वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

हत्तींचे संवादकौशल्य

१५ प्रतिक्रिया
हत्तींचे संवादकौशल्य

हत्तींचे संवादकौशल्य

हस्त नक्षत्र लागले की हत्तीची प्रतिमा पाटावर रेखून त्याच्याभोवती फेर धरत ”ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडिला करीन तुझी सेवा…..” अशी हादग्याची किंवा भोंडल्याची गाणी म्हणणे हे महाराष्ट्रातील स्त्री संस्कृतीचे अविभाज्य अंग! गणेशोत्सवात गजाननाची मनोभावे पूजा-अर्चा करून प्रत्येक मराठमोळ्या घरात विघ्नहर्त्या गणपतीला सादर वंदन केले जाते. हत्ती हा बालगोपालांचा विशेष आवडता प्राणी. कधी ओवीत, कधी अभंगांत, कधी दोह्यांमध्ये, कधी पोथ्या पुराणांमध्ये तर कधी सुभाषितांमध्ये हत्तीविषयीची, त्याच्या स्वभावधर्माविषयीची माहिती पुढे येत राहते. तसेच त्याचे भारतीय संस्कृतीशी असलेले अतूट नाते वैदिक ग्रंथांपासून ते अगदी आताच्या नवकाव्यांपर्यंत साहित्य, कला, शास्त्रांतून आणि विविध माध्यमांतून अधोरेखित होत जाते. हत्तीच्या गुणवैशिष्ट्यांचा वापर करून रचलेली ही काही सुभाषिते त्याचेच प्रतीक म्हणता येतील.

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते
शुष्कैस्तृणैर्वनगजाः बलिनो भवन्ति ।
कन्दैः फलैर्मुनिवराः क्षपयन्ति कालम्
सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम् ॥

साप हवेवर जगूनही दुर्बल नसतात. हत्ती वाळलेले गवत खाऊनही बलवान होतात. संन्यासीजन कंद-मुळे, फळे खाऊन निर्वाह करतात. अशा प्रकारे संतोष ही मनुष्यप्राण्याला मिळालेली सर्वात मोठी संपत्ती आहे.

लाङ्गूलचालनमधश्चरणावपातं
भूमौ निपत्य वदनोदरदर्शनं च |
श्वा पिण्डदस्य कुरुते गजपुंगवस्तु
धीरं विलोकयति चाटुशतैश्च भुङ्क्ते || – हितोपदेश

येथे हत्ती व कुत्र्याच्या वर्तनातील फरक सांगितला आहे. अन्न दिसताच कुत्रा उताणा पडून, शेपूट हालवून, चेहरा दीनवाणा करून व पायात घोटाळून अन्न देणाऱ्या व्यक्तीच्या पुढे-मागे करतो. पण हत्ती मात्र (अन्न समोर आल्यावरही) त्याची अविचलता वा मानीपण त्यागत नाही. माहुताला त्याच्याशी गोड बोलून त्याला खिलवावे लागते. आपण कुत्र्यासारखे वागायचे की हत्तीसारखे, हे आपणच ठरवायचे.

हत्ती हा प्राणी हजारो-लाखो वर्षांपासून भारताच्या भूमीवर नांदत आहे. उत्खननांत मिळालेल्या लाखो वर्षांपूर्वीच्या हत्तीच्या अश्मास्थी, गुंफाचित्रे, शिल्पे, उत्खननांत आढळलेल्या मुद्रा, नाणी, प्रतिमा इत्यादींवर हत्तीची रेखाटने, पुराणकथा-काव्य-साहित्य इत्यादींमधून ह्याचीच प्रचीती येते.

शतकानुशतके हत्ती व माणूस यांच्यात एक सकारात्मक नाते आहे. माणसाने हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचा उपयोग अवजड वजने उचलणे,वाहून नेणे, सैन्यदळ, शोभायात्रा, वाहन म्हणून वर्षानुवर्षे केला आहे. मिथ्यक, जातककथा, पंचतंत्रादी माध्यमांतून हत्ती हा पुरातन काळापासून नागरजीवनाचा अविभाज्य हिस्सा असल्याचे लक्षात येते. भासाने लिहिलेल्या स्वप्नवासवदत्तमध्ये राजा उदयनाकडे हत्तीला वीणावादन करून आकृष्ट करण्याची विद्या अवगत होती असा उल्लेख आहे. ‘मातंगलीला’, ‘हस्तायुर्वेद’ अशा ग्रंथांमधून हत्तीच्या प्रशिक्षणाविषयी, त्याच्या आरोग्याविषयी व व्यवस्थापनाविषयी सखोल विचार केलेला आढळतो. सैन्यात हत्तीचा वापर सर्वप्रथम भारतात केला गेला असे सांगितले जाते. पूर्वीच्या राजेरजवाड्यांचे वैभव त्यांच्याकडे असलेल्या गजदळावरून तोलले जायचे. चक्रवर्ती राजाकडे बलाढ्य गजदळ असायचे. हत्तीला धर्मातही विशेष स्थान आहे. गजलक्ष्मी, ऐरावत, गणेश अशा अनेक दैवी रूपांमध्ये हत्तीची आराधना केलेली दिसून येते. लोकसाहित्यातही हत्ती वेगवेगळ्या रूपांत डोकावत राहतो. भारतीय संस्कृतीत हत्ती हे समृद्धी, सृजनशीलता, बुद्धी, औदार्य, शौर्य, मांगल्य व राजयोगाचे प्रतीक मानले गेले आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या स्वरसप्तकातील ‘नी’ किंवा ‘निषाद’ हा सुर हत्तीच्या आवाजापासून घेतला असल्याचे सांगितले जाते. अतिशय पातळ पण तरीही अत्यंत प्रभावी असा हा सूर जणू हत्तीच्या स्वरसामर्थ्याचीच प्रचीती देतो.

हत्तीच्या शरीरवैशिष्ट्यांबरोबरच तो त्याच्या भव्य गर्जनेविषयीही प्रसिद्ध आहे. त्याचे विशाल कान व सोंड यांचा वापर करून तो सूक्ष्मातिसूक्ष्म आवाज टिपतो ह्याबद्दल साहित्यात संदर्भ येत राहतात. पण आता ह्या संदर्भांना शास्त्रीय परिमाणही मिळाले आहे. आधुनिक विज्ञानाने हत्तींच्या ध्वनी-संवेदनशीलतेविषयी संशोधन करायचे ठरवले आणि अनेक वर्षांच्या तंत्रकुशल संशोधनातून कितीतरी रंजक व उपयुक्त बाबी समोर आल्या.

हत्ती हा मुळात कळप-प्रिय प्राणी… चटकन माणसाळणारा… अशा ह्या विशालकाय, सस्तन, कळप-प्रिय प्राण्याची आपल्या भाई-बांधवांशी संपर्क साधायची क्षमताही अतिशय प्रभावी व संवेदनशील आहे. केवळ ध्वनीच्या माध्यमातूनही हत्ती आपल्या कळपाशी व इतर प्राण्यांशी व्यापक संपर्क साधू शकतो. ह्या लेखात आपण त्याच्या ह्या संवादकुशलतेचीच अधिक माहिती घेणार आहोत. हत्ती आपल्या दृष्टी, गंध, स्पर्श व ध्वनी ज्ञानाचा उपयोग इतर हत्तींशी व प्राण्यांशी संपर्क साधण्यासाठी करतो. त्याला स्पंदन-लहरी देखील चटकन जाणवतात आणि त्यांचा उपयोग तो आपल्या संवाद व हालचालींसाठी करत राहतो.

ह्या अभ्यासातून हत्तीची श्रवणशक्ती व विविध ध्वनी काढण्याच्या ताकदीविषयी आश्चर्यकारक माहिती समोर येते. एकाच वेळी हत्ती एकमेकांच्या अंगाला आपले अंग घासून संवाद साधतात तर दुसरीकडे आपल्या ध्वनी-निर्मिती व श्रवणाच्या क्षमतेमुळे अगदी १० किलोमीटर्स अंतरावर असलेल्या हत्ती वा हत्तींच्या कळपाशी संपर्क साधू शकतात. त्यातून ते आपली शारीरिक स्थिती, ओळख, कामवासना, भावनिक स्थिती आणि आपल्या हेतू व इच्छांविषयी एकमेकांना कळवत असतात.

हत्तींनी दिलेले ध्वनी-संकेत हे वाऱ्यामुळे सर्व दिशांना जातात. त्यातून तो संदेश ज्यांसाठी आहे अशा प्राण्यांपर्यंत व ज्यांसाठी नाही अशांपर्यंतही जात असतो. ध्वनी-संकेत हे तात्कालिक स्थितीचे वर्णन करण्यासाठी जास्त करून वापरले जातात. त्यातही वातावरणामुळे अनेक अडथळे येऊ शकतात. पण त्यावर मात करत हत्ती आपल्या शरीररचनेचा व वेगवेगळे आवाज काढण्याच्या क्षमतेचा समर्थ वापर करून एकमेकांशी संपर्क साधताना दिसतात. त्यांची खासियत म्हणजे खर्ज स्वरांतील व दीर्घ पल्ल्यावर साधलेला संवाद.

हत्ती कोणकोणते आवाज काढू शकतात?

अतिशय खर्ज सुरातील आवाजापासून अगदी तुतारीसारख्या कर्णभेदक आवाजापर्यंत अनेक तऱ्हेचे आवाज काढण्यासाठी हत्ती प्रसिद्ध आहेत. त्यात सुस्कारे, भुंकल्यासारखे आवाज, चीत्कार, गर्जना, आक्रोश, फूत्कार आणि इतरही वैशिष्ट्यपूर्ण आवाजांच्या नोंदी आहेत. आफ्रिकन हत्ती खर्जातील सादेसाठी विख्यात आहेत.

मनुष्याच्या आवाजाशी हत्तीच्या आवाजाची तुलना करायला गेल्यास, माणसांमध्ये सामान्य पुरुष बोलताना त्याची तीव्रता साधारण ११० हर्टझच्या आसपास असते, बाईच्या आवाजाची तीव्रता साधारण २२० हर्टझच्या आसपास तर लहान मुलाच्या आवाजाची तीव्रता ३०० हर्टझच्या आसपास असते. सामान्य माणूस बोलताना साधारण एका स्वरसप्तकात बोलतो. तर गायकाच्या आवाजाची फेक दोन सप्तकांपर्यंत असू शकते. आणि हत्तीच्या आवाजाची फेक चार सप्तकांपासून दहा सप्तकांपर्यंत असू शकते! अगदी २७ हर्टझच्या खर्जातील गुरगुरीपासून ते ४७० हर्टझच्या भेदक गर्जनेपर्यंत ते लीलया आपल्या आवाजाचा वापर करतात. आणि कधी कधी तर ही फेक ५ हर्टझपासून ते १०,००० हर्टझपर्यंत जाते. आहे ना अचंबित करायला लावणारी क्षमता?

हत्ती एवढे सर्व आवाज कसे काय काढू शकतात?

अतिशय सौम्य, मवाळ आवाजापासून ते अतिशय बलशाली आवाज काढण्याच्या हत्तींच्या क्षमतेमागील रहस्य काय असावे?
उच्छ्वासाद्वारे बाहेर टाकली जाणारी फुफ्फुसांतील हवा हत्तीच्या ७.५ सें. मी. लांब असलेल्या स्वरयंत्रातून जाते. त्या गतिमान हवेमुळे स्वरयंत्राच्या तारा स्पंदित होतात व त्यावेळी हत्ती जशा प्रकारचा आवाज काढत असेल त्या त्या तीव्रतेने त्यांचे स्पंदन होते. स्वरमार्गातील विविध घटकांचा (जसे की सोंड, मुख, जीभ, कंठ, घशाजवळची पिशवी) उपयोग करून, त्यांची विशिष्ट स्थिती ठेवून हत्ती आवाजाची तीव्रता कमी-जास्त करतो.

हत्तींचे काही आवाज त्यांच्या मस्तकाच्या व कानाच्या हालचालीशी संबंधित आहेत. आपल्या विशालकाय शरीराचा उपयोग ते अत्यंत खर्जातील आवाज काढण्यासाठी करतात. एखाद्या वाद्यामध्ये ज्याप्रमाणे तारा जितक्या लांब, मोकळ्या-सैल असतील व आवाज घुमण्याची जागा मोठी असेल तर खर्जातील खर्ज आवाज काढता येतो त्याचप्रमाणे हत्तींचे आहे. त्यांना आपल्या आंतरिक अवयवांच्या हालचालींवर वेगवेगळ्या प्रकारे नियंत्रण साध्य करून आपल्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी पटींनी खर्जातील आवाज काढणे सहज जमते. सोंडेचा आकार, लांबी, जीभेच्या तळाशी असलेल्या अस्थिसमूहाची रचना इत्यादींमुळे त्यासाठी साहाय्यच मिळते.

हत्ती सर्वात जास्त कोणत्या प्रकारचा आवाज काढत असतील तर तो आहे गुरगुरण्याचा, गडगडाटासारखा आवाज. अनेकदा हा आवाज सामान्य मनुष्याच्या श्रवणक्षमतेच्या एक ते दोन सप्तके खाली असतो. आणि तार सप्तकातील आवाजापेक्षा हा खर्जातील आवाज लांब पल्ल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतो. हत्तींचा कळप अनेकदा १०० मीटर्सच्या क्षेत्रफळात पसरलेला असतो आणि त्यांच्या इतर आप्तस्वकीयांचे कळप अनेक किलोमीटर्सच्या अंतरापर्यंत विखुरलेले असतात. परंतु खर्जातील बलशाली आवाजांमुळे हत्ती एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. तसेच खर्जातील आवाज वाटेतील झाडे, गवत, वृक्षराजीने विकल होण्याचे प्रमाण कमी असते. ह्या खर्जातील सादेने एक हत्ती दुसऱ्या हत्तीचे आपल्यापासून किती अंतर असेल ह्याविषयी अंदाज बांधू शकतो. गेल्या काही वर्षांतील संशोधनातून पुढे आले आहे की हत्तींचा खर्जातील आवाज जमीनीतूनही प्रवास करतो. तसेच त्यांच्या मस्तकाच्या विशाल आकारामुळे, एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत असलेल्या अंतरामुळे त्यांना आवाजाची दिशा, स्थान चटकन कळू शकते.

दृष्टी-संवाद

दृष्टीच्या माध्यमातूनही हत्ती एकमेकांशी व इतरांशी संपर्क साधतात. त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग, जसे, सोंड, कान, मस्तक, शेपूट, सुळे, तोंड, पाठ, पाय आणि आपल्या संपूर्ण शरीराचा वापर ते संवाद साधण्यासाठी किंवा संकेत देण्यासाठी करतात. उदाहरणार्थ, एखादी दादागिरी करणारा हत्तीण असेल तर ती आपले शरीर इतरांपेक्षा मोठे असल्याचे भासवते, डोके उंच ठेवते व कान फैलावते. त्याचवेळी जो कळपातील दुय्यम दर्जाचा हत्ती असतो तो आपले मस्तक खाली ठेवतो आणि त्याचे कान शरीरालगत, मागच्या बाजूस वळलेले असतात. घाबरलेला किंवा उत्तेजित हत्ती आपली शेपटी व हनुवटी हवेत उंचावतो. एकमेकांना भेटल्यावर उत्तेजित झालेला हत्ती त्याचे कान सतत फडकवत राहतो व डोळे विस्फारतो.

हत्तींची दृष्टी त्यामानाने तेवढी तीक्ष्ण नसते. मंद प्रकाशात त्यांना चांगल्यापैकी दिसते. परंतु प्रखर प्रकाशात त्यांची नजर त्या मानाने दुबळी असते. अर्थात कधी कधी ते प्रखर प्रकाशातही चांगल्या प्रकारे पाहू शकत असल्याचे पुरावेही पुढे आले आहेत. तसेच आपल्या नजरेला न पडणाऱ्या गोष्टीही ते टिपू शकतात. उदाहरणार्थ, जेव्हा एक हत्ती दुसऱ्या हत्तीला धमकावतो तेव्हा तो आपल्या कानाचा खालचा भाग आत मुडपतो. कानाची एक प्रकारे घडीच घालतो म्हणा ना! माणसाच्या नजरेला ही गोष्ट चटकन येत नाही. संशोधकांनाही ही गोष्ट आठ वर्षांच्या संशोधनानंतर लक्षात आली. इतरांवर हुकुमत गाजवणारा हत्ती जेव्हा जेव्हा अशी कानांची घडी घालायचा तेव्हा तेव्हा दुय्यम दर्जाचा हत्ती आपोआप मागे सरकायचा किंवा दुसरीकडे नजर वळवायचा. जी हालचाल टिपायला शास्त्रज्ञांना दुर्बिणीची गरज भासली तीच हालचाल कळपातील इतर हत्ती सहज पाहू शकत होते!

गंध – रसायन संकेत

हत्ती आपल्या सोंडेचा व सोंडेच्या अग्राचा वापर आजूबाजूचे अनेक गंध टिपण्यासाठी करत असतात. हवेत आपली सोंड उंचावून ते अनेकदा हवेला हुंगताना दिसतात. तसेच सोंडेच्या अग्राचा वापर ते जमीन हुंगण्यासाठी (खास करून मूत्र उत्सर्जित केलेले ठिकाण, मूत्रावरून माग आणि विष्ठा विसर्जन यांसाठी) तसेच इतर हत्तींचे मस्तक, गुह्यांगे वा मुख हुंगण्यासाठी करतात. हे रासायनिक संकेत जास्त काळ टिकणारे व हत्तींच्या ऊर्जेची बचत करणारे असतात. मूत्र, विष्ठा, लाळ, मद (मस्तकातून व कानांतून पाझरणारा स्राव) यांचा ह्या गंध-संकेतांसाठी वापर केला जातो. हत्तींची घ्राणशक्तीही अतिशय तीव्र व संवेदनशील असते हेही आता अनेक प्रयोगांतून सिद्ध झाले आहे.

स्पर्श – संवाद

हत्ती हे अतिशय स्पर्श-प्रिय प्राणी आहेत. ते एकमेकांना जाणूनबुजून स्पर्श करत राहतात. त्यासाठी ते आपल्या सोंड, सुळे, कान, पाय, शेपूट, एवढेच नव्हे तर सर्व शरीराचा वापर करतात. त्या स्पर्शातून ते एकमेकांना अनेक संदेश देत असतात. कोण वरचढ आहे हे दाखवणे, कोण कनिष्ठ – दुय्यम आहे, आक्रमक, अनुमोदनात्मक, कामुक, खोडकर, आस्थादर्शक आणि चाचपणी करणारे असे अनेक प्रकारचे हे स्पर्श-संकेत असतात. आपल्या सुळ्यांचा वापर ते दुसऱ्या हत्तीवर आक्रमण करतानाही करतात, पिल्लाला चिखलातून अलगद बाहेर काढतानाही करतात व एकमेकांना अभिवादन करताना आपली एकी दाखवण्यासाठीही करतात. आपले कान दुसऱ्या हत्तीच्या कानाला घासण्यातून त्यांचा खोडकर – खेळकरपणा किंवा स्नेह प्रकट होतो. तर आपल्या शेपटीचा वापर ते दुसऱ्याला फटकारण्यासाठी किंवा हळुवारपणे पिल्लू सोबत आहे ना हे चाचपण्यासाठी करतात. सोंडेचा वापर पिल्लाला कुरवाळण्यासाठी, धीर देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी केला जातो. तसेच आपल्या कुटुंबातील सदस्याचे मुख, गुह्यांग वा मस्तक हुंगण्यासाठीही सोंड वापरली जाते. मृत हत्तीच्या शरीराला स्पर्श करण्यासाठी, त्याचे शरीर चाचपण्यासाठीही सोंड वापरतात. खेळात एकमेकांना स्पर्श करण्यासाठी किंवा ढकलण्यासाठीही सोंड कामी येते. आक्रमक किंवा बचावात्मक वर्तनात हत्ती आपली सोंड फटकारण्यास, मार्ग अडवण्यास किंवा वन्य श्वापदाच्या हल्ल्यात एकमेकांना आश्वस्त करण्यास वापरतात. मैथुनातही आपल्या सोंडेचा वापर ते आपल्या जोडीदाराला स्पर्श करण्यासाठी, चाचपणीसाठी, त्याच्या हालचाली नियंत्रित करण्यासाठी वापरतात.

हत्ती आपल्या पायांचा वापर आक्रमकपणे किंवा खेळकरपणे लाथा मारण्यासाठी करतात. तसेच एकमेकांना चाचपायला, कुरवाळायला व मदत करायलाही पायांचा वापर केला जातो. आणि आपल्या सर्व शरीराचा वापर ते एक-दुसऱ्याला ढकलण्यासाठी, एकमेकांशी मैत्र भावनेने अंग घासण्यासाठी वा हत्तीणीला मैथुन हेतूने ढकलण्यासाठी करतात.

हत्तीच्या प्रत्येक हालचालीतूनही तो वेगवेगळे संकेत देत असतो. उदाहरणार्थ चिडलेला हत्ती अंगावर धावून जाणे, कानांना फ़डकवणे, लाथेने धूळ उडविणे, सोंड उंचावणे, सोंड मुडपणे, मस्तीत चालणे अशा अनेक हालचाली सांगता येतील. त्यातून तो अनेक संकेत देत असतो. हत्तीच्या ह्या हालचाली, त्याचे आपल्या कळपातील इतर हत्तींशी वर्तन, संवाद इत्यादींमधून हत्तींची ही शब्दविरहित भाषा जाणून घेण्याचा शास्त्रज्ञ आजही प्रयत्न करत आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये हत्तींनी गावांत, शेतांत घुसण्याच्या बऱ्याच घटना झाल्या. मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड, वनांमध्ये माणसाचे अतिक्रमण, प्रदूषण, शिकार, तस्करी अशा अनेक गोष्टींमुळे आज भारतातील हत्तीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एकविसाव्या शतकाच्या आरंभाचे वेळीस आशियायी हत्तींची संख्या एका गणनेनुसार फक्त दोन लाख होती. पर्यावरण अभ्यासक हीच संख्या आता पस्तीस ते चाळीस हजार उरली असावी असा अंदाज व्यक्त करतात. व्यापक शहरीकरण झाल्याने हत्तींचे वसतीस्थान असलेली जंगलेच नष्ट होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वनक्षेत्रे ओलांडून जंगली हत्तींचे कळप गावांत येऊन नासधूस, संहार करू लागले आहेत. हत्तींशी मैत्र साधून त्यांचे नैसर्गिक पुनर्वसन करण्यासाठी जंगलतोड थांबवून जास्तीत जास्त वृक्षसंवर्धन केले पाहिजे. तसेच तस्करी, शिकारीच्या विरोधात व्यापक जनजागृतीही आवश्यक आहे. अतिशय बुद्धिमान, बलशाली व भारताचे वैभव असलेल्या ह्या गजांतलक्ष्मीची जोपासना करून निसर्गाचा समतोल साधणे ही फक्त शासनाचीच नव्हे तर आपणां सर्वांची जबाबदारी आहे हे मात्र नक्की!

[ माहिती स्रोत : आंतरजाल व अन्य स्रोत | फोटो: विकिपीडिया]

संबंधित लेखन

PG

अरुंधती कुलकर्णी

सहज सुंदर आयुष्याचा घेते चांदणझोका |
या रसिकांनो रंजक वेधक गोष्टी माझ्या ऐका ||

नमस्कार, मी अरुंधती कुलकर्णी. आपण मला माझ्या इरावती या ब्लॉगवरही भेटु शकता.

  1. अतिशय सहज सुंदर माहिती
    इरावतीताई धन्यवाद

  2. मी पुणेकर, आपल्या प्रतिसादाबद्दल आभार! 🙂

  3. शेटे भाऊ, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙂

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME