वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

१४ एप्रिल ची मिरवणूक

० प्रतिक्रिया

येत्या १४ अप्रीलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येणार आहे. दरवर्षी येणारी ही बाबासाहेबांची जयंती मोठ्या धुमधाडाक्याने सर्वत्र साजरी केल्या जात असते. त्या निमित्त बहुतेक ठिकाणी मिरवणूका काढण्यात येत असतात. या जयंतीच्या कार्यक्रमांचा व मिरवणूकांचा उद्देश बाबासाहेबांचा जयघोष करणे, त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा प्रभाव जनमानसात उमटविणे व रुजविणे, त्यांची चळवळ योग्य दिशेने व गतीने पुढे नेण्यासाठी लोकांना प्रेरित करणे, चळवळीमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी संकल्प करणे, समाजामध्ये एकोपा, संघटितपणा निर्माण करणे, आपल्या उध्दारदात्याविषयी कृतज्ञता प्रदर्षित करणे इत्यादी असते

परंतु मिरवणूकांचा एकमेव उद्देश मात्र ‘आनंद व्यक्त करणे’ असा सांगितल्या जातो. म्हणून आनंद व्यक्त करण्यासाठी ‘नाचणे’ हा प्रकार आवश्यक असल्याचे सांगितले जाते. जसे लग्नाच्या वरातीमध्ये लोकं आनंदाने  नाचतात तसे ! सात-आठ हजारांचा ढोल-ताशा किंवा बॅंडबाजा व दारु पिऊन तर्र… झालं की मस्तपणे एंजॉयमेंट करता येते असा तरूण वर्गाचा (काही अपवाद वगळता) व त्यांना गायडंस करणार्‍यांचा समज झालेला असतो. दारु पिल्याशिवाय नाचतांना हुरुप येत नाही व स्टॅमिना टिकून राहत नाही असे त्यांना वाटत असते.. दारु पिण्यासाठी मिळणारा पैसा ना आपल्या कमाईचा असतो ना आपल्या बापाचा ! तो पैसा वर्गणीतून मिळालेला असतो. शिवाय बाबासाहेबांनी घालून दिलेले आदर्श, शील, सदाचरण व नैतिकता दारुच्या नशेत बेशरमपणाने सहज विसरता येते.

जय़ंतीच्या मिरवणूकीमध्ये केवळ सर्वसामान्य लोकंच नाचतात असे नाही तर सुशिक्षित, समाजाचे नेतृत्व करु पाहणारे व वरिष्ठ पदावर काम करणारे अधिकारी सुध्दा मस्तपैकी दारु पिऊन नाचल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले आहे. नौकरीच्या काळात हे चित्र आम्ही काही ठिकाणी पाहिलेले आहेत.

एका ठिकाणी मागासवर्गिय कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी मोठ्या तोर्‍यात येऊन म्हणाला होता की, ‘यावेळेस मुलं मस्तपैकी नाचलेत… कारण त्याना भरपूर दारु पाजली होती…’ मी त्यांना विचारले की, ‘त्यात तुमचा मुलगा पण होता काय?’ तेव्हा त्याचा चेहरा खाड्‍कन पडलेला दिसला. दुसर्‍यांच्या मुलांना दारु पाजून नाचविणारे असे महाभाग समाजात आहेत हे खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. तेव्हा ही विकृती किती टोकाला पोहचली आहे याची कल्पना येते. पंचशीलातील, ‘सुरा-मेरय-मज्ज पमादट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि’ या पाचव्या शिलाचं पालन करण्याची जबाबदारी. जनू काही आपली  नाहीच, असे दारु पिऊन नाचणार्‍यांची व त्यांना प्रोत्साहन देणार्‍यांची अवस्था झालेली असते. या लोकांनी मिरवणूक म्हणजे एक ‘मजाक’ बणवून टाकली आहे याची खरोखरच लाज वाटते. फूले-शाहू-आंबेडकर चळवळीचा रथ वाहून नेण्याची जबाबदारी ज्या शिकलेल्या लोकांच्या खाद्यावर टाकली आहे, असे काही लोक याप्रकारे  निकृष्ट दर्जाचे निपजावेत, ही भयानक शोकांतीका आहे असेच म्हणावे लागेल

हा लेख वाचून कोणी म्हणेल की, “आपल्याच समाजातील लोकांचे वैगूण्य लोकांसमोर माडून आपलीच बदनामी कां करता?” परंतु जे सत्य असेल ते सांगितलेच पाहिजे. आपले स्वतचे आत्मनिरिक्षण केल्याशिवाय आपल्यातील दुर्गुण नजरेस येणार नाही व त्यामुळे अपेक्षतीत सुधारणा होणार नाही

आता बाबासाहेब जरी आपल्यामध्ये राहिले नसलेत तरी त्यांचे लिखान आणि काही लोकांनी लिहून ठेवलेल्या आठवणी मात्र आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असतांना त्यावेळेसच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा ५० वा वाढदिवस मोठ्या प्रंमाणात साजरा करण्याचा विचार मांडला होता. तेव्हा  “माझा जयजयकार करण्यापेक्षा माझे कार्य करा. ते जास्त महत्वाचे आहे.” असे त्यानी सांगितले होते. तसेच नागपूर येथे १५ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म बांधवांना मार्गदर्शन करतांना  बाबासाहेब म्हणाले होते की, “मात्र तूमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्द‍ल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे.” म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करतांना प्रत्येक कृतीमध्ये बाबासाहेबांचे कार्य, त्यांचा आदर्श व विचारांचे प्रतिबिंब उमटेल याचे भान प्रत्येक कार्यकर्त्यांने ठेवणे आवश्यक आहे. म्हणून  बाबासाहेबांचे हे बोल आपण लक्षात ठेवून तसे आचरण केले पाहिजे, नव्हे तसे वागणे हे आपले कर्तव्यच आहे !

जयंतीमध्ये दारु पिणे, मनोरंजनाकरीता सिनेमा, सिनेमाच्या गाण्यांचा ऑर्केष्ट्रा, क्रिकेटसारखा बेकारांना व्यर्थ गुंतवून ठेवणारा कंटाळवाणा खेळ ( हा खेळ जपान, चिन, रशिया, जर्मन, अमेरीका, फ़्रान्स इत्यादी प्रगत देशात कां खेळल्या जात नाही व आपल्या देशात कां खेळला जातो, यामागे ब्राम्हणी कावा तर नाही नां ? याचा आयोजकांनी जरुर विचार करुन पाहावा.) यासारखे अनुचित व  अवांच्छित कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही. त्यामुळे मुलांवर वाईट संस्कार पडतात. शिवाय लोकांकडून जमविलेल्या निधिचा गैरवापर होत असतो. त्यापेक्षा मनोरंजनातून प्रबोधन कसे होईल याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. तरच सुसंस्कारीत समाजमन निर्माण होऊ शकेल.

सुरुवातीच्या काळात खेड्या-पाड्यांमध्ये सुध्दा समता सैनिक दल असायचे. ते पांढरा शर्ट, निळा पॅंट घालून हातात साधारण बारीक बांबुची किंवा वेताची काठी घेऊन दोन-दोनच्या रांगेमध्ये घोषणा देत मार्च करत पोलीस दलासारखे शिस्तीत चालत असायचे. त्यामुळे संपुर्ण वातावरण भारावून जायचे. समाजामध्ये विलक्षण असे बळ निर्माण व्हायचे. लोकांमधील ऊत्साह उदंड वाहत राहायचा. विरोधकांच्या मनात धडकी भरायची. समाजाचा एकोपा, उत्साह, शिस्त, बाबासाहेब व त्याच्या चळवळीप्रती निष्ठा इत्यादी गोष्टीचे त्यात प्रदर्शन व्हायचे. हल्लीच्या काळात मात्र बहूतेक ठिकाणी समता सैनिक दल राहिलेले नाही्त. त्यामुळे मिरवणूकीवर कोणाचे नियंत्रण राहत नाही. म्हणून मिरवणूकींना विकृत असे स्वरुप येत आहेत. तरी ह्या गोष्टी रोखणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

काही लोकांना असे वाटते की बाबासाहेबांची जयंती धुमधडाक्यांनी साजरी केली की संपली चळवळ! चळवळीचे आणखी काही अंग आहेत, आयाम आहेत यांचेशी त्यांचे काही देणे घेणे नसते… बस आपल्या वाट्याला आलेली वर्गणी किंवा घासाघीस करुन पैसे दिले व कार्यक्रमाला नवसासारखे हजेरी लावली की झाली आपली वर्षभराची निचंती! असा बहुतेकांचा समज (गैरसमज) झालेला असतो. चळवळ ही गतीशील व सातत्याने सुरु असणारी प्रक्रिया असते. त्यात पैसा, वेळ व बुध्दी ह्या तिन्ही गोष्टीचे समर्पण सातत्याने दिले गेले पाहिजे याची जाणिव ठेवणे आवश्यक आहे..

मिरवणूकीमध्ये दोन दोन च्या रांगेमध्ये चालणे, (जर खुप मोठा जमाव असेल तर तिन-तिन च्या रांगेमध्ये चालण्यास काही हरकत नाही.) पांढरे शुभ्र वस्त्रे परिघान करणे, रात्रीच्या वेळेला शक्य असल्यास बशांमध्ये (प्लेट) वाहणार्‍या वार्‍यात टिकतील असे जाडसर जळत्या मेणबत्या काही लोकांच्या हातात देणे, काही लोकांच्या हातात पंचशीलाचे झेंडे देणे, स्वयंसेवकाद्वारे किंवा समता सैनिक दलाद्वारे मिरवणूकीचे नियंत्रण करणे, शक्य झाल्यास खुल्या वाहनावर बाबासाहेबांची भव्य प्रतिमा ठेवणे, शक्य झाल्यास सजिव अथवा निर्जिव दृश्यांची व्यवस्था करणे, मशाली, लेझीम पथक, आखाडा, कवायत इत्यादीची व्यवस्था करणे, घोषणा कोणत्या द्यायच्या हे आधिच ठरवून तशा प्रकारचे लिहिलेले कागदं काही ठरावीक लोकांकडे देणे, सुमधूर आवाजामध्ये ‘बुध्दंम शरणंम गच्छामी, धम्मम शरणंम गच्छामी व संघम शरणंम गच्छामी’ची कॅसेट तयार करुन ती खुल्या वाहनावर लावणे, चौका-चौकात फटाक्याची आतिषबाजी करणे इत्यादी पध्दतीची मिरवणूक काढली तर ती आकर्शित बनू शकते. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ढोल-ताशा किंवा बॅंडबाजा लाऊन नाचण्याची कोणालाही परवानगी देऊ नये. दारु पिलेल्या व्यक्तींना मग तो कोणीही  असो अशांना स्वंसेवकाद्वारे बाहेर काढून पोलिसांच्या हवाली करावे

या पध्दतीने आदर्श अशी मिरवणूक काढता येणे शक्य आहे कां असा काही लोकांचा प्रश्‍न असू शकतो. एक उदाहरण म्हणून आम्ही अशा प्रकारचा प्रयोग करुन पाहिलेला आहे.

एका मोठ्या विद्युत वसाहतीच्या ठिकाणी दरवर्षी दारु पिऊन मिरवणूका काढणार्‍यांचा एकाधिकार, अरेरावी व दहशत मोडून काढण्यासाठी आंबेडकर व शिवजयंती सयुक्तपणे, सार्वजनिकरित्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या सहकार्याने साजरी करण्याचे ठरविले होते. सर्व कामगार-अधिकार्‍यांच्या पगारातून वर्गणीचे पैसे प्रशासनामार्फत कापून घेतल्यामुळे फार मोठा निधी जमा झाला होता. त्यामुळे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे शक्य झाले.

सर्वांना विश्वासात घेऊन एका वेगळ्या पध्दतीने मिरवणूक काढण्याची आम्ही सर्वांनी योजना आखली होती. मात्र आमच्या या नाविण्यपुर्ण उपक्रमाला त्या प्रस्थापितांनी मोठ्या प्रमाणात विरोध करुन पाहिला. ठिकठिकाणी आम्हाला त्यांनी व त्याच्या कंपुने अडविण्याचा प्रयत्न करून पाहिला. कारण त्यांची यापुढे दुकानदारी बंद होणार होती. त्यामुळे ते चिडलेले दिसत होते. बरे त्यांचेमध्ये फार मोठी प्रगल्भता होती असेही नाही. कारण जेव्हा आम्ही बाया-माणसांना शक्य तोवर पांढरे कपडे परिधान करुन मिरवणूकीमध्ये सामिल व्हावे असे सांगत होतो, तेव्हा तो म्हणत असे की, ही काय बाबासाहेबांची प्रेतयात्रा आहे कां ? कोणत्याही मंगल प्रसंगी बौध्द धम्मात पांढरे वस्त्रे घालतात याची त्याला थोडीसुध्दा जाण नव्हती आणि निघाला होता पुढारपण करायला ! किती  लाजिरवाणी गोष्ट होती ती ! तो आणि त्याचा कंपु धमक्या द्यायचा की  तुम्ही जर मुलांना नाचू दिले  नाही तर मिरवणूकीमध्ये गडबड  होऊ शकते. मी त्यांना औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमधील गाढवावर बसून मौज-मजा करणार्‍या एका विद्यार्थ्याला बाबासाहेबांनी पाहिल्यानंतर त्याला बाबासाहेबांनी काठीने कसे मारले व स्वत: कसे ढसाढसा रडलेत ही गोष्ट सांगून तुम्ही असे अडथळे आणू करु नका, अशी प्रशासनाच्या वरिष्ट अधिकार्‍यांसमोर मी हात जोडून त्यांची विणवनी केली. तेव्हा ते थोडेफार नरमले.

मिरवणूक अत्यंत शिस्तबद्द व एका आगळ्या-वेगळ्या पध्दतीने यशस्वी व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही जबरदस्त तयारी केली होती. माझ्या पत्‍नीने यांत सक्रियपणे पुढाकार घेतला होता. तिने जयंतीच्या काही दिवसा आधीपासूनच खुप मेहनत घेऊन महिला व त्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणात तयार केले होते. विशेष म्हणजे जे विरोध करीत होते त्यांच्याच घरच्या महिलांनी माझ्या पत्‍नीला या कामात साथ दिली होती.  त्यांना सुचना दिल्या होत्या की पांढरे कपडे घालून मिरवणूकीमध्ये सामील व्हावे. मिरवणूकीमध्ये कोणिही नाचू नये. त्याऎवजी घोषणा द्यायचे. घोषणा कोणत्या द्यायच्या ते सुध्दा लिहून दिले होते. मिरवणूक कधी, कोणत्या मार्गाने जाईल, कोणत्या पध्दतीने व कशाप्रकारे निघेल याचे लेखी परिपत्रक काढले होते. जवळपास सर्वच बाया, माणसं व मुलांकडे बशामध्ये पेटलेल्या जाडसर मेणबत्त्या देण्यात आले होते व काहींच्या हातात पंचशीलाचे लहान-लहान झेंडे दिले होते. पेटलेल्या मेणबत्त्यामुळे काही अनिष्ट प्रसंग उद्‍भवू नयेत, याचीही काळजी घेण्यात येत होती. त्यांचेवर लक्ष ठेवण्यासाठी, दोन दोन ची रांग तुटू नये, प्रत्येकांनी शिस्त पाळावी, घोषणा व्यवस्थित द्यावेत म्हणून स्वयंसेवक तयार करण्यात आले होते व ते मिरवणूकीवर नियंत्रण ठेवून होते. कोणीही नाचनार नाही याची ते काळजी घेत होते. दोन दोन ची रांग असल्यामुळे मिरवणूक भव्य दिसत होती. दोन खुल्या जिपवर बाबासाहेब व शिवाजी महाराजांचे मोठ्या आकाराचे प्रतिमा ठेवल्या होत्या. ‘बुध्दंम शरणंम गच्छामी, धम्मम शरणंम गच्छामी व संघम शरणंम गच्छामी’ची कॅसेट तयार करुन ती हळु आवाजात जिपवर लावण्यात आली होती. मिरवणूकीच्या समोर एक जळती मशाल घेउन एक युवक चालत होता. त्यानंतर लेझीमची कवायत करणारे विद्यार्थी होते. चौका-चौकामध्ये फटाक्याची आतिशबाजी व्हायची. सर्वजन भारावून गेले होते. उत्साहीत झाले होते. लोकं ही मिरवणूक पाहण्यासाठी वसाहतीतील बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन पाहत होते. यापुर्वी अशाप्रकारची मिरवणूक कधिही निघाली नसल्याचे लोकांच्या तोंडून उद्‍गार निघत होते.  जेव्हा मिरवणूक विसर्जित झाली तेव्हा त्या विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता यानी सांगितले की, ‘मी अशा प्रकारची भव्य व शिस्तबद्द मिरवणूक पहिल्यांदाच पाहतो आहे.’ त्यांनी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहून माझ्या पत्‍नीचे अभिनंदन केले.

त्या वसाहतीमधील काही मुठभर लोकं सोडले तर ईतर कर्मचारी व अधिकारी वर्ग मात्र खरोखरच चांगले, समजदार व जागृत होते, याचा विशेष असा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय अशा प्रकारची नाविण्यपुर्ण व आदर्श अशी मिरवणूक काढणे शक्यच नव्हते. म्हणून  तसा प्रयत्न यावर्षी येणार्‍या जयंतीमध्ये जागोजागी आयोजकांनी जरुर करुन पाहायला काही हरकत नाही. यापेक्षा आणखी चांगले आयोजन करता आले तर वाचकांनी तशा सुचना, प्रतिक्रिया द्यावेत.

जयंतीदिनी प्रत्येकांनी चळवळीतील आपल्या सहभागाचे सिंहावलोकन करणे आवश्यक आहे. येणार्‍या वर्षात चळवळीला हातभार लावण्याचा संकल्प करावा. तरच खर्‍या अर्थाने आपण जयंती साजरी करीत आहोत असे समजता येईल. नाहीतर दिवाळी-होळीच्या सणासारखी जयंतीची गत झाल्याशिवाय राहणार नाही हेही तितकेच खरे आहे.

-सदर लेख  दैनिक वृतरत्न सम्राट मध्ये दि. ०२.०४.२०१० रोजी प्रकाशित झाला.

संबंधित लेखन

 • स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
  सोनिया गांधी यांचे आणि राहुलचे स्वीस बॅंकेत गुप्त खाते असल्याचे दोन विश्वासार्ह संस्थांनी जाहीर क…
 • जागे व्हा…..!!
  माझ्या शेतकरी बांधवांवर अन्याय होतोय, जो दिवस-रात्र उन्हा-तान्हात काबाडकष्ट करून पिकवतो त्याच्या …
 • ‘वणवा’
  ‘विवाहितेवर हिंजेवाडीत झालेल्या सामुहिक बलात्कार’ घटनेने स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा…
 • माझी माय .. अरुण फिरोदिया..
  बऱ्याच लोकांच्या बद्दल मनामधे एक असा आकस असतो.अर्थात , त्या साठी काहीच कारण असावं लागत नाही. बस्स…
 • नात्यांतील अस्थिरता
  ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥
  त्याची गाडी जुनी होती पण अतिशय सुंदररीत्या काळजी घे…
PG

rkjumle

मी महाडिस्कॉम (महाराष्ट राज्य विद्युत मंडळ) कंपनीमध्ये लेखाधिकारी या पदावर कार्यरत असतांना निवृत झालो. मी सध्या अकोला (महाराष्ट्र) येथे स्थायिक झालो.
मी नोकरीमध्ये असतांना माननिय कांशिरामजींच्या बामसेफ व पे बॅक टु सोसायटी या संघटनेत काम करीत होतो. तसेच महाराष्ट राज्य विद्युत मंडळ वर्कर्स फेडरेशन व मागासवर्गिय संघटनेमध्ये सक्रिय काम करीत होतो. तसेच मी स्थानिक गांवच्या यवतमाळ, दिग्रस, वणी, पोफळी (ता.चिपळून जि. रत्‍नागिरी). नाशिक, भुसावळ, पारस इत्यादी ठिकाणी समाजकार्यामध्ये माझा सक्रिय सहभाग होता. पारस येथे बुध्दविहाराच्या सभागृह बांधण्यामध्ये माझा सक्रिय सहभाग होता.
सध्या मी लेखनकार्य करीत आहे. माझे काही लेख दैनिक वृतरत्‍न सम्राट मुंबई. दैनिक विश्वरत्‍न सम्राट मुंबई, लोकनायक मुंबई, धम्मशासन मुंबई. भिमरत्‍न पुणे, विश्व लिडर मुंबई, शालवन पत्रिका, इत्यादी अनेक नियतकालिकात लेख व कथा प्रकाशित झाल्या आहेत. तसेच मी बुध्द विहारामध्ये प्रबोधन करीत असतो.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME