वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

वेब ब्राउजर

२ प्रतिक्रिया
अनुक्रमणिका

 

तोंड-ओळख:

इंटरनेटच्या संकल्पनेशी जर तुम्ही थोडे-बहुत परिचित असाल तर तुम्हाला सुरुवातीला असा प्रश्न नक्की पडला असेल की, इंटरनेटवरील अथवा आंतरजालावरील एवढी भरमसाठ माहिती मिळवण्यासाठी किंवा ती पाहण्या/ऐकण्यासाठी बरीच साधने लागत असावीत, मग ती कुठली? आंतरजालाला सध्या महाजाल असे देखील संबोधले जाते, याअर्थी आंतरजालावर किती अमाप माहितीचा साठा उपलब्ध आहे, याची प्रचिती तुम्हाला बहुधा आलेली असेलच. ही सर्व माहिती इंटरनेटवर व्यवस्थितरीत्या संकलित करून ठेवलेली असते; गरज असल्यावर ही माहिती हवी तेव्हा मिळवता येते. या माहिती मिळवण्याच्या कामात सर्वांत महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे तुमच्या संगणकावरील वेब ब्राउजरची! वर्ल्ड वाइड वेब (WwW) किंवा इंटरनेटवरील माहिती पुरवणारी स्थळे न्याहाळण्यासाठी, पाहण्यासाठी आणि तेथील माहितीवर आवश्यक/ऐच्छिक असे संस्कार करून ते आपणाला समजेल अशा दृकश्राव्य स्वरूपांत रूपांतरित करून संगणकाच्या पटलावर दर्शवण्यासाठी एका खास विषय-प्रणालीचा उपयोग केला जातो, त्या प्रणालीला वेब ब्राउजर किंवा इंटरनेट ब्राउजर असे म्हटले जाते. एखाद्या माहिती पुरवणाऱ्या संकेतस्थळावरील उपलब्ध करून दिलेली माहिती वेब पृष्ठ, छायाचित्र, चित्रफीत, ध्वनिफीत अशा किंवा इतर विशिष्ट माहिती प्रकारांमध्ये असते; बहुतांश वेळा वेब पृष्ठांवरच इतर सर्व प्रकार-साधने उपलब्ध करून दिली जातात. प्रत्येक संकेतस्थळाला (तसेच त्यावरील वेब पृष्ठाला) एक विशिष्ट प्रकारचा आंतरजालीय पत्ता—युआरएल (युनिफॉर्म रीसोर्स लोकेटर) दिला जातो, केवळ ज्याआधारे वेब ब्राउजर त्या संकेतस्थळाला आंतरजालावर शोधून तेथील आवश्यक ती माहिती मिळवण्यास सक्षम असते. संकेतस्थळांवरील हायपरलिंक्समुळे (किंवा लिंक्स/दुवे) वेब ब्राउजरचा उपयोग करून तत्सम् संबंधित स्थळांकडे जाणे सुलभ ठरते. अगदी सरळ भाषेत सांगायचे झाले तर इंटरनेट विश्वातील पोस्ट मास्तर म्हणजे वेब ब्राउजर म्हणणे न लगे, पण दिलेले पत्ते शोधून तेथून माहिती मिळवणे किंवा तेथे ऐच्छिक माहिती पुरविणे—केवळ एवढेच वेब ब्राउजरचे काम असते, या भ्रमात मात्र राहू नका हंऽऽ!!!

केवळ आंतरजालावर टेहाळणी करण्यास्तव आजवर चाललेला ब्राउजर्सचा वापर हल्ली इतर कामांकरीता देखील सुरू झालेला आहे. वेब सर्व्हर्सनी परवानगी दिलेल्या खासगी नेटवर्क्स मधील अथवा फाइल सिस्टीम्स मधील माहिती मिळवण्यासाठी ब्राउजर्सचा वापर वाढतो आहे. सध्या काही ब्राउजर्स तर संकेतस्थळांना फाइल सिस्टीम्सवर जतन करण्याची सुविधादेखील पुरवितात.

 

इतिहास:

सन १९८० नंतरच्या काळात इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहितीची देवाण-घेवाण करण्याचा वापर वाढत गेला; परिणामी संगणक आणि नेटवर्किंग क्षेत्रांमध्ये नव-नवीन तंत्रांचा विकास होत गेला. इंटरनेटची सुरुवात खरी तर याच काळात झाली—वाढत्या गरजेमुळे सन १९९१ साली वर्ल्डवाइडवेब हा त्या काळचा सर्वसमावेशक असा वेब ब्राउजर नावारूपास आला. हायपरटेक्स्ट ही नवखी संकल्पना देखील या ब्राउजरद्वारे सर्वप्रथम राबवली गेली. हा काळ वेब जगतातील “फर्स्ट जनरेशन” म्हणून ओळखला जातो. युनिफॉर्म रीसोर्स लोकेटर (URL), हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (HTTP), हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज (HTML) चे नियम व वापर-पद्धती इत्यादी गोष्टी या जनरेशनमध्ये जगासमोर आल्या.

वेब च्या “सेकंड जनरेशन” मध्ये—सन १९९३ साली NCSA या संस्थेने मोझाइक हा सर्वांत पहिला ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) असलेला वेब ब्राउजर बाजारात उतरवला. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे FTP, गोफर यांसारख्या प्रोटोकॉल्सचे मोझाइक समर्थन करू शकत होता. एकाच पृष्ठावर चित्रे, अक्षर-मजकूर दर्शवला जात असल्यामुळे अगदी कमी काळातच हा ब्राउजर लोकप्रिय झाला.

लोकप्रिय वेब ब्राउजर्स.jpg

वेब च्या “थर्ड जनरेशन” मध्ये—कालांतराने सन १९९४ साली मोझाइक ब्राउजरचे नेटस्केप नॅव्हिगेटर असे नामांतरण करण्यात आले. त्या काळी जगातील सुमारे ९०% वेब ब्राउजर धारक नेटस्केप नॅव्हिगेटर हे वेब ब्राउजर वापरत होते, एवढी त्याची लोकप्रियता वाढली होती.

तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण मायक्रोसॉफ्ट कंपनीने सन १९९५ साली स्वतःच्या मालकीचा इंटरनेट एक्स्प्लोरर (IE) हा वेब ब्राउजर (ज्यावर मोझाइक ब्राउजरचा प्रभाव ठळकपणे दिसत होता) बाजारात उतरवून वेब-उद्योग जगतातील पहिले-वहिले ब्राउजर युद्ध सुरु केले. फक्त मायक्रोसॉफ्टच्या विन्डोज या ऑपरेटिंग सिस्टिमवरच हा ब्राउजर उपलब्ध असल्याकारणाने “विन्डोज”कडे गर्दी खेचण्यात IE ने कमाल केली, असे म्हणण्यास हरकत नसावी; आकडे पाहता—सन २००२ पर्यंत जगभरातील सुमारे ९५% ब्राउजर धारक हे IE वापरकर्ते होते, ही आकडेवारी जानेवारी २०१० मध्ये ६२ टक्क्यांपर्यंत घसरली, डिसेंबर २०१० मध्ये केवळ ५७% एवढेच वापरकर्ते IE धारक आहेत, आणि आता दिवसेंदिवस इंटरनेट एक्स्प्लोररचे मार्केट घसरतच आहे. तरीदेखील IE ने खूप काळापर्यंत वेब जगतामध्ये अधिराज्य गाजवले, ही गोष्ट मान्य करावीच लागेल!

१९९६ मध्ये ओपेरा हे ब्राउजर सुद्धा बाजारात उतरवले गेले; पण अपेक्षित लोकप्रियता मिळवण्यात ओपेरा अयशस्वी ठरले. सन २०१० अखेर जगभरातील एकूण वेब ब्राउजर्स धारकांपैकी सुमारे २.५% हे ओपेरा वापरणारे आहेत, अशी आकडेवारी उपलब्ध आहे. पण मुळात ओपेराची लोकप्रियता वाढली ती म्हणजे त्यांच्या मोबाइल फोन वेब ब्राउजरमुळे! जगभरातील सुमारे ५० दशलक्ष फोनांवर ओपेराचे मोबाइल वेब ब्राउजर स्थापित केले गेले आहे—अजूनतरी स्पर्धा करू शकेल असा कोणी तोडीचा स्पर्धक ओपेराला या क्षेत्रामध्ये नाहीये!

मुक्त स्त्रोत (ओपन सोर्स) प्रणालीचा आधार घेऊन स्पर्धा करू शकणारे ब्राउजर निर्माण करण्याच्या हेतूने सन १९९८ मध्ये नेटस्केपने मोझिला फाउन्डेशन नावाची संस्था उघडली—या संस्थेद्वारे फायरफॉक्स नावाचा प्रकल्प सूरू करण्यात आला. सन २००४ च्या अखेरीस फायरफॉक्स १.० आवृत्ती असणारे मुक्त स्त्रोत ब्राउजर बाजारात उतरवले गेले. सन २०१० च्या अखेरपर्यंत जगभरातील सुमारे २५-३०% वेब-ब्राउजर धारक फायरफॉक्स वापरतात, असे आकडेवारीवरून दिसते. मायक्रोसॉफ्टच्या इंटरनेट एक्स्प्लोररची जागा फायरफॉक्स घेत आहे, असे म्हणणे नलगे! 😉

सन २००३ मध्ये अॅपल कंपनीने सफारी वेब ब्राउजर प्रदर्शित केले—सन २०१० अखेरपर्यंत जगभरातील एकूण वेब ब्राउजर धारकांपैकी सुमारे ६% सफारी वापरणारे आहेत, असे आकडे दर्शवतात.

ब्राउजर्सच्या युद्धात नुकतेच प्रवेश (सप्टेंबर २००८) केलेल्या गुगलच्या क्रोम (क्रोमिअम) ब्राउजरने नवा विक्रम स्थापित केला आहे. जानेवारी २०१० मध्ये ५% वापरकर्ते असणाऱ्या क्रोमच्या वापरकर्त्यांची संख्या डिसेंबर २०१० च्या अखेरपर्यंत थेट दुप्पट म्हणजेच १०% इतकी झाली होती; येत्या दिवसांत ही टक्केवारी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. फायरफॉक्सकडील गर्दी खेचण्यात क्रोमला बरेचसे यश मिळाले आहे, अशी फायरफॉक्सकडून क्रोमवर स्थलांतरित झालेल्या बऱ्याच वेब-वापरकर्त्यांची समजूत झालेली आहे—आकडेवारीवरून तरी तसेच दिसते आहे.

विविध ब्राउजर्स वापरणार्‍यांची टक्केवारी

(ऑक्टोबर २०११ च्या आकडेवारीनुसार)

इंटरनेट एक्स्प्लोरर३७.५५%डाउनलोड
मोझिला फायरफॉक्स२४.६६%डाउनलोड
गूगल क्रोमिअम२३.३६%डाउनलोड
सफारी७.०९%डाउनलोड
ओपेरा३.१०%डाउनलोड
इतर वेब/मोबाइल ब्राउजर्स/अॅन्ड्रॉइड४.२४%

 

कार्यप्रणाली:

आंतरजालावरील उपलब्ध माहिती संसाधनांची वापरकर्त्याला हव्या त्या प्रकारे हाताळणी करण्याची सुलभरीत्या सुविधा पुरविणे—प्रामुख्याने हे वेब ब्राउजरचे मुळ उद्दिष्ट आहे. ही प्रक्रिया चालू होते ती म्हणजे वापरकर्त्याने इच्छित संकेतस्थळाचा युआरएल पत्ता टाकल्यानंतर—उदाहरणार्थ: http://marathimandali.com/ अशा स्वरूपाचा URI (युनिफॉर्म रीसोर्स इंडिकेटर). माहितीचा प्रकार नेमका काय आहे व ती कशा स्वरूपात संकलित केली आहे हे URI च्या उपसर्गावरून ब्राउजर लगेच ओळखून घेतो. सर्वसाधारणपणे http: अशा उपसर्गाने चालू होणारे URI पत्ते हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (HTTP) वरून वापरले जातात. बरेच ब्राउजर्स HTTPS (HTTP सीक्युर) करिता https:, फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल (FTP) करिता ftp:, स्थानिक फाइल्सकरिता file: असे उपसर्ग असणाऱ्या URI पत्त्यांचे समर्थन करतात. याव्यतिरिक्त इतर काही उपसर्ग आहेत, ज्यांना थेट ब्राउजरच्या अंतर्गत न हाताळता इतर तृतिय-पक्ष प्रणालीमध्ये उघडण्याची मुभा बहुतेक ब्राउजर्स पुरवतात—उदाहरणार्थ: mailto: URI पत्ते वापरकर्त्याच्या संगणकावरील डिफॉल्ट इ-मेल प्रणालीकडे पाठवले जातात, news: URI पत्ते वापरकर्त्याच्या डिफॉल्ट न्युजग्रुप रीडरकडे पाठवले जातात, तसेच irc:, gopher: इत्यादींसारखे उपसर्ग असणारे URI पत्ते उघडण्यासाठी देखील संबंधित तृतिय-पक्ष प्रणालींचा ब्राउजरद्वारे वापर केला जातो.

http, https, file आणि इतरांच्या बाबतीत एकदा का संकेतस्थळाकडील आवश्यक/ऐच्छिक माहिती मिळाली की वेब ब्राउजर ती लगेच संगणकाच्या दृष्य-पटलावर प्रदर्शित करतो. वेब सर्व्हरकडून मिळालेली HTML पृष्ठे ब्राउजरच्या लेआउट इंजिनकडे पाठवली जातात, जेथे ती पृष्ठे मार्कअप कोडिंगमध्ये न दिसता आकर्षक रूपात संगणकाच्या पटलावर ब्राउजरच्या माध्यमातून झळकतात. HTML व्यतिरिक्त इतर प्रकारची सामग्रीदेखील ब्राउजर वेब पृष्ठाचा भाग म्हणून दर्शवतो. बहुतांश वेब ब्राउजर्स—छायाचित्रे, दृक् सामाग्री, श्राव्य सामग्री, XML (एक्स्टिन्सिबल मार्कअप लँग्वेज) फाइल्स आणि फ्लॅश सामग्री तथा जावा अॅप्लेट्स दर्शवण्यासाठी तत्सम् आवश्यक प्लग-इन्स इत्यादी गोष्टींचे सहजगत्या समर्थन करतात. जर एखादी असमर्थनिय प्रकार असलेली फाइल किंवा दर्शवण्यापेक्षा डाउनलोड करण्यासाठी ठेवलेली फाइल जर वेब ब्राउजरला मिळाली तर वापरकर्त्याच्या परवानगीद्वारे ब्राउजर अशा फाइलला संगणकावर उतरवून घेते.

संकेतस्थळांवर हायपरलिंक्स (दुवे) असू शकतात, गोंधळ होऊ नये म्हणून या हायपरलिंक्स म्हणजे एकप्रकारे URI चाच प्रकार समजावा—ज्यांवर क्लिक केल्यानंतर वेब ब्राउजर तत्सम् वेब पत्त्यावरील उपलब्ध माहिती वरील उताऱ्यांत सांगितलेल्या प्रक्रियेद्वारे दर्शवते.

जावास्क्रिप्ट, Ajax या नवीन संकल्पनांच्या आधारे कुठल्याही प्लग-इन शिवाय आकर्षक व सतत बदलत राहणारी तसेच प्रोग्रॅम केलेली माहिती द्विमितीय अथवा त्रिमितीय ग्राफिक्सच्या मदतीने दाखवणे शक्य झाले आहे. HTML5, CSS3, MathML, SVG या व अशा अनेक नव्या येत असणाऱ्या मुक्त स्त्रोत संकल्पनांमुळे वेब ब्राउजर्समध्ये दिवसेंदिवस अधिक सुधारणा व समर्थन उपलब्ध करून दिले जात आहे, परिणामी इंटरनेट न्याहाळणे पूर्वीपेक्षा अधिक सुकर व आकर्षक झाले आहे.

 

वैशिष्ट्ये:

प्रत्येक वेब ब्राउजरची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत. आजवर उपलब्ध झालेल्या ब्राउजर्स पैकी काही केवळ मजकूर दर्शवणारी आहेत, काही HTML समर्थनिय आहेत, आणि काही अनेक प्रकारच्या फाइल्सना आणि प्रोटोकॉल्सना समर्थन पुरवणारी आहेत. इ-मेल, युजनेट घडामोडी, इंटरनेट रीले चॅट (IRC) अशा प्रकारच्या शिल्लकच्या सुविधांना समर्थन पुरवणाऱ्या वेब ब्राउजर्स म्हणण्यापेक्षा बरेचदा “इंटरनेट सुट्स” असे संबोधले जाते.

सर्व प्रमुख वेब ब्राउजर्समध्ये एकाच वेळी अनेक संस्थळांना नवीन चौकटींमध्ये (विन्डो) किंवा एकाच विन्डोवर नवीन टॅब्जमध्ये भेटी देता येतात. शिवाय काही ब्राउजर्स त्रास देणाऱ्या, बहुतेकदा जाहीराती असणाऱ्या पॉप-अप विन्डोंना अडवण्यासाठी पॉप-अप ब्लॉकर्स सारख्या प्लग-इन सुविधा पुरवितात.

महत्त्वाच्या व/वा आवडीच्या संकेतस्थळांचे पत्ते बुकमार्क करून ठेवण्याची सुविधा देखील बरेच ब्राउजर्स देतात, जेणेकरून कधीही बुकमार्कवर क्लिक करून इच्छित संकेतस्थळावर जाता येणे सहज शक्य होते.

बहुतेक प्रमुख ब्राउजर्स एखाद्या संकेतस्थळावरील नवीन अद्यतनांविषयीची ताजी वेब फीड RSS, अॅटम किंवा इतर वेब प्रणालींद्वारे सबस्क्राइब करण्याची सुविधा पुरवितात. सबस्क्राइब केल्यानंतर संबंधित संकेतस्थळावरील ताजे बदल अथवा नवीन माहिती “लाइव्ह बुकमार्क्स” च्या स्वरूपात तुम्हाला मिळते.

याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा बहुतांश प्रमुख वेब ब्राउजर्स शिल्लकच्या शेकडो ते हजारो उपलब्ध प्लग-इन्स किंवा अॅड-ऑन्सच्या माध्यमातून पुरवितात.

 

युजर इंटरफेस:

बहुतेक वेब ब्राउजर्समध्ये पुढील साधने सामान्यपणे आढळतात:

 • अॅड्रेस बार: संकेतस्थळाचा URI टाकण्यासाठी ह्या बारचा उपयोग केला जातो.
 • बॅक आणि फॉरवार्ड बटने: मागील आणि पुढील URI वर जाण्यासाठी या बटनांचा उपयोग केला जातो.
 • रीफ्रेश किंवा रीलोड बटन: सध्याचे वेब पृष्ठ पुन्हा लोड करून पाहण्यासाठी ह्या बटनाचा उपयोग केला जातो.
 • स्टॉप बटन: सध्या होत असलेली संकेतस्थळाची लोडिंग थांबवण्यासाठी हे बटन वापरले जाते. काही ब्राउजर्स मध्ये, रीलोड बटन आणि स्टॉप बटन हे एकत्र दिलेले आहेत.
 • होम बटन: होम पेज वर परतण्यासाठी याचा उपयोग करतात. ऐच्छिक होम पेज ठरवण्याची ब्राउजर्सकडून मुभा असते.
 • सर्च बार: सर्च इंजिन्सवर ऐच्छिक शब्दाबद्दल अथवा शब्दसमूहाबद्दल तत्काळ माहिती शोधण्यासाठी या बारचा उपयोग केला जातो.
 • स्टेटस बार: संकेतस्थळ लोड होत असतांना माहितीपूर्ण सूचना या बारवर दर्शविल्या जातात. तसेच, एखाद्या लिंकवर (दुव्यावर) माउसचे कर्सर फिरवले असता त्या लिंकचा URI या बारवर दिसतो.
 • हिस्टरी लिस्ट टॅब/मेन्यू: मागील भेटी दिलेल्या संकेतस्थळांची यादी व त्यांचे URI
 • फाइंड: सध्याच्या वेब पृष्ठावर एखादा शब्द अथवा शब्दसमूह इंक्रिमेंटल फाइंड वैशिष्टाद्वारे शोधण्याची सुविधा पुरविली जाते. बहुतेक ब्राउजर्समध्ये [CTRL]+[F] या दोन कळी कळपटलावरून एकदम दाबल्यानंतर ही सुविधा चालू होते.

बहुतेक वेब ब्राउजर्समध्ये खालील चित्रात दर्शविल्याप्रमाणे वर नमूद केलेली साधने अंतर्भूत असतात:

browser_layout

वेब ब्राउजरचा सर्वसाधारण लेआउट

गोपनियता आणि सुरक्षितता:

बहुतेक वेब ब्राउजर्स HTTPS (HTTP सीक्युर) साठी समर्थन पुरवितात. तसेच वेब कॅशे, कुकिज्, ब्राउजिंग इतिहास, जतन केलेले पासवर्ड्स अशा गोपनिय गोष्टी कायमस्वरूपी हटवण्यासाठी अथवा सुरक्षित करण्याकरीता अतिशय सुलभ मार्ग पुरवितात.

 

 

संबंधित लेखन

 • फायरफॉक्स ४

  मोझिलाच्या फायरफॉक्स आंतरजाल न्याहाळकाचे संचालक श्री. माईक बेल्ट्झ्नर यांच्या ब्लॉगवरील एक ले…

 • उबुन्टू १०.०४
  उबुन्टू (Ubuntu (उच्चार –  /uːˈbʊntuː/ oo-BOON-too)) ही एक फ्री ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी कम्युनिट…
 • काही लिनक्स कमांड्स – भाग २
  मागील “काही लिनक्स कमांड्स – भाग १” मध्ये दिलेल्या कमांड्स बहुतेक जणांना आवडल्या नसतीलच… त्यामु…
 • काही लिनक्स कमांड्स – भाग १

  लिनक्स/युनिक्स साठीच्या मिळेल तेव्हा कमांड्स  देण्याचा प्रयत्न करतोय… काही मी स्वतः वापरून …

 • टेक मराठी सभा -२
  टेक मराठीच्या पहिल्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! या महिन्यात दुसरी सभा आयोजीत करण्…
PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. खुप छान Article आहे.
  पण खुपच Detail मध्ये दिले आहे.
  Anyway मला खुप आवडला. . .
  http://techshree.eahmadnagar.com/

दखल घेणारे बाह्यदुवे (ट्रॅकबॅक्स/पिंगबॅक्स)

 1. वेब ब्राउजर | सौ नेहा टकले - […] तोंड ओळख […]

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME