वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

होळी….

३ प्रतिक्रिया
होळी....

होळी….

आज होळी. मी रंगांचे दुष्परिणाम, किंवा लाकडं जाळण्यामुळे होणारी निसर्गाची हानि, किंवा ग्रिन हाउस इफेक्ट बद्दल लिहायचं नाही असं ठरवलंय.. कारण हेच विषय बऱ्याच ब्लॉग वर वाचुन झालेत.

माझ्या मुलींना माझ्या लहानपणच्या गोष्टी ऐकायला खुप आवडतं. आजी इथे आली की आजी कडून फक्त ’बाबांच्या गोष्टी’ सांग म्हणुन मागे लागतात. कदाचित वेगळं वातावरण, वेगळंच काहितरी अगदी गोष्टीतल्या सारखं ऐकायला बरं वाटत असेल.तर अशाच काही गोष्टींपैकी ही एक गोष्ट.. माझ्या लहानपणची होळी….इथे जे काही लिहिलंय ते म्हणजे आमची होळी कशी असायची ते…

त्या मधे काय चुक अन काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करु नये. आमचं लहान पण म्हणजे साधारण ३०-३२ वर्षापुर्वीचे  दिवस आणि आत्ताचे दिवस यात खुपच फरक आहे त्यामुळे काही घटना काल बाह्य वाटतिल.

यवतमाळ ! होळी चा दिवस जसा जसा जवळ येउ लागायचा , तसा तसा आम्हाला होलिकाज्वर चढणं सुरु व्हायचं.२ ते ३ आठवडे आधिपासुन होळीची तयारी चालायची. आमच्या घराशेजारी खुप झाडं होती. कुऱ्हाडी घेउन झाडांच्या फांद्या तोडणं सुरु व्हायचं. मोठी मुलं मोठ्या झाडांवर कुऱ्हाडी चालवायच्या, तर लहान मुलं अगदी सिताफळाच्या झाडांच्या ( जे नॉर्मली कंपाउंडला लागुन असायचे)फांद्या तोडाचे. कुऱ्हाडीने तोडतांना एक लयबद्ध आवाज आला, की मग ज्याचं झाडं तोडणं सुरु असेल तो धावत येउन तोडणाऱ्या मुलांवर डाफरायचा.

आमच्या इथे कुंटे म्हणुन आजी रहायच्या. त्या एकट्य़ाच होत्या. मुळ कोंकणातलं पण विदर्भात लग्न करुन आलेल्या . वय अंदाजे ७५ च्या वर. मुलं लाकडं तोडायला आली की मग त्या शिव्या द्यायच्या…”मेल्या रांडीच्च्यांनो…. वगैरे वगैरे” कोंकणी शिव्यांची लाखोली वहायच्या.ह्या सगळ्या शिव्या पण आम्हाला नविनच ना, त्या मुळे  त्यांच्या तोंडुन शिव्या ऐकायला मिळाव्या  म्हणुन मुद्दाम त्यांच्या झाडांवर कुऱ्हाड चालवायचे आणि एक मुलगा साळसुदपणे त्यांना जाउन सांगायचा की मुलं झाडं तोडताहेत. मग काय..आजी बाहेर येउन शिव्या देणे सुरु करायच्या.. अगदी ठेवणितल्या .. की त्या आत इथे लिहिता येणे शक्य नाही…. त्यांच्या शिव्यांचा कधिच राग आला नाही, उलट त्यांना शिव्या द्यायला आम्हीच प्रवृत्त करायचो.. खुप छान होत्या त्या आजी स्वभावाने तशा..

घरासमोरच पारगांवकर देशमुखांचा एक जुनाट बंगला होता, की ज्या मधे कोणिही रहात नव्हतं. त्याच्या आसपास तर भरपुर झाडं होती. मला आठवतं ,एकदा शाम्या जोशीने ( आर्टीस्ट, मुर्तीकार, सर्प मित्र, आणि बरेच काही करतो आता हा, पण लहान असतांना वात्रट पणाचा कळस होता शाम्या म्हणजे ) एक पिंपळाच्या झाडाचे चांगले २ फुट व्यास असलेले मोठ्ठं खोड तोडलं होत. नंतर होळिमधे ते जवळपास २ दिवस जळत होतं.

इथे तुम्हाला सगळ्यांना हे समजुन घेतले पाहिजे की त्या वेळी टिव्ही नावाची आपत्ती नव्हती , त्यामूळे करमणुकी साठी मित्रांमधे उंडारणे हाच एक उद्योग असायचा.एकदा संध्याकाळी घरी आलो की मग दप्तर फेकायचे आणि  ( कपडे बदलणे हा कन्सेप्ट नव्हता, आज साकाळी घातलेले कपडे दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळिच्या वेळेसच उतरवले जायचे) बाहेर पडायचे. होळी आली की नेहेमीच्या खेळण्यापासुन वेगळं काहीतरी करायला मिळायचं म्हणून खूप मज्जा यायची. लाकडं गोळा करणं हे पण एक प्रकारचा खेळच होता.

लाकडं तोडतांना प्रत्येकाची नजर असायची एखाद्या घानमाकड बनवायला उपयोगी असणाऱ्या खोडाकडे.घान माकड म्हणजे एका सेंटर पिव्हॉट वर ( पिव्हॉट म्हणजे पण चांगलं कडक वाळलेलं लाकडाचा खांब ( ज्याला आम्ही बल्ली म्हणायचो. ही सागवानाचीच कोणाच्या तरी कंपाउंड्ची चोरुन आणलेली असायची). तर हा खांब जमितित गाडून त्यावर एक ( अळी चालतांना कशी दिसते? आपलं अंग आक्रसुन घेत्ल्यावर.. तशा आकाराचं एखाद खोड घेउन त्याला जमिनित गाडलेल्या खांबावर मध्यभागी सपोर्ट दिला जायचा. मग दोन टॊकांवर दोन मुलांनी बसलं की मेरी गो राउंड सारखं  त्याला फिरवता यायचं. होळी पेटवली की मग लहान मुलांना मेरी गो राउंड प्रमाणे त्यावर बसवुन फिरवलं जायचं.. फिरवणं सोपं व्हावं म्हणुन सेंटर पिव्हॉट ला शामबाबुच्या गॅरेजमधलं ग्रिस आणुन लावलं जायचं. मग कोणितरी लहान मुलगा पडुन रडणं सुरु होई पर्य़ंत हा खेळ चालायचा. नंतर मोठी मुलं  पण  ह्यावर ते लाकुड तुटेपर्यंत खेळायचे.अर्थात हे काही फार वेळ चालत नसे, थॊड्याच वेळात लाकूड तुटलं की होळीमधे फेकुन दिलं जायचं.

होळी रे होळी पुरणाची पोळी सायबाच्या गांडिवर बंदुकिची गोळी म्हणत बोंब मारणे हा एक आवडिचा उद्योग होता.  या दिवशी तुम्ही कशाही बोंबा मारलया तरीही कोणी काही म्हणत नसे.

रात्रिचे १२-१ वाजला की मोठी मुलं सिग्रेट्स वगैरे आणायची.. सिग्रेट म्हणजे तेंव्हा ५ नविन पैशाला पिवळा हत्ती नावाची सिग्रेट मिळायची. मोठी मुलं एकच सिग्रेट १०-१२ जण एक एक कश मारायचा. आम्ही लहान मुलं पण मागे लागायचो…..! अर्थात आम्ही मोठं म्हणजे चिंचेच्या झाडावर चढुन बसण्याइतकं होई पर्यंत सिग्रेट काही ओढली नव्हती.

विषयांतर करतोय.. तर माझी पहिली सिग्रेट!! होळिचेच दिवस होते, एक दिवस मस्करीमधे सिग्रेट ओढायचि का आप्ण? असं कोणिसं म्हंटलं.. कोण ते आठवत नाही.. अर्थात आमची पण इच्छा होतीच.. कोणितरी ५ पैसे काढले. पानवाल्याच्या गादिवर गेल्यावर सिग्रेट मागायची कशी? कोणी पाहिल तर? शेवटी घरापासुन दुर म्हणजे २ किमी अंतरावरच्या पान टपरिवरुन एक पिवळा हत्ती आणला एकदाचा ! बरं आता सिग्रेट ओढायची कुठे? कोणी पाहिल तर? शेवटी  आमच्या घराच्या मागचं चिंचेचं झाड जरा दाट होतं. जवळ जवळ २ झाडं होती आणि फांद्या पण एक्मेकांत मिसळलेल्या होत्या. तेंव्हा एका झाडावर चढलो आम्हीसगळे आणीएकदाची सिग्रेट पेटवली. त्या सिग्रेटला फिल्टर नसल्यामुळे  तोंडाकडला भाग एकदम ओला झाला होता, तरी पण सगळ्यांनी एकेकदा धुर काढला आणि बस्स! एकदाचं आपणही आता मोठं झालो… हे जाणवलं..

की आपण मोठं झालो हेच दर्शविण्याच्या साठीच तर ती सिग्रेट ओढली नसेल ना?

तर अशी रात्री होळी पेटवली जायची. रात्री २ च्या सुमारास मग एक रात्र फेरी व्हायची. कोणाच्या घराबाहेर जे काही लाकडी सामान पडलेले असेल ते ( मोडक्या खाटा, मोडकी दारं, कंपाउंड ची लाकडं इत्यादी.. ) होळिला स्वाहा व्हायचं.दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र नुसती बोंब असायची..

होळी म्हणजे मार्च चा महिना, ह्या महिन्यामधे पळसाची सुंदर फुलं बहरलेली असतात. आम्ही १५ दिवस आधी पासुनच फुलं गोळा करणं सुरु करायचो. यवतमाळ गावाशेजारिच बरेच जंगल होतं आणी पळस तर खुपच होते. ही फुलं वाळवून ठेवली जायची, रंग बनवायला. मग होळिच्या आदल्या दिवशी  थोड्या पाण्यामधे ही फुलं खुप उकळली की ह्यांचा सुंदर केशरी रंग तयार व्हायचा. तो रंग नंतर इतर रंगांबरोबरच वापरला जायचा.

holi1रंग खेळण्यासाठी अधिर लहान मुलं लवकर बाहेर पडायची. आमच्या सारखी पौगंडावस्थेमधिल मुलं मात्र सकाळी ९ नंतर बाहेर पडायची. आमच्या इथे एक पध्द्त होति, सकाळि निघालं की एका मित्रा कडे जायचं तिथे खाणं झालं की दुसरा मित्र असं करता करता पुर्ण टोळकं तयार व्हायचं . मग शामरावच्या गॅरेजमधल्या पाण्याच्या मोठ्या टाकी मधे मधे रंग मिसळुन  त्यात जो दिसेल त्याला बुडवायचं असा प्रकार चालायचा.रंग संपला की कारच्या सायलेन्सर मधली काजळी + ऑइल किंवा ग्रिस एकत्र करुन एक मेकाला फासणे हे पण चालायचं. रंग खेळणं म्हणजे एक नशाच असायची… गेले ते दिवस.. आता कोणितरी कॉलनितला एखादा भैय्या येतो घरी अन गुलाल लाउन जातो.. बस्स! झाली होळी.

रंग खेळण्याचा कंटाळा आला की मग मात्र इतर उद्योग सुरु व्हायचे. जसे एखादे गाढव पकडुन त्याच्यावर एखाद्याला बसवुन, समोर पत्र्याचा डबा वाजवत गांवभर हिंडणे सुरु व्हायचे. आमच्या शाम्याने एक नविन शोध लावला होता, पेट्रोल चा थेंब कुत्र्याच्या गुदद्वारास लावला, की तो जीव खाउन पळत सुटतो.. ( पेटा वाल्यांनो कृपया इकडे लक्ष देउ नका) तर , पेट्रोलची तर कमतरता नव्हतीच.. कर्टसी शामबाबु गॅरेज.. बस्स! रस्त्याने फिरणारे कुत्रे पकडुन त्यांच्या  गुदद्वाराला पेट्रोल चा थेंब ( कापड भिजवुन ते नुसतं टेकवलं, तरी पुरेसं व्हायचं)लाउन ते कुत्रं पळायला लागलं की त्याच्या मागे धावायचं….काही दिवसा नंतर असं झालं की आम्हाला पाहिलं की कुत्रे आधिच दुर पळुन जायचे. खरंच सांगतोय..  🙂

मग ह्याचा पण लवकरच कंटाळा आला की मग मात्र कोणितरी टूम काढायचं कच्चा चिवडा बनवायची.. कच्चा चिवडा म्हणजे पोहे, मुरमुरे, कांदा, दाणे, फुटाणे, तेल , तिखट वगैरे घालुन एकत्र कालवायचे.. बस्स ~ झाला कच्चा चिवडा तयार.. मग प्रत्येकी १ रुपया जमा करुन हे सगळं करण्यात एक तास भर जायचा…चिवडा बनवायला शामरावच्या गॅरेज मधेच एखाद्या पेपर वर हे सगळं साहित्य आणुन मिक्स केलं जायचं आणी  मग त्याच रंगलेल्या हातांनी खाणं व्हायचं.भांग वगैरे पण काही वेळेस दिलिप राखे कडे केली जायची.. पण नेहेमी नाही.. आता भांग प्यायल्यावर कॊण कसं वागायचं हे सांगुन बोअर करित नाही.. ते तुम्ही समजुन घ्या..

हे सगळं आटॊपे पर्यंत.. दुपारचे २-३ वाजलेले असायचे.. आणि आईचा ओरडा सुरु झाला की एक एक जण काढता पाय घ्यायचा.. अन.. चल रे.. भेटू संध्याकाळी शाखेमधे …. असं म्हणून निरोप घेतला जायचा….

संध्याकाळी नगर वाचनालयामधे एक मुर्खांचे सम्मेलन असायचे. त्यामधे काही लोक कविता वगैरे म्हणायचे . आम्ही सगळे जण त्या सम्मेलनाला आवर्जुन हजेरी लावायचॊ. आणि मग यवतमाळचा मुर्ख शिरोमणी  म्हणुन कोणि तरी डीक्लिअर केला जायचा… तिथल्या हास्य कवितांच्या बद्दल मात्र मी कधीच विसरु शकत नाही.

यवतमाळ माझ्या साहित्यिक जडणघडणासाठी एक महत्वाचे गांव आहे. इथेच मी (गोनिदा) आप्पांंची व्याख्यानं ऐकली, मंगेश पाडगांवकर, विंदा करंदिकर, वसंत बापटांचा कवितांचा कार्यक्रम ऐकला ज्या कार्य क्रमाने मला कवितेमधली गम्मत कशी अनुभवायची हे शिकवलं.

तस साधारणपणॆ होळी अशाच प्रकारे साजरी केली जायची.. ….

संबंधित लेखन

PG

महेंद्र कुलकर्णी

मी महेंद्र कुलकर्णी. एक वर्ष होऊन गेलं ब्लॉगिंग सुरु करुन . ‘काय वाटेल ते’ ब्लॉग वर लिहितो. मनाविरुध्द काही झालं की चिडणारा, मनासारखं झालं की आनंदाने सगळ्या जगाला सांगत सुटणारा, कोणी थोडं प्रेमाने बोललं की त्याच्या साठी जीव टाकणारा, कोणी थोडा वाकडेपणा दाखवला तर तेवढ्याच आवेशाने भांडणारा- तुमच्या सारखाच मी एक !

  1. Namaste,
    Aapala lekh vaachun ananad zala. Mazya bal panichya aathavani tajya zalya.
    “Ramya te baalpan” 🙂

  2. धन्यवाद.. प्रतिक्रियेकरता आभार. गेले ते दिवस !!

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME