वर्गणीदार व्हा: लेख | प्रतिक्रिया

GSLV – इतिहास आणि ओळख

१३ प्रतिक्रिया
[लेखात शेवटचा बदल: १२:३६ वाजता, डिसेंबर  २६, २०१० रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार]

पूर्वार्ध

कॉन्स्टटिन त्सिओल्कोवस्की या रशियन संशोधकाच्या “बियॉण्ड दि अर्थ” (इंग्रजी आवृत्ती) या पुस्तकाने रशियात १९५० च्या दशकात अवकाश प्रवासाची उत्सुकता शिगेला पोहोचवली. प्रत्यक्ष स्टॅलिनने त्यांच्या संशोधनाचे कौतुक केले होते. म्हणूनच त्सिओल्कोवस्कींना आधुनिक अवकाश-प्रवासाचा जनक म्हणून संबोधले जाते. त्सिओल्कोवस्कींच्या संशोधनांचा आधार घेत रशियाने १९५७ साली “स्पुटनिक” नावाचा उपग्रह पृथ्वीबाहेरील अवकाशात स्थापित करून एका नव्या युगाला सुरुवात केली. रशिया पाठोपाठ अमेरिकेलाही याची चाहूल लागली, पण एकामागे एक असे अनेक प्रयत्न फोल होऊनही अमेरिकेच्या नासाला यश संपादन होत नव्हते. १२ एप्रिल, १९८१ रोजी ‘कोलंबिया’ या नासाच्या पहिल्या स्पेस शटलने आकाशात भरारी घेतली, पण इच्छित वेळेत, इच्छित ठिकाणी स्पेस शटल नेण्यास नासाला बराच काळ लागला. त्यातच १९८६ मध्ये सात अंतराळवीरांना घेऊन जाणारे ‘चॅलेंजर’ स्पेस शटल लॉन्च केल्यानंतर लगेच स्फोट होऊन जळून खाक झाले. ‘अपोलो’ मोहिमेबाबतही बरेच अपयश पचवून नासाने प्रयत्न चालू ठेवत (अमाप पैसे ओतून) ते पुर्णत्वास नेले. नासाची सर्वात मोठी कामगिरी होती, ती म्हणजे हबल दूर्बिण त्यांनी पृथ्वीबाहेरील अवकाशात स्थापित केली, त्यामुळेच आज आपल्याला अवकाशाबद्दल एवढे ज्ञान प्राप्त झाले आहे. SETI हा नासाचा एक प्रकल्प पैशाअभावी अलिकडेच स्थगित करण्यात आला आहे, शिवाय पैशाअभावी त्यांचे भविष्यकालीन महत्वाकांक्षी प्रकल्प, जसे की, मंगळ मोहिम, चांद्र वसाहत, अवकाशस्थानक इत्यादी जरी थोडे पुढे ढकलण्यात आले असले (२०१४ पर्यंत तरी) तरी यांचा संपूर्ण मानव-जातीला खुप फायदा होणार आहे. युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, ऑस्ट्रेलिया, इरान यांच्याही अवकाश मोहिमा कौतुकास्पद आहेत.

रशियातील वाढत्या अवकाश संशोधनांवर ५० च्या दशकात काही भारतीय संशोधकही टक लावून होते. त्यावेळी भारताच्या अणुऊर्जा प्रकाल्पाचे संचालक असलेल्या डॉ. होमी भाभा यांनी १९६२ साली “इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च” ही संस्था स्थापन करून तीची सुत्रे डॉ. विक्रम साराभाई यांच्या हवाली केले. सुरूवातीला अमेरिका, रशिया व काही युरोपिय राष्ट्रांच्या मदतीने “साउंडिंग” रॉकेट्सच्या प्रयोगांच्या चाचण्या सुरू झाल्या. अवकाश संशोधनाचा विस्तार वाढत चाललेला पाहून १९६९ साली ” इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) ” ह्या सरकारी संस्थेची केवळ अवकाश संशोधनासाठी स्थापना करण्यात आली. अजुनही सॅटेलाईट्सना प्रक्षेपित करण्यासाठी लागणार्‍या रॉकेट्ससाठी भारताला इतर प्रगत राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागत होते, पण ते फार काळ शक्य नव्हते. त्यासाठी इस्त्रोने स्वतः सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (SLV) हे घन इंधन असणारे चार टप्प्यांचे रॉकेट विकसित केले. १९ एप्रिल, १९७५ रोजी भारताने आपला पहिला उपग्रह “आर्यभट्ट” हा अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित करून स्थापित केला. त्यानंतर “भास्कर-१” या उपग्रहाचे १९७९ साली यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आंध्रातील श्रीहरीकोटा येथे मंध्यतंरीच्या काळात एक नवीन उपग्रह-प्रक्षेपण केंद्र स्थापन करण्यात आले. १९८० साली या उपग्रह-प्रक्षेपण केंद्रावरूनच SLV-3 रॉकेटने रोहिणी उपग्रह बरोबर घेऊन अवकाशात झेप घेतली. ध्रूवीय कक्षेत भ्रमण करणारे उपग्रह अधिक उपयुक्त ठरतील ही गोष्ट लक्षात आल्यावर पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (PSLV) कडे संशोधन चालू झाले. त्यासाठी फ्रान्सच्या मदतीने द्रवरूप इंधन असणारे ऑग्मेण्टेड सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल्स (ASLV) तयार केले गेले, व या ASLV च्या मदतीने १९९४ मध्ये भारताने पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल्च्या (PSLV) आधारे रीमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट (वायरलेस) कम्युनिकेशन साठीचे उपग्रह प्रक्षेपित केले. २००८ मध्ये चांद्रयान-१ हे याच PSLV च्या मदतीने चंद्रावर यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले.

GSLV

जिओसिन्क्रोनस ऑर्बिट (पृथ्वीभोवतालची सुमारे ३६००० किमी अंतरावरील कक्षा) मध्ये सॅटेलाइट उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या दिशेने इस्त्रोने आपल्या हालचाली सुरू केल्या. जिओसिन्क्रोनस लॉन्च व्हेइकल (GSLV) या अतिप्रचंड व वेगवान रॉकेटच्या शेवटच्या टप्प्यासाठी क्रायोजेनिक इंजिनची आवश्यकता असते (अधिक माहिती पुढे दिली आहे). १९९० पासून इस्त्रोने त्या दिशेने प्रयत्न चालू केले होते. रशियाच्या “ग्लाव्ह कॉसमॉस” या संस्थेशी करार करून ७ क्रायोजेनिक इंजिन्स मिळवले, पण अमेरिकेने मे, १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय करारांचा जबाब देत भारतावर निर्बंध लादल्यामुळे रशियाकडून भारतात येणारे क्रायोजेनिक इंजिन्स त्यापुढे येणे अशक्य होते. अमेरिकेने त्यावेळी भारतावर क्रायोजेनिक इंजिन्स रशियाकडून घेण्यावर निर्बंढ का लादले, याचे अधिकृत उत्तर अजुनही अमेरिकेने दिलेले नाही, पण त्यामागच्या अंधुक कारणांची पार्श्वभूमी तर प्रत्येक भारतीयाला (भारतच नाही तर पुर्ण जागाला) ठाऊकच आहे तशी… असो. क्रायोजेनिक इंजिन्स येणे बंद झाल्यामुळे भारताला स्वतःच क्रायोजेनिक इंजिन्स विकसित करण्याशिवाय पर्याय नव्हता. रशियाकडून मिळालेल्या क्रायोजेनिक इंजिन्सच्या आधारे २००१ पासूनच GSLV च्या उड्डाणांना सुरुवात झालेली होती, मात्र संपुर्णतः भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन तयार व्हायला २००६ पर्यंत वाट पहावी लागली.

GSLV चे व्हॅरिएन्ट्स खालीलप्रमाणे आहेत:

१) GSLV Mk.I (a) – हे रॉकेट, रशियन बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरून बनवण्यात आले होते (एका टप्प्याचे) आणि सुमारे १५०० किग्रॅ एवढ्या वजनाचे पेइलोड (उपग्रह, इतर साधने इत्यादी) जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये घेऊन जाण्याची याची क्षमता आहे.

२) GSLV Mk.I (b) – हे सुद्धा रशियन क्रायोजेनिक इंजिन वापरून बनवण्यात आले होते. यामध्ये पहिल्या GSLV Mk.I (a) मध्ये आलेल्या अडचणी दूर करून इंधन क्षमता वाढवली गेली आणि अजुन एक टप्पा जोडला गेला. सुमारे १९०० किलोग्रॅम वजनाचे साहित्य GTO मध्ये प्रक्षेपित करण्याची याची क्षमता आहे.

३) GSLV Mk.II – हे पुर्णपणे भारतीय बनावटीचे आणि भारतीय क्रायोजेनिक इंजिन असलेले रॉकेट आहे. २५०० किग्रॅ एवढे वजन GTO मध्ये स्थापित करण्याची याची क्षमता आहे.

GSLV चा आतापर्यंतचा प्रक्षेपण इतिहास:

आतापर्यंतचे सर्व GSLV प्रक्षेपणे श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर येथून करण्यात आली आहेत.

उडानरॉकेटप्रक्षेपण वेळ (UTC)लॉन्च पॅडअंतर्भूत उपग्रह, इ. (पेइलोड)पेइलोड वजनइतर माहिती
D1GSLV Mk.I(a)१८ एप्रिल, २००१, १०:१३पहिलेGSAT-1१५४० किग्रॅअयशस्वी, विकसित उड्डाण. पेइलोड इच्छित ऑर्बिटच्या खालच्या पातळीत प्रक्षेपित झाले.
D2GSLV Mk.I(a)८ मे, २००३, ११:२८पहिलेGSAT-2१८२५ किग्रॅयशस्वी, विकसित उड्डाण.
F01GSLV Mk.I(b)२० सप्टेंबर, २००४, १०:३१पहिलेEDUSAT१९५० किग्रॅयशस्वी, पहिले आर्थिक/व्यावसायिक उड्डाण.
F02GSLV Mk.I(b)१० जुलै, २००६, १२:०८दुसरेINSAT-4C२१६८ किग्रॅअयशस्वी, रॉकेट आणि उपग्रह, दोन्ही बंगालच्या उपसागरामध्ये पडून जळून खाक झाले.
F04GSLV Mk.I(b)२ सप्टेंबर, २००७, १२:५१दुसरेINSAT-4CR२१६० किग्रॅप्रक्षेपण यशस्वी, पण प्रक्षेपणाच्या वेळी रॉकेटची दिशा चुकल्याने ते काही काळ भरकटले होते.सुदैवाने २१६० किग्रॅ उपग्रह GTO मध्ये स्थापित केला गेला.
D3GSLV Mk.II१५ एप्रिल, २०१०, १२:५७दुसरेGSAT-4२२२० किग्रॅअयशस्वी, सुमारे ९०+ किमी अंतरावर गेल्यानंतर तिसर्‍या टप्प्यातील क्रायोजेनिक इंजिन चालूच झाले नाही आणि FBTP सुद्धा काही कारणांमुळे बंद पडले.
F06GSLV Mk.I२५ डिसेंबर, २०१०, १०:३४दुसरेGSAT-5P२१३० किग्रॅअयशस्वी, प्रक्षेपण झाल्यानंतर अवघ्या ६३ सेकंदांत FBTP वरील नियंत्रण सुटल्यामुळे आणि पुढील टप्प्यांत असलेले रशियन बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन चालू होऊ शकले नाही.
Fo5
GSLV Mk.I२०११n/aGSAT-6n/aआगामी

GSLV – D3:

GSLV-D3

GSLV-D3 | सौजन्य: en-wikipedia

गुरूवार, दिनांक १५ एप्रिल, २०१० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार १६:२७ वाजता GSLV-D3 चे यशस्वी उड्डाण झाले.  पण प्रक्षेपण झाल्यानंतर लगेच ५०५ सेकंदांनतर (त्यावेळी रॉकेट अंदाजे ९०+ किलोमीटर वर गेले असावे) रॉकेटशी कसलाही संपर्क प्रस्थापित होऊ शकला नाही.

रॉकेटचे उड्डाणाच्यावेळी किंचित इनक्लायनेशन झाल्यामुळे ते ठरवलेल्या मार्गाने न जाता चुकीच्या मार्गाने गेले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे.

GTO (जिओ ट्रान्सफर ऑर्बिट) मध्ये प्रस्थापित करण्यासाठी असलेला GSAT-4 हा २.२ टन वजनाचा कम्युनिकेन उपग्रह घेऊन जाणार्‍या GSLV-D3 ने उड्डाणानंतर, ५०५ सेकंदांनंतर त्याच्या प्रमाणाची, उंचीची आणि इतर जिओ-पोजिशनिंग बद्दलची माहिती पाठवणे बंद केल्यामुळे आमचे त्यावरील नियंत्रण मर्यादेच्या बाहेर गेले, असे इस्रोच्या संशोधकांचे म्हणणे आहे.

अद्ययावत: दिनांक ०९ जुलै, २०१० (GSLV-D3 च्या अयशस्वी होण्यामागची कारणे):

GSLV-D3 चे प्रक्षेपण अयशस्वी कोण-कोणत्या कारणांंमुळे झाले असावे, या गोष्टीचा छडा लावण्यासाठी इस्रोच्या संशोधकांनी मधल्या काळात प्रक्षेपणसंदर्भात उपलब्ध माहितीची व क्रायोजेनिक अप्पर स्टेज (CUS) ची कसून तपासणी केली.  दिनांक ०९ जुलै, २०१० रोजी इस्रोने त्यासंबंधित प्रेस रीलीज मध्ये अयशस्वी होण्याच्या कारणांची मीमांसा केली आहे.

इस्रोच्या संशोधकांनी शोधलेल्या कारणांचे नॅशनल ग्रुप ऑफ एमिनण्ट च्या सल्लागारांनी परिक्षण केले आहे, त्यांच्या अहवालाच्या सारांशानुसार अगोदर झालेल्या GSLV च्या फ्लाइट्सच्या तुलनेने CUS सुरू झाल्यापासून केवळ २.२ सेकंदांची तफावत त्यांना दिसून आली.

पण मुख्य इंजिनच्या थ्रस्ट चेंबरला पुरवल्या जाणार्‍या द्रव हायड्रोजनच्या (LH2) कमतरतेमुळे इंजिनमध्ये निर्माण झालेला थ्रस्ट फार काळ काही टिकू शकला नाही. या कारणामुळे आकस्मितपणे फ्युएल बुस्टर टर्बो पंप (FBTP) बंद पडले. एव्हाना, FBTP ची सुरूवात मात्र चांगली (हवी होती तशी) झाली होती. CUS सुरू झाल्यानंतर अपेक्षेनुसार त्याची गती ३४,८०० rpm एवढी झाली होती. पण, काही क्षणांत म्हणजेच पुढील १.५ सेकंदांत FBTP ने फिरणे अचानक बंद केले.  (इस्रोच्या प्रेस रीलीजच्या हवाल्यानुसार)

FBTP च्या अयशस्वी होण्यामागे इस्रोने दोन कारणे दिली आहेतः आवरणामुळे वाढलेले अंतर्गत तापमान व परिणामी दबावामध्ये झालेली एकाएकी वाढ यांमुळे पहिले कारण म्हणजे सील केलेल्या ठिकांणापैकी  एखादे लीक झाले असावे आणि दुसरे कारण म्हणजे रोटर आणि टर्बाइन एकाचवेळी तुटले गेले असावेत. हे दोन्ही कारणे मध्यंतरी झालेल्या निरंतर तपासाची परिणीती असल्याचे इस्रोचे म्हणणे आहे.

यानंतरच्या काळात वर्षभर या कारणांची पुष्टी करण्यासाठी व त्या चुका/त्रुटी पुन्हा घडू नयेत यासाठी इस्रो अनेक चाचण्यांची मालिका सुरू करणार आहे, त्यामध्ये भारत निर्मित क्रायोजेनिक इंजिन आणि काही प्राथमिक चाचण्यांचा अंतर्भाव असेल. या चाचणी मालिकेच्या काळात आधीपासूनच इस्रोच्या वेळापत्रकात असलेल्या GSLV च्या पुढील दोन उड्डाणांसाठी (सप्टेंबर’१० आणि २०१०-११ मधील) सध्या उरलेल्या (उपलब्ध असलेल्या) रशियन निर्मित क्रायोजेनिक इंजिनांचा वापर करण्यात येईल, असे इस्रोने दिनांक ०९ जुलै, २०१० च्या पब्लिक प्रेस रीलीज मध्ये सांगितले आहे.

GSLV-F06:

दैनिक सकाळवरील बातमी:

दळणवळण उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी
सकाळ वृत्तसेवा
Saturday, December 25, 2010 AT 06:20 PM (IST)

श्रीहरिकोटा – “जीसॅट-5 पी’ या दळणवळण उपग्रहाच्या प्रक्षेपकाचा उड्डाणादरम्यान स्फोट झाल्याने त्याचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. दुपारी चार वाजून चार मिनिटांनी येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून “जीएसएलव्ही-एफ06′ उपग्रह प्रक्षेपकाने उड्डाण केले; मात्र काही सेकंदांत तांत्रिक दोष निर्माण झाल्याने त्याचा स्फोट झाला. या प्रक्षेपकात रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला होता. उड्डाणानंतर प्रक्षेपक नियोजित मार्गापासून भरकटला आणि स्फोट होऊन त्याचे तुकडे झाले.

या उपग्रहाचे प्रक्षेपण 20 डिसेंबरला स्थगित करण्यात आले होते. उलटगणतीपूर्वीच्या तपासणीत क्रायोजेनिक इंजिनाच्या व्हाल्व्हमध्ये किरकोळ गळती आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर उपग्रह प्रक्षेपणाचा निर्णय घेण्यात आला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) या वर्षातील हे दुसरे अपयश आहे. याआधी 15 एप्रिल रोजी देशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा प्रथमच वापर करून “जीएसएलव्ही’ मालिकेतील उपग्रह प्रक्षेपणाचा प्रयत्न फसला होता. हा उपग्रह बंगालच्या उपसागरात कोसळला होता.

‘क्रायोजेनिक  इंजिन’ म्हणजे काय?

क्रायोजेनिक इंजिन

क्रायोजेनिक इंजिन | सौजन्य: en-wikipedia

रॉकेट इंजिन दोन प्रकारचे आहेत. एका प्रकारातील इंधन द्रवरूप असते, तर दुसर्‍या प्रकारातील घनरूप असते. घनरूप इंधन एकदा प्रज्वलित झाले की त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवता येत नाही, सर्व इंधन जळेपर्यंत ज्वलनक्रिया चालू राहते. द्रवरूप इंधनावर चालणार्‍या इंजिनावर नियंत्रण ठेवणे शक्य असते. द्रवरूप इंधनाचेही दोन प्रकार आहेत, एक सामान्य तापमानात (२५ अंश सेल्सिअस) कार्य करते,  तर दुसरे अतिशीत (-२०० अंश सेल्सिअस) अवस्थेत ठेवावे लागते. अतिशीत इंधनावर कार्य करणार्‍या इंजिनाला “क्रायोजेनिक इंजिन” म्हणतात. (क्रायो ~ अतिथंड – ग्रीक शब्द)

रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाने १९२६ साली प्रथमच द्रवरूप इंधन वापरून रॉकेटचे यशस्वी उड्डाण करून दाखविले होते.  त्याने गॅसोलीन आणि द्रवरूप ऑक्सिजन यांचा इंधन म्हणून वापर केला होता. द्रवरूप ऑक्सिजन ऑक्सिडायजर म्हणून वापरतात, कारण ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते. द्रवरूप इंधन ज्वलनकक्षात प्रज्वलित करण्यात येते. ज्वलनामुळे या कक्षेत अत्युच्च दाब आणि अतितप्त वायू निर्माण होतो.  कक्षेच्या एका बाजूला असलेल्या अरूंद तोंडाच्या तोटीमधून बाहेर पडताना या वायूचा वेग आणखी वाढतो (सुमारे ताशी ८०००-१६००० किमी); त्यामुळे रॉकेटवर उर्ध्व दिशेत शक्तीशाली थ्रस्ट (बल) निर्माण होतो, व रॉकेट अतिवेगवान गतीने मार्गक्रमण करते.

द्रवरूप इंधन असणार्‍या रॉकेट्समध्ये पुढील प्रकारच्या इंधनांचे मिश्रण वापरले जाते:

 • द्रवरूप हायड्रोजन (LH2) + द्रवरूप ऑक्सिजन (LOX) : स्पेस शटलच्या मुख्य इंजिनमध्ये हे मिश्रण वापरले जाते.
 • गॅसोलीन + द्रवरूप ऑक्सिजन :  रॉबर्ट गोडार्ड यांनी प्रारंभी हेच मिश्रण वापरले होते.
 • केरोसीन + द्रवरूप ऑक्सिजन : अपोलो प्रकल्पातील सॅटर्न-५ या रॉकेटमध्ये पहिल्या टप्प्यासाठी या मिश्रणाचा उपयोग करण्यात आला होता.
 • नायट्रोजन टेट्रॉक्साइड + मोनोमिथिल हायड्राझाइन : कॅसिनी इंजिनमध्ये या मिश्रणाचा उपयोग करण्यात आला.

क्रायोजेनिक इंजिनमध्ये सामान्यतः द्रवरूप हायड्रोजन आणि द्रवरूप ऑक्सिजन यांचा उपयोग केला जातो. (भारताच्या GSLV (जिओसिन्क्रोनस लाँच व्हेइकल) या भूस्थिर कक्षेत उपग्रह नेणार्‍या रॉकेटचा शेवटचा टप्पा क्रायोजेनिक इंजिनचा आहे.)  क्रायोजेनिक इंजिनमधील इंधनातील हायड्रोजन शून्याच्या खाली २५१ अंश सेल्सिअस तापमानाला, तर ऑक्सिजन शून्याच्या खाली १४७ अंश सेल्सिअस तापमानात द्रवरूप होतो. इतक्या कमी तापमानात दीर्घकाळ या वायूंना द्रवरूप अवस्थेत राखणे हा  एक अत्यंत बिकट प्रश्न आहे. द्रवरूप हायड्रोजनचा अनियंत्रितपणे द्रवरूप ऑक्सिजनशी जराही संपर्क आला तर भयंकर मोठा स्फोट होऊ शकतो, किंवा दोघांची अभिक्रिया होऊन निव्वळ पाणी (H2O) तयार होऊ शकते, जे की जळणारे इंधन म्हणून कामी येणं सध्यातरी शक्य नाही! तरीही अत्यंत अवजड उपग्रह अवकाशात नेण्यासाठी याच मिश्रणाचा उपयोग करण्यात येतो.

माहिती संदर्भ:

आंतरजाल (इंग्रजी विकिपेडिया, इस्रोचे अधिकृत संस्थळ, गूगल न्युज)

“Introduction to Astronomy and Cosmology” – Ian Morison, Wiley Publication

“अवकाश” – मोहन आपटे, राजहंस प्रकाशन

“The Satellite Experimenter’s Handbook” –  Martin R. Davidoff

Press Release by ISRO on July 9th, 2010

GSLV-F06 चे प्रक्षेपण अयशस्वी झाल्याविषयीची दैनिक सकाळवरील बातमी [दुवा]

धन्यवाद!


संबंधित लेखन

PG

विशाल तेलंग्रे

» लेखक सध्या माहिती तंत्रज्ञान शाखेत महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत. अवकाश, तंत्रज्ञान, पर्यावरण, राजकारण, रंगभूमी, कला-साहित्य इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी अनेक महत्वपूर्ण लिखान केलेले आहे. त्यांच्याशी आपण vishaltelangre.com या त्यांच्या संकेतस्थळावर, किंवा सुरूवात…, ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट या ठिकाणी संपर्क साधू शकता!

 1. संपूर्ण लेख आवडला, पण यातील : ‘संपूर्ण मानव-जातीला खुप फायदा होणार आहे’ हे वाक्य खटकते. ‘जे’ काही चालू आहे ते अंतराळातील वसाहतवाद या विषयाकडे झुकणारे आहे, आणि वसाहतवाद हा अधिपत्य गाजवणाऱ्या राष्ट्रांच्याच फायद्याचा असतो. 🙂 जी भूमी नविन वसाहत म्हणून मिळते, तेथिल स्थानिक देशोधडीला लागतात, हे सांगायला नको. (ब्रिटिश वसाहत आणि भारत, युरोपीय वसाहत आणि रेड इंडियन ), या विषयावरच – अवतार हा चित्रपट आहे, आपल्या शाळांमधे किंवा दैनंदिन जगण्यात हे सर्व सांगताना अंतराळ संशोधन म्हणजे : ज्ञानाची‌दारं उघडणं, मानव जातीला पोषक, इंधन प्रश्न सुटेल वगैरे पद्धतीने मांडला जातो, पण ग्राऊंड-लेवल रियॅलिटी म्हणजे ‘रिटर्न ऑन इऩेस्टमेंट’ हाच आहे, होता आणि असेल. (आणि आजचे सगळे व्यवासाय – टिव्ही, मोबाईल फोन आदी, याचेच परिणाम आहेत 🙂 ) कॉमन युथसाठी बुद्धीला आव्हान म्हणून जर यात जायच असेल तर ठिक पण यापलिकडॆ कॉमनमॅनला तसा विषेश थारा नाही. .. हे लिहिताना डिस्करेज करण्याचा उद्देश नाही, पण .. तळपत्या उऩ्हात पाणी म्हणणाऱ्या एखाद्याला डोक्यावरच्या सॅटेलाईटचा तसा काहीच फायदा नाही , हे ही‌ नक्की. अमेरिका, रशिया यांच्या यातील इन्वेस्टमेन्टची‌ मुख्य कारण ‘संरक्षण’ आहेत. आपल्याकडे अजूनतरी तेवढ्या पातळीवर त्याचा वापर होत असेल यात शंकाच आहे नाहितर दहशतवादी हल्ले झालेल्च नसते. शिवाय तू कितीही‌ ग्रेट टेक. बनवलीस तरी देशातील राजकारण आणि शास्कीय नोकरशहा त्याचा एक क्षणात कचरा करतील .. जय हे !

  • विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

   मलाही तुझे विचार पटलेत. शेवटी कोणत्याही गोष्टीमागे (मग ती एखादी अवकाश मोहिम का असेना) बनवणा‍र्‍याचा किंवा त्या गोष्टीशी संबंधित लोकांचा स्वार्थ तर नेहमीच असतो. असे जरी असले ना, तरीही त्यांच्या अशा हालचालींमुळे अनेक धुरीणांना त्यांच्यासारखं काही करण्याची प्रेरणा मिळते. उदाहरणे भरपूर आहेत, पण त्या गोष्टींचं आप्लिकेशनच जर गरज असलेल्या कामांसाठी होत नसेल, तर त्या गोष्टींचा कवडीमोल अर्थही उरत नाही, जसे की तू म्हणालास “तळपत्या उऩ्हात पाणी म्हणणाऱ्या एखाद्याला डोक्यावरच्या सॅटेलाईटचा तसा काहीच फायदा नाही..”.. हे एका ठिकाणी बरोबर आहे, पण ज्याने त्या गोष्टीसाठी दिवसरात्र घाम गाळला आहे, त्याच्या कष्टाच्या फलिताबद्दल (मग ते सफल असो किंवा असफल, त्याबद्दल शंका नाही) तरी आपण त्याला मान द्यायलाच हवा, पण त्यामागचे जे अव्वल व्यवसाय म्हणून, लोकांच्या जीवांशी खेळून, काळे पैसे कमावतात, त्यांना कधीच माफी नसावी. (सध्या चालू असलेल्या आयपीएल बाबतही असेच घडतांना दिसतंय, बि़चारे प्लेअर्स दिवसरात्र घाम गाळून टीमसाठी खेळत असतात, पण कोण जिंकणार असे ठरवणारे बोर्डरूममध्ये बसून पैसे मोजत असतात.) असो… विषय भरकतांना दिसतोय मी…! 😉

   पुर्णपणे ट्रान्सपरण्ट सिस्टीम, माणसाच्या दुनियेत तरी शक्य नाही, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालणं फार कठिण काम! (म्हणजे यंत्रयुगात ते शक्य होईल, असं मला मुळीच म्हणायचं नाहिये! 😛 )

   • अवांतर असले तरी, “बि़चारे प्लेअर्स दिवसरात्र घाम गाळून टीमसाठी खेळत असतात”
    एकदम अमान्य!!! फुकट कुणी खेळत नाही. टेस्ट मॅचसाठी हे फिट नसतात आणि आयपीएलच्या वेळी ठणठणीत होतात, हे घाम गाळण्यासाठी? पण तुझा लेख ग्रेट आहे (नेहमीप्रमाणेच).

    • हे मात्र बरोबर… कसोटी क्रिकेटसाठी उन्हा-तान्हात (किंवा थंड तापमान असतांना) खेळणार्‍या क्रिकेट प्लेअर्सपेक्षा तीन तासांमध्येच कसोटी मध्ये जेवढी कमाई होते, त्याच्या कित्येक पटीने पैसा मिळतो, तेव्हा त्यांचा घाम गळणे तर दूरच, डोक्यावरचा केसांचा भांगही(?) मोडत नाही!

     पण सांगायचेच झाले, तर मी वरील “बि़चारे प्लेअर्स दिवसरात्र घाम गाळून टीमसाठी खेळत असतात” उदाहरण यासाठी दिले होते, की बसल्या जागी करोडींची हेराफेरी करणारे मात्र त्या प्लेअर्सच्या खेळणीवर आपले खिसे भरत असतात… असो..

     आपल्या इस्त्रो वरही असा प्रसंग ओढवू नये ही सदिच्छा! ह्म्म, आपले शासन व नागरिक आज पूर्वीपेक्षा तरी अधिक सावध व जागरूक झालेले आहेत, ही गोष्ट तरी मला सध्या पटतेय!

  • सोमेश,
   अंतराळातील वसाहतवाद असो किंवा काहीही. संपूर्ण मानवजातीचे माहीत नाही, पण भारताला (किंवा स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करणार्‍या कुठल्याही देशाला) मात्र नक्कीच फायदा होतो. नवनवीन उपग्रह सोडण्यामागे नक्कीच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनेच सरकार आणि इस्त्रो पाहत आहे. अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञान वापरुन (किंवा वापरण्याचा प्रयत्न करुन, किंवा भविष्यात वापरण्यासाठीचे प्रयोग करुन) आपण त्यात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे उपग्रह नक्कीच हवामानाचा वेध, त्यातील बदल, त्याचा शेती आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर होणारा दूरगामी परिणाम यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शिवाय राष्ट्राच्या हद्दीचे हवाई सर्वेक्षण दूरसंवेदी (रिमोट संवेदी) पद्धतीने करुन मुलभूत सुविधांची व्यापक आखणी करण्यासाठी मदत होते. यामध्ये जसे रस्ते-जल-हवाई वाहतूक, पेय जल आणि सिंचनाच्या महाकाय योजना, पवनऊर्जेसाठी वार्‍याची वर्षभराची दिशा-वेग-तीव्रता मापन अशी अनेक उदाहरणे देता येतील. यातच तळपत्या उन्हात पाणी पाणी म्हणणार्‍याचा (इनडायरेक्ट का होईना) फायदा आला. नाही का? शिवाय अशा उपग्रहांच्या सेवा खाजगी क्षेत्राला व्यापारी तत्त्वावर खुल्या करुन ’रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ होतेच. हे मान्य की अजून आपण संरक्षणासाठी हवा तेवढा वापर करत नाही. पण आपण त्या दृष्टीने नक्कीच पावले टाकत आहोत.

 2. जालन्दर बनकर म्हणतात:

  धन्यवाद विशाल.खुप दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले.३-४ दिवसापुर्वी पेपरमध्ये भारताचा उपग्रह घेउन जाणारे यान असफल झाले,हे वाचले व येथे तुमचा लेख वाचायला मिळाला. क्रायोजेनिक इंजिन बद्दल व इंधनाबद्दल खुप सविस्तर लिहीले आहे.घन इंधन कोणते व त्याची सुध्दा थोडी माहिती लिहावी. पुढील नव्या विषयावरील लेखाची उत्सुकता आहे. परत एकदा धन्यवाद.

  • प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार जालंदर जी! आपल्या प्रोत्साहनपर प्रतिसादांमुळेच माझा लिहिण्याचा उत्साह अजुनही कायम आहे!

   घन इंधन हे दुसरे तिसरे काही नसून आपण जी फटाक्यांमध्ये (विशेषतः दिवाळीला उडवल्या जाणार्‍या रॉकेट्समध्ये) दारु (गन पावडर किंवा ब्लॅक पावडर) पाहतो, तीच आहे!
   अधिक माहितीस्तव सांगायचे झाल्यास, हे घन इंधन गंधक, कोळसा (लोणारी) आणि पोटॅशिअम नायट्रेट यांचे योग्य गुणात्तरीय प्रमाणातील एकजीव केलेले मिश्रण असते. हे घन इंधन लवकर प्रज्वलित होते, व त्यापासून (ज्वलनाने) अतितप्त वायू आणि थोडाफार स्थायू कचरा (कार्बनच्या रूपात) निर्माण होतो. शिवाय हे फार काळ टिकणारे असते. अतितप्त वायू तयार होण्याच्या व फार काळ टिकण्याच्या वैशिष्ट्यांमुळे पुरातन काळापासूनच्या युद्धांमध्ये वापरल्या गेलेल्या (अरब, मंगोली, चीनी लोकांकडून आणि भारतातील टिपू सुल्ताननेही इंग्रजांविरूद्ध) अग्निक्षेपणास्त्रांमध्ये अशा प्रकारच्या घन इंधनाचा वापर केलेला दिसतो. आजही बहुतेक देशांमध्ये क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यासाठी याच इंधनाचा मुख्यत्वे वापर केला जातो.

प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया देण्यासाठी तुम्ही सदस्य प्रवेश केलेला असणे गरजेचे आहे.

Powered By Indic IME