वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

समाज सुधारक वृत्ती

१ प्रतिक्रिया

॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥

आज परत त्या माणसाची एक ई-मेल आलेली होती. काही महिन्यापूर्वी तो मनुष्य परदेशाहून परत येऊन संस्थेमध्ये नोकरीला लागला होता. पहिल्या काही दिवसांत सर्वांशी ओळख करुन घेऊन त्याने वातावरणाचा अंदाज घेतला आणि मग त्यानंतर दररोज त्याचे संदेश यायला सुरुवात झाली. काय केले म्हणजे आपली संस्था अजून कार्यक्षम होईल याबद्दल सूचना देणाऱ्या त्या संदेशांबद्दल सुरुवातील सर्वांना थोडे कौतुक वाटले. परंतु नंतर त्याचा कंटाळा येऊ लागला. गाड्या कुठे पार्क करायच्या आणि कशा करायच्या इथपासून कँटीनच्या वेळा काय असायला पाहीजेत यावरील त्याचे मत ऐकायची कुणाची तयारी नव्हती. त्याचे म्हणणे असे होते की जर सर्वांनीच स्वतःला थोडी वेगळी सवय लावली तर सगळ्यांचेच जीवन अजून सुखदायक होईल. त्याने केलेल्या सूचना वरकरणी साध्या वाटल्या तरी लोकांना त्या अंमलात आणायला सोप्या नव्हत्या. नेहमीच्या सवयी कितीही चुकीच्या असल्या तरी त्या इतक्या अंगवळणी पडलेल्या होत्या की त्या बदलणे सोपे नव्हते. आणि त्यातून हा कोण आम्हाला बदलायला सांगणार अशी भावना होतीच! लहानपणी स्वतःला जास्त कार्यक्षम बनविण्यासाठी आपण स्वतःच्या वागण्यात सहजपणे बदल करु शकतो पण जसजसे वय वाढत जाते तसतशी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी कमी होत जाते. याला दोन गोष्टी जबाबदार आहेत. एक म्हणजे स्वतःचा अहंकार हळूहळू वाढत जातो. लहानपणी कुणीही योग्य सूचना दिली तर आपण तीचे पालन करतो. याउलट मोठेपणी, सूचना ठीक आहे पण याने स्वतः तसे वर्तन केले आहे काय? असा विचार करून आपण सूचनेपेक्षा सांगणाऱ्याची पात्रता महत्वाची ठरवितो. दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंतच्या आलेल्या अनुभवांमुळे आपली अशी खात्री झालेली असते की अमुक एक गोष्ट चांगली नसली तरी तीने काम होते! आपण जरा अकार्यक्षम असू पण दिलेले काम आपल्या हातून पार पडेल याचा आत्मविश्वास आलेला असतो. दुसऱ्याच्या सूचनेप्रमाणे वागल्यास ते कदाचित लवकर आणि कमी प्रयासात होईल पण माझ्या वर्तनानेसुध्दा ते होईल या खात्रीने आपण आपले वागणे बदलण्याचा फारसा प्रयास करीत नाही. त्या माणसाच्या सूचनांबाबतीतसुध्दा हीच वस्तुस्थिती लागू होत होती. आता त्याची ई-मेल आली की न वाचताच गाळणारे जास्त होते!!

‘ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर लगेच माउलींनी समाधी घेण्याची भाषा का केली? याउलट सगळीकडे फिरुन त्यांनी स्वतःला झालेल्या ज्ञानाचा प्रसार केला असता तर समाजात किती सुधारणा झाली असती.’

जेव्हा आपण एका ठिकाणी नवीन आलेलो असतो तेव्हा आपल्यामध्ये त्या जागेच्या भल्याकरीता कष्ट करायची तयारी असते. उदाहरणार्थ, नवीन जागेत गेल्यावर कुटुंबातील सर्वांनाच घर स्वच्छ ठेवण्याचा उत्साह असतो. पण काही वर्षांनंतर त्या घराची अवस्था आपोआप आधीच्या घरासारखीच होते! संत समाजात बदल घडवावयाच्या धडपडीत पडत नाहीत कारण ते या जगाला अनादीकाळाच्या इतिहासासकट ओळखत असतात. गीतेमध्ये चवथ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ‘तत्वज्ञानाचा हा उपदेश मी विवस्वताला केला होता आणि त्यापासूनच स्वधर्म म्हणजे काय हे लोकांना माहित झाले’. समाज सुधरविण्याची भाषा करणारे या जगात नवीन आलेले असतात. संतांचे अस्तित्व अनादिकाळापासून असल्याने त्यांना या वरकरणी दिसणाऱ्या गोंधळातही एक सूत्र दिसत असते, एकसंधता स्पष्ट होत असते. एका ठराविक गोष्टीला चांगले करण्याच्या नादात समाजाचा तोल बिघडतो याची पूर्ण जाणीव त्यांना झालेली असते. स्वतःच्या ज्ञानाचे वाटप ते जरुर करतात पण नको तिथे नाही. बागेत उमललेल्या फुलासारखे ते एका ठिकाणी स्तब्ध राहतात आणि त्यांच्या अस्तित्वाचा सुगंध आपोआप पसरतो. ज्या भुंग्यांना त्या सुगंधाची जाणीव होते ते स्वतःच त्यांच्याजवळ जाऊन तहान शमवितात. ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर फूल उमललेले होते. आता भुंगे आपणहून येतील याची पूर्ण खात्री असल्याने महाराजांना देहत्याग करण्याबाबत विशेष वाटले नाही.

संबंधित लेखन

PG

श्रीधर इनामदार

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब माधवनाथ सांगवडेकर, कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली.
माझे मराठीमंडळीवरील लिखाण प्रख्यात तत्ववेत्ते श्री. जे. कृष्णमूर्ती यांच्या Commentaries On Living या नावाच्या तीन पुस्तकांनी स्फुरलेले आहे. ही पुस्तके आपण जरुर वाचावीत.

  1. बरोबर आहे. म्हणूनच ज्ञानोबांनी संपुर्ण आळंदीच्या डोक्यावर हात ठेवून सर्वांचाच उद्धार केला नाही. “आपुला तो गळा, घेई उगवोनी” हे जवळपास सर्वच संतांच सूत्र दिसते.
    ज्ञानोबा एके ठिकाणी म्हणतात “प्रथम स्वरूपसमाधान । पावोनी ठेला अर्जुन । मग सवेंचि उघडी लोचन । तव विश्वरूप देखे ॥”

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME