वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

हुरहुर असते तीच उरी….

१ प्रतिक्रिया

’हुरहुर असते तीच उरी’ मुग्धा गाऊ लागते आणि आपल्या अंगावर सर्रकन काटा येतो….अगदी शहारून जातो आपण !!

ती एक अनामिक हुरहुर, आत कुठेतरी खोलवर लपलेली….ठसठसणारी….सुक्ष्म…अतर्क्य… आपल्याही नकळत गेली कित्येक वर्षे साथ करणारी….. तुम्ही अवाक्‌ !

कसला हा घोर आणि कसली ही चुटपुट??

मुग्धाचा स्वर किंचित चढलेला – ’दिवस बरा की रात्र बरी?’

दिवस आणि रात्र या फक्त कल्पना … एकाच अस्तित्वाची ही दोन शकलं का?

डोळ्यातील जडपणा, मनातील धूसरपणा वाढलाय की काय?

एरवीही तसा संधीप्रकाश फार फसवा असतो म्हणा… काही कळत नाही…

समत्वाची तीर्थे ही अशीच असतात… गूढ, अचल, निराकार, निर्विकार !!!

आपण मात्र अलीकडचेचं…एकतर प्रकाशमान दिवस प्यारा किंवा गडद काळोखी रात्र जवळची !! यथार्थतेची संध्या का कोण जाणे नकोशी वाटते.

मुग्धाचा खोल जाऊन विचारलेला प्रश्न – ’दिवस बरा की रात्र बरी?’

अंतरंगात जाउन शोधायला हवं एकदा… ती हुरहुर, ती अस्वस्थता या कातर संध्याकाळचीच तर नव्हती??

केशरी रंगाचं हे एक वैशिष्ट्य मात्र… प्रश्न फार पडतात… अन् काहीचं कळेनासं होतं..

निरागसपणे मुग्धा परत विचारते ’कुठला रस्ता सांग खरा, वळणाचा की सरळ बरा’

रस्ते, त्यांचे चकवे, त्यातील खाच-खळगे…. सगळेच कसे जीर्ण विषय…

रस्ता निवडणारा आणि चालणारा वेगळाय की काय? आत बसून दिशा दाखवणारा खरा की बाहेर चालणारा खरा?? नागमोडी वाटा येतचं राहतात… पाउल घसरतील अश्या निसरड्या वाटा, काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटा, पाय भरून येतील अश्या दुर्दम वाटा…. मुग्धाचा प्रश्न योग्यचं म्हणायचा !!!

सरळ रस्ता ज्याच्या नशिबी तो भाग्यवंत अन् वळणावळणावर तोल सावरत जाणाराही नशिबवान… प्राक्तनातले उन पाऊस दोन्ही पहायलाच हवेत…

मुग्धाचा हृदय चीरत जाणारा सवाल ’जगणे मरणे काय बरे?’ ..

युगानेयुगे उलगडण्याचा प्रयत्न चाललाय अश्या रहस्यांमध्ये अग्रभागी असलेला मृत्यू… अन् ही चिमुकली विचारतेय ’जगणे मरणे काय बरे’… कसं सांगावं??

उत्फुलतेचं, साक्षित्वाचं जीवन बरं का प्रशांत, घनदाट अशी मृत्यूची महानिद्रा बरी??

दोन्हीही अपरिहार्य… दोन्हीही अगदी निकट आणि दोन्हीही पुर्ण सत्य…. हां, पण ज्याला अंतिम बोध होतो त्याला दोन्हीही स्वप्नासारख्याच वाटतात म्हणे… त्या तूरीय अवस्थेत जाउन ऐकायला हवी ही ओळ एकदा !!
’सुख खरे की दुःख खरे’…भासमान सुखाचे क्षण, चटके देणारे दुःखाचे क्षण.. खरे काय नी खोटे काय.. मुग्धाची किंचीत लांबलेली तान ’सुख खरे की दुःख खरे’….

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात , ’जिये लोकींचा चंद्रही क्षयरोगी।जेथ उदयो होय अस्तालागी।दुःख लेवुनी सुखाची आंगी।सळीत जगाते॥

सुखाची अंगडी टोपडी घालून दुःखचं तर येत नाही ना – हळूच…. विकटपणे…

मग खरं सुख आहे तरी काय?? आणि कुठे??

मुग्धाच्या एकेका सूरापाठोपाठ या प्रश्नांच्या वावटळी उठत राहतात… संवेदनांना धडका देत राहतात.. सैरभैर करत राहतात…

ऐकताना वाटतं, आपलंच तर मनोगत गातेय ती… मग आपण मान्य का करत नव्हतो?

सगळं समोर आलं या गीतातून… मुग्धा फक्त निमित्त्मात्र ठरली ती खपली निघायला !!!

थरारून टाकणार्‍या सूरेलपणे मुग्धाने आपल्याला आतपर्यंत हालवून टाकलं…

गाणं तर संपलं..पण तळाशी फेर मात्र चालूचं आहे…शोधही चालू आहे… आपल्याच आत…दररोज…!!

’हुरहुर असते तीच उरी……हुरहुर असते तीच उरी’

संबंधित लेखन

PG

विक्रांत देशमुख

मी एक चिमुकलं रानफुल…रंग,रूप,गंध नसलेलं… दरीखोर्‍यात कडेकपारीत रानावनात उगवणारं… त्याच्या असण्या वा नसण्याने तसा कुणाला फारसा फरक पडत नाहीचं. रानफुलाची मात्र इच्छा असते जीवन सार्थकी लावण्याची. इथे आलोच आहोत तर समरसून जगण्याची. अश्यातच कधीतरी चुकून वसंताची नजर त्यावर पडते आणि मग हे वेडं फुल गायला लागतं ’रूतुराज आज वनी आला… रुतुराज आज वनी आला’.

  1. श्रीराम…
    श्री. विक्रांत देशमुखजी नमस्ते ……
    खूप सुंदर लिहिले आहे ,मी एका तळ्यातील एक कुरूप – शामल (पण मन मात्र पांढरे शुब्र )बदक
    श्री.सद-गुरु कृपेने त्याचा एक राजहंस झालो ,या भवसागरी नाम रुपी नौकेने पोहोतो आहे .आनंदात आहे ,
    आपल्या सर्वांचा मुकुंद = जो आनंदाचा कंद -धुळे

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME