वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

वसुंधरा दिवस २०१०

३ प्रतिक्रिया

वसुंधरा दिवस

आज २२ एप्रिल म्हणजे जगभर साजरा होणारा आपल्या धरणीमातेसाठीचा वसुंधरा दिवस. नक्की काय आहे यामागचा इतिहास हे पाहण्याचा थोडा प्रयत्न केला असता कळलं की पहिला जागतिक वसुंधरा दिवस जवळजवळ चाळीस वर्षांपुर्वी १९७० साली अमेरिकेतल्य विस्कॉन्सीन राज्यातील तत्कालीन सिनेटर गेलॉर्ड नेल्सनयांच्या पुढाकाराने साजरा झाला होता. त्याकाळी अमेरिकेत इंधनाचा धूर हा वातावरणाला हानिकारक आहे याऐवजी संपन्नतेचं लक्षण म्हणून जास्त प्रसिद्ध होत होता; त्यासाठी जवळजवळ २० मिलियन अमेरिकन नागरिकांनी अनेक ठिकाणी रॅली आयोजित करुन यासाठीचा निषेध, आरोग्यदायी वातावरणाची आवश्यकता याचा पुरस्कार करण्यासाठी हा दिवस साजरा केला. त्यामुळे मुख्य म्हणजे Unites States Environmental Protection Agency ची स्थापना झाली. तसेच स्वच्छ हवा,पाणी आणि धोक्यात असणार्‍या जातींसाठी कायदे निर्माण झाले. या कार्याबद्दल सिनेटर नेल्सन यांना अमेरिकेतील प्रेसिडेन्शियल मेडलही देण्यात आले. युनायटेड नेशन्सचा वसुंधरा दिवस मात्र

त्यानंतर साधारण १९९० च्या दरम्यान काही पर्यावरणवाद्यांनी डेनिस हेज यांना अशाच कार्यासाठी मोठी कॅंम्पेन आयोजित करण्यास सांगितले.यावेळी वसुंधरा दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्यात आला.१४१ देशांमधुन जवळजवळ २०० मिलियन लोकं यात सहभागी झाले. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाचा विषय चर्चिला गेला आणि बर्‍याच ठिकाणी रिसायकलिंगचं तत्व वापरात यायला सुरुवात झाली. २००० च्या वेळेस श्री. हेज यांनी पृथ्वीचं वाढंतं तपमान आणि स्वच्छ इंधनाच्या पुरवठ्यावर भर दिला. २००० सालापर्यंत साधारण १८४ देशांमध्ये वसुंधरा दिवस साजरा करणं आणि याविषयावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणं अजुनही सुरुच आहे.

आजही या निमित्ताने निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले असणार आहेत आणि त्यांत सहभागी होऊन आपण आपला या कार्यासाठीचा पाठिंबा व्यक्त करु शकतो. पण हा एकच नव्हे तर येणारे प्रत्येक दिवस वसुंधरा दिवस असल्याचं भान आपण सर्वांनीच ठेवलं पाहिजे. त्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण प्रत्येकजण करु शकतो आणि आपला आपला खारीचा वाटा आपल्या धरतीमातेसाठी, किंवा खरंतर आपल्या स्वतःसाठीच करु शकतो त्यांची यादी देऊन ही पोस्ट संपवते..वसुंधरा दिवसाच्या अनेक शुभेच्छा आणि every day as earth day साठी आपण सर्वच प्रयत्न कराल अशी आशा.

 • मंडईत, खरेदीला जाताना दुकानदारांनी दिलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी स्वतः घरुन नेलेली कापडी पिशवीच वापरा. चुकुन कधी प्लास्टिकची पिशवी घ्यावी लागलीच तर निदान ती लगेच फ़ेकुन न देता आणखी एकदोनदा तरी वापरा. जर रिसायकलींगचा पर्याय उपलब्ध असेल तर सगळ्याच प्रकारचं प्लास्टिक त्यात जाऊदे.
 • घरकामं, मुलांचे छोटे छोटे प्रकल्प यासाठी पाठकोरे कागद वापरणे.
 • शक्य तितकं इमेल इ. प्रिंट करणं टाळावं. आणि अगदी आवश्यकच असेल तर पाठकोर्‍या कागदांनी काम चालवावं.
 • पाण्याचं नियोजन जसं भांडी विसळलेलं, भाज्या धुतलेलं पाणी झाडांना घालणं, मुळातच नळ सुसाट न सोडता कमीत कमी वापर करुन पाणी वाचवणं.
 • घरी हवा शुद्ध राखण्यास मदत होणारी आणि आपल्याला जोपासता येतील त्या हिशेबाने झाडं लावणं. अगदी तुळस, गुलाब हेही यासाठी खूप उपयुक्त आहेत.
 • केवळ मोठी दुकानं विकतात, सेलवर असतात म्हणून मोठ्या प्रमाणावर वस्तू आणून मग त्या तारखा संपल्या म्हणून फ़ेकुन देणं टाळावं..साधारण आपल्याला किती पुरतात या हिशेबाने नाशवंत वस्तु खरेदी करणं.
 • जमेल तसं एकट्याने चार चाकी किंवा केव्हातरी आपलं स्वतःचं वाहन टाळून थोडं अंतर असेल तर चालणं, सायकल वापरावी किंवा शक्य असेल तिथे पब्लिक ट्रानस्पोर्टचा वापर करावा.
 • ओला सुका कचरा वेगळा ठेवुन त्याप्रमाणे तो टाकावा.
 • निर्माल्य नदीत, समुद्रात न टाकता ठिकठिकाणी ठेवलेल्या निर्माल्यकलशात टाकावे.
 • उन्हाळ्यात आंबे, चिकु, जांभळं ही आणि अशी बरीच फ़ळं खाल्ली जातात आणि त्यांच्या बिया मात्र कचर्‍यात जातात. त्या बाल्कनीत एका ठिकाणी उन्हात वाळवुन ठेवाव्यात आणि मग पावसाळ्यात कुठेही निसर्गभ्रमंतीला गेलात की तिथे त्या फ़ेकल्या गेल्या की रुजल्या जरी नाहीत तरी पक्षी, किटकांना खाद्य म्हणून तरी त्यांचा वापर होतो. नॅशनल पार्क, कर्नाळ्यासारख्या जंगलात आपण जातो तिथे टाकलेल्या बियांत एकीचं तरी मोठं झाड झालं तर त्याचा नक्कीच जंगल संवर्धनासाठी थोडाफ़ार उपयोग नक्कीच होईल.
 • एकंदरितच प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं उत्तम. बाहेरून वस्तु जसं इलेक्ट्रॉनिक इ. विकत घेताना कमीत कमी पॅकेजिंग असणारं घ्यावं.
 • थर्माकोलचा वापरही शक्यतो टाळावा. मखरासाठी आजकाल बरेच इतर पर्याय उपलब्ध आहेत.

हे सर्व आणि यासारखे अनेक छोटे छोटे उपाय आपणांकडेही असतील..त्याबद्दल नक्की कळवा आणि प्रत्येक दिवस वसुंधरा दिवस असल्यासारखाच साजरा करा.

संबंधित लेखन

 • आकाश निळे का दिसते?
  लेखात समाविष्ट सामग्री:

  अभिसारण
  रेलिघचा अभिसारण नियम
  अभिसारणाची उदाहरणे
  सामान्यतः आकाश …

 • आघात – एक उल्लेखनीय प्रयत्न
  विशेषतः डॉक्टर रुग्णांची करत असलेली भलावण, रुग्ण्यांच्या मनातली शस्त्रक्रियेबद्दलची भीती. ऐकलेल्य…
 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • काही लिनक्स कमांड्स – भाग २
  मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामु…
PG

अपर्णा संखे-पालवे

मी अपर्णा संखे-पालवे, शिक्षणाने इंजिनियर, आय.टी. व्यवसायात गेले काही वर्ष अमेरिकेत मुक्काम, त्यामुळे कमी होत चालेला मराठीशी संपर्क..अशा पार्श्वभुमीवर ब्लॉगिंग करायला घेतलं आणि लक्षात आलं की मराठीत विचार मांडता आल्यामुळे होणारा आनंद काही औरच आहे. जे काही थोडे फ़ार कडू-गोड अनुभव येतात त्या क्षणांच्या आठवणी होण्याआधीच आजकाल त्या माझिया मना ब्लॉगवर मांडल्या जातात. मराठीमधले अनेक सुंदर सुंदर ब्लॉग्ज वाचणं आणि जमेल तिथे प्रतिक्रिया देणं हेही सध्या आवडीने करते.

 1. तू सांगितलेल्या सर्व सुचना स्वागतार्ह आहेत, यामधील बहुतेक मी पाळतोच.. आपल्या धरणी मातेच्या संवर्धनासाठी आवश्यक तेवढे सर्व प्रयत्न करण्याचा प्रत्येकाने पक्का निर्धार करण्याची आज नितांत गरज आहे! लेख अतिशय छान झाला आहे!

 2. धन्यवाद विशाल…अरे हे सगळंच काय, यापेक्षाही बरंच काही करण्याची गरज आहे…

  • खालील आणखी काही उपाय आपण नक्कीच अंमलात आणू शकू अशी मला खात्री आहे:

   » घरी एखादे वाहन असल्यास, त्याला दररोज धुण्याची काही जणांना सवय असते. धुतेवेळी नळीने फोर्सफुली येणार्‍याप पाण्याने धुवायला कोणालाही मजा वाटतेच. पण त्यामुळे पाण्याचा फार मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. एखाद्या बादलीमध्ये थोडेफार (जेवढे आहे तेवढेच) पाणी घेऊन जर हे काम केले, तर नक्कीच शुद्ध पाण्याची फार मोठ्या प्रमाणावर बचत होण्यास मदत होईल.

   » लहान मुले सकाळी सकाळी दात घासतांना बेसिन मधील नळ तसाच चालू करून ठेवतात. दात घासून होईपर्यंत ते शुद्ध पाणी नाहक वाया जाते. यापेक्षा दात घासल्यानंतरच फक्त तोंड धुण्यासाठी नळ चालू केला, तर पाण्याची बरीच बचत होईल. सुजाण पालकांनी आपल्या मुलांना ही सवय लावणे, व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले संस्कार घालणे, आज काळाची गरज आहे.

   » अंघोळीला शॉवरचा वापर टाळणं जरी अवघड असलं तरी अशक्य नाही. बादलीभर पाण्यात एकेकाची अंघोळ सहज शक्य आहे. गीझर कींवा हीटरचा वापर करून पाणी गरम करण्यापेक्षा, परवडत असल्यास सोलर हीटर बसवून घ्यावे. आणि जर शक्य नसेल, तर थंड पाण्याने अंघोळ करावी. गीझर किंवा हीटर, थंड पाणी गरम करण्यासाठी कित्येक पटीने वीजेचा वापर करते. आज आपले सरकार आणि काही संशोधक वीज तयार करण्यासाठी नवनविन मार्गांचा शोध घेत आहेत, त्यामुळे आपण तरी जागरुक नागरिकाप्रमाणे वीज वाचवण्यासाठी स्वतःहून शक्य तितके प्रयत्न करावे.

   » नळांच्या तोट्या जर लीक किंवा खराब झाल्या असतील, त्यामधून नेहमी थेंब-थेंब का होईना, पण पाणी टपकत असेल, तर त्या तोट्या लवकरात लवकर बदलाव्यात.

   » भांडे धुतलेले पाणी परसबागेतील झाडांना टाकावे, कपडे धुतलेले टॉयलेट मध्ये टाकण्याचा प्रयत्न करावा. यामुळे पाण्याचा घरगुती दैनंदिन कामांमध्ये होत असलेला नाहक अपव्यय बर्‍याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

   » पावसाळ्यात पावसाचे पाणी बर्‍याच प्रमाणात नाहक वाहून जाते. याचा जर योग्य प्रक्रियांनी निचरा केला तर, भूमीगत पाण्याची पातळी वाढणे सहज शक्य आहे. घराच्या छतावरन पावसाळ्यात वाहणारे पाणी, शक्य असल्यास Rain Harvesting द्वारे जमीनीत मुरण्यासाठी प्रयत्न करावेत. घराला किंवा अपार्टमेंटला लागून असलेल्या जागेत एक मोठा खड्डा खणून त्यात विटांचे तुकडे, वाळू आणि दगडांचे तुकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित भरावेत. घराच्या छतावरून वाहणारे पाणी थेट याच खड्ड्यात येईल, यासाठी योग्य उपाययोजना करावी. यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरेल, व त्याचा आपल्याला नंतर हवा तसा उपसा करता येईल. (हातपंप, विहीरींच्या मदतीने!) शेतकर्‍यांनीसुद्धा समुह (म्हणजे १५-२० जणांनी मिळून) करून एखाद्या एकर नापीक जमिनीमध्ये शेततळे निर्माण करावे. पावसाळ्यात प्रत्येकाने आपल्या शेतातून वाहून जाणारे कित्येक गॅलन पाणी या शेततळ्यात पोहोचण्याची योग्य सोय केली, तर वर्षभर त्या सर्वांना पाण्याची कमतरता भासणार नाही! 🙂

   » घरातील रोजच्या जेवणातील बराचसा नाशवंत ओला कचरा लगेच सडतो. त्यामुळे मिथेन, अमोनिआ सारखे ग्रीनहाऊस गॅसेस उत्पन्न होतात. परसबागेतील मातीमध्ये हा कचरा जर गाडला, तर त्यामुळे तेथील झाडांना निश्चितच आवश्यक पोषकद्रव्ये मिळतील.

   » घरातील ओला (wet) कचरा आणि सुका (dry) कचरा एकत्र न करता तो नेहमी वेगवेगळा करून ठेवावा. यामुळे या कचर्‍याच्या विलगीकरणासाठी लागणारा कर्मचार्‍यांचा बराचसा वेळ वाचेल. ओल्या कचर्‍यावर योग्य संस्कार करून त्यापासून नैसर्गिक खत, कागद आणि बर्‍याचशा टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. सुक्या कचर्‍यामध्ये असलेल्या कोल्ड ड्रिंक्सच्या काचेच्या/प्लॅस्टिकच्या बाटल्या व इतर धातूंच्या वस्तू विकून तुम्हाला थोडेफार पैसे मिळू शकतात. ह्या सुक्या कचर्‍यातील वस्तूंवर विविध संस्कार करून रीसायक्लिंकद्वारे अनेक नवनविन प्रोडक्ट्स तयार केले जातात.

   » बंगळुरू येथे एका ठिकाणच्या डांबरी रस्त्यामधील असलेल्या ऍग्रिगेट मध्ये विविध प्रकारचा इ-कचरा आणि प्लॅस्टिकचा (आपल्या रोजच्याव वापरातील) ५० ते ६० टक्के वापर करण्यात आला. याचप्रमाणे जर आपल्या देशातील फक्त निम्मे रस्ते जरी याच पद्धतीने तयार केले गेले ना, तर देशातील ९५ टक्के कचरा (ज्याची विल्हेवाट लावणे अवघड आहे, असा) संपेल! 🙂 फक्त यावर अधिक संशोधनाची गरज आहे, असे मला वाटते.

   » घरातील विजेवर चालणारी उपकरणे काम नसतील, किंवा घराबाहेर पडतांना लक्ष देऊन बंद करावीत.

   » खाजगी वाहनांऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वाहनांद्वारे प्रवास करावा. यामुळे संपुष्टात येत असलेल्या भूगर्भिय इंधनाच्या उपश्यावरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

   » जास्तीत जास्त इको-फ्रेंडली वस्तूंचा दैनंदिन व्यवहारात वापर करण्याचा प्रयत्न करावा.

   » झाडे लावणे किंवा लावलेल्या झाडांचे नित्यनियमाने संवर्धन करणे शक्य नसले तरी अगोदरच असलेल्या झाडांना हानी पोहोचवण्याची चुकी कधीच करू नये!

   » याशिवायही बरेचसे उपाय, ज्यामुळे आपल्याला धरणी मातेला काही तरी देता येईल, राबवण्याची सवय अंगिकारावी.

   अशा उपायांना पाळ्ल्याने, मनाला बरीच शांती व समाधान लाभेल. यामुळे होणारा फायदा आपलाच आहे, फक्त प्रत्येकाने मनापासून करण्याची नितांत गरज आहे!

   एकूणच लेख अगदी छान झालाय तायडे! कीप इट अप! 😉


   वसुंधरा दिवस रोजच असावा आणि तो पाळावा!

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME