंतर असेल तेवढे दूरची वस्तू फोकसमध्ये ठेवता येते. सगळ्याच लेन्सवर हे अंतर लिहिलेले असते.

जर लेन्सचा झूम काढायचा असेल तर त्यातील मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता झूमचा आकडा मिळेल. कुठल्याही पॉइंट अँड शूट कॅमेराची भिंगे (लेन्स) बदलता येत नाहीत. त्याला जी लेन्स जोडलेली असते कॅमेराचे आयुष्य असेपर्यंत तीच वापरावी लागते. अशा कॅमेराच्या लेन्सवर नाभीय अंतर लिहिलेले असते. परंतु हे आकडे फसवे असतात. पॉइंट अँड शूट कॅमेरामध्ये त्याच्या स्वतःच्या लहान सेन्सरशी प्रमाणित असतो. जर तो आकडा आंतरराष्ट्रीय प्रमाणित मानकाशी (३५मिमी सेन्सर किंवा प्रकाशसंवेदी पटल) तुलना करताना फारच कमी येतो.

एसएलआर कॅमेराच्या लेन्स बदलता येतात. विशिष्ट प्रकारच्या फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्या लेन्सेस वापरल्या जातात. या लेन्स म्हणजे अति-अचूक ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचा संगम घडवून तयार केलेली दुर्बिणच. या लेखात आपण त्या प्रकारांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेऊ.

फोकसच्या प्रकारावरुनवरुन होणारे वर्गीकरण:

 1. स्वयंचलित (ऑटो) फोकस लेन्स: या लेन्स त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक्समुळे वस्तूवर आपोआप फोकस होतात. फोकसमध्ये मानवी हस्तक्षेपासही वाव असतो.
 2. मानवी (मॅन्युअल) फोकस लेन्स: या लेन्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स नसते आणि ती आपल्या डोळ्यांनी पाहून हाताने फोकस करावी लागते.

माउंटवरुन होणारे वर्गीकरण:
लेन्सचे त्यांच्या कॅमेराशी असलेल्या जोडणीवरुन, ज्याला माउंट म्हणतात, प्रकार पडतात. यामध्ये कॅनन माउंट, निकॉन माउंट, ऑलिम्पस माउंट असे कॅमेरा तयार करणार्‍या कंपनीनुसार प्रकार आहेत. ज्या त्या कंपनीचा माउंट त्याच लेन्सशी अनुरुप असतो. म्हणजे कॅननची लेन्स कॅननच्याच कॅमेरावर माउंट होते, ती निकॉनवर चालणार नाही. पण आजकाल काही थर्डपार्टी कंपन्या काही असे ऍडाप्टर बनवतात की त्यामुळे अशा लेन्स दुसर्‍या कॅमेरावर माउंट होतात.

कार्यचालनावरुन (working) होणारे वर्गीकरण:
लेन्सचे कार्य कुठल्या पद्धतीने चालते यावरुन तिचे दोन प्रकार आहेत.

 1. स्थिर लेन्स (फिक्स्ड लेन्स): या प्रकारच्या लेन्समध्ये लेन्सचे प्रकाशसंवेदी पटलापासूनचे नाभीय अंतर समान असते. ते कधीही बदलता येत नाही. ही लेन्स वापरायला कमी फ्लेक्जिबल असली तरी अतिशय उच्च दर्जाच्या ऑप्टिक्समुळे फोटोची गुणवत्ता वादातीत असते. एकदम शार्प फोकस आणि शार्प फोटोसाठी ही लेन्स वापरली जाते. ३५मिमी, ५०मिमी, ८५मिमी, ३००मिमी अशा काही प्रसिद्ध स्थिर लेन्स आहेत.
 2. विविधा (झूम) लेन्स: या प्रकारच्या लेन्समध्ये नाभीय अंतर बदलता येते. त्यामुळे फोटोच्या चौकट रचनेत (Frame composition) बदल करताना फ्लेक्जिबिलिटी मिळते. याच लवचिकतेमुळे या लेन्सेस लोकप्रिय आहेत. १८-५५मिमी, ७०-२००मिमी, ७५-३००मिमी, १००-४००मिमी असे काही प्रसिद्ध झूम लेन्स आहेत.

नाभीय अंतरावरुन होणारे वर्गीकरण:

 1. सामान्य झूम लेन्स: सामान्यतः ही लेन्स कॅमेराबरोबर घेतली जाते आणि रोजच्या वापरासाठी उपयुक्त असते. या प्रकारच्या लेन्सचा दृष्टीचा कोन साधारणतः मानवी दृष्टीशी मिळताजुळता असतो. या लेन्स बर्‍यापैकी शार्प, वजनाने हलक्या आणि आकाराने लहान असतात. यामध्ये साधारण ३५-७०, २८-८५, २४-१०५ अशा लेन्सेस असतात.
 2. विस्तृत दृष्टी (वाइड अँगल) लेन्स: विस्तीर्ण निसर्गचित्रे, समूह फोटो अशा फोटोंसाठी विस्तारित दृष्टी असणार्‍या लेन्स आवश्यक असतात. चित्रातील कुठलीही गोष्ट वगळली जात नाही अशा हेतूने ही लेन्स बनवलेली असते. शिवाय ही लेन्स वापरली असता चित्रातील बर्‍याच गोष्टी फोकसमध्ये राहतील म्हणजे दृश्याची खोली अधिक राहील (depth of field) याची काळजी घेतली जाते. बहुतेक वाइड अँगल लेन्सचे नाभीय अंतर ५०मिमी पेक्षा कमी असते.
 3. मध्यम नाभीय अंतराच्या लेन्स: नाभीय अंतर अंदाजे ८५मिमी-१३५मिमी असते. मुख्य सबजेक्ट पार्श्वभूमीपासून वेगळा दिसून त्याचे व्यक्तित्व दिसून येणे ही या लेन्सची खासियत. त्यामुळे नैसर्गिक स्थितीतील (candid) व्यक्तिचित्रणासाठी अशा लेन्सेस वापरल्या जातात.
 4. दूरचित्रण (टेलिफोटो) लेन्स: अधिक नाभीय अंतरामुळे या प्रकारच्या लेन्सेस खेळ, वन्यजीवन, पक्षी अशा फोटोसाठी वापरल्या जातात. यांचे नाभीय अंतर शक्यतो १३५मिमी आणि अधिक असते. ७०-३००, ७०-२०० अशा काही टेलिफोटो लेन्स प्रसिद्ध आहेत.

वापरावरुन होणारे वर्गीकरण:

 1. सूक्ष्मचित्रण (मॅक्रो)लेन्स: या लेन्स वस्तूच्या अगदी जवळून फोकस करु शकतात. आणि एकास एक अशा प्रमाणात वस्तू प्रतिमेत दाखवतात. शक्यतो फुले, कीटक अशा फोटोंसाठी वापरली जाते.
 2. अतिविस्तृत दृष्टी (अल्ट्रा वाइड अँगल) लेन्स: विस्तृत दृष्टी (वाइड अँगल) लेन्सप्रमाणेच पण जास्त भाग दृष्टीक्षेपात आणता येतो. नाभीय अंतर हे २४मिमी पेक्षाही कमी असते. जास्त उपयोग स्थापत्यचित्रण आणि निसर्गचित्रणात केला जातो.
 3. मत्स्यदृष्टी (फिश-आय) लेन्स: माशाच्या डोळ्याप्रमाणे १८० अंशाच्या कोनातील भाग दृष्टिक्षेपात आणता येतो. पण हे फोटो छापण्यापूर्वी संगणकावर प्रक्रिया करणे आवश्यक असते.
 4. अतिदूरचित्रण (सुपर टेलिफोटो) लेन्स: खूप दूरच्या वस्तूच्या चित्रणासाठी आवश्यक. उदा. उंच झाडावरील पक्षी, पुण्यातून सिंहगडाचा मनोरा वगैरे. ४००मिमी, ५००मिमी, ६००मिमी असे काही प्रसिद्ध प्रकार.

गुणवत्तेवरुन होणारे वर्गीकरण:
गतिमान (फास्ट) लेन्स आणि संथ (स्लो) लेन्स असाही एक प्रकार आहे. त्याची माहिती आपण अपेर्चर(aperture)चे धडे घेतल्यावर करुन घेऊ. कारण तेव्हाच ते समजेल.

पुढील भागात एक्सपोजर (exposure), अपेर्चर (aperture) आणि शटरस्पीडची (shutter speed) ओळख.

संबंधित लेखन

 • नीळकंठेश्वर – नव वर्ष, नवी जागा
  बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करा…
 • फोटोग्राफी: विविध प्रकार
  मागील भागात कॅमेरा आणि त्याचे विविध प्रकार जाणून घेतल्यावर आता आपण छायाचित्रणाचे विविध प्रकारांची…
 • डिजीटल स्क्रॅप्स
  पुर्वीच्या काळी, फोटो बद्दलच्या आठवणी, तारखा इत्यादी फोटोच्या मागच्या बाजुला लिहुन ठेवायची पद्धत …
 • फोटोग्राफी: ओळख
  फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रण. खरे तर प्रकाशचित्रण हा शब्द अधिक संयुक्तिक ठरेल, कारण फोटो काढताना …
 • फोटोग्राफर्स@पुणे मेळावा
  नमस्कार मंडळी,

  आपणांस फोटोग्राफीची आवड असेल आणि पुण्यातील काही हौशी फोटोग्राफर्सना भेटण्याची इ…

PG

पंकज झरेकर

“रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” म्हणजेच… आगळीच दुनिया आहे माझी…माझी भटकी टोळी, त्यातले मित्र, सह्याद्रीचा रानवारा अनि माझा camera मिळून एक विचित्र रसायन बनलंय…त्याचे नाव आहे: पंकज Absolute भटक्या……. कायम सह्याद्रीच्या कुशीत भटकंती…माज आणि मस्ती जिरवायला…

 1. निलेश रसाळ म्हणतात:

  पुन्हा एकदा धन्यवाद… उत्तम लेख आहे. पुटील लेखाची वाट पाह्त आहोत.

 2. Sarvaprathan tumche aabhar manto ki tumhi phtographi chi marathit etki chaan mahiti aamchyaparyant pohchavalit.

  Mala hi photography chi aavad aahe. mala hi suruvat karaychi aahe photgraphy chi pan me aavad mhanun photography karnar aahe.

  Mala animal photography karaychi aahe tar tyasathi mala kuthla camera ghayva lagel. Mala jara guidence karal ka.

  Vat baghto aahe tumchya reply chi.

  Regards,
  Anup Mhapralkar

 3. chaan lekh ahe mala photography chi avad ahe pan mahiti nahi yatna baryach goshti samjalya dhanyvad

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME