वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

व्हेज मान्चुरिअन

७ प्रतिक्रिया

चायनीज फूडला आपण व ते आपल्याकडे आता चांगलेच रूळलेत. गाडीवरचे असो किंवा चांगल्या हॉटेल मधले असो, प्रत्येकाची स्वत:ची खासियत आहे. इथे जागोजागी चायनीज जॉइंट्स आहेत. पण इथले-अमेरिकेत मिळणारे  चायनीज एकतर गोडाकडे झुकणारे किंवा तिखट करा म्हटले की हमखास आंबटढोक लागणारे. सुरवातीला तर आपल्याकडच्या गाडीवरच्या चायनिजच्या आठवणी काढून काढून खायचो….. 🙂  आता हळूहळू इतक्या वर्षात हेही आनंदाने खाऊ लागलोत पण मनात मात्र अजूनही ती चव रेंगाळतेच. कधीकधी फारच इच्छा झाली की मग मात्र खटाटोप करतेच. चायनीज मग ते मान्चुरिअन असो, पनीर चिली वा चायनीज राईस- न्यूडल्स काहीही करा आधीच्या तयारीलाच वेळ जास्त. प्रत्यक्ष पदार्थ पंधरा मिनिटात तयार आणि पुढच्या पंधरा मिनिटात चट्टामट्टा….. 🙂 तयारी

साहित्य:

एक मध्यम गाजर किसून, किसलेला कोबी दोन वाट्या, किसलेला फ्लॉवर एक वाटी
प्रत्येकी अर्धी वाटी मटार व मका दाणे
अर्धी वाटी चिरलेली कांद्याची पात व पातीचे कांदे
एक मोठी सिमला मिरची व एक मध्यम कांदा चौकोनी तुकडे करून
चार-पाच लाल सुक्या मिरच्या, तीन चार हिरव्या मिरच्या
दहा-बारा लसूण पाकळ्या व बोटभर आले बारीक चिरून
मशरूम्स, बेबी कॉर्न, वॉटर चेसनटस, बांबूच्या पातळ पट्ट्या ( ऐच्छिक )
एक मोठा चमचा व्हिनीगर, दोन मोठे चमचे सोया सॉस, चार मोठे चमचे तेल व तळण्याकरीता तेल
चार मोठे चमचे कॉर्न स्टार्च , तीन कप पाणी व चवीनुसार मीठ

कृती:

फ्लॉवर, कोबी, गाजर किसून घ्यावे. मटार व मक्याचे दाणे फार टचटचीत असतील तर मिनिटभर मायक्रोव्हेव मध्ये ठेवून वाफवून घ्यावेत किंवा उकळते पाणी त्यावर ओतून संपूर्ण निथळून घ्यावेत. कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी. एका भांड्यात हे सगळे घालून हाताने कुस्करून घ्यावे. मग चवीपुरते मीठ घालू पुन्हा कुस्करावे. मिठामुळे पाणी सुटेल. आता त्यात दोन चमचे लाल तिखट व दोन चमचे मैदा, एक चमचा तांदुळाचे पीठ घालून एकत्र करावे. नंतर त्यात दोन मोठे चमचे कॉर्न स्टार्च घालावे, जेणेकरून मिश्रण बांधले जाईल. मग छोटे छोटे गोळे वळून मध्यम आचेवर लालसर रंगावर तळून घ्यावेत.
भोपळी मिरची व कांद्याचे चौकोनी तुकडे करावेत. हिरव्या मिरचीचे पोट फोडून घ्यावे. बेबी कॉर्न, वॉटर चेसनटस, बांबू पट्ट्या, मशरूम्स यातले जे उपलब्ध असेल व आवडत असेल ते प्रत्येकी अर्धी वाटी चकत्या करून घ्यावे. पातीचा कांदा मुळे काढून संपूर्णच ठेवावा. लसूण व आले अगदी बारीक चिरावे. किसून अथवा मिक्सरला वाटून घेऊ नये. एका पसरट कढईत चार चमचे तेल घालून मोठ्या आचेवर ठेवावी. तेल तापले की त्यात आले लसूण टाकून मिनिटभर परतावे. त्यावर हिरव्या मिरच्या व लाल मिरच्या टाकून पुन्हा मिनिटभर परतावे. घेतलेल्या सगळ्या भाज्या आता त्यावर टाकाव्यात व पाच ते सात मिनिटे परतत राहावे. आच कमी करू नये. भाज्या अर्धवट शिजतील की मग व्हिनीगर व सोया सॉस घालावे. चवीनुसार मीठ व दोन भांडी पाणी घालून आच मध्यम करावी. झाकण ठेवू नये. साधारण पाच-सहा मिनिटात उकळी फुटली की तळून ठेवलेले गोळे घालावेत. लगेचच अर्धी वाटी गार पाण्यात कॉर्न स्टार्च विरघळवून घेऊन या मिश्रणाला लावावे व हालवत राहावे. कॉर्न स्टार्चमुळे मिश्रण थोडेसे घट्ट होऊ लागले की नीट ढवळून तीनचार मिनिटात बंद करावे. साध्या गरम भाताबरोबर, चायनीज फ्राईड राईसबरोबर किंवा नुसतेच……, आवडेल तसे परंतु गरम गरम खावे.
व्हेज मान्चुरिअन

टीपा
मान्चुरिअन चे गोळे करताना तिखट आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करावे. मिठामुळे पाणी सुटतेच तेव्हा वरून आणखी पाणी चुकूनही घालू नये. ग्रेव्हीत मीठ घालताना, गोळ्यात मीठ घातलेले आहेच व सोया सॉसमध्येही मीठ असते हे लक्षात घेऊन घालावे. नाहीतर हमखास खारट होण्याची शक्यता असते. ग्रेव्ही कोरडी हवी असल्यास कॉर्न स्टार्च लावून झाल्यावर जरा जास्त वेळ आचेवर ठेवावे. आणि जास्त पातळ हवी असल्यास त्यानुसार पाणी वाढवावे. ग्रेव्हीला जास्त तिखटपणा हवा असेल तर लाल व हिरवी मिरची जरा जास्त वेळ तेलात परतावी. अती तिखट हवे असेल तर ओली लाल मिरची दोन चमचे पाण्यात किंचितसे मीठ घालून वाटून घेऊन आले-लसणाबरोबर परतावी. ग्रेव्ही अगदी खडखडीत कोरडी हवी असेल तर अर्धा चमचा कॉर्न स्टार्च पाव वाटी पाण्यात कालवून मिश्रणाला लावून मोठ्या आचेवर परतून लागलीच वेगळ्या भांड्यात काढून घ्यावे. मान्चुरिअन उरल्यास पुन्हा खाताना अर्धी वाटी पाणी घालून उकळी आणून खावे. कॉर्न स्टार्चमुळे खूपच घट्ट झालेले असते.

संबंधित लेखन

 • तो सुप्रसिद्ध केक…
  गाजराचा केक..साधं जेवणही बनवताना चाचपडणार्‍या माझ्यासारख्या व्यक्तीला बेकिंग जमावं म्हणजे ही पाकक…
 • चविने खाणार गोव्याला…
  सगळ्या मस्त्याहारी लोकांना गोवा म्हणजे जीव की प्राण असतं   कदाचित म्हणुनच माझं पण  फेवरेट शहर आहे…
 • खारे व मसाला शेंगदाणे
  समुद्रकिनारी गेल्यावर ती चिरपरिचित सेंगचना ची हाक आली नाही असे कधी तरी होईल का? आमच्या चाळीत तर श…
 • ११८ वर्षांची गणेशोत्सव परंपरा………….
  दगडूशेठ च्या शतकातील तीनही मूर्तींचे आजही विधिवत पूजन
   
  श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केले…
 • गोंधळ
  विष्णू कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता तेव्हा …
PG

भाग्यश्री सरदेसाई

मी भाग्यश्री. आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे. संवादाची मला ओढ आहे. मानवी मन-त्याचे विविध रंग-छटा मला नेहमीच मोहवतात. ‘तोरा मन दर्पण कहलाए भले, बुरे, सारे कर्मों को देखे और दिखाए… मी सरदेसाईज या ब्लॉगवर “भानस” नावाने लिहिते.

 1. जबरदस्त, फोटो बघुनच पाणी सुटले तोंडाला, पण बायकोला आत्ता काही करायला सांगीतले तर घेउन ये म्हणेल बाहेरुन 🙂 त्यामुळे उद्याच स्वतःहुन जाऊन घेऊन येईन म्हणतो. बर्‍याच दिवसांत ’मेन लॅंड चायना’ चे चायनीज खाल्ले नाहीये.

  फोटो आणि रेसेपी झोक्कात झाली आहे 🙂

 2. bhaanasa

  mala chinese khupach avdte, pan bavarchichya chinese sarkhi test mi ghari nahi banvu shkat. pan hi recepi try karen. thanks

  asmita

 3. mala chainese far avdte. mala manchurian baghun majya tondala pani sutle. mala tumchi recipy far avadli. tuchyakade ajun ashya changlya receipy asatil tar mala majya e-mail var send kara

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME