वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

लोकलच्या गमती जमती: पळा पळा ते सुटलेत…

३३ प्रतिक्रिया

लोकलच्या गमती जमती!

सहसा संध्याकाळी मी स्लो लोकलच घेत असे. खिडकी पकडून सीएसटीला उलट जायचे. बहुतेक ती ठाणाच लागे. मग तासभर निवांत. लोकलमध्ये आणि निवांत? हो तर. अहो दररोजच्या सवयीने अनेक गोष्टींची मूलभूत संकल्पनाच बदलते म्हणतात ना, तसेच आहे हे. किमान अर्धा तास गाढ झोप आणि काही वेळ परोपकार असे होईतो उतरायची वेळ येतेच. ही झोप सगळी संध्याकाळ उत्साहात घालवण्यासाठी गरजेची असल्याने मी चुकवत नसे. पण कधीकधी घाई असली की नाईलाजाने फास्ट लोकलकडे पळावेच लागे.

फास्ट लोकल म्हणजे त्या त्या भागातील बायकांची मक्तेदारी. काहींच्या मते गाडी थांबते ना मग आम्ही चढणारच, मग जवळ जायचे असो का लांब. तर काहींच्या मते तुम्हाला खंडीभर गाड्या आहेत कशाला मरायला येता इथे? आधीच उभे राहायलाही जागा नाही आणि ह्यांना दादरला जायलाही फास्ट लोकल लागते. हा वाद कधीही न संपणारा आहे. चूक कोणाचीच नाही, तरीही काढायचीच म्हटली तर लांब जाणाऱ्यांना थोडे झुकते माप द्यावे लागेल. पण हा विषय पुन्हा कधीतरी.

मी धावतपळत जाऊन बदलापूर लोकल पकडली. दररोजच्या बायकांनी ही कोण आगंतुक आलीय असे भाव डोळ्यात आणून एकमेकीकडे पाहिले. मला लवकरच उतरायचे होते शिवाय आत जाऊन कोणा लांब जाणारीची जागा अडवायची माझी इच्छाही नव्हती. काय भरवसा नंतर इतकी गर्दी होईल की ह्या बाया मला जातील घेऊन पार डोंबिवलीपर्यंत ही भीतीही होतीच. मी दाराजवळच थांबले. सीएसटीलाच गाडी भरली होती. त्यातही लागलीच विणकाम, वाचन, काल गप्पा जिथे थांबवल्या तिथूनच पुढे चालू केल्या. फेरीवाल्यांनची वर्दळ सारे सारे जोरात सुरू झालेले. गाडी सुटली. पाच मिनिटात भायकळा आले. उतरणारे कोणीच नव्हते, त्यामुळे हल्ला बोल करीत तीनही दरवाज्यातून मुसंडी मारून सैन्य घुसले. भराभर आपापल्या मैत्रिणी शोधून स्थिरावलेही.

गाडी सुटणार तोच एक कोळीण भली मोठी टोपली घेऊन दाराजवळ आली. मालाच्या डब्यापर्यंत तीला पोचणे शक्य नव्हते म्हणून बायकांच्या डब्याकडे तिने मोहरा वळवला होता. कोळणीच्या पाटीतल्या पाण्याचा एक थेंब जरी अंगावर पडला तरी काय होते ह्याचा अनुभव अनेक जणांनी घेतलेला असेलच. त्यातून डब्यात मुंगीलाही जागा नाही अशी परिस्थिती झालेली. तिला पाहताच सगळ्यांनी एकच कालवा केला. दाराशी उभे असणाऱ्यांची जबाबदारी असते अशावेळी खिंड लढवायची. त्यांनी अगदी जोर लावून प्रयत्न केला. पण कोळीण हार मानणारी थोडीच होती. तिने फक्त म्हटले, ” ए बायांनो गप रावा, नाहीतर पाटीतले पाणी टाकीन अंगावर. चला, सरा बाजूला. येऊ दे मला आत. ” सगळ्या भरभर सरकल्या. उगाच कोण हिच्या तोंडाला लागणार असे म्हणत पुन्हा आपापल्या गप्पात रमल्या.कोळिणीने पाटी उतरवली. हुश्श…. करेतोच दादर आले.

दादरला उतरणारे आणि चढणारे ह्यांची नेहमीची हाणामारी होत बायका डब्यात घुसू लागल्या. पुढे असलेल्या दोघीतीघी मागच्या रेट्याने ढकलल्या जाऊन हिच्या मध्येच ठेवलेल्या पाटीवर आपटल्या.त्यांना उठायला मिळेतो गाडी सुटली. डबा खच्चून भरला. दोन्ही दाराच्या मधल्या जागेत गोंधळ माजला होता. कसेबसे सावरत कोणाच्यातरी आधाराने पाटीवरून उठताना झाकण सरकले. तोवर कोळणीने खास शेलक्या, समस्त बायकांनाच काय पुरषांनाही लाज वाटेल अशा शिव्या घालत सगळ्यांचा उद्धार करून झाला होताच. तिचेही बरोबरच होते. कारण पाटीत काय आहे हे फक्त तिलाच माहीत होते ना.

झाकण सरकले मात्र, पाटीतले दोन तीन खेकडे भर्रकन बाहेर आले. चांगले हाताच्या पंज्याएवढे मोठे होते. अगदी पाटीला खेटून असणारीला प्रथम दिसले. ती घाबरली आणि तिने दूर होण्यासाठी म्हणून जी हालचाल केली त्याने पाटीचे झाकणच पूर्ण निघाले. तोवर आजूबाजूच्या बायकांनाही पत्ता लागला होताच. त्यात भर म्हणून कोणीतरी ओरडले, ” अग बाई, खेकडे सुटलेत की. ” झाले एकच रण माजले.जवळजवळ वीसपंचवीस खेकडे पाटीबाहेर पडून इतस्ततः पळत होते. साड्या, पंजाबी सावरत बायकाबेंचवर चढून उभ्या राहू लागल्या. इकडे कोळणीचा जीव खालीवर होत होता, ” मुडदा बशविला तुमचा. अग कशाला इतके नाचकाम करताय? तुम्ही आग लागल्यावाणी बोंबलताय अन माझे खेकडे तुम्हाला घाबरून पळू लागलेत. गप रावा जरा. आत्ता धरून आणते की सगळ्यांस्नी. ” ती जोराजोरात ओरडू लागली.

शेजारीच असलेल्या पुरषांना काही दिसत नसले तरी किंचाळणे ऐकू येत होते. त्यांना वाटत होते कीकोणीतरी सुरा घेऊन घुसलाय किंवा बेवडा दिसतोय. ते तिकडून विचारत होते काय झालेय, का ओरडताय? पण त्यांना सांगणार कोण, जोतो खेकडे शोधण्यात गुंतलेला. न जाणो अंगावरच चढायचा आणि नांगी मारायचा. शेवटी एकदाचे घाटकोपर आले. उतरणाऱ्या सुटलो म्हणत पळाल्या.

मात्र उतरताना त्यांनी त्यांचे काम चोख केले, ” गाडीत खेकडे सुटलेत गं बायांनो, सांभाळा. ” हे ऐकले मात्र कोणी चढलेच नाही. तोवर काही खेकडे पकडून कोळणीने पाटीत कोंबले होते. हळूहळू बाकावर उभ्या असलेल्या बायका खाली उतरत होत्या. पण सारखे वाटे काहीतरी वळवळतेय की पुन्हा किंचाळणे अन लागलीच कोळणीचे करवादणे ही जुगलबंदी सुरू झाली. कमीतकमी आठदहा खेकडे ह्या कालव्यात नक्कीच डब्यात पसरले होते, खबदाडात लपले होते.

ठाणा आले आणि मीही धूम ठोकली. पुढे काही दिवसतरी हे निसटलेले खेकडे बायकांना नक्कीच पळवत असले पाहिजेत.

[ फोटो फ्लिकर-वरून ]

संबंधित लेखन

 • पाऊस जगा…!!!
  मागल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला हा लेख इथे प्रसिद्ध केला होता. आता पाऊस येतोच आहे तर इथेही टाकतो…
 • सई…………
  सर्वत्र हिरवळ पसरलेली……..हिरवळ……………… ओली …………
  मन तृप्त करणारी ………….
 • फरक कुठे पडला आहे
  लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
  त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
  आताही मी …
 • प्रेममयी
  मैत्रीण आलेली. गेल्या वेळच्या मुक्कामात ही पठ्ठी स्वत:च भटकंती ला गेल्याने गाठभेट होऊ शकली नव्हती…
 • पाऊस मनातला !
  आज रविवार ऑफिस ला  मस्त सुट्टी. सुट्टीची संध्याकाळ आभाळ भरून आलेल विजेच्या कडकडाटा सह पावसाल सुरु…
PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

 1. मस्तच किस्सा सांगितलात बाचून मनसोक्त हसलो ………..
  धन्यवाद…

 2. कोळिणीचा संवाद वाचून, बर्‍याच दिवसांनी मनापासून आणि पोटभर हसलो. लेखन चांगले आहे.

 3. एकदम झकास किस्सा. खूप खूप मस्त. मनापासून खुप आवडला.

 4. खूपच सही, काल्पनिक लेखन तर मनोरंजक वाटतेच, पण घडलेली घटना देखील अत्यंत मनोरंजक पध्द्धतिने लिहिलेली आहे, म्हणून खूप आवडली.

 5. हा लेख “सरदेसाईज”वर नाही आहे का? कारण तो ब्लॉग मी माझ्या ब्लॉगला जोडलाय. तिथून या लेखाचा अपडेट मिळाला नाही. आज सहजच मराठी मंडळीवर फेरफटका मारताना हा लेख वाचायला मिळाला. धमालच आहे.

  आणि सकाळमधल्या उल्लेखाबद्दल अभिनंदन इथंच करतो. असे प्रसंग सगळ्यांनीच अनुभवलेले असतात पण असं लिहिणं सगळ्यांनाच जमत नाही!

 6. wa masta dhamaal ali wachtana…office madhyech basun wachat hoto…ani jorat hasu laglo tase shejari pan mhanale mhala pan aikav kissa…te pan khush..
  mi norway madhye ahe ani ikadchya lokana tar mumbaichi local train chi gardi aikun angawar kata ala…
  mi mhatale amhi mumbaikar BORN TOUGH ahot..

 7. भाग्यश्री,

  लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. तिकडे थोडी शोधाशोध केली तर मला मोठा खजिनाच सापडला. आता हा खजिना मला खूप दिवस पुरेल.

  २००९ या एका वर्षात २६९ लेख… याची तुलना सेहवागच्या रनरेटशीच होऊ शकेल!

  You are an avid and a vivid writer!

  विवेक.

 8. khoop mast lekh aahe. mi mumbaikar nahi tyamule localchi maja wachunach mahiti aahe.hasavlyabaddal thanks.

 9. लोकल हा सर्व मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे की काय हा लेख खुप आवडला

  अमोल केळकर

 10. ekdam zakkasss….ashi dhamal tar chaluch asate train madhe….roj navin kahitari anubhavayala milate…

 11. धन्यवाद हर्षल.

  ट्रेनचे जीवनच वेगळे व आपापला आगळा दृष्टीकोन. कोणाला कटकट वाटेल तर कोणास चैतन्य मिळेल. 🙂

 12. नमस्कार,
  दैनंदिन जीवनामधला, परंतु मार्मिक प्रसंग टिपलात. खूप मजा व करमणूक झाली.
  असेच प्रसंग शोधत जा. लिहा. इतरांना आनंद मिळेल.
  ( जीवनाच्या रगाड्यातून – – ब्लीग करते )
  भगवान नागापूरकर

 13. मस्तच किस्सा सांगितलात बाचून मनसोक्त हसलो ………..
  धन्यवाद…
  प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME