वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

आमच्याबद्दल

कोणी मेकॅनीकल, कोणी संगणक तज्ञ कोणी ग्राफीक्स तर कोणी अजुन कोण. सर्व जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे. पण सर्वांमध्ये एका गोष्टीचे साम्य आणि ते म्हणजे मराठी बद्दल प्रचंड आदर आणि मराठीतून लेखन करण्याची आवड. ह्या एका गोष्टीमुळेच प्रत्येकाचे स्वतंत्र असे मराठीतून ब्लॉग होते, आहेत.

हळू हळू असे लक्षात येऊ लागले की आपल्यासारखेच हजारो आहेत. ह्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असं म्हणतात की ‘गर्दीचा कुठला चेहरा नसतो’. पण मराठी भाषेने झपाटलेल्या काही तरूणांनी हेच वाक्य खोटं करुन दाखवण्याचा ध्यास घेतला. आपण मराठी ध्येयवेड्यांना एकत्र करुन ह्या गर्दीला एक चेहरा द्यायचा..

ध्येय सांगायला तसे अगदी सोप्पं, एका वाक्यातले उत्तर, पण त्याची व्याप्ती खूप मोठ्ठी… मराठी साहित्य आजपर्यंत दृक्‌, श्राव्य आणि लिखित स्वरूपात उपलब्ध होत आले. बदलत्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ब्लॉगिंगच्या रूपाने या तीनही अंगांचा समावेश असलेला अतिशय परिणामकारक वाङमय-प्रकार प्रसृत झाला. एकेकाळी छोटे रोपटे असलेल्या ह्या ब्लॉग्जचे काही वर्षांतच मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले. मराठी भाषिकही ह्या प्रकारापासून मागे कसे रहातील? आणि मग बघताबघता अनेक मराठी ब्लॉग्ज स्थापन झाले. आजच्या तारखेला कमीत कमी १५ हजारांच्या वर मराठी ब्लॉग्स महाजालावर उपलब्ध आहेत. ह्या ब्लॉग्सच्या रुपाने अनेक कथा, कविता, दैनंदिन घटनांवर भाष्य करणारे लेख वाचकांना वाचायला उपलब्ध झाले. ब्लॉग ह्या व्यासपीठाची शक्ती एवढी आहे की जगाच्या एका कोपऱ्यात प्रसिद्ध झालेले लेख जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातील वाचकाला काही सेकंदात उपलब्ध होऊ लागले.

अर्थात हे सर्व ब्लॉगर आपल्या-आपल्या ब्लॉगवर कार्यरत होते.  मराठी भाषेचा विकास आणि प्रचार घडवून आणण्यासाठी, त्याचबरोबर काही सुयोग्य कार्य घडवून आणण्यासाठी ह्या सर्वांना एकत्र करणे गरजेचे होते. आणि ह्याच विचाराने प्रेरित होऊन “मराठी मंडळी”ची स्थापना झाली. त्या अर्थाने ही चळवळ तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

आता तुम्ही म्हणाल चळवळ म्हणजे नक्की करायचे काय?

आता असं बघा, महाजालावर मराठी भाषेतून अशी कितीशी माहीती उपलब्ध आहे. कित्तेक शब्द, म्हणी, शिवाय इतर साहित्यप्रकार आपल्या दैनंदिन बोलीतून, लेखनातून नि वाचनातून आणि परिणामी भाषेतून हद्दपार होत चालले आहेत. आपली भाषा मराठी न रहाता ‘मिंग्लीश’ झाली आहे. हे शब्द, ह्या म्हणी, हे वाक्प्रचार, हे साहित्य इत्यादी आपण जपले नाहीत तर ते आपल्या पुढच्या पिढीला कसे कळणार?

मराठी विकिपीडिया अजूनही काहीसा बाळबोध स्थितीत आहे. या उपक्रमाबरोबरच तोसुद्धा आपण सर्वजण मिळून समृद्ध करू शकतो.

आपल्या लहानपणी वाचलेला आपला सर्वांचा लाडका ‘फास्टर फेणे’ तसं पाहीला तर मराठी कथांमधील शेवटचा मुलांचा हिरो होता. त्यानंतर असा हिरो जन्माला आलाच नाही. आपल्यातीलच काही ब्लॉगर मिळून असा नवीन हिरो नाही का निर्माण करू शकणार ज्याला आपली मराठी बाल मंडळी आपलंसं करतील?

अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या आपण एकजुट होऊन पार पाडू शकतो.

एका सुनियंत्रित व्यवस्थेसाठी आपल्यातलेच काही असे आम्ही पुढाकार घेतो आहोत. पण अपेक्षा आहे आपणा सर्वांच्या हार्दिक सहभागाची, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची!

PG

विक्रांत देशमुख

मी एक चिमुकलं रानफुल…रंग,रूप,गंध नसलेलं… दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं… त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला… रुतुराज आज वनी आला’.


Powered By Indic IME