वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

वर्गवारी करण्याची सवय

३ प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

खिशात हात घालून त्या निर्मनुष्य रस्त्यावर स्वतःच्या तंद्रीत फिरताना अचानक एक स्तब्धता मनात निर्माण झाली. ही स्थिती कुठल्याही प्रयत्‍नांनी उत्पन्न झालेली नव्हती. मनाच्या त्या स्थितीची जाणीवदेखील अंधाऱ्या राना पलिकडील झोपडीमधल्या मिणमिणत्या दिव्यासारखी दूरवर दिसत होती. आपले अस्तित्व आणि ही अवस्था यांमधे ज्ञानाचासुध्दा पडदा नव्हता. पाचोळ्यातील पायाखाली चुरडलेली जाणारी वाळलेली पाने आणि मनातील सर्व विचार हे एकाच पातळीवर आहेत हे स्पष्टपणे दिसत होते. एका भल्यामोठ्या चित्रपटगृहात जाऊन त्रिमिती सिनेमा बघत असल्यासारखे जीवन दिसत होते. स्वयंभू निर्माण झालेल्या त्या अवस्थेबद्दल मनात ममत्व निर्माण झाले आणि त्याचक्षणी ती स्थिती भंग पावली व मनातील कोलाहल परत सुरु झाली.

अनपेक्षितरीत्या लाभलेल्या गोष्टींनासुध्दा तपासून बघण्याची आपली सवय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भगवंताचे दर्शन स्थिर होणे शक्य नाही. ज्याप्रमाणे युध्दभूमीवर जमिनीत पुरलेले सुरंग शत्रूचा पाय पडताक्षणी फुटतात, त्याचप्रमाणे आपल्यात मुरलेली ‘चांगली-वाईट या वर्गवारीत प्रत्येक गोष्टीचे विभाजन करण्याची वृत्ती’ स्वयंभू ज्ञानाला उपजताक्षणीच उध्वस्त करते.

‘तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आमच्या मनातसुध्दा अनेकवेळा आपोआप विचार येतात. त्यांवर विचार केल्याशिवाय त्यातील कुठले आपल्यातच सुप्तपणे दडलेल्या गुणांचे व्यक्त रुप आहेत आणि कुठले भगवंताचे रुप आहेत हे कसे कळणार?’

स्वतःच्य मनात स्फुरलेल्या विचारांपैकी कुठले ‘सत्य’ आहेत आणि कुठले ‘टाकाउ’ आहेत हे समजून घेण्याचा अट्‍टाहास का आहे? आणि समजून घेतल्यावर तुम्ही स्वतःच्या विचारांचे समर्थन कुणाला देणार आहात? आपल्या या विचारसरणीमध्ये ‘भगवंताने दिलेल्या विचारांना धरुन ठेवले पाहिजे आणि बाकीच्यांना सोडून दिले पाहिजे’ ही वृत्ती आहे. एखादा विचार भगवंताने जरी दिलेला असला तरी तो तेव्हढाच तात्पुरता खरा असतो जेव्हढे आपले स्वतःचे विचार. उदाहरणार्थ, भगवंतांनी कित्येकजणांना स्वतः दिलेल्या शापापासून मुक्‍त केले आहे. यातून असा अर्थ निघतो की त्यांनासुध्दा आपल्या भूतकाळातील विचारांना अनंतकाळ चालवायचे नव्हते. ज्याक्षणी पापी माणसाला उपरती झालेली आहे हे त्यांच्या ध्यानात येते तेव्हा स्वतःला आधी स्फुरलेल्या विचारांना ते दूर सारतात. जेव्हा सर्वच विचारांची क्षणभंगुरता आपणास कळते तेव्हा त्यांच्यातील कुठले चांगले आणि कुठले वाईट याची निवड करणे म्हणजे काळाचा अपव्यय करणे आहे हेसुध्दा आपोआप कळते. सूर्य उगविल्यावर अंधार नष्ट आपोआप होतो तशी ही गोष्ट आहे.

‘मग संतांना कशी जाणीव असते की ते भगवंताच्या जवळ आहेत?’

कुठल्याही संताने स्वतः असे सांगितलेले नाही की मला स्फुरलेले विचारच सत्य आहेत आणि बाकीचे विचार संकुचित आहेत. प्रत्यक्ष श्री रामकृष्ण परमहंसांनीसुध्दा असा विश्वास दाखविला नव्हता. ते म्हणायचे की ‘मी तुमचे प्रश्न ऐकतो आणि आपोआप त्याचे उत्तर मनात येते आणि ते मी तुम्हाला सांगतो.’ यावरुन त्यांना स्वतःला मिळालेले हे उत्तर कसे आले, कुठून आले आणि ते बरोबर आहे की नाही यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते हेच सिध्द होते.

या विवेचनातून संतांचे महत्व कमी होत नाही तर ते स्वतःला सुचलेल्या विचारांवर विचार करीत नसायचे ही वस्तुस्थिती स्पष्ट होत आहे. जर त्यांनी आपल्या विचारांना काळाच्या प्रवाहात निःसंकोच विलीन केलेले आहे तर आपल्या विचारांना सातत्य देण्याचा आपला प्रयास कशाला? सोडून द्या आत्ता स्फुरलेला विचार (मग तो कितीही सुंदर असो) आणि व्हा पुढे वर्तमानकाळाला तोंड द्यायला.

संबंधित लेखन

PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

  1. Chhan !Man prasanna jhaale he vachun!
    Santani आपल्या विचारांना काळाच्या प्रवाहात निःसंकोच विलीन केलेले आहे तर आपल्या विचारांना सातत्य देण्याचा आपला प्रयास कशाला?
    khara aahe he!

  2. साधारण व्यवहारात समजून घ्यावयाची बाब ही आपल्यापेक्षा वेगळी आहे असे गृहीत धरले जाते.त्यामुळे तपासून पाहणे या प्रक्रियेची गरज पडते. याउलट समजून घ्यावयाची बाब व समजून
    घेणारा यानी साक्षात्काराद्वारे एकरूप होणे आवश्यक आहे असा संतांचा आग्रह आहे.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME